पुरुषोत्तम कृ. आठलेकर

आज गिरगावातील वास्तूंची ओळख पुसली जाऊ  लागली आहे. जीर्ण व धोकादायक चाळी त्यांचा ठप्प झालेला पुनर्विकास, मेट्रो प्रकल्पामुळे तोडल्या गेलेल्या इमारती यांमुळे हा संपूर्ण परिसर भकास होत चालला आहे. जीर्ण इमारतीत लोक अक्षरश: जीव मुठीत धरून राहत आहेत. पुनर्विकास हा झालाच पाहिजे, मेट्रो प्रकल्प व विकासाचे उद्दिष्ट हे गाठले गेलेच पाहिजे याबाबत तमाम गिरगावकारांचे दुमतच नाही. कारण सामाजिक दृष्टिकोन हा नेहमीच येथे जपला गेला आहे. त्यासाठी गिरगावकारांचे नेहमीच सकारात्मक योगदान राहिले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात गिरगावने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. अगदी सर्वसामान्य चाकरमानी ते उच्चभ्रू लोकांचे वास्तव्य या परिसरात राहिले आहे. जुन्या चाळी, वाडय़ा या वास्तूंमधून संस्कारांची बीजे रुजवली गेली आहेत. आज काही ठिकाणी उंच टॉवर्स साकारले गेले आहेत, पण बहुतांशी इमारती या अर्धवट पुनर्विकास प्रक्रियेत अडकून पडल्या आहेत. त्यांना कोणी वालीच राहिले नाहीत. येथे राहत असलेला मराठी माणूस उपनगरात फेकला गेला आहे. ज्या वाडय़ात १००% मराठी माणूस होता तेथे त्याच्यावर उपरे होण्याची वेळ आली आहे. मात्र हे खरे की, गिरगावचा  इतिहास, ओळख व लैकिक निर्माण करण्यात मराठी माणसाचा सिंहाचा वाटा आहे. ठप्प झालेला पुनर्विकास, कुलाबा-सिप्झ मेट्रो प्रकल्प याबातीत ठोस धोरण नाही. शासनाचे सातत्याने पुनर्विकासासंदर्भात बदलणारी ध्येय-धोरणे, डीपी प्लॅन २०२४ लागलेला कालावधी, विकासकांची मनमानी, स्वयंविकासासंदर्भात नसलेली पारदर्शकता याबाबतीत सर्वसामान्य रहिवाशांना योग्य माहिती व मार्गदर्शन मिळत नाही. कोणताही प्रकल्प आणताना त्याबाबत प्रामाणिक पारदर्शक भूमिका शासनाची असावी. आज मेट्रो प्रकल्पाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पण पुनर्वसनाच्या नावाने फसवणूक होत आहे. एक तर पुनर्विकासामुळे मराठी माणूस उपनगरात फेकला गेला आहे आणि पुनर्विकास ठप्प आहे. आता मेट्रोमुळे जर मराठी माणासावर ही वेळ येत असेल तर तो कदापि ते सहन करणार नाही. आज ठाकूरद्वार गिरगाव परिसरात फेरफटका मारताना अनेक जुन्या इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत. पुनर्विकास व पुनर्वसन आश्वासन दिल्याप्रमाणे होत नाहीए. स्थानिक राजकीय लोकप्रतिनिधींनी यात जातीने लक्ष घालणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाची कामे मात्र तातडीने होत आहेत, पण वर्षांनुवर्षे रखडलेला पुनर्विकास मेट्रो प्रकल्पामुळे स्थानिकांचे पुनर्वसन या वस्तुस्थितीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही ही मोठी शोकांतिका आहे.

सदर प्रकल्प गिरगावकरांच्या मुळावर आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाला घालत असतील तर त्याला प्रकर्षांने विरोध असेल. चाळी, वाडय़ा याच खऱ्या अर्थाने गिरगावचा इतिहास आणि तो सहजासहजी पुसला जाणार नाही हेही तितकेच खरे असले तरी सध्याची वस्तुस्थिती व परिस्थिती पाहता ठप्प झालेला पुनर्विकास, मेट्रोमुळे पुनर्वसनाबाबतची चिंता यांमुळे गिरगावकर हताश झाले आहेत. याची दखल शासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने घेऊन या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा काढावा हीच अपेक्षा!

पुनर्विकास समिती सदस्य, गिरगाव.

pkathalekar@gmail.com.