पनवेल बस आगारापासून सुमारे पाच किलोमीटरच्या अंतरावर जुना मुंबई-पुणे, मुंबई-गोवा, यंशवतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि पनवेल जेएनपीटी बंदराकडे जाणारा मार्ग असे चारही प्रमुख रस्ते एकाच वलयांकृत वळणावर जोडले जातात तो परिसर पळस्पे गावाजवळ येत असल्याने या वळणाला पळस्पे फाटा असे नाव पडले आहे. तालुक्यातील पळस्पे फाटा या परिसरातील शिरढोण, कोन, कसळखंड, कुडावे यासारख्या गावांचा परिसर विस्तारलेला आहे. सिडकोच्या नैना प्रकल्पाचा पहिला विकास आराखडा मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यातील नैनाचा प्रकल्प पळस्पे ते खारपाडा गावापर्यंतच्या जमिनींवर विस्तारलेला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे सुरू असलेले चौपदरीकरणामुळे या गावातील दळणवळण ही समस्या येत्या काळात दूरहोऊन या महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नैना प्रकल्पातील रहिवाशांना आणि मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दुहेरी डांबरी रस्त्यावरून आपले वाहन चालविण्याची आणि सुरक्षित प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

राज्य सरकारने पळस्पे फाटय़ापासून मालवाहू अवजड वाहनांना थेट उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) बंदरात जाण्यासाठी पळस्पे फाटय़ाच्या डोक्यावरून मोठा उड्डाण पूल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया ३० टक्के पूर्ण झाली असून, या उड्डाणपुलाचे काम लवकरच दृष्टिक्षेपात येईल. या पुलामुळे आणि नैना प्राधिकरणाच्या सुनियोजित शहरामुळे पळस्पे फाटा व इतर गावांची ओळख बदलून जाणार आहे. कोन आणि पळस्पे गावांजवळ अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरांच्या मोठय़ा गृहप्रकल्पाचे काम येथे सरकारने सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यातील मॅरेथॉन या गृहप्रकल्पामध्ये मुंबईचे गिरणी कामगार व झोपडपट्टी पुनर्वसन होण्यासाठी सरकार अग्रेसर आहे. कसळखंड या गावाजवळ रेल्वे यार्डचा मोठा प्रकल्प येत असल्याने रसायनी भागात जाणाऱ्या मालवाहू रेल्वेमार्गाचे सक्षमीकरण यानिमित्ताने पुढील काळात होताना आपल्याला दिसेल. राज्य सरकारकडून कोन गावाजवळ मुंबईच्या हिरे व्यापाऱ्यांसाठी व झवेरीबाजारासाठी मोठे व्यापारी संकुल बांधले जाणार आहे.

आरिवली गावाजवळ एमएसआरडीसी प्राधिकरणाचा सुमारे १० हेक्टर जागेवर हजारो घरांचा मोठा गृहप्रकल्प येत आहे. भोकरपाडा इथे एक मोठा गृहप्रकल्प होत आहे. सध्या याच परिसरात परसीपीना व सेनीव्हिस्टा या कंपनीने मोठी गुंतवणूक जमीन क्षेत्रात केलेली पाहायला मिळते. विरार-अलिबाग कॉरिडॉर रेल्वे प्रकल्पाचा मोठा भाग पळस्पे व भागातून जात असल्याने पळस्पे हा परिसर पनवेल तालुक्याचे  मोठे व्यापारी केंद्र बनणार आहे. या परिसरातील वाढते शहरीकरण लक्षात घेऊन या परिसरात दिल्ली पब्लिक विद्यालय आणि एमएनआर अशी दोन मोठी विद्यालये सुरू आहेत. ओएनजीसीच्या मोठा कामगार वर्गाची येथे वसाहत असल्याने यापूर्वीच येथे केंद्रीय विद्यालय आहे. याच परिसरातील शहरीकरणाचा अंदाज घेऊन नुकतीच एका कंपनीच्या व्यवस्थापकांनी किराणा मालाच्या घाऊक विक्रीच्या दुकानासाठी येथे जागा खरेदी केली आहे. कोन गावाजवळ होणाऱ्या म्हाडाच्या घरांमुळे पळस्पे परिसरात यापुढे व्यापारी संकुले व मोठय़ा वसाहती उभ्या राहिलेल्या पाहायला मिळतील.

आनंददायी रहिवास

विमानतळ, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, नैना प्रकल्प, भविष्यातील मेट्रो सेवा असे अनेक फायदे नवी मुंबईशी जोडले गेले आहेत.  त्यामुळे नवी मुंबई हे अत्याधुनिक शहरातील राहणीमानाचा अनुभव देणारे शहर आहे. परिणामी इथला रहिवास हा सुखद आणि आनंददायी आहे. हे शहर सोयीसुविधांनी परिपूर्ण  असल्याने अनेक ग्राहक इथे घर घेण्यास इच्छुक आहेत.

अशोक छाजेड अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, अरिहंत सुपरस्ट्रक्चर लिमिटेड