डॉ. शरद काळे

आपल्या घराच्या परिसराचा शहराशी, राज्याशी, देशाशी आणि पर्यायाने वसुंधरेशी अत्यंत जवळचा संबंध असतो. पण रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण ते विसरून जातो. किंवा जीवनातील कर्तव्ये बजावत असताना या महत्त्वाच्या घटकाचे महत्त्व वाटेनासे होते. प्रत्येक माणसाच्या बाबतीत हे जेव्हा घडू लागते त्याचे त्या स्थानिक पर्यावरणावर जे परिणाम होतात, त्यांचाच एकत्रित परिणाम म्हणजे ग्लोबल वॉìमग किंवा जागतिक तापमानवृद्धी. आपल्या घराच्या आसपासचे पर्यावरण आहे त्यापेक्षा १ ते २ डिग्री सेल्सिअस शीतल ठेवता आले तर त्याचा एकत्रित परिणाम होऊन जागतिक तापमान आपण सर्व मिळून १ ते २ डिग्री सेल्सियसने शीतल ठेवू शकलो तर ग्लोबल वॉìमगचा धोका अर्ध्यावर कमी करता येईल. हे स्वप्न वाटेल काही लोकांना आणि त्यावर विश्वासदेखील बसणार नाही. पण शांतपणे विचार केला तर जागतिक तापमानवृद्धी रोखण्यासाठी हाच एक मार्ग आहे असे लक्षात येईल.

घर आणि घराचा परिसर यात आपली बाग येते, आपले वाहन येते, आपले अन्न आणि स्वयंपाकघर येते आणि आपल्या जीवनशैलीशी जोडला गेलेला घराचा इतर भाग आणि यातून निर्माण होणारा कचरा येतो. या सर्वाच्या अतिवापरातून किंवा त्यांना हाताळण्यासाठी वापरत असलेल्या अनियंत्रित प्रणालींमुळे आपण आपल्या घरातून जी ऊर्जा खर्च करीत असतो तिचा शेकडा ३०-३५ भाग हा पर्यावरणात उष्णतेच्या स्वरूपात सोडला जातो. ही उष्णता मग एकत्रित होत जाते आणि वातावरणात फेरफार व्हायला सुरुवात होते.

सन १९६५ मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे ५० कोटी एवढी होती, आज ती १३६ कोटींच्या घरात पोहोचली आहे. म्हणजे त्यात २.७५ पटीने वाढ झाली आहे. पण त्या वेळी म्हणजे १९६५ मध्ये जेवढे लोक दारिद्रय़रेषेखाली होते त्यात घट होऊन आज त्यांची संख्या जवळजवळ २० ते २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. याचा अर्थ मध्यम आणि उच्च मध्यम गटात ती वाढ सामावली गेली आणि इतक्या लोकांच्या जीवनशैलीत पशामुळे आणि विज्ञानातील भौतिक सुधारणांमुळे खर्चाची ताकद वाढली. याचा दृश्य परिणाम वाहनांची संख्या, कचऱ्याचे प्रमाण आणि औद्योगिकी प्रदूषण यांचे प्रमाण प्रचंड वाढले. एक उदाहरण वाहनांच्या संख्येचे घेता येईल. सन १९६५ साली सायकलींचे आणि बसेसच्या असलेल्या या शहरात आता ३५ लाख वाहने रोज रस्त्यावर धावत आहेत! तीच स्थिती बंगलोरची आहे. तिथे आता ७५ लक्ष वाहने रस्त्यावर धावत आहेत. म्हणजे सन १९६५ साली जेवढी उष्णता आपण एकत्रितपणे बाहेर सोडत होतो त्या एककात कमीतकमी ५ ते ६ पटीने तरी आता वाढ झाली आहे. ज्याला लॉग प्रमाण म्हणतात. तशा प्रमाणात ही वाढ होते आहे आणि ती रोखली जाणे यासाठी प्रत्येकाने आपला कार्बन ठसा कमी केला पाहिजे.

