प्रकाश मिराशी

पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी किंवा आजोळी जाण्याची पद्धत होती. सुट्टय़ा लागल्या की एसटी, ट्रेन पकडून आजीकडे मुलांची रवानगी व्हायची आणि उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवून पुढच्या वर्षी शाळेला यायचं अशी प्रथा होती. पण आम्ही मुलं मात्र मावशीकडे जायचो. मावशी पार तिकडे कालिकतला केरळात राहायची. कोकणात राहणारे गुर्जर, गागळेकर, देव, गोरे, ढमढेरे, अभ्यंकर अशी मंडळी गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात कोकण सोडून केरळात ठिकठिकाणी स्थायिक झाली. काही कोचिनला तर काही कालिकतला. महाराष्ट्रात आणि कोकणात धंदा न जमणाऱ्या या मंडळींनी केरळात मात्र चांगला व्यवसाय करून जम बसवला. देव, ढमढेरे सुगंधी अत्तराच्या व्यवसायात तर गुर्जर, गोरे मंडळी मसाल्याच्या दलालीत आली. गागळेकरांची दुर्गी कालिकतच्या गुर्जरांकडे गेली आणि हीच माझी मावशी आणि हेच तिचं घर!

कालिकतला जाणं तसं सोपं नव्हतं. दोन रात्री गाडीत घालवाव्या लागायच्या. कोकण रेल्वे तेव्हा झाली नव्हती. मुंबईहून मद्रासला जायच्या गाडीत बसायचं आणि आर्रकोणम् नावाच्या स्टेशनवर आमचा डबा तिथेच ठेवून गाडी मद्रासला निघून जायची. नंतर मद्रासवरून मंगलोरकडे जाणाऱ्या गाडीला आमचा डबा लावला जायचा आणि तिसऱ्या दिवशी आम्ही कालिकतला पोहोचायचो. कोळशाच्या इंजिनाच्या गाडीत दोन दिवस काढल्यावर आमचे चेहरे कसे दिसत असतील याची कल्पनाच केलेली बरी.

रस्त्याला लागून असलेलं मावशीचं घर- ‘दुर्गा निवास’. वरची कडी असलेलं लोखंडाचं दार उघडल्यावर समोर मावशीच्या घराचं दर्शन व्हायचं. पिवळट रंगाची बैठी वास्तू. समोर मुख्य दरवाजावर टेराकोटा दगडांची कमान. वरती लाल मंगलोरी कौलांचं तिरकं छप्पर. शिरल्या शिरल्या डाव्या हाताच्या कंपाउंड वॉलवर असलेल्या कृष्णकमळाच्या फुलांचा मंद सुगंध यायचा. मावशीच्या घरात आल्याची ही पहिली खूण. डाव्या हाताला छोटीशी फुलांची बाग. उजव्या हाताला आंब्याचं भलंमोठं झाड आणि त्याच्या खाली कुत्र्याचा पिंजरा. लाकडाच्या पट्टय़ांनी केलेला आणि लाल रंगाचा. आल्यावर तो भुंकून भुंकून घर डोक्यावर घ्यायचा. ब्रुनो होतं त्याचं नाव. आतल्या लोकांना कोणीतरी नवीन मनुष्य आलाय याचीही सूचना मिळायची. पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य लाकडी दरवाजा. या दरवाजाचे चार भाग. म्हणजे वरचे दोन दरवाजे उघडे ठेवले आणि खालचे बंद केले तर दरवाजा खिडकीसारखा वापरता येई. अशा दरवाजांची पद्धत केरळात बऱ्याच घरांना दिसते.

पुढला दिवाणखाना तसा छोटासाच. उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याची व्यवस्था. कोपऱ्यात उंच स्टुलावर काचेच्या भांडय़ात मासा असायचा. दिवाणखाना ओलांडून गेल्यावर मोठा हॉल. हॉलच्या दोन्ही बाजूला दोन-दोन अशा चार खोल्या होत्या. डाव्या हाताची पहिली खोली मावशी आणि काकांची. उजव्या हाताची पहिली खोली सर्वात मोठय़ा मावस भावाची.

या हॉलमध्ये एक लाकडी झोपाळा होता. हा लाकडी झोपाळा म्हणजे घराचा एक दागिना होता. पुष्कळ सुंदर सुंदर घटना या झोपाळ्यावरून मी पाहिलेल्या आहेत. एक पायरी उतरून गेल्यावर लांब मोकळी जागा होती. डाव्या हाताला छोटं न्हाणीघर आणि त्यात शॉवर होता आणि उजवीकडे दोन खोल्या होत्या. एक देवघराची आणि दुसरी सामानाची. देवघरातून नेहमी पारिजातकाच्या फुलांचा आणि चंदनाचा वास यायचा, तर सामानाच्या खोलीतून लाडू किंवा मेथीचे लाडू किंवा मोहनथाळचा वास यायचा. आंब्यांच्या दिवसात इथे आंब्याची अढी असायची आणि आंब्याचा वास. एक पायरी चढून वरती गेलो की जेवणघरात यायचो.

लांबलचक जेवण घराच्या उजव्या बाजूला स्वयंपाकघर आणि डावीकडे न्हाणीघर होतं. स्वयंपाकघरात मावशीचा वावर जास्त आणि सुंदर वास. त्यातला मला सकाळी खमंग दूध तापलेला वास अजूनही स्मरणात आहे. डावीकडचं न्हाणीघर म्हणजे तर माझ्या आठवणीतलं सुंदर ठिकाण. भली मोठी चूल. चुलीखाली सरपणासाठी नारळाची सोललेली सालं. त्यांच्यावर तापणारं काशाचं भलंमोठं भांडं आणि त्यात तापणारं कडकडीत पाणी. त्या गरम पाण्याला सुंदर भाजका वास यायचा. काचेच्या कौलातून उन्हाची तिरीप आत येत असे. या उन्हाच्या तिरिपीतून चुलीतून येणारा आणि वर जाणारा धूर बघण्यात फार मजा यायची. मोठय़ा घंगाळात हे गरम पाणी ओतून घ्यायचं आणि नळाने थंड पाणी सोडायचं. अशी कडकडीत पाण्याची अंघोळ मी नंतर कधीही केली नाही. ती माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील.

