सीमा पुराणिक

‘वास्तु-संवाद’ लेखमालेतील ‘घराचे रूप बदलताना..’ या मागील लेखात आपण अंतर्गत सजावटीच्या कामाचे नियोजन पूर्ण झाल्यानंतर, आणि या कामाची अंमलबजावणी सुरू करण्याअगोदर करावयाच्या अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षिततेच्या आणि सावधगिरीच्या अलिखित नियमांचा आढावा घेतला.

आज गृह-सजावटीच्या कामाची  प्रत्यक्ष अंमलबजावणी या विषयाची सुरुवात करताना तोडफोडीच्या कामाचा (Demolishing or Breaking) विचार प्रामुख्याने करावा लागेल. ‘तोडणे सोपे आणि जोडणे अवघड’ अशी म्हण आपल्याकडे आहे. रोजच्या व्यावहारिक दृष्टीने ते कितीही खरे असले, तरी बांधकाम क्षेत्राच्या दृष्टीने तोडफोड करणे ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे. या संदर्भातील आणि गृह-सजावटीचे काम करताना जाणीवपूर्वक ज्याचा विचार व्हावा, अशा इमारतीच्या सुरक्षेच्या बाबतीतील काही मुद्यांचा आज पडताळा घेऊ.

तोडफोडीचे काम करताना आरसीसी स्ट्रक्चरचा विचार करून कॉलम, बीम आणि स्लॅब, इत्यादी संरचनात्मक (स्ट्रक्चरल) भागाला जराही धक्का लागू देता कामा नये. बा भिंतींना धक्का लागू देता कामा नये. अंतर्गत भिंती तोडतानादेखील कमीतकमी तोडफोड होईल अशा प्रकारे आराखडा असावा. अंतर्गत रचनेच्या दृष्टिकोनातून सोयी करायच्या म्हणून आणि भिंती पाडल्या तरीही चालतात, असे म्हणून वाट्टेल तसे ब्रेकर्स चालवणे अत्यंत चुकीचे ठरते. भिंती पाडताना तसेच इतरही कामात जसे की, फ्लोअिरग किंवा वॉल टाईल्स काढतानाही ब्रेकर्सचा वापर करू नये. कारण ती कंपने कॉलम, बीम आदी स्ट्रक्चरल भागांची मजबुती आणि जीवनमान कमी करतात. बांधकाम तोडताना ते भिंतीच्या मधल्या भागातून तोडण्यास सुरुवात करावी, जेणे करून बीम आणि स्लॅबपर्यंत कमीतकमी कंपने पोचतील.

विशेषत: जुन्या इमारतींमध्ये खिडक्या रुंद केल्या जातात आणि अशा वेळेस लिंटेल लेवलच्या बीम्सचा विचारही केला जात नाही. आणि नंतर खिडक्यांच्या ग्रॅनाईट फ्रेम्सना तडे जाणे, saging होणे असे प्रकार निदर्शनास येऊ शकतात. तसेच स्वयंपाकघर किंवा बेडरूममधील पूर्वी असलेला लॉफ्ट  किंवा पोटमाळा तोडताना जोराने घणाघाती घाव घातले जातात. यामुळे निर्माण होणारी कंपने संरचनात्मक भागांची मजबुती कमी करतात. अशा वेळेस तांत्रिक सल्ला घेऊन कामाची अंमलबजावणी करणे योग्य ठरते. कधी कधी सलग दोन्ही मजल्यांवरच्या वास्तू एकाच मालकाच्या असतात. अशा वेळेस जागेचा ताबा घेतल्यानंतर अंतर्गत रचना करताना स्लॅब कट करून नवीन जिना काढल्याची उदाहरणेही आपण पाहतो. परंतु अशा वेळेस तांत्रिक सल्ला घेणेच रास्त होय. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या नियमांनुसार कायदेशीर बाजूदेखील लक्षात घेतली पाहिजे.

तळमजल्यावरील दुकानांच्या गाळ्यात अंतर्गत उंची वाढवून पोटमाळा बांधून कमर्शिअल जागेचा वाढीव फायदा घेण्याचा प्रकार होतो. अशा वेळेस plinth level खाली नेली जाते. तांत्रिक सल्ला न घेता आणि बेकादेशीरपणे असे करणे सर्वस्वी अयोग्य होय. अंतर्गत रचनेत बदल करताना इमारतीची सुरक्षा (Structural Safety) ही प्रथम लक्षात घेतली पाहिजे. टॉयलेटवरील पोटमाळ्यावर अति जास्त वजनाच्या वस्तू जसे की, खूप जास्त क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, एकापेक्षा जास्त इन्व्हर्टर बॅटरीज् शक्यतो ठेवू नयेत.

नवीन वीट बांधकाम करताना स्लॅबच्या कोणत्याही भागात कोठेही करून चालत नाही, तर बीमचा आधार घेऊन करावे. अन्यथा सिपोरेक्सचे बांधकाम किंवा मार्बलची पार्टिशन उभी करावी. तसेच फ्लॉवर-बेड किंवा बाल्कनीचा भाग आतमध्ये घेऊन आतील खोल्यांची मोजमापे वाढवली जातात. परंतु असे करताना इमारतीचा अधांतरी भाग (Cantilevered Portion) आत येतो आणि यावर अतिरिक्त वजन आले तर इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसते. बरेचदा वन रूम किचन असलेल्या फ्लॅटमध्ये मूळ स्वयंपाकघराचे बेडरूममध्ये रूपांतर होते आणि स्वयंपाकघर बाल्कनीमध्ये प्रस्थापित केले जाते, जे तांत्रिक आणि कायदेशीर दृष्टय़ा अयोग्य आहे.

अंतर्गत रचना करताना कधी कधी खोलीच्या एखाद्या भागातील जमिनीचा स्तर उंच (Raising Floor Level) केला जातो. असे करताना तळमजला सोडून इतर मजल्याच्या बाबतीत स्लॅबवरील वजन वाढणार नाही हे बघितले पाहिजे. वस्तुत: ही स्लॅब अशा प्रकारचे लोड गृहीत धरून डिझाइन केलेली नसते, हे लक्षात घ्यायला हवे.

मूळ इमारतीच्या आराखडय़ात दाखविलेल्या जागेनुसार न ठेवता टॉयलेटची जागा हलविली तर प्लिम्बग आऊटलेट बदलावे लागते. अशा वेळेस आऊटलेटचे काम करताना बीमला धक्का पोहोचू शकतो आणि नवीन आऊटलेट जोडणीचे बेकायदेशीर प्रकार केले जातात. अशा गोष्टींवर लक्ष ठेवून आळा घालणे हे प्रत्येक सोसायटी सभासदाचे कर्तव्य आहे. या सर्व गोष्टींचा आढावा काम सुरू होण्याआधी घेणे आणि त्यासाठी अंतर्गत रचनेच्या कामाचा आराखडा सोसायटीमध्ये जमा करून, तज्ज्ञ व्यक्तींकडून तपासून घेणे आणि मगच कामाला परवानगी देणे हे उत्तम. हे करताना सुरुवातीस जरी काम सुरू करण्यास वेळ लागला तरी मागाहून पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.

अंतर्गत रचना करताना मूळ बांधकामात बदल करणे, अर्थातच तोडफोड करणे आणि नवीन बांधकाम करणे हा भाग गृहसजावटीच्या इतर सर्व अंतर्गत कामांच्या मानाने नक्कीच जिकिरीचा असतो आणि त्यामुळेच अशा प्रकारचे अंतर्गत बदल तांत्रिक सल्ल्यानुसार आणि कायद्याच्या चौकटीत बसूनच करावे हे उत्तम.

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)