सीमा पुराणिक

‘वास्तुसंवाद’ या लेखमालेच्या निमित्ताने आपणा सर्वाशी सुसंवाद साधायला मला नेहमीच आनंद वाटतो. आणि याच लेखनसंधीचा अचूक फायदा घेऊन मी आपणा सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा न देता कशी राहीन?

वाचकहो, मागील लेखात आपण अंतर्गत सजावटीच्या पूर्वनियोजनाच्या कामाचा विचार केला. अशा प्रकारे सर्वार्थाने नियोजन करून कंत्राटदार, रचनाकार आणि उपभोक्ता या तिघांनीही सुसंवाद साधून अंतर्गत सजावटीच्या अंमलबजावणीच्या कामाचा श्रीगणेशा केला असेल तरीही अंतर्गत रचनेची अंमलबजावणी सुरू करताना तोडफोडीच्या कामात पहिला हातोडीचा घाव घालण्यापूर्वी सावधान असा.

आपल्या गृहसजावटीच्या कामाच्या या टप्प्यावरील काही सुरक्षिततेचे आणि सावधगिरीचे अलिखित नियम (Precautionary Measures) खास तुमच्यासाठी..

इमारतीस काही वर्षे होऊन गेली असतील आणि अशा इमारतीतील घराचे किंवा फ्लॅटचे नव्याने अंतर्गत काम काढणार असाल तर साहजिकच सिव्हिल, प्लिम्बग आणि इलेक्ट्रिकल काम येथे करावयाचे असते. तेव्हा कामाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी या सर्व कंत्राटदाराची तेथे गरज असते.

सर्वप्रथम जुने इलेक्ट्रिकल कनेक्शन काढून टाकणे महत्त्वाचे. जुन्या सिव्हिल कामातील तोडफोड करताना ही सुरक्षितता बाळगणे अत्यंत गरजेचे असते. तसेच जुन्या वायर्स काढून टाकून इलेक्ट्रिशिअनने सर्व कंत्राटदारांना कामासाठी आवश्यक असतील तेवढे दोन ते तीन तात्पुरत्या स्वरूपातील स्वीच-बोर्ड आणि लाइट-पॉइंट्स चालू करून देणे आवश्यक असते. बरेचदा काम चालू असताना प्लग पिन न लावताच वायर्स सॉकेटमध्ये टाकल्या जातात, हे देखील धोक्याचे असते. सराईतपणे या गोष्टी साईटवर घडत असतात. याऐवजी इलेक्ट्रिशिअनने व्यवस्थित स्विच सॉकेट आणि प्लग पिन तयार करून दिली तर संभाव्य धोके टाळता येतात.

तसेच प्लिम्बग कामाच्या बाबतीतही. सिव्हिल कामातील तोडफोड चालू करण्यापूर्वी जुने नळ आणि प्लिम्बग कनेक्शन काढून टाकून साईटवरील कामास आवश्यक असा एक पाण्याचा नळ चालू ठेवावा. यामुळे दररोज संध्याकाळी काम संपल्यानंतर नळ चालू राहण्याची शक्यताही संपुष्टात येते. तसेच आपल्या फ्लॅटपुरता स्वतंत्र असा एक मेन नळ लावून घेतल्यास आपले काम चालू असताना प्रत्येक वेळेस सोसायटीमधील मेन लाइन बंद करावी लागणार नाही आणि इतर फ्लॅटधारकांची गैरसोय होणार नाही.

कंत्राटदाराने काम चालू करण्यापूर्वी फ्लॅटमध्ये कोठेही लिकेज प्रॉब्लेम्स असतील तर ते नमूद करणे, त्याची कारणमीमांसा करणे आणि त्यानुसार उपाययोजना करणे हे महत्त्वाचे. अन्यथा पूर्वी असलेले लिकेज प्रॉब्लेम्स नंतर विसंवादाला कारणीभूत होतात. नवीन काम करताना आणि वॉटरप्रूफिंग करतानादेखील आवश्यक असलेली तांत्रिक प्रक्रिया (Procedure) काळजीपूर्वक आणि जबाबदारीने अनुसरणे हे तर अध्याहृतच असते.

