शं. रा. पेंडसे

गणेश-रचनामधील सातव्या मजल्यावरच्या ब्लॉकचा ताबा देताना टिपणीस साहेब म्हणाले होते, ‘‘साठ वर्षांपूर्वी चाळींतल्या दोन खोल्यांत आपण प्रवेश केला होता, आज साठ वर्षांनंतर त्याच ठिकाणी एका अलिशान टॉवरमध्ये सातव्या मजल्यावरच्या ब्लॉकमध्ये आपण प्रवेश करीत आहात. अभिनंदन.’’

१९५९ साली मुलुंडमध्ये गणेशदर्शन या एकमजली चाळीत पहिल्या मजल्यावर मी दोन खोल्यांची जागा भाडय़ाने घेतली होती. स्टेशनपासून जवळ भरपूर उजेड आणि खेळती हवा असलेली ही जागा मला आवडली होती. फक्त या जागेत दोन उणीवा होत्या. या चाळीत वीज नव्हती आणि पाणी विहिरीचे होते. पालिकेची पाण्याची लाईन चाळीपर्यंत आली नव्हती आणि वीज पूर्वभागातही आली नव्हती. अशी जागासुद्धा भक्कम डिपॉझिट आणि भाडय़ाने मी घेतली होती, याचे कारण ती स्टेशनपासून जवळ होती आणि मुंबईच्या उपनगरात असल्याने पाणी आणि वीज या सुविधा लवकर मिळतील असा आशावाद मालक आणि अन्य भाडेकरू दाखवत होते.

संध्याकाळ झाली की रॉकेलची काचवाली चिमणी आणि कंदील लावायचा, की त्या मंद प्रकाशांत त्या दोन खोल्या उजळून जायच्या. सकाळ संध्याकाळी शौचालयात जाताना घरातून रिकामी बादली घेऊन जायचं, कारण परत येताना ती विहिरीतील पाणी काढून भरायची आणि पहिल्या मजल्यावर रहात असल्याने जिने चढून आणायची. नुकतेच लग्न ठरलेल्या मला हा ‘ताजमहाल’ माझ्या नियोजित पत्नीला दाखवायचा होता, कारण तिच्या प्रतिक्रियेवर पुढचे सारे अवलंबून होते. दुपारच्या वेळी मी तिला खोली दाखवायला घेऊन गेलो. प्रथमदर्शनीच भरपूर उजेड आणि खेळती हवा असलेली ही जागा तिला आवडली. ‘‘अहो, इथं पंखा नसला तरी चालेल इतका वारा दोन खोल्यांत येत आहे.’’ ही तिची प्रतिक्रिया.

हवा, उजेड भरपूर असलेल्या या वास्तूत वीज आणि नळाचे पाणी नसले तरी रहाणाऱ्या मोजक्याच भाडेकरूंमध्ये आपुलकी ओतप्रोत भरलेली होती. मी नियोजित पत्नीला घेऊन आलो आहे हे कळताच प्रथम चाळमालक आणि नंतर इतर भाडेकरू यांनी तिचे यथोचित स्वागत केले.

सहा डबल रुम असलेल्या चाळीत खालच्या मजल्यावर तीन आणि वरच्या मजल्यावर तीन अशा खोल्या होत्या. कोपऱ्यावरची खोली मालकांची होती. मधे माझी खोली आणि जिन्याजवळ दुसरे एक भाडेकरू होते. मालक कोपऱ्यात असल्याने गॅलरीचा भाग एन्क्लोझ करून त्यांनी त्याची खोली बनविली होती. आम्हा दोघांना गॅलरीचा वापर जाण्यायेण्याकरिताच होता.

मुलुंड पूर्वमध्ये त्याकाळात वस्ती तुरळक होती. स्टेशनवरून येता-जाताना पायी अंतर कापता येईल इथपर्यंतच चाळी बांधलेल्या होत्या. कुठलीही वहातुकीची साधने नव्हती. इतकंच नव्हे, तर आजारी पडलं तर डॉक्टरही नव्हता.  रेल्वेचा ब्रिज क्रॉस करून मुलुंड पश्चिमेला गेलं की स्टेशनजवळच डॉ. पुरंदरे यांचा दवाखाना होता. पूर्व मुलुंडचे तेच तारणहार होते.

‘गणेशदर्शन’च्या खोलीत रहायला येऊन मला तीन-चार महिनेच झाले होते. धाकटा भाऊ आणि मी असे दोघेच रहात होतो आणि त्याच काळात इलेक्ट्रीक फिटींग्ज करून घ्या अशी आवई उठली. भराभर लोकांनी फिटींग्ज करून घेतली, पण सहा महिने झाल्यावर ही लाईन आली नाही. जोडणी कधी होतील कुणीही सांगू शकत नव्हते.

त्याचवेळी माझा विवाह झाला. लग्न आटोपून रात्री दहाच्या सुमारास आम्ही घरी आलो तो चाळीचा सारा परिसर विद्युत दिव्यांनी लखलखत होता. संध्याकाळी सात वाजताच विद्युत जोडणी होऊन साऱ्या परिसरात दिव्यांचा लखलखाट झाला होता.

