News Flash

वस्तू आणि वास्तू : सगळीकडे स्टिकर्सच स्टिकर्स!

कोणाच्याही घरी डोकावून बघा. कानाकोपऱ्यात कसले कसले स्टिकर्स चिकटवून ठेवलेले असतात.

(संग्रहित छायाचित्र)

प्राची पाठक

कुठेही लहानमोठे बटबटीत स्टिकर्स लावून ठेवणे सौंदर्यदृष्टीला अगदीच आड येते. त्याने त्या त्या वस्तूचे नुकसानसुद्धा होऊ शकते. भिंतीचा, कपाटाचा, लाकडाचा रंग जाऊ शकतो. ते काढताना त्यावर ओरखडे पडू शकतात. कोणाला अगदी देवाधर्माच्या नावाने वाटलेले आणि कुठेही चिकटवून ठेवलेले स्टिकर्सदेखील नकोसे वाटू शकतात. ते बटबटीत दिसू शकतात.

कोणाच्याही घरी डोकावून बघा. कानाकोपऱ्यात कसले कसले स्टिकर्स चिकटवून ठेवलेले असतात. कसलीशी जाहिरात असते, कोणता सुविचार असतो. कुठे एखादा झेंडा फुकट मिळालेला असतो, तो अडकवून अथवा लटकावून ठेवलेला असतो. कुठे चॉकलेट्समधून काही स्टिकर्स मिळालेले असतात. ते कसे उमटतात ते आपण ट्राय करायला जातो. ते तिथेच उमटून जातात. डाग पडतात. ये दाग अच्छे नहीं होते! गिफ्ट्ससोबत आलेले स्टिकर्स असतात. ते फेकवतही नाहीत आणि काही कामाचेही नाहीत, अशा प्रकारचे असतात. फ्रिजला, टीव्हीच्या आसपास, गाडीच्या काचांवर, देवघरात, संडास-बाथरूममध्ये, आरशांवर, दारं-खिडक्यांवर वेगवेगळे स्टिकर्स चिकटवून ठेवणे, हा जणू कलात्मक अधिकार आहे, अशा सहजतेनं लोक वागत असतात. कुठलेसे गल्लीबोळातले पुढारी, कुठले संप्रदायवाले, कुठल्या सामाजिक संस्था वगरे असले स्टिकर्स वाटणे म्हणजे त्यांच्या प्रसिद्धी योजना समजत असतात. अतिशय टुकार ते अतिशय भारी अशा कोणत्याही रेंजमध्ये हे स्टिकर्स असले, तरी ते चिकटवायची सक्ती करणे, ते लावून ठेवा असे जबरदस्ती सुचवत राहणे हे चुकीचेच आहे. पार्किंगसाठी गाडीच्या काचेवर स्टिकर्स लावायचा असाच एक ट्रेंड आलाय. तुम्ही कायमस्वरूपी जरी तिथेच राहणार असलात, तरी काचेच्या कोपऱ्यातली जागा नसेल भरून ठेवायची तुम्हाला अशा प्रकारे. स्टिकर्स लावायची सक्ती कशाला? कित्येक गाडय़ांच्या कोपऱ्यांत अशा स्टिकर्सची रांगच लागलेली असते. मग त्यांचे रंग उडतात. ते अर्थवट फाटतात आणि तो सगळा प्रकारच फार विद्रूप दिसायला लागतो. अनेक कार सर्व्हिसिंगवाले सर्व्हिसिंगचा भाग म्हणूनच काही स्टिकर्स, काही लेटर्स तुमच्या गाडीच्या पुढेमागे न विचारता लावून टाकतात. अनेकदा रस्त्यावर काच पुसून देतो, असे सांगणारे लोकसुद्धा काच पुसायला हो/नाही म्हणायचा अवकाश की काहीतरी चिकटवून जातात. नंतर ते चिकटलेले स्टिकर्स निघता निघत नाहीत. निघाले, तरी त्यांचे डाग भिंतीवर, काचेवर पडलेले असतात. त्या चिकट भागावर नंतर धूळ चिकटत राहते. तो भाग काळसर होतो आणि हळूहळू काळपट दिसायला लागतो. भिंतीला स्टिकर्स चिकटवले असतील तर एकेकदा भिंतीचा रंगच त्यासोबत निघून येतो.