आपला कार्बन ठसा कमी कसा करता येईल यासाठी ज्या उपाययोजना करावयाच्या आहेत त्यात घरातील बागेचे आणि वृक्ष लागवडीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. घरात टेरेस गार्डन आणि इमारतींसाठी व गृहनिर्माणसंस्थांसाठी वृक्ष लागवड हे पर्याय आपण वापरायला हवेत. जागतिक स्तरावर पाहिले तर माणशी ७१६ झाडे सध्या आहेत. पण हे प्रमाण लोकसंख्येशी सम नाही. कॅनडामध्ये माणशी ८९५३ झाडे आहेत तर ब्राझीलमध्ये हे प्रमाण माणशी १४९४ आहे. चीनमध्ये हे प्रमाण माणशी १०२ झाडे आहे आणि भारतात मात्र ते माणशी २८ झाडे एवढे कमी आहे! स्वित्र्झलडसारख्या थंड वातावरणातदेखील माणशी ६० झाडे आहेत. जेवढी झाडे जास्ती तेवढे प्रदूषण कमी होते. आणि माणसांची संख्या जशी वाढत जाते तसे प्रदूषण लॉग प्रमाणात वाढत जाते. म्हणून सर्वप्रथम आपल्याला गरज आहे ती आपली जंगले घनदाट करण्याची.

प्रत्येकाच्या नावे अजून ५० ते ६० झाडांचा संकल्प करून तो अमलात आणण्यासाठी गृहनिर्माणसंस्थांनी आपला खारीचा वाटा उचलून हा रामसेतू पूर्णत्वाला नेण्यास मदत केली पाहिजे. आपल्याकडे कायद्याने आता प्रत्येक इमारतीच्या भोवती हिरवा पट्टा सक्तीचा केला आहे. पण प्रत्यक्षात ते येण्यासाठी नागरिकांनी सजग असणे आवश्यक आहे. भारतातील सिक्कीम या राज्याला जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचे ‘उत्कृष्ट धोरण ऑस्कर’ हे २०१८ चे प्रथम पारितोषिक १०० टक्के सेंद्रिय राज्य म्हणून दिले आहे, ही प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानास्पद घटना आहे. सन २००३ मध्ये सिक्कीमने रासायनिक खतांची आयात पूर्ण बंद केली आणि प्रत्येक शेतकऱ्याची जमीन फक्त सेंद्रिय खतेच वापरते.  सिक्कीम हे जगातील पाहिले सेंद्रिय राज्य ठरले आहे. या राज्यात रासायनिक कीटनाशकांवरदेखील पूर्ण बंदी घातलेली आहे. सेंद्रिय खतांवर शेती होऊ शकते याचे उत्तम उदाहरण आपल्याला सिक्कीमने घालून दिलेले आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशाला कृषी क्षेत्रात जे खत लागते ते सर्व सेंद्रिय करता येणे शक्य आहे. पण प्रत्यक्षात ते येणे सोपेदेखील आहे आणि अवघडदेखील! प्रत्येक घराने जर आपल्या भाजीपाला आणि फळांच्या टाकाऊ पदार्थाचे सेंद्रिय खत केले तर दरमहा कमीतकमी १० किलो खत आपण बनवू शकतो आणि त्यातून ४० ते ५० किलो भाज्या आपण वाढवू शकतो. भारताच्या स्तरावर हे गणित अत्यंत मोठे होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने व सेंद्रिय शेतीला ते वरदान असेल यात शंकाच नाही. एका घराला वार्षिक जो भाजीपाला लागतो त्याचा काही भाग तरी तो घरी पदा करू शकतो. यात कार्बन ठसा किती तरी प्रकारे कमी होईल.

मुख्य म्हणजे घरटी कमीतकमी ३० किलो हिरवा कचरा महापालिका किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना उचलावा लागणार नाही व डिम्पगवर तो न गेल्यामुळे तिथल्या मिथेन निर्मितीमध्ये लक्षणीय घट होईल. घरटी महिन्याला ३० किलो कचरा कमी झाला म्हणजे १०० फ्लॅट असलेल्या गृहनिर्माण संस्थेतील ३ टन कचरा कमी झाला आणि वर्षांला ३६ टन कचरा कमी झाला! या ३६ टन कचऱ्याचे मिथेन मूल्य १५ टन कार्बनडाय ऑक्साइड एवढे आहे. पर्यावरणाच्या भाषेत सांगायचे तर एक टन कार्बनडाय ऑक्साइड आपण हवेत जाण्यापासून रोखला तर १ सर्टफिाइड रिडक्शन इन कार्बन एमिशन (सीईआर) आपल्याला क्रेडिट मिळते. आता हे क्रेडिट पशाच्या स्वरूपात मिळणार नाही. पण १०० फ्लॅटनी आपला कचरा डिम्पगला जाऊ दिला नाही म्हणजे दर वर्षांला प्रत्येक कुटुंबाने फक्त प्रतिदिन १ किलो कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी त्या कुटुंबाला वसुंधरेकडून .३ सीईआरची पावती मिळणार आहे. ही पावती लिखित स्वरूपात नसली तरी जागतिक तापमानवृद्धी त्यामुळे रोखण्यास मदत मिळेल. जर कोरडा कचरा आपण डिम्पगसाठी जाऊ दिला नाही तर प्रत्येक कुटुंबाला अजून १तरी वार्षिक सीईआर मिळू शकेल.

आपण या कचऱ्याचे काय करायचे तर तो वेगवेगळा ठेवून योग्य त्या ठिकाणी पाठविला जाईल याची दक्षता घ्यावयाची आहे. त्यासाठी तुमच्या गृहनिर्माणसंस्थेतील सफाई कर्मचारी उपयोगी पडतील आणि त्यांचे ही उत्पन्न त्यातून वाढू शकेल. फक्त आपण त्यात वाटा मागू नये अशी माफक अपेक्षा आहे.  पुनर्रचक्रांकण वाढल्यामुळे सर्वच मूलतत्त्वांचे शाश्वतमूल्य वाढेल आणि आपली वसुंधरा जोमाने आपल्या पुढील पिढय़ांना तेवढय़ाच उत्साहाने मदत करू शकेल. जर तुमच्या गृहनिर्माणसंस्थेत महानगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गाडय़ा आपण बंद किंवा अगदी कमी करू शकलो तर उकिरडा मुक्त भारताचे स्वप्न आपण साकार करू शकतो. आणखी कोणते सीईआर आपण मिळवू शकतो आणि वसुंधरेची मदत करू शकतो याची संक्षिप्त माहिती अशी आहे.

कचऱ्याचे पुनर्चक्रांकण व्यवस्थित व्हावे यासाठी आपल्या घरातील कचरा वेगवेगळ्या स्वरूपातच ठेवा.

ताटात अन्न टाकू नका आणि अन्न जेवढे हवे त्या प्रमाणातच शिजवा. सणावारी जास्ती प्रमाणात शिजविलेले अन्न उरले तर वेळीच ते गरजूंच्या मुखात जाईल याची काळजी घ्या, म्हणजे ते उकिरडय़ावर जाणार नाही.

आपल्या घरातील भाजीपाल्याचे अपशिष्ट, अंडय़ाची आणि फळांची साले आपल्या घरातच खतात परिवर्तित करा आणि घरीच या खताचा भाज्या आणि फुले वाढविण्यासाठी वापर करा.

आपल्या घरात ओला कचरा राहिला नाही, खरकटे हद्दपार झाले आणि स्वयंपाकघरातील सिंकमध्ये खरकटी भांडी रात्रभर ठेवण्याची सवय मोडली तर कीटनाशके न वापरता झुरळे नाहीशी होतील.

घरात जुने झालेले कपडे कचऱ्यात न टाकता वेगळे ठेवा आणि त्यांचे पुनर्चक्रांकण करता आले तर करा नाहीतर जे करीत असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवा.

दिवाळीच्या खरेदीचे पॅकिंग खोकी आणि इतर गोष्टी वेगळ्या ठेवून त्या इमारतीच्या सफाई कामगारामार्फत पुनर्चक्रांकणासाठी पाठवा. हे आपले काम नाही म्हणून फक्त फेकून द्यायचे टाळा. जुने चपला-बूट दुरूस्त करून गरजू लोकांपर्यंत पोहोचवा.

आपले घर आणि इमारत शून्य कचरा व्यवस्थापन करू लागेल याकडे लक्ष द्या. आपल्या घरात वातानुकूलित यंत्रणा असेल तर तिचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सियसपेक्षा कमी ठेवू नका. त्यामुळे वीज बिलाची बचत होईल आणि पर्यावरणात जाणाऱ्या उष्णतेत घट होईल. वतानुकूल यंत्र लावून पांघरूण घेऊन झोपणे ही जीवनशैली पर्यावरणास अनुकूल नाही. याच पद्धतीने रेफ्रिजरेटरचा वापर तारतम्याने करा.

प्रेशर कुकरची शिट्टी होऊ देऊ नका. शिट्टी होणे म्हणजे पदार्थ शिजण्यासाठी आवश्यक असलेली उष्णतेने संपृक्त झालेली दाबाखालील वाफ हवेत जाऊन जागतिक तापमानवृद्धी होण्यास मदत करणे असा होतो हे लक्षात ठेवा.

आवश्यक तेवढय़ातच विजेचा वापर करा.आपल्या घरातून सरासरी २५ ते ३० टक्के विजेचा अपव्यय होत असतो हे लक्षात घेऊन तो थांबविण्यासाठी उपाययोजना करा.

