आवास  हे अलिबागपासून १०/१२ कि. मी.वर मुंबईला खेटूनच आमचं जोश्यांचे गाव! माझ्या आठवणीपासून गेल्या ३५/४० वर्षांत गावाचा आणि घराचाही कायापालट झालाय. पूर्वीचं आमचं कौलारू घरही आता दुमजली झालंय. कालानुरूप बदललंय. आजोबांचे वडील नेवरे सोडून इथे आले त्यालाही १२० वर्षे उलटून गेली. पूर्वी पेंढय़ाच्या घरात राहणाऱ्या आजोबांनी १९६० च्या सुमारास मोठं कौलारू घर बांधलं. किराणा मालाचं दुकान सांभाळणाऱ्या आजोबांनी घर बांधताना बऱ्याच गोष्टीत दूरदृष्टी ठेवली होती. त्या काळात आमच्या घरात यायला गाडी रस्ता किंवा उतार-रस्ता केला होता, जो अजूनही आमच्या घराची खूण म्हणून परिचित आहे. आम्हा मुलांसाठी धावायची घसरगुंडी! या रस्त्याने उद्या आपली मुले-नातवंडे गाडय़ा वर आणून अंगणात उभ्या करू शकतील, अशी कल्पना आणि इच्छाही!! त्याच्या बाजूला ३/४ पायऱ्या.

१९७०-७२ला घरात पोस्ट आले. मला अस्पष्ट आठवतं तो बाहेरच्या गंजांवर लावलेला भारताचा मोठा नकाशा, बाजूला टांगलेली लाल पोस्टाची पेटी, येणाऱ्या माणसांना बसायला बाक, कोपऱ्यात मोठा काळा टेलिफोन आणि उंच लाकडी खुर्चीत बसलेले, नाकावर सरकलेल्या चष्म्यातून बाहेर नजर ठेवणारे आजोबा.

तेथून पायरी चढून गेलं की आत आजी-आजोबांची खोली आणि त्यापुढे दक्षिण दरवाजाची छोटी खोली. ही आजीची आवडती जागा असावी. स्टोव्ह साफ करायला, वाती कापायला आणि मुख्य म्हणजे माझ्याशी पत्ते खेळायला आजी इथेच बसायची. आमचा घडय़ाळ-डाव खूप वेळा रंगायचा तिथे. आतल्या कुठल्याच खोल्यांना दरवाजे नव्हते. त्याच्या डाव्या बाजूला मोठे माजघर. माजघरात स्वयंपाक घराजवळच्या कोपऱ्यात देवघर. समोर चौरंग ठेवलेला. त्यावर बसून आजोबा पूजा करायचे. माजघरात वावर जेवणाच्या पंगतीपुरता आणि रात्री निजायला. बाकी सारा वेळ माजघराच्या पुढच्या पडवीत मोठय़ा झोपाळ्यावर असायचा. दिवाळी आणि मेच्या सुट्टीतला दंगा आणि आरडाओरड तिथेच. नंतर खालेल्या आजीच्या ओरडय़ाने झोपाळाही आमच्याबरोबर शांत व्हायचा.

आता तो झोपाळा पुढल्या पडवीत आलाय. आजोबा गेल्यावर ८/९ वर्ष आजीने सांभाळलं हे घरं. मुंबईला मुलं बोलवत असली तरी ते घर आणि घराशी असलेलं नातं जपत राहिली. त्यावेळी ना टी. व्ही होता ना फोन. रेडिओ ऐकत, नातवंडांची वाट बघत झोपाळ्यावर बसलेली आजी जणू आठवणीत कोरून गेलीय. आजीच्या कणखर स्वभावाने ते घर आणि घराचं घरपण टिकून राहिलं. त्या जागेचा शतकमहोत्सव १९८४ साली केला. दुर्दैवाने तो पाहायला आजोबा नव्हते; पण आजीने सर्वाबरोबर साजरा केला.

मागल्या पडवती झोपाळ्यामागे आजी गजांना सुतळीने बांधलेल्या मोठय़ा रवीने रांजणात लोणी काढायची. तिथेच बाजूला आम्हा मुलांची न्याहरीची जागा. कण्हेरी, मऊ-भात लोणचं, चुलीवर भाजलेला पोह्यचा पापड, भरपूर नारळ आणि कैरी घालून केलेले पोहे असा आलटून-पालटून बेत असायचा. मे महिन्याची आणि दिवाळीची देखील सुट्टी आवासच्या घरीच असायची. बाहेर गावात कुठे गेलो की कोणीतरी विचारे, ‘काय गो, पोस्त-मास्तर जोश्यांची नात ना तू?’ आजोबांमुळे झालेली ही ओळख त्या घराचीपण ओळख होती.