कुठेही लहानमोठे बटबटीत स्टिकर्स लावून ठेवणे सौंदर्यदृष्टीला अगदीच आड येते. त्याने त्या त्या वस्तूचे नुकसानसुद्धा होऊ शकते. भिंतीचा, कपाटाचा, लाकडाचा रंग जाऊ शकतो. ते काढताना त्यावर ओरखडे पडू शकतात. कोणाला अगदी देवाधर्माच्या नावाने वाटलेले आणि कुठेही चिकटवून ठेवलेले स्टिकर्सदेखील नकोसे वाटू शकतात. ते बटबटीत दिसू शकतात. त्यात कोणतंही सौंदर्य नसू शकतं. जसा कोणाच्या श्रद्धेचा आदर करा हे सतत लोक सांगत असतात, तसेच कोणाच्या अश्रद्धेचादेखील आदर करायला आपण कधी शिकणार? त्यांना नसतील बघायच्या काही गोष्टी स्टिकरवर आणि येता जाता अशा वेळी सर्वत्र काहीतरी चिकटवून ठेवायच्या सवयीचा आपण विचार करतो का, हा मुद्दा आहे.

सेलोटेप सहजच उपलब्ध झाल्यापासून आणि त्यात वेगवेगळे रंग, टू वे टेप्सचे विविध प्रकार आल्यापासून हाताशी काहीही आले की कसेही आणि कुठेही लटकवून द्यायची लोकांना सवयच होऊन गेली आहे. साधी ब्राऊन टेपसुद्धा सरळ, नेटकी आणि कमीतकमी टेपमध्ये काम होईल अशी लावायला लोकांना ट्रेनिंग द्यावे की काय, असे वाटावे इतक्या वेडय़ावाकडय़ा प्रकारे लोक टेप्स लावत असतात. त्यांची टोके कशीही तोडतात. त्याने टेपच्या रुंदीची सलगता निघून जाते. तिला वळ्या पडतात. टेपसुद्धा लावायचीच झाली तर नेटकी लावता येते आणि काढायची असल्यास टेपच्या प्रकारानुसार, कुठे लावली आहे त्यानुसार मूळ वस्तूला खराब न करता काढता येते, असा विचारही लोकांच्या गावी सहसा नसतो. वाढदिवसाला, लहानसहान पाटर्य़ामध्ये, लग्नाच्या सजवलेल्या गाडीसाठी लोक कोणतीही गोष्ट कशीही आणि कुठेही सेलोटेपने चिकटवत राहतात. त्या त्या वेळेपुरती काहीतरी बटबटीत सजावट करतात. पण ते कार्य पार पाडल्यावर त्या टेप्स, ते स्टिकर्स, बॅनर्स, पोस्टर्स, शोभेचे साहित्य नीट काढून टाकत नाहीत. या हौशी सजावटीत भिंत, काच, लाकूड, इतरही कशाचा जो काही पृष्ठभाग असेल तो खराबच होऊन गेलेला असतो. काढलेल्या टेप्सदेखील कुठेही कशाही फेकून दिल्या जातात. त्यांची नीट एकत्र विल्हेवाट लावली जात नाही, ते मुद्दे वेगळेच.

आपल्याला जे आवडते, जे प्रिंट करून छान दिसते, त्यावर काही टिप्स असतात; जे आपल्याला रोज लागते आणि डोळ्यांसमोर असावेसे वाटते, ते वेगवेगळ्या प्रकारे समोर ठेवता येते. त्याचे अगदीच स्टिकर करायची किंवा बोर्डस् बनवून सटासट टेपने चिकटवायची गरज नसते. या चिकटवण्यातदेखील सौंदर्यदृष्टी असू शकते, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यातही नेटकेपणा आणत गेले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्याला जे फार भारी वाटेल, ते इतरांना आवडेलच असं नाही. तर आपल्या हक्काच्या जागेमध्येच हे चिकटवाचिकटवी उद्योग करावेत! उगाच दिसेल तो आसमंत व्यापून ठेवू नये.

सहजच चक्कर मारा आता आपल्या घरात, ऑफिसात. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणच्या भिंती, काचा, कपाटं बघा. त्या त्या वस्तूंवर किती भारंभार स्टिकर्स, पोस्टर्स लोक चिकटवून ठेवतात, त्याची नकोशी झलकच समोर येईल!

prachi333@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:19 am

Web Title: article on stickers stickers everywhere
Next Stories
1 निवारा : नैसर्गिक आपत्ती आणि पारंपरिक घरे
2 गणेश दर्शन ते गणेश रचना ६० वर्षांचा प्रवास
3 रखडलेला पुनर्विकास, मेट्रो प्रकल्प आणि हताश गिरगावकर!
Just Now!
X