06 March 2021

News Flash

भांडीकुंडी : पोळपाट ते रोटीमेकर

गोलाकार, सपाट पृष्ठभाग असलेला, साग वा शिसव लाकडापासून बनवलेला आणि एकसंध असे तीन पाय असलेला पोळपाट उत्तम मानला जातो

(संग्रहित छायाचित्र)

सागर कारखानीस

karkhanissagar@yahoo.in

आपल्या दैनंदिन आहारातील वरण-भाताएवढाच महत्त्वपूर्ण पदार्थ म्हणजे पोळी होय. अर्थात ही पोळी विविध रूपांत आपल्या ताटात मिरवत असते. उदा. कधी ती साधी बनते, तर कधी दुघडीची, चौघडीची बनते. कधी कधी रुचीपालटासाठी ती टम्म फुगलेल्या पुरीच्या रूपात साकार होते. एवढेच नव्हे तर ती होळीच्या सणाला पुरणपोळी, तेलपोळी बनून सर्वाच्या जिव्हा तृप्त करते. अर्थात या पोळीला विविध रूपे देण्यासाठी स्वयंपाकघरात प्रत्येक गृहिणीला मदत करणारी जोडगोळी म्हणजे ‘पोळपाट-लाटणे’. आजच्या सदरात याच जोडगोळीचा प्रवास आपण पाहणार आहोत.

पोळपाट हा सामासिक शब्द असून ‘पोळी + पाट = पोळपाट’ असा त्याचा विग्रह करता येतो आणि त्यावरून ‘पोळी लाटायचा पाट’ असा पोळपाटाचा शब्दश: अर्थही लावता येतो. या पोळपाटाला तंजावरी मराठीत म्हणजेच दक्षिणी मराठीत ‘कोळपाट’ तर खानदेशात ‘पोयपाट’, ‘कोयपाट’ म्हणतात.  गोलाकार, सपाट पृष्ठभाग असलेला, साग वा शिसव लाकडापासून बनवलेला आणि एकसंध असे तीन पाय असलेला पोळपाट उत्तम मानला जातो. या पोळपाटावर पोळ्या लाटण्यासाठी जी गोल दंडाकार वस्तू वापरली जाते त्यास लाटणं म्हणतात.

सिंधू संस्कृतीकालीन उत्खननात जी काही भांडीकुंडी सापडली आहेत त्यामध्ये तवा, पीठ मळण्याची परात आहे; मात्र त्यात पोळपाट दिसत नाही. आणि विशेष म्हणजे जे लाटणं सापडलं आहे त्याचा आकार आज वापरात असलेल्या लाटण्याप्रमाणेच आहे. तसेच सूत्र वाङ्मयात पोळ्या या तुटलेल्या मातीच्या खापरावर लाटल्या जात असल्याचा उल्लेख आला आहे. त्यावरून मातीचे खापर ही पोळपाटाची प्राथमिक अवस्था असावी असे दिसते. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील सांची स्तुपावर पोळी लाटण्याच्या प्रक्रियेची प्रतिमा कोरलेली असून त्या पोळपाटाला पाय आहेत. आधुनिक पोळपाटाचे निर्देशक म्हणून या प्रतिमेकडे पाहता येते. याव्यतिरिक्त पोळपाटाचे स्पष्ट उल्लेख प्राचीन साहित्यात आढळत नाहीत. राजा सोमेश्वरनेही ‘मानसोल्लास’मध्ये हातावरच वाढवून बनवलेल्या अंगारपोळीकेचा उल्लेख केला आहे. मात्र तेथेही पोळी लाटण्यासाठी पोळपाट दिसत नाही. मध्ययुगात पोळपाट लाटण्याचा उल्लेख मिळतो तो थेट १७व्या शतकात संत रामदासांच्या लिखाणात —

‘.. शुभा काष्ठे बहुसाल

पाट चाटू खोरणीं

पोळपाट लाटणी घाटणीं

तसेच तत्कालीन दैनंदिन आहारात मुख्यत्वे करून भाकरीचाच समावेश होत होता. त्यामुळे पुरिया, पुरणपोळी हे पदार्थ खास कार्यक्रमानिमित्तच रांधले जात असत. त्यामुळे प्रत्येकाकडे पोळपाट आणि लाटणे होतेच असे नाही. त्यामुळे कधी शेजारून मागून आणून तर कधी भाकरी थापण्याची परात किंवा ताट पालथे पाडून त्यावर घरात उपलब्ध असलेली गोलाकार लाकडी काठी किंवा चुलीजवळ असणाऱ्या फुंकणीच्या साहाय्याने पोळ्या लाटल्या जात असत. आजही आमच्या सीकेपी समाजात तेलपोळी ही खास तेलपोळीच्या पत्र्यावरच लाटली जाते.