फ्लोअिरगचे काम करायचे असले तरी तोडफोड करताना सुरुवातीच्या काळात कधीही जुने फ्लोअिरग तोडू नये. इतर सर्व सिव्हिल कामे चालू असताना कमी अधिक पाण्याचा वापर होऊन खालच्या मजल्यावर सिलिंगला ओल आली तर तेही विसंवादाला निमंत्रण देईल. वाचकहो, या लिखाणाचे कारणच वास्तुसंवाद, अर्थात सुसंवाद आहे हे पुन्हा एकदा नमूद करू या.

असो, सुतार बोलावून जुने फिक्स्ड फर्निचर काही असेल तर काढून घेणे, स्वयंपाकघरातील जुने ट्रॉली वर्क काढून टाकणे, पडद्याचे जुने रॉड, वॉल हँगिंग्ज वगरे सर्व गोष्टी व्यवस्थित काढून घरातील व्यक्तीच्या ताब्यात देणे हे सिव्हिल वर्क सुरू करण्याआधीच होणे योग्य असते. तसेच, जुन्या परंतु सुस्थितीतील फर्निचरचे स्वरूप बदलून पुन्हा नव्याने वापरण्यासंबंधित योग्य तो निर्णय घेणे आणि हा विचार करून मगच त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे उत्तम. इमारत खूप जुनी असेल तर बरेचदा प्लास्टरची मजबुती कमी झालेली असते आणि ग्रिलचे अँकर किंवा होल्डफास्टस बरेचदा खिडक्यांच्या फ्रेम्समध्ये बसवलेले असतात. म्हणूनच खिडक्यांच्या जुन्या फ्रेम्स काढण्याआधी तेथील ग्रिल वर्कची मजबुती पडताळणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते; अन्यथा जुने ग्रिल आधी काढून ठेवून मगच फ्रेम्स काढाव्यात.

तोडफोडीच्या कामाची सुरुवात करण्यापूर्वी इमारतीच्या स्ट्रक्चरल मेम्बर्सचे स्थान निर्देशित करून कामगारांना त्यासंबंधात सूचना आणि जाणीव करून देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. तोडफोड चालू असताना स्ट्रक्चरल मेम्बर्सना जराही धक्का लागता कामा नये. तसेच तोडफोड करताना विशेषत: त्यासाठी मशीन वापरताना जास्त काळजी घ्यावी. खूप जुनी इमारत असेल तर हेवी डय़ुटी मशिन्स न वापरणे हेच योग्य होय.

तसेच सिमेंट बॅग्स, रेती किंवा टाईल्स बॉक्सेस याचा साठा खोलीच्या मध्यभागी न करता भिंतीलगत थोडय़ा थोडय़ा प्रमाणात ठेवावे. तसेच एकदम सर्व मटेरियल साईटवर आणले तर ते ठेवण्यासाठी जागेचा प्रश्न येतो. म्हणून सुरुवातीच्या काळात बेसिक मटेरियल जसे की रेती, सिमेंट, प्लिम्बगचे कन्सिल कामाचे पाइप्स हे आणले आणि मग कामाच्या गतीनुसार एकेक फिनिशिंग मटेरियल आणले तर उत्तम. म्हणजे स्लॅबवरचे वजन मर्यादित राहील आणि महागडय़ा फिनिशिंग मटेरियलची नासधूसदेखील होणार नाही. वॉश बेसिन, प्लिम्बगचे नळ तर सर्वात शेवटी रंगाचे काम संपत आल्यावर आणून लावावे.

नवीन खरेदी केलेला फ्लॅट असेल आणि अंतर्गत सजावटीच्या संदर्भातील फॉल्स-सिलिंग, फर्निचरचे काम करण्याआधी सिव्हिल कामाचा भाग फारसा नसेल तर बरेचदा बिल्डरने दिलेले फ्लोअिरग न तोडता पुढील कामाचा विचार  होतो. अशा वेळेस संपूर्ण फ्लोअिरग पीव्हीसी शीट्सने कव्हर करून घ्यावे; जेणेकरून काम चालू असताना फ्लोअिरग कोठेही खराब होणार नाही किंवा तडा जाणार नाही.

अंतर्गत रचना आणि त्याची अंमलबजावणी या संदर्भातील बऱ्याच काही मुद्यांवर पुढील लेखांमध्ये क्रमवार विचार करू या.

पुन्हा एकदा, शुभ दीपावली!

seemapuranik75@gmail.com
(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)