मेच्या सुट्टीत आजोबा वाडीतले रायवळ वेचून बादलीत धुऊन टाकून ठेवायचे. मग आमचा नाश्ता तोंड धुतल्यावर लगेचच चालू व्हायचा. कोणी वाडीत कोय फेकली की कुठूनतरी आवाज यायचा, ‘अरे, फेकू नका इकडे तिकडे, वाडीत खड्डय़ात टाका.’ दुपारी कैरी बरोबर खायला मागल्या पडवीतल्या कोनाडय़ातल्या बरणीतून मीठ आणि तिखट चोरून आणणे म्हणजे जरा कौशल्याचं काम असे. बाकीचा वेळ वाडीत हुंदडणे, संध्याकाळी समुद्रावर जाणे.

दिवाळीत मागच्या अंगणात पहाटे चुलीपुढे बसायची मजा काही वेगळीच. आई, आत्या, काकू, तुळशीवृंदावनापुढे पाट ठेवून त्यावर बसवून तेल चोळायच्या, उटणं लावायच्या आणि मग कढत पाण्याने धोंडीवर अंघोळ. मग सकाळी वाडीत आजोबांबरोबर शिंपण करायला जायचं. पाण्याचे छोटे बांध घालायचे, पोगीने झाडांच्या मुळांवर आळीतलं पाणी हळुवारपणे उडवायचं, फुलं काढायची, पानं गोळा करायची. आंघोळ झाल्यावर आजोबांबरोबर औदुंबराच्या झाडाची पूजा करायला जायचं- हातात घंटा आणि तांब्यात पाणी घेऊन. औदुंबराची पूजा करताना आजोबा पाणी शिंपडत आणि नंतर उरलेलं पाणी बाजूला ओतत. तेव्हा भर दुपारी ते पाणी मातीत पटकन झिरपे- कळेल न कळेल असा आवाज करत. मग तिथल्या मंद फुलांचा, मातीचा आणि उदबत्तीचा मिश्र सुगंध नकळत नाकात शिरे. तो वास आजही त्या घराशी कायमचा जोडला गेलाय. आताही ते जुनं घर आठवलं की त्या गंधाचीही आठवण येते. नंतर जेवल्यावर माजघरात शेण लावायचं. कसतरी उरकून टाकायचं काम. मोकळ्या वेळात वाडीत खेळणे,  झाडावर चढणे, अंगणात रांगोळीसाठी सारवणे, रांगोळ्या काढणे, फटाके उडवणे.. अशी धम्माल असे.

अशाच एका दिवाळीतलं घराचं चित्र स्मरणवहीचं पहिलं पान बनून गेलंय. दिवेलागणी नंतर आजोबा देवळात जाऊन आले की फटाके उडवायचे हा प्रघात. माझी मजल अनार आणि भुईचक्रापर्यंतच. त्याच्या लखलखाटात घर उजळून निघे. अंगणात फटाके लावताना घराच्या, झाडांच्या सावल्या पडत. असं वाटायचं की हे सारेही आपल्याबरोबर दिवाळी साजरे करताहेत. फटाके उडवून झाल्यावर, सगळे घरात गेल्यावर फुलबाजांच्या काडय़ा वाकवत, विझवत, कचरा गोळा करत असताना शांत, थंड, अंधाऱ्या अंगणातली प्राजक्ताच्या खाली घातलेली ठिपक्यांची रांगोळीही बाजूच्या पणतीच्या प्रकाशात सारं घरं न्याहाळायची. मग तिच्याबरोबर ते कौलारू घरही चमकू लागायचं. असं प्रकाशाने, तेजाने भरलेलं घर डोळ्यात साठवून ठेवलंय.

आता घर पुळष्कच बदललं. गेल्या पिढीतल्या आत्याचं लग्न माजघराने पाहिलं तसंच आमच्या पिढीतल्या भावाचं लग्नही. घराने नव्या सूनेचं स्वागत केलं आणि पुढल्या पिढीतल्या नातवाची मुंजही डोळे भरून पाहिली. घराने त्याचा वसा सोडला नाहीये. खूप नव्या सोयी, नवी माणसं साऱ्यांना आपलंसं करून पुढे जात राहील. आज काका-काकू या वयातही घराचं घरपण जपतायत.

आमचं बालपण समृद्ध करणारी माणसं एकत्र बांधून ठेवणारं ते घर होतं आणि आजही आहे याचा आनंद उपभोगत राहू.

संध्या रानडे sandhyaranade.vinayak@gmail.com