आज लाकडी पोळपाटाबरोबरच पांढऱ्या गुलाबी रंगाच्या संगमरवरी दगडांचे, पितळेचे, लोखंडाचे, हिंडालियमचे पोळपाट वापरले जातात. त्यातही काही उत्तम लाकडाच्या पोळपाटांना एका बाजूला खोलगट वाटीचा आकार असतो. त्यात पोळी लाटताना लावायची पिठी किंवा तेल ठेवले जाते. तर काही पोळपाटांना लाटणे अडकवण्यासाठी स्टँडही असतो. तसेच पापड, पुरणपोळी लाटण्यासाठी खास पोळपाट बनवून घेतले जातात. विशेषत: कोकणी मुस्लीम समाजात ‘चोंगा’ म्हणून बनवल्या जाणाऱ्या पदार्थासाठी खास नक्षीदार पृष्ठभाग असलेला पोळपाट वापरला जातो अशी माहिती खाद्यसंस्कृती अभ्यासक डॉ. मोहसीना मुकादम यांनी दिली. काही कुटुंबांमध्ये पोळपाट लाटणे धुऊन, पुसून आणि नंतर थोडेसे तेल लावलेल्या मळलेल्या पिठाच्या लहानशा गोळ्याने पुन्हा पुसून घेण्याची पद्धतही दिसून येते.

पोळपाटाएवढेच महत्त्वाचे असते ते लाटणे. कारण पोळपाटावर पोळी सरसर सरकावी, ती पोळपाटाला चिकटू नये यासाठी लाटणेही उत्तमच असावे लागते. या लाटण्याच्या मदतीने पोळी लाटणे हेसुद्धा एक कौशल्यच आहे. सुरुवातीला गोळीवर लाटणे रेटून ती थोडी वाढवावी. नंतर चार बोटे लाटण्यावर पालथी व लाटण्याखाली अंगठा अशा पद्धतीने दोन्ही हात लाटण्याच्या टोकावर ठेवून, अंगठा व त्याच्या जवळचे बोट यांमधील बेचक्यात लाटणे धरून ते स्वत:भोवती व पोळपाटावर वाटोळे फिरेल असे धरून हलक्या हाताने पोळी लाटावी लागते.

फुलका बनवताना तर लाटल्या जाणाऱ्या गोळ्याला सर्व बाजूंनी सारखा दाब देणे आवश्यक असते. पोळपाटाप्रमाणे लाटणेही लाकडी, संगमरवरी दगडांचे, पितळेचे, लोखंडाचे, हिंडालियमचे, स्टेनलेस स्टील, प्लास्टिक, इ. स्वरूपात उपलब्ध आहेत. काही लाटण्यांवर नक्षीकाम केलेलेही दिसते. काही वर्षांपूर्वी ‘सासूचे लाटणे’ म्हणून लाकडी लाटण्याचा एक प्रकार बाजारात मिळत असे. विशेष म्हणजे या लाटण्यांच्या दोन्ही टोकांना घुंगरू लावले जात. कारण पोळ्या लाटताना होणाऱ्या घुंगरांच्या आवाजामुळेच देवघरात जप करत बसलेल्या सासूबाईंना आपल्या सूनबाईच्या कामावर लक्ष ठेवता येत असे. मात्र काही चलाख सुना हे घुंगरू काढून टाकत. त्यामुळे पुढे पितळी, आतून पोकळ आणि लहान खडे भरून बंद केलेले लाटणेही निघाले होते. दिवाळीत झटपट शंकरपाळे कातण्यासाठी खास ‘शंकरपाळे लाटणे’ही मिळते.

