सागर कारखानीस

karkhanissagar@yahoo.in

Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
arrest
रंग लावण्यासाठी अल्पवयीन मुलीला घरातून खेचून आणले; विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपीला अटक

‘दत्त दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध,

दुधाची साय, सायीचं दही, दह्यचं ताक,

ताकाचं लोणी, लोण्याचं तूप..’

लहानपणी सर्वानीच ऐकलेलं हे गाणं आपल्या कृषीप्रधान संस्कृतीतील दूधदुभत्यांच महत्त्व सांगून जाते. प्राचीनकाळी कुटुंबाची खाण्यापिण्यातील सुबत्ता ही दूधदुभत्यांवरून ठरत असे. एवढेच नव्हे तर श्रीमंती अथवा गरिबी सांगण्यासाठी दुधाचाच दाखला दिला जाई. प्रत्येकाघरी एक तरी दुभते जनावर असल्याने रोजच्या आहारात दुधाचा कमीअधिक वापर होत असे. आजच्या या सदरात विरजलेल्या दह्यापासून ताक व लोणी तयार करण्यासाठी स्वयंपाकघरात मदत करणाऱ्या ‘रवी’चा आढावा घेणार आहोत.

मराठी व्युत्पत्ति कोशात कृ. पां. कुलकर्णी यांनी ‘रवी’चा अर्थ ताक करण्याची काठी (मराठी), रवओ = मन्थन: (देशी प्राकृत), रावि (कानडी) असे दिले आहेत. त्यांच्या मते, ‘रावि’ हा कानडी वृक्षविशेष असून हे लाकूड अर्क नावाच्या वृक्षाचे असते म्हणून त्याला रवि म्हणण्याचा प्रघात आहे. यावरून रवी हा कानडी राविचा अपभ्रंश असावा. तसेच ताक व लोणी बनवण्यासाठी महत्त्वाची असते ती ‘घुसळण्या’ची प्रक्रिया. म्हणूनच या घुसळण्याच्या प्रक्रियेत मदत करणाऱ्या रवीला ‘मंथा’, ‘रवओ’, ‘घुसळणी’ असेही संबोधले गेले असावे. समुद्रमंथनात देव व दानव यांनी मेरू पर्वताचा रवीसारखा आणि वासुकी नागाचा दोर म्हणून केलेला वापर, गण-गवळणी, महाकाव्यांमध्ये वर्णिलेल्या श्रीकृष्णाच्या बाललीलांमधील लोण्याचे उल्लेख, इ. आधारे आपणास घुसळण्याच्या प्रक्रियेचे व रवीचे प्राचीनत्व अधोरेखित करता येते. एवढेच नव्हे तर अनेक भारतीय मंदिर स्थापत्यात उदा. खजुराहो येथील लक्ष्मण मंदिर तसेच हम्पी येथील विठ्ठल मंदिरमध्ये कोरलेल्या घुसळण प्रतिमांवरून तत्कालीन ताक व लोणी बनवण्याच्या प्रक्रियेची कल्पनाही करता येते.

या रवीची एकूण रचनाही वैशिष्टय़पूर्ण असते. उदा. या रवीचा घुसळण्याचा खालील मुख्य भाग गोलाकार असून त्यास फुलांच्या पाकळीप्रमाणे त्रिकोणी छेदाच्या खोलगट खाचा पाडलेल्या असतात. तसेच हा भाग फिरवण्यासाठी त्याला एक दांडा जोडलेला असतो. रवीचा गोलाकार भाग दह्यच्या आत बुडवून वरचा दांडा उलटसुलट दिशेने जोरात फिरवला की दही घुसळण्याची प्रक्रिया सुरू होते व त्यातील लोणी वेगळे होऊन ताकाच्या पृष्ठभागावर जमा होते. हातात रवी पकडून ताक घुसळण्यासाठी एक ते दीड फूट उंचीच्या रव्या वापरल्या जात. तसेच घुसळखांबाच्या साहाय्याने ताक घुसळण्याची क्रिया बसून किंवा उभ्यानेही करता येत असल्याने बसून ताक घुसळण्यासाठी ३ ते ४ फूट उंचीच्या आणि उभ्याने ताक घुसळण्यासाठी ५ ते ६ फूट उंचीच्या लाकडी रव्या वापरल्या जात. यापकी काही रव्यांना ४ तर काहींना ८-१० पाकळ्या किंवा आरे असत. मोठय़ा रव्या किंवा घुसळखांबा हे मोठय़ा प्रमाणावरील दूधदुभत्याचे द्योतक मानले जाई. कारण हातात रवी धरून दही घुसळण्याचे हे काम तसे शारीरिक परिश्रमाचे असते. त्यामुळे कमी प्रमाणातील दही घुसळण्यासाठी रवीचा दांडा दोन्ही हातांच्या तळव्यांत धरून उलटसुलट फिरवणे शक्य असते; मात्र मोठय़ा प्रमाणात दही घुसळून ताक बनवण्यासाठी घुसळखांब वापरला जातो. पूर्वी अनेक घरांत ताक करण्यासाठी असे लाकडी घुसळखांब असत. त्याला ताकमेढी असेही म्हणत. ४ फूट उंच असलेल्या घुसळखांबाला रवीचा दांडा एका मध्यम जाडीच्या दोराच्या फाशांत अडकवून ती रवी ताकाच्या भांडय़ात ठेवली जाई. नंतर फाशांच्या मधल्या जागेत पांढऱ्या वाखाच्या जाड दोरीचे २-३ वेढे  देऊन त्या दोरीचे एक टोक डाव्या हातात तर दुसरे टोक उजव्या हातात धरून ती दोरी पुढेमागे करीत ताक घुसळले जाई. ताकाची रवी दोरीने एका लयीत पुढेमागे करताना होणारा ताकाचा घुळूऽऽऽघुळूऽऽऽआवाज आणि त्यात समरस होणारा घुसळणाऱ्या स्त्रीच्या बांगडय़ांचा किणकिण नाद एक सुंदर संगीत निर्माण करी. मग अशा संगीतमय वातावरणात आपसूकच ती सस्त्री आपल्या भावना व्यक्त करताना म्हणे –

‘ताक घुसळ घुसळ, येवो लोणीयाचे बळ।

वर आनंदाचा झरा, आत सारी खलबळ।। ’

तर कधी आपल्या अंगणात उभ्या असणाऱ्या सासूला उद्देशून  –

‘बाळा कृष्णा कर रे घाई, खाऊन घेई लोणी गोळा,

पाहा जरा मागे तुझ्या जमला गोपाळांचा मेळा,

एवढी मुखे वासलेली कसे करू लाड?

अंगणात उभी आहे सासू माझी द्वाड!’ – अशी मजेशीरपणे शालजोडीही मारत असे.

प्राचीनकाळी ताक घुसळताना ते चांगले घुमावे म्हणून उभट आकारापेक्षा गोलाकार मातीचे डेरे वापरले जाई. मातीच्या डेऱ्याला रवीचा धक्का न लावता असे ताक घुसळणे हे कौशल्यच मानायला हवे. पुढे मातीच्या डेऱ्यांची जागा कल्हई केलेल्या पितळी भांडय़ांनी घेतली. या भांडय़ामध्ये ताक घुसळण्याचेही एक विशिष्ट तंत्र होते. सुरुवातीला रवीने दही एकजीव करण्यासाठी पाणी न घालता घुसळले जाई. नंतर उष्णता निