News Flash

माट येथील कुषाणकालीन मंदिर

मंदिर स्थापत्य

(संग्रहित छायाचित्र)

|| आनंद कानिटकर

गुप्तपूर्व मंदिरांच्या उत्खननात सापडणाऱ्या पुरातत्त्वीय अवशेषांबद्दल अधिक न लिहिले गेल्यामुळे, तसेच त्याची विशेष चर्चा न केली गेल्यामुळे अनेकदा भारतीय उपखंडातील ही प्राचीन मंदिरे आपल्याला अधिक परिचित नसतात. गुप्त राजवंशापूर्वी उत्तर भारतात आलेल्या कुषाण या राजवंशातील राजांनी तसेच त्यांच्या कालखंडात बांधल्या गेलेल्या मंदिरांची उत्खननातून आपल्याला माहिती मिळाली आहे.

कुषाण राजे साधारणपणे इ. स. ४० ते इ. स. ३६० या काळात होऊन गेले. कुजुल कडफायसिस हा अंदाजे इ. स. ४० ते इ. स. ९० या काळात राज्य करणारा कुषाण राजा या घराण्याचा संस्थापक म्हटला जाऊ शकतो. कारण तो अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बाल्ख या भागात प्रांताधिकारी असताना त्याने स्वतंत्रपणे राज्य करायला सुरुवात केली. नंतर या वंशातील विम तक्षम (अंदाजे इ. स. ९० ते ११३), विम कडफायसिस (इ. स. ११३ ते इ. स. १२७) इत्यादी राजांनी चीनवरून येणाऱ्या रेशीम मार्गावरील व्यापार ताब्यात ठेवण्यासाठी या मार्गावरील सध्याचा दक्षिण उझबेकिस्तान, ईशान्य अफगाणिस्तान, उत्तर पाकिस्तानचा भाग हा आपल्या आधिपत्याखाली आणला. या राजघराण्यातील पुढील महत्त्वाचे राजे म्हणजे कनिष्क (इ. स. १२७ ते इ. स. १५०), व हुविष्क (इ. स. १५० ते इ. स. १९०). कनिष्काच्या काळात काश्मीरपासून बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा) पर्यंत कुषाणांचा राज्यविस्तार झाला.

या कुषाण राजांच्या काळातील अनेक मंदिर अवशेष, मूर्ती, शिलालेख उत्तर भारतात विशेषत: मथुरेच्या आसपासच्या परिसरात आढळतात. या परिसरात यक्ष, यक्षी, नाग, शिव, विष्णू, मातृका, दुर्गा, सूर्य, लक्ष्मी, इत्यादींच्या कुषाणपूर्व तसेच कुषाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत.

१९११-१२  साली पंडित राधा-कृष्ण यांनी मथुरेच्या उत्तरेला असणाऱ्या माट या गावातील टोकरी टिला या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन अवशेषांच्या टेकाडावर उत्खनन करून कुषाण राजांच्या काळात विटांनी बांधलेल्या एका ‘देवकुला’चे (मंदिराचे) अवशेष उजेडात आणले. या उत्खननात त्यांना आयताकृती १०० फूट लांबीचे आणि ५९ फूट रुंदीचे जोते सापडले होते. त्यावर एका वर्तुळाकार मंदिराच्या बांधकामाचे तसेच इतर खोल्या बांधल्याचे पुरावे सापडले होते. या जोत्याच्या ईशान्येला पायऱ्या होत्या. तर जोत्यावर पश्चिमेकडे लंबगोलाकार गर्भगृह असल्याचे पुरावे सापडले होते. आसपासच्या गावातील रहिवाशांनी या टेकाडातून विटा मिळत असल्याने घरबांधणीसाठी येथील विटा काढून नेल्याने या मंदिराचा बराचसा भाग नष्ट झाला होता.

या जोत्याच्या दक्षिणेला आवाराच्या भिंतीचा काही भाग व त्याला लागून असलेल्या खोल्यांचे अवशेष सापडले होते. तर जोत्याच्या पश्चिमेला जवळ जवळ जोत्याएवढीच लांबी-रुंदी असलेला, पण विटांनी बांधून काढलेल्या तलावाचे अवशेष होते. या तलावाच्या काठावरील विटांचा आकार आणि जोत्याच्या व मंदिराच्या विटांचा आकार सारखा आहे. म्हणजे हे दोन्ही एकाच काळात निर्माण झाले होते.