नववधूने गृहप्रवेश केला. सारी शेजारी जमली. ‘‘अहो, लक्ष्मी घरी आली आणि तिच्या पावलांनीच वीज आणली. सारा लखलखाट केला.’’ जो तो म्हणत होता.

कुठल्याही सुविधा उपलब्ध नसलेला तो काळ खरंच सुंदर होता. प्रत्येक भाडेकरू वा त्यांचे इतर सदस्य यांच्याशी रोजच्या रोज संवाद होत होता. फार काय, मालकांकडे आज भाजी कुठली होती, तर दोन नंबरकडे फिलीप्सचा रेडिओ आला आहे हे रेडिओ पॅकींगमधून बाहेर पायऱ्या आत साऱ्या चाळीला कळायचं.

या चाळींतल्या खोल्यांना कधीही ‘मेन्टेनन्स’चा खर्च करायला लागला नाही. बांधकाम भक्कम होतं. कुठंही पावसाच्या पाण्याची गळती झाली नाही की भिंतींना ओल आली नाही. बाहेरून पावसात गॅलरीत झड येऊन संबंध गॅलरी ओली व्हायची, हाच त्रास.

एक वर्षांनंतर नळजोडणी झाली आणि आमच्या भागात सर्व घरामध्ये नळ आले. विहिरीचे पाणी काढण्याचा त्रास वाचला.

जवळजवळ बारा वर्षे म्हणजे एक तप मी या चाळींत राहिलो, पण पत्नीनेही त्याकाळात कधी चाळीच्या जीवनाबद्दल नाराजी दाखवली नाही.

मुलुंड तेव्हा कात टाकीत होतं आणि पूर्व भागात अनेक हाऊसिंग सोसायटय़ांची कामे चालू होती. साहजिकच खिशाला परवडेल अशा ओनरशिप  ब्लॉकची आम्ही चौकशी करीत होतो आणि ठाकूरनगर भागात तशी जागा मिळाली. हा नवा ब्लॉक मिळाला तरी गणेशदर्शन चाळीतील जागा आम्ही सोडली नव्हती आणि कधीकधी शनिवार-रविवार ब्लॉकमधून चाळीत रहायला येत होतो. पत्नीला आणि मुलांनाही त्या जुन्या जागेत रहायला आवडायचं.

त्यानंतर १९७८ च्या आसपास आमच्याच मालकाने राहिलेल्या प्लॉटमध्ये दहा बारा ब्लॉकची एक इमारत ओनरशिप तत्वावर बांधली आणि तिला नाव दिलं ‘रचना’ सोसायटी. काळ कोणासाठी थांबत नसतो. उन-पावसाला गणेश दर्शन जसं तोंड देत होती तशी नवी रचना सोसायटीही तोंड देत होती. मेंटेनन्सचा खर्चही वाढत होता. या दोन्ही इमारती पाडून तिथं टॉवर उभा करता येईल का, याची चाचपणी चालू होती. नवीन इमारत बांधणीचं हे काम टिपणीस- हिरेद्वयींनी अंगावर घेतलं.

बरोब्बर तीन वर्षांत म्हणजेच २०१५ ते २०१८ या कालावधीत अकरा मजली टॉवर या गणेश दर्शन आणि रचना सोसायटीच्या जागेवर उभा राहिला. गणेशदर्शनमधील गणेश आणि रचना सोसायटीमधील रचना या नावांतून ‘गणेश-रचना’ या नावाने हा टॉवर दिमाखाने उभा आहे.

इथंही भरपूर उजेड आणि खेळती हवा आहे. जोडीला सर्व आधुनिक सुविधा आहेत. टॅक्सी दाराशी येते. डॉक्टर, हॉस्पिटल्सही आहेत. गणेश-रचनामधील सातव्या मजल्यावरच्या ब्लॉकचा ताबा देताना टिपणीस साहेब म्हणाले होते, ‘‘साठ वर्षांपूर्वी चाळींतल्या दोन खोल्यांत आपण प्रवेश केला होता, आज साठ वर्षांनंतर त्याच ठिकाणी एका अलिशान टॉवरमध्ये सातव्या मजल्यावरच्या ब्लॉकमध्ये आपण प्रवेश करीत आहात. अभिनंदन.’’

ब्लॉक बघायला नातेवाईक मित्र मंडळी येऊन गेली. साऱ्यांनाच ब्लॉक आवडला. काही दिवसांपूर्वी माझे एक नातेवाईक लग्नात भेटले. त्यांना मी म्हटलं, ‘‘पूर्वी मी ज्या चाळीत राहत होतो ती पाडून तिथं आता टॉवर झाला आहे.’’ यावर ते नातेवाईक म्हणाले, ‘‘अरे, अवश्य तुझी नवी जागा पाहायला येतो. पण मला आठवते ती जुनी जागा आणि हात रहाट असलेली ती विहिर! अरे, दोन दिवस तुझ्याकडे रहायलो असता हात रहाटाने पाणी काढून बादल्याभरून त्या पहिल्या मजल्यावरच्या तुझ्याखोलीत मी आणल्या आहेत!’’

कुणाच्या काय आठवणीत राहतं सांगता येत नाही.

shankarpendse@yahoo.in