आपल्या भोवती छान बाग निर्माण करा आणि सदैव हिरवाई राहील याची काळजी घ्या. कमीतकमी ५-६ झाडे लावून त्यांची निगा राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. झाडे लावण्यासाठी आजूबाजूला जागा नसेल तर ज्या ठिकाणी अशी झाडे लावणे शक्य असेल तिथे ती लावण्यासाठी आर्थिक मदत द्या. आपण वापरत असलेल्या ऑक्सिजनच्या निसर्गातील समतोलासाठी, दूषित वायूंचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जागतिक तापमानवृद्धी वाढविण्यास कारणीभूत होणाऱ्या हवेतील कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि शहरातील व परिसरातील सौंदर्यात या हिरवाईने भर घालण्यासाठी तसेच पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या पक्ष्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही झाडे उपयोगी पडणार आहेत.

आपल्या स्वयंचलित वाहनांची काळजी घेऊन ती पर्यावरणाशी समतोल राखतील याकडे लक्ष द्या. शक्य तिथे सायकलचा वापर करा आणि पेट्रोलियम पदार्थावर चालणाऱ्या गाडय़ा आपल्याकडे असतील तर कमीतकमी दोन दिवस तरी त्या वापरू नका. रस्त्यावर खाजगी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी, प्रदूषण या समस्या हाताबाहेर चाललेल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशा प्रवाशांच्या अभावी धोक्यात येत आहेत आणि त्याचा फटका सर्व देशाला सहन करावा लागत आहे. युरोपातील आणि चीनमधील वर्षांतील सहा ते सात महिने होणारा सायकलींचा वापर आपल्याला बरेच काही शिकवून जातो.

हे सर्व उपाय सरसकट सर्वाना करता येईलच असे नाही. शिवाय, ‘मी हे सर्व का करावे?’ अशी मानसिकता असलेली मंडळीदेखील समाजात भरपूर आहेत. आपल्या कचऱ्याचे नियोजन आपण करणे याचा अर्थ स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत करणे आणि त्यांची कामे हलकी करणे असा नसून उकिरडामुक्त समाज निर्माण करणे असा घेतला तर हे सर्व करता येईल आणि घरटी कमीतकमी ५-६ सीईआर मिळवून आपला कार्बनचा ठसा कमी करता येईल. त्यामुळे पर्यावरणाची आणि त्यातून वसुंधरेतील जीवसृष्टीची अक्षयता कायम राखली जाईल. भारतासारख्या खंडप्राय देशात तर हे होणे अत्यंत गरजेचे आहे. घराचे घरपण राखले तरच वसुंधरा संतुलित राहणार आहे हे सर्वानी मनापासून आचरणात आणले पाहिजे. भारतासारख्या समस्याप्रधान देशात हे करण्यासाठी आपल्याला दोन पिढय़ांचा वेळ लागेल, जर आज कामाला सुरुवात केली तर!

निसर्गदेवते तुझ्यासाठी..

निसर्ग देवी तुला भरवितो घास हा चिमणीचा।

सांग जनांना जाई क्षयातून मार्ग अक्षयतेचा ॥ धृ॥

कचराकुंडी दिसते का हो कुठे निसर्ग मंदिरी?

ठेवा ध्यानी सदासर्वदा नकोच ती आमुच्या दारी

कचरा कशास का हो म्हणता तो असे अविनाशी

लक्ष असू द्या जे नको तुम्हाला ते गमे दुसऱ्याशी

निसर्ग देवी तुला भरवितो घास हा चिमणीचा।

सांग जनांना जाई क्षयातून मार्ग अक्षयतेचा ॥ २॥

निरुपयोगी नाही काही येथे सृजनशील धात्री

विज्ञान देतसे धडे नित्य दृष्टी हवी तव नेत्री

साल केळीची फेकून करिता अपमान सृष्टीचा

असेल का साल केळीला विचार पुढील पिढीचा

निसर्ग देवी तुला भरवितो घास हा चिमणीचा।

सांग जनांना जाई क्षयातून मार्ग अक्षयतेचा ॥ २॥

उत्पत्ती, वृद्धी अन् क्षय असे हा मार्ग जीवनाचा

क्षयातून होई नवनिर्मिती नियम मेदिनीचा

वसुधव कुटुंबकम् असे गुरू मार्ग भविष्याचा

निसर्गऋण फेडीत राहू ध्यास पर्यावरणाचा

निसर्ग देवी तुला भरवितो घास हा चिमणीचा।

सांग जनांना जाई क्षयातून मार्ग अक्षयतेचा ॥ ३॥

sharadkale@gmail.com

लेखक भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक आणि सिम्बायोसिस कचरा स्रोत व्यवस्थापन केंद्र येथे प्राध्यापक आहेत.