कलानिर्मिती एक ‘पिसं’ असतं. ‘वेडंपिसं’ करणारं! ज्याला ते लागतं तो तिचा होतो. जगरहाटीचे ‘अर्थ’, स्वार्थ त्याला रोखू शकत नाहीत. ते पिसं त्याला ओढत राहातं! भले भले धोपट मार्ग सोडून कलेच्या या बिकट वाटेला जातात. कारण ती उर्मीच तशी असते प्रबळ! दाबता न येणारी! त्या वाटेवरची माती, रंग त्याला निर्मितीसाठी खुणावीत असतात. त्याच्या डोळ्यासमोर तरळत असतात, आधीच्या कलारोहकांनी निर्मिलेली कलाशिखरे! शिखरांकडे जायची वाट बिकट असणारच. पण तो बिचकत नाही. त्या शिखरांपर्यंत पोहचण्याइतकी शक्ती आपल्यापाशी आहे की नाही याची फिकीर तो करत नाही. कारण त्याला लागलेलं ते कलानिर्मितीचं पिसं! ती प्रबळ इच्छा! अशापायी तर एखाद्या दिनकर धोपटेंसारख्या कलाकाराने वयाच्या चोविसाव्या वर्षी कलेच्या रीतसर औपचारिक शिक्षणास पुण्याच्या अभिनव कला विद्यालयात सुरुवात केली व ‘शिल्पसाधना’ स्टुडिओ उभारला. पुढे त्यांचा मुलगा अविनाश हा कलेचा ध्यास घेऊन जगला.
दिनकर थोपटेंचं शिक्षण १९६९ मध्ये पूर्ण झालं. नंतर तेथेच त्यांनी अध्यापनाची नोकरी केली. पुढे ते या संस्थेचे प्राचार्यही होऊन सन २००० मध्ये निवृत्त झाले. कलाशिक्षण चित्रकलेचं घेतलं होतं. पण शिल्पकलेच्या ओढीनं त्यांना कधीही स्वस्थ राहू दिलं नाही. शिकत असतानाच पुण्यातील गणेशोत्सवासाठी मूर्ती, हलते पुतळे करण्याचा श्रीगणेशा झाला. त्यासाठी पुण्यातील तज्ज्ञ कलाकारांचं मार्गदर्शन मिळालं. गेली पन्नास वर्षे ते त्यांच्या स्टुडिओत निष्ठेने कार्यमग्न आहेत. त्यांची मुले अविनाश, दीपक यांनी शिल्पकलेचं रीतसर शिक्षण जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून घेतलं आणि कलेच्या त्याच बिकट वाटेवर पावलं टाकली. तिसरे चिरंजीव राजेंद्र यांनी शिल्पकलेचं औपचारिक शिक्षण घेतलं नसलं तरी त्यांनाही यात गती असून सहभाग असतो. सर्वानी आपापल्या क्षमतेनं स्टुडिओचं कार्यक्षेत्र, पसारा वाढविला. त्यांच्या त्या स्टुडिओला संत-माहात्म्यांचा आशीर्वाद आहे, अशी त्या सर्वाची श्रद्धा आहे. येथील कोणतंही काम चांगल्या दर्जाचं व वेळेत पूर्ण झाल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं.
या स्टुडिओची प्रशस्त जागा तेरा हजार चौरस फूट आहे. तो धायरी येथं गणेश नगरात आहे. सभोवती बरीच झाडंझुडपं आहेत. पक्कं बांधकाम असलेल्या स्टुडिओत शिरण्यापूर्वीच्या पॅसेजमध्ये दोन्ही बाजूला शिल्पाकृती व पॅनल्स ओळीत ठेवले आहेत. स्टुडिओत एकावेळी चार-पाच प्रकल्पांची कामं निरनिराळ्या टप्प्यात सुरू असतात. शिल्पकलेसाठी आवश्यक असलेला भरपूर नैसर्गिक प्रकाश व कृत्रिम प्रकाश आत येण्यासाठी छताला ट्रान्स्परंट फायबर शीट लावून शिवाय  पांढऱ्या दिव्यांची सोय केली आहे. शिवाय दक्षिण उत्तरेला भरपूर खिडक्या आहेत. स्टुडिओत वर्कशॉप आहे. शिल्प सर्व बाजूंनी व लांबून बघितलं जाणं आवश्यक असतं. त्यासाठी शिल्पाच्या आजूबाजूला आवश्यक असणारी मोकळी जागा आहे. शिल्पाकृती खाली-वर करण्यासाठी चेन पुली (क्रेन्स) आहेत. शिल्पाकृती सर्व बाजूंनी बघण्यासाठी फिरकीची टेबल्स आहेत.