याच भल्या मोठय़ा चुलीवर केळ्याची कापं तळण्याचा कार्यक्रम आम्ही परत जायच्या आधी काही दिवस व्हायचा. केळ्याच्या कापाला तिथे बाळकं म्हणायची प्रथा आहे. केरळात मिळणाऱ्या केळ्याला नेंद्रपळम् म्हणतात. या कापाची चव मला नंतर कधीच मिळाली नाही.

जेवण घराचं दार सरळ बाहेरच्या पडवीत उघडायचं. पडवी लाल रंगाच्या कोव्याची. पडवीत सोललेले आणि बिनसोललेले नारळ असत आणि इतर सरपण. पडवीच्या समोर गोठा. बहुतेक वेळेस गोठय़ात मी गायीस पाहिलेलं आहे. गोठय़ात शिरल्यावर शेणाचा-मुताचा वास अजूनही आठवतो. गोठय़ाच्या उजव्या अंगास दोन शौचालये होती. समोर पाण्याचा हौद आणि त्यावर ठेवलेले पितळेचे तांबे. प्लास्टिकचा अजिबात संबंध नाही. सगळीकडे तांब्या पितळेची भांडी.

घराच्या उजव्या अंगाला विविध प्रकारची झाडं होती. नारळ, पारिजात, पेरूचं झाड मला छान आठवतंय. घराच्या मागच्या बाजूस पडवीच्या डावीकडे अडगळीची खोली होती. ही सरपण ठेवण्याची जागा. इथे मोठा इडलीचं पीठ वाटण्यासाठीचा रगडा ठेवलेला होता. एक कामाला ठेवलेली बाई इडलीचं पीठ वाटत बसलेली असायची. तिचं नाव तंगम्मा.

सकाळच्या नाश्त्याला इडली किंवा डोसा जास्त करून असायचा. सोबत खोबऱ्याची आणि कांदा आणि लाल तिखटाची चटणी. वरून खोबऱ्याच्या तेलाची धार. दुपारच्या जेवणाच्या पंगतीत आंब्याचा रस ठरलेला. सोबत कोयंडा. म्हणजे आंब्याच्या कोईची सारासारखी आमटी. सगळ्या पदार्थाना एक वेगळीच सुंदर चव. आंबे खायला बसलो की आम्हा मुलांना सगळे कपडे काढावे लागायचे. आंबादेखील सेलम. आपल्यासारखा हापूस नाही. त्याची चव आणि वास काही विरळाच.

वासावरून आठवलं, या घराचा तपशील जितका मला आठवतो तितकाच वासही आठवतो. प्रत्येक खोलीत एक वेगळा वास होता आणि तो अजूनही माझ्या स्मरणात आहेत. फोटो आणि व्हिडीओ काढून वेळोवेळची चित्र आणि प्रसंग रेकॉर्ड करून ठेवता येतो, पण वासाचे रेकॉर्डिग करण्याची कला अजून तरी उपलब्ध नाही.

दुपारी आणि रात्री कुत्र्याला मोकळे सोडायचे. त्या वेळेला सगळ्यांना सूचना दिली जायची आणि घराची दारे लावून घेतली जायची.

मावशीला अकरा मुलं आणि आम्ही सात भावंडं. मुलगी आणि आई एकाच वेळेला बाळंत होण्याचा तो काळ. त्यामुळे या असल्या घरात लेकुरे उदंडच. बहिणींना आणि वहिनीला शिकवायला गायन शिक्षक यायचे. त्यांचे नाव मराठे. शिकवत असताना ते तेव्हा काय शिकवयाचे कळले नाही, पण बऱ्याच वर्षांनंतर भूप रागाचे सूर कानावर पडले तेव्हा या मराठय़ांची आठवण झाली. बाहेरच्या खोलीत रेडिओ होता आणि त्यावर नेहमी हिंदी गाणी लागलेली असायची. घराच्या जवळच समुद्र किनारा. संध्याकाळी आम्ही मुलं तिकडे जायचो. रस्त्यात असलेलं लालभडक गुंजाचं झाड फार फार आठवतं. बरीच वर्ष उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही जात राहिलो. मावशीचा गोतावळा पुष्कळ मोठा. काळाच्या ओघात बरेच बदल होत गेले. घरात जनसंघाच्या कार्यकर्त्यांचा राबता असायचा. जेवायला पाहुणेरावळे नक्कीच.

मुलं मोठी झाली. शिकायला म्हणून दूर गेली. काही नोकरीनिमित्त दूर गेली. मुलींची लग्नं होऊन आपापल्या घरी गेल्या. आमचंही येणंजाणं कमी झालं. काळाच्या ओघात मावशी गेली. काकाही गेले. परंतु कथा-कादंबऱ्यांत जेव्हा घराची वर्णनं येतात, त्या वेळेला हे एकच घर डोळ्यासमोर येतं. लग्नानंतर बायको-मुलांना घेऊन मावशीचं घर दाखवायला गेलो आणि आठवणीतल्या या सुखद कप्प्यांचा पुरावा दिला. या सुखद आठवणी अजूनही उरात बाळगून आहे आणि त्या तशाच राहाव्यात अशी इच्छा आहे.

prakash.mirashi@gmail.com