‘हाऊसिंग डॉट कॉम’चा अहवाल

घर खरेदी करताना लोक कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतात याची चाचपणी करण्यासाठी ‘हाऊसिंग डॉट कॉम’ने एक सर्वेक्षण केले. त्यात सुमारे ९३ टक्के लोक वास्तुशास्त्रानुसार घर खरेदी करण्याला प्राधान्य देतात, अशी माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, आपल्या देशात पूर्व, पश्चिम व उत्तरेकडील राज्यांपेक्षा दक्षिणेकडील राज्यांमध्ये खास करून बंगळुरू आणि चेन्नईमध्ये वास्तुशास्त्राचा प्रभाव अधिक असलेला दिसून येतो.

घर खरेदी करताना काय काय पाहावे? घरातील मोकळी जागा, आजूबाजूचा परिसर, मुलांसाठी सोयीची शाळा, इ. भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रात नवनवीन संकल्पना राबविणाऱ्या ‘हाउसिंग डॉट कॉम’ने एक अहवाल सादर केला आहे. त्यात घर घेताना भारतीयांची नेमकी मानसिकता आणि विचार काय असतो, याचे सर्वेक्षण केले आहे. गेल्या काही वर्षांत वास्तुशास्त्राच्या रचनेनुसार घर खरेदी करण्याचा ट्रेण्ड मोठय़ा प्रमाणात वाढला आहे, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. घर खरेदी करताना घराभोवतीच्या सोयी-सुविधांपेक्षाही आपले घर वास्तुशास्त्रानुसार आहे की नाही, या गोष्टीला प्राधान्यक्रम देतात. या सर्वेक्षणावरून जनमानसावर वास्तुशास्त्राचा किती मोठा प्रभाव आहे, ही गोष्ट प्रामुख्याने नमूद झाली.

रिअल इस्टेट क्षेत्रात घर खरेदी-विक्रीची प्रक्रिया ही बऱ्याचदा दलांलामार्फत किंवा एखाद्या मध्यस्थामार्फत होत असत परिणामी ही मंडळी बाजारपेठेचा मुख्य घटक असतात. परंतु या सर्वेक्षणात दलालांबरोबरच आíकटेक्ट आणि बिल्डर्स यांचादेखील समावेश करण्यात आला होता. शिवाय देशभरातील आठ विविध शहरांचा जसे- मुंबई, दिल्ली, जयपूर, कोलकत्ता, पाटना, अहमदाबाद, चेन्नई आणि बंगळुरू या शहरांचा आढावा घेण्यात आला.

घर खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या पाचपकी किमान चार जण तरी प्रत्यक्ष घर बघण्याआगोदर ते वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार योग्य आहे की नाही, हे तपासतात. विशेष म्हणजे, आपल्या देशात पूर्व, पश्चिम व उत्तरेकडील राज्यांपेक्षा दक्षिणेकडील राज्यांमध्ये खास करून बंगळुरू आणि चेन्नईमध्ये वास्तुशास्त्राचा प्रभाव अधिक असलेला या सर्वेक्षणात दिसून आला.

या सर्वेक्षणातील प्रमुख निष्कर्ष

वास्तुशास्त्रानुसार असलेल्या घराच्या मांडणीला प्राधान्य-

या सर्वेक्षणात समावेश करण्यात आलेल्या लोकांपैकी वास्तुशास्त्रानुसार दिशेला ३३ टक्के, अंतर्गत रचना आणि व्यवस्थेला ३० टक्के तर घरातील सकारात्मक ऊर्जेला २० टक्के लोकांनी प्राधान्य दिले. वायुविजन (व्हेंटिलेशन) या अतिमहत्त्वाच्या गोष्टीला मात्र १७ टक्के लोकांनी प्राथमिकता दर्शविली. यात दिशेमध्ये प्रवेशद्वारापासून ते स्वंयपाकघर, बाथरूम, देवघर आदी सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला होता.

घराचे प्रवेशद्वार हे वास्तुशास्त्राने सांगितलेल्या दिशांनुसारचे असावे असे ५६ टक्के ग्राहकांना वाटते. संपूर्ण घर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार मिळेलच असे नाही. तरीदेखील ८७ टक्के लोकांना आपले घर थोडय़ाफार प्रमाणात तरी वास्तुशास्त्राच्या नियमांना अनुसरून असावे असे वाटते.

प्रदेशानुसार बदलत जाणारा वास्तुशास्त्राचा प्रभाव

पूर्व, पश्चिम, उत्तर राज्यांपेक्षा दक्षिणेकडे वास्तुशास्त्राचा प्रभाव मोठय़ा प्रमाणावर असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले. दक्षिणेकडे त्यातही खासकरून बंगळुरू व चेन्नईमध्ये वास्तूच्या रचनेनुसार घरांना मोठय़ा प्रमाणावर पसंती दिली जाते असेही आढळून आले. या सर्वेक्षणात समावेश असलेल्या फक्त ९ टक्के लोकांना वास्तुशास्त्रानुसार घर नसले तरीही चालेल असे वाटले.

कुटुंबपद्धतीनुसार वास्तुरचनेला प्राधान्य

एकत्रित कुटुंबांपकी ७० टक्के ग्राहकांनी वास्तुशास्त्रानुसार घराच्या ट्रेण्डला पसंती दिली. तर ५० टक्क्यांपेक्षा कमी विभक्त कुटुंबांनी आणि अविवाहित मंडळींनी वास्तूच्या रचनेमध्ये फारसा रस नसल्याचे सांगितले.

व्यावसायिक मंडळींचा वास्तुशास्त्रावर असलेला प्रभाव

वास्तुशास्त्राप्रमाणे घराची रचना केल्यास त्या घराची भरभराट होते, अशी अनेक भारतीय मंडळींची धारणा आहे. यातही व्यापारी आणि व्यावसायिक मंडळींची संख्या अधिक आहे. ६५ टक्के व्यापारी तर ३० टक्के व्यावसायिक मंडळी वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार घर, ऑफिस, कारखान्याच्या रचनेला प्राधान्य देताना दिसतात. तर कामगार किंवा लघुउद्योगातील मंडळी घर विकत घेताना वास्तुशास्त्रापेक्षाही त्या जागेला अधिक महत्त्व देतात, अशी माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

एका बाजूला आपण विज्ञानाची कास धरून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची भाषा करीत असताना, घराभोवतीच्या सुख-सोयींपेक्षाही वास्तुशास्त्रानुसार घर खरेदी करण्याचा लोकांचा वाढता कल हा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखा आहे.

suchup@gmail.com