या मंदिराच्या परिसरातील सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे या जोत्यावर सापडलेले कुषाण राजांचे पूर्णाकृती पुतळे! यातील तीन पुतळ्यांवर लेख कोरलेला आहे. त्यावरून ते कुषाण राजांचे पुतळे होत, यात शंका उरत नाही. परंतु हे पुतळे जोत्यावरील वर्तुळाकार गर्भगृहात न सापडता त्यापासून थोडय़ा अंतरावर, पण जोत्यावरच एका खोलीपाशी सापडले होते. यात एक सिंहासनावर बसलेल्या राजाचा पुतळा होता. या पुतळ्याचा कमरेवरील धडाचा भाग मंदिराशेजारी असलेल्या तलावाकाठी ठेवलेला सापडला. या अध्र्या पुतळ्याची स्थानिक लोक ‘वरुण’ म्हणून पूजा करीत होते. या पुतळ्याच्या दोन पायांमधील जागेत दोन ओळींचा संस्कृत भाषेतील व ब्राह्मी लिपीतील एक लेख कोरलेला होता. या शिलालेखात ‘महाराजो राजातिराजो देवपुत्रो कुषाणपुत्रो शाही विम तक्षुमस्य बाकणपतीन (हुमस्फल) देवकुलं कारिता’ असा उल्लेख आहे. म्हणजे वर उल्लेख केलेल्या विम तक्षम या कुषाण राजाच्या हुमस्फल नावाच्या बाकणपतीने- म्हणजे अधिकाऱ्याने देवकुलाची निर्मिती केली. तसेच या शिलालेखातील पुढील वाक्यात येथे बाग, पुष्करणी, विहीर, सभागृह तसेच द्वारतोरण (कदाचित सांची येथील स्तुपासमोरील तोरणाप्रमाणे असलेले तोरण) बांधल्याचा उल्लेख आहे. त्यावरून हा पुतळा कदाचित अंदाजे इ. स. ९० ते इ. स. ११३ या काळात राज्य करणाऱ्या विम तक्षम या कुषाण राजाचा असावा. येथेच सापडलेला एक पुतळा कनिष्क या राजाचा होता, हे त्यावरील ‘महाराजा राजातिराजा देवपुत्रो कनिष्को’ या कोरीव लेखाने लक्षात येते.

माट येथे एक भग्न मूर्तीचे पादपीठ सापडले होते. या पादपीठावरील कोरीव लेखानुसार कुषाण राजा हुविष्क याच्या पितामहांनी बांधलेले देवकुल भग्न, विशीर्ण झालेले असल्याने हुविष्काचा महादंडनायक (एक अधिकारी) याने या देवकुलाची दुरुस्ती करविली. या लेखाच्या पहिल्याच ओळीत ननाया (किंवा नना या मध्य आशियातील प्रसिद्ध) देवीच्या उत्सवात तिच्याकडून राज्य प्राप्त झालेला राजा हुविष्क’ असा हुविष्काचा उल्लेख केला आहे. हुविष्काचे वडील कनिष्क याच्या अफगाणिस्तानातील रबाटक येथे सापडलेल्या शिलालेखात कनिष्कालाही ‘नना’ या देवीकडून राज्यप्राप्ती झाली होती हे पहिल्याच ओळीत नमूद केले आहे, हे या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे. याशिवाय येथे नित्य येणाऱ्या ब्राह्मणांसाठी काही तरतूद केलेली होती.

काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार, माट येथील हे देवकुल म्हणजे कुषाण राजांचेच मंदिर होते. परंतु येथे सापडलेल्या अजून एका भग्न मूर्तीमध्ये एका पुरुषाचा कमरेपर्यंतचा भाग दिसतो आहे. या मूर्तीच्या पायामागे एक सिंह कोरलेला आहे. तर याच मंदिराच्या आवारात एक स्त्री प्रतिमाही सापडली होती. या स्त्री प्रतिमेच्या मागील बाजूस सिंह दाखवला होता. वासुदेव शरण अग्रवाल या ज्येष्ठ संशोधकांच्या मतानुसार, या प्रतिमा अनुक्रमे शिव व दुग्रेच्या असाव्यात. कुषाण राजे शिवपूजक होते हे त्यांच्या नाण्यांवरील शिवप्रतिमांवरून दिसून येते. परंतु माट येथे कुषाण राजांच्या पुतळ्याची देवतारूपात पूजा होत असावी याबद्दल संशोधकांत एकमत नाही. विशेष म्हणजे, हे राजांचे पुतळे मुख्य गर्भगृहात नव्हते व असू शकत नव्हते हे या मंदिराचा आराखडा, पुतळ्यांचा आकार बघितला तरी लक्षात येते.

भास या लेखकाच्या संस्कृत ‘प्रतिमानाटक’ या नाटकात राम वनवासाला गेल्यानंतर आपल्या आजोळहून अयोध्येला परत येणाऱ्या भरताला अयोध्येच्या बाहेर असलेल्या एका प्रतिमागृहात इतर तीन राजांच्या पुतळ्यासोबत दशरथाचाही पुतळा दिसतो. या प्रतिमागृहात केवळ मृत राजांचे पुतळे उभारला जाण्याचा संकेत असल्याचा उल्लेख भासाने केला आहे. येथे उभारलेल्या दशरथाच्या पुतळ्यावरून राखणदाराकडे अधिक चौकशी करता भरताला दशरथाचा मृत्यू झाल्याची वार्ता कळते, असे भासाने दाखवले आहे. या नाटकातील राजांचे पुतळे असणाऱ्या प्रतिमागृह या उल्लेखाच्या आधारे १९२४ मध्ये पहिल्यांदा दया राम साहनी यांनी माट येथील कुषाणांच्या या देवकुलाला कुषाण राजांचे ‘प्रतिमागृह’ असल्याचे म्हटले.

देवकुल (देवगृह) हा शब्द केवळ कुषाणांच्या माट येथील या मंदिराच्या बाबतीतच वापरला गेला आहे असे नव्हे, तर मथुरा येथे सापडलेल्या काही जैन शिलालेखांमध्येदेखील देवकुल हा शब्द वापरला आहे. याशिवाय येथील कोणत्याही लेखांत हे कुषाण राजासाठी बांधलेले देवकुल आहे असा उल्लेख नाही. उलट या देवकुलाच्या दुरुस्तीच्या पुण्याने हुविष्क राजाचे आरोग्य वाढावे अशी लेखात शेवटी प्रार्थना केली आहे. त्यामुळे हे कुषाण राजांच्या पूजनासाठी बांधलेले देवकुल नसून, कुषाण राजांनी बांधलेले व कदाचित शिव आणि दुग्रेच्या प्रतिमा असलेले हे देवकुल होते; ज्याच्या आवारात कुषाण राजांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या, हे लक्षात घेतले पाहिजे. राजघराण्यातील व्यक्तींच्या प्रतिमा उभारण्याची पद्धत जुन्नरजवळील नाणेघाट येथील इ.स. पूर्व पहिल्या शतकात कोरलेल्या लेण्यातील सातवाहन कुळातील व्यक्तींच्या प्रतिमांवरून लक्षात येते. परंतु माट येथील कुषाणांच्या या देवकुलावरून नाणेघाटातील सातवाहन राजांच्या लेण्याचा उल्लेख अनेकदा ‘सातवाहनांचे देवकुल’ असा केला जातो हे योग्य नाही; कारण ते लेणे कोणत्याही देवाचे मंदिर म्हणून उभारण्यात आले नव्हते.

कुषाण वंशातील महत्त्वाचा राजा कनिष्क याच्या काळात अफगाणिस्तानात बांधलेल्या दोन मंदिरांबाबत पुढील लेखात विस्ताराने पाहू या.

kanitkaranand@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:22 am

Web Title: loksatta vasturang 3
Next Stories
1 बक्षीसपत्र
2 अंतर्गत जागेचे लेखापरीक्षण
3 कच्ची आणि पक्की घरे
Just Now!
X