या स्टुडिओत गणेशोत्सवाच्या सजावटीची व अन्य प्रसिद्ध स्थानी उभारलेली शिल्पे घडली आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई, हत्ती गणपती, निंबाळकर तालीम, गुरुजी तालीम, अरुणा चौक इत्यादी अनेक प्रतिष्ठित गणपती मंडळांचे मूíतकाम व सजावटींची कामं थोपटे यांची असतात. मुलगा अविनाश थोपटे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असलेल्या शिल्पाकृती म्हणजे पुण्याच्या सारस बागेजवळील महालक्ष्मी मंदिरातील संतांच्या सोळा मूर्ती (१९८१-८४), आळंदी येथील ‘ज्ञानेश्वरांची समाधी’ हे दृश्य व अन्य उठाव शिल्पे (२००४), लता मंगेशकर उद्यान- नागपूर (२००२-०२), देहू येथील गया मंदिरातील संत तुकारामांचे जीवन शिल्प, अकलूज येथील शिवसृष्टी (२००८). हे काम सुमारे २ र्वष सुरू होतं. गीता मंदिर (न्यूयॉर्क), जैन फाऊंडेशनचं कलकत्ता येथील भगवान पाश्र्वनाथ मंदिर, जेजुरी येथील ‘शिवाजी व शहाजी भेट’ अगदी अलीकडची कामं म्हणजे हुतात्मा बाबू गेनू शिल्पसृष्टी; पडवळ, मॉरिशस मराठा संस्था व उर्से ग्रामसंस्थांच्या वतीने २०१२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मॉरिशस येथे केलेली स्थापना. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांचा जन्म व बालपण ही प्रसंगमालिका केली आहे. १२x८ फुटांची ८ पॅनल्स फायबरग्लासमध्ये करण्यात आली. काही मोजक्या शिल्पाकृतींचा उल्लेख येथे केला आहे. शिल्पकलेच्या क्षेत्रात दोन-तीन पिढय़ांनी हा वारसा चालविल्याची उदाहरणे अत्यल्प आहेत. दिनकर थोपटे व त्यांच्या तिन्ही मुलांनी हा वारसा पुढे नेला, हे विशेष.
स्टुडिओची जमीन दिनकर थोपटे यांच्या कामगार वडिलांनी १९७२ मध्ये घेतली होती. हे ठिकाण त्यावेळी शहरापासून लांब व ओसाड जागी होतं. लहानसं टेकाडच होतं ते! त्यामुळे आजही तेथील जमिनीला थोडे चढ-उतार आहेत. थोपटे यांच्या वडिलांनी सुरुवातीला दोन-चार पोत्यांचं केवळ एक खोपटं उभं केलं होतं. आज माती-प्लॅस्टरची अनेक पोती तिथं एका बाजूला रचून ठेवली आहेत. खोपटे यांची निवासस्थानंही ‘शिल्पसाधना’ आवारातच आहेत. एकूण जागेच्या केवळ १५% जागा निवासासाठी म्हणजे कौटुंबिक प्रपंचासाठी असावी. बाकी जिकडे बघू तिकडे अंगणापासून गच्चीवर, छतावर आजूबाजूला शिल्पकलेचा प्रपंच पसरला आहे.
बहरलेल्या या स्टुडिओवर दोन वर्षांपूर्वी एक उदासीनतेचा विषण्ण काळा ढग सरकून गेला. थोपटय़ांच्या कौटुंबिक प्रपंचावर व कलाप्रपंचावर मोठे चिरंजीव अविनाशच्या अकाली निधनाचा मोठाच आघात झाला.