स्वयंपाकघरातील हे लाटणं पोळी लाटण्याबरोबरच इतरही कामासाठी उपयोग पडत असे. उदा. कधी पायाचे तळवे दुखत असतील तर लाटणे घेऊन त्यावर तळवे फिरवले जाते तर कधी मान आवटळल्यास लाटणे थोडे गरम करून ते मानेवरून फिरवले जाते. मंगळागौरीच्या व्रतात याच लाटण्याच्या साहाय्याने ‘लाटय़ा बाई लाटय़ा सारंगी लाटय़ा’च्या गाण्यावर फेर धरला जातो. एवढेच नव्हे तर स्वयंपाकघरात लुडबुड करणाऱ्या, आईला त्रास देणाऱ्या मुलांना याच लाटण्याचा मारही बसतो. कोकणात आमच्याकडे गौरी- गणपतीच्या सणाला गौरी रडवण्याच्या (जागवण्याच्या) कार्यक्रमात परात पालथी ठेवून त्यावर राख पसरवून एका हातात उलथने आणि दुसऱ्या हातात लाटणे धरून त्याचे घर्षण परातीवर केले जाते. या घर्षणाने होणाऱ्या लयबद्ध आवाजात गाणी गायली जातात. या लाटण्याचे सामाजिक महत्त्वही तितकेच उल्लेखनीय आहे. जेव्हा स्त्रीला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करावे लागे तेव्हा ‘हाती पोळपाट लाटणे आले’ असे म्हटले जाते.

मुंबईतील गिरणी कामगारांच्या वाताहतीच्या काळात अनेक स्त्रियांनी हाती पोळपाट लाटणे घेऊन आपले संसार सावरले होते. १९७२ मध्ये जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांचा सामना करणाऱ्या स्त्रियांनी मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लाटणे मोर्चा काढत आपली संघटित ताकद दाखवून दिली होती.

बदलत्या काळात अन् तंत्रज्ञानाच्या विकासात पोळपाट लाटण्यांना पर्याय उपलब्ध झाले. विशेषत: नोकरी करणाऱ्या स्त्रीवर्गासाठी वेळेची बचत करणारे रोटीमेकर्स बाजारात उपलब्ध झाले. सुरुवातीला लाकडी, नंतर लोखंडी अशा या रोटीमेकर्समध्ये मळलेल्या कणकेचे गोळे ठेवून दाबतंत्राचा वापर करून काही मिनिटांत पोळी तयार करता येत असे. मात्र यातील पोळ्या या तुलनेने जाडसर असत. आणि हे रोटीमेकर्स फक्त पोळी लाटून देण्याचेच काम करत. यानंतर बाजारात आला तो इलेक्ट्रानिक रोटीमेकर. या रोटीमेकरमध्ये पोळी लाटून व भाजून येत असे. मात्र तेथेही पीठ मळण्याचे काम होतेच. त्यामुळे कमीतकमी वेळेत पीठ मळण्यापासून ते पोळी लाटून, शेकण्यापर्यंत असे सर्व प्रक्रिया करणारे अत्याधुनिक ‘रोटीमॅटिक’ नामक रोटीमेकर प्रणोती नगरकर आणि रिषी इसरानी यांनी २०१६ मध्ये तयार केला.

विशेष म्हणजे  या ‘रोटीमॅटिक’च्या वितरणाच्या जाहिरातीमुळे तो बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच  त्याची वेटिंग लिस्ट ३५ लाखांत पोहोचली होती. या रोटीमेकरमध्ये पोळीबरोबरच पराठा, पुरी, पिझ्झा बनवता येतो. सरतेशेवटी, या रोटीमेकरच्या जमान्यातही पोळपाटावर पोळी लाटून अन् तव्यावर शेकवून तिचा गरमागरम आस्वाद घेण्याची मजा काही औरच!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 12:07 am

Web Title: article on polpat to rotimaker abn 97
Next Stories
1 मुद्रांक शुल्क कपात : घरखरेदीदारांना दिलासा
2 स्थावर मालमत्ता : ग्राहकांचा बदललेला कल
3 घरगुती सजावट
Just Now!
X