अविनाशजींनीदेखील शिक्षण सुरू असतानाच पुण्यातील गणेशोत्सवातील मूर्ती, पुतळे, सजावटीची दृश्यं करण्याच्या कामास सुरुवात केली होती. त्यातील हलत्या मूर्तीसाठी त्यांनी विविध प्रयोग केले. या स्टुडिओत दर्जेदार काम करीत या क्षेत्रात स्वत:च्या नावाची मोहोर उठवली. आपल्या स्टुडिओची हुन्नरीनं, परिश्रमानं भरभराट केली. शिक्षणानंतर आपल्या ‘शिल्पसाधनेत’ मग्न असताना नियतीच्या अतक्र्य खेळीनं आपला पहिला फासा टाकला. अविनाश यांच्या किडन्या निकामी झाल्या. डायलेसिस सुरू झालं. पाच डॉक्टरांनी रुग्ण व रिपोर्ट्स बघितले. प्रकृती अत्यवस्थ असल्याचाच निर्वाळा दिला.  मात्र, डायलिसीसनंतर घरी परतले की, स्टुडिओत या शिल्पकाराचा झपाटा उत्साहानं सुरू! दिवसाचे आठ-दहा तास ते काम करीत होते. आश्चर्य म्हणजे पंधरा वर्षे हा झपाटा विविध शिल्पं ठरलेल्या वेळेत निर्माण करीत होता. ढासळलेल्या प्रकृतीच्या साथीनं शिल्पकलेतील अनेक तांत्रिक प्रक्रियांचं भान सांभाळीत होता. विविध प्रकारच्या शारीरिक हालचालींचा अंतर्भाव असणाऱ्या शिल्प निर्मिती प्रक्रियेत असताना शारीरिक क्षमतेत कधी कमी पडले नाहीत. ब्लड प्रेशर २४० च्या पुढं जायचं. नंतर नंतर डोळ्यांच्या शिरांच्या रक्तस्रावानं दृष्टी क्षीण झाली. यापुढे हातून शिल्पनिर्मिती होणं नाही हे शिल्पकाराला कळून चुकलं. त्याची जगण्याची इच्छाच संपली.
वैद्यकीय उपचारांच्या मर्यादा सुरुवातीलाच स्पष्ट होत्या. डायलिसीसचा खर्च कुटुंबाच्या कुवतीबाहेरचा होता. पंधरा र्वष सर्व निभावलं ते संतांच्या कृपेमुळं व अविनाशच्या शिल्पनिर्मितीच्या दुर्दम्य इच्छेमुळं! असं त्याच्या शिल्पकार वडिलांना मन:पूर्वक वाटतं. ते म्हणतात, ‘‘अविनाशच्या हातून शिवसृष्टी (अकलूज) घडायची होती. अनेक देव-देवतांच्या मूर्ती निर्माण व्हायच्या होत्या. म्हणून त्याला जगण्याचं चैतन्य महाराजांनी दिलं. येणाऱ्या कामातून डायलिसीसचा खर्च निभावत गेला.’’
‘शिल्पसाधना’ स्टुडिओतील कलानिर्मितीमागची ही कहाणी ऐकून वाटलं, खरंच! हे निर्मितीचं ‘पिसं’? नियतीचे संकेत? की सर्जकतेची प्रचंड इच्छाशक्ती? गुरुकृपा की सर्वच?  मला वाटतं, कलेच्या इतिहासात या शिल्पकाराची दखल ज्या स्थानावर असेल तेथे ती नोंदविली जाईल. तथापि त्यात महत्त्वाची आहे ती कलानिर्मितीची प्रचंड आस. तरुणपणीच मृत्यूच्या कराल छायेत असतानाही अधिक तीव्रतर झालेला सर्जकतेचा ध्यास. इतका की कलानिर्मितीच त्याची जणू ‘कवचकुंडले’ बनली. शिल्पकार अविनाश थोपटे यांचं अवघ्या छत्तीसाव्या वर्षी निधन झालं. त्यांचा शिल्पनिर्मितीचा उत्साह, धीरोदात्तपणा यामुळेच त्यांच्या जाण्यानंतर कुटुंब खचलं नाही. ते दु:ख हळूहळू कमी होईल. त्यांच्या स्टुडिओत नेहमीची लगबग, धामधूम सुरू आहे. गणेशोत्सव मंडळांनी आत्तापासून त्यांना ‘बुक’ करून ठेवलंय. थोपटे परिवार जोमदार काम करीत ‘शिल्पसाधनेत’ मग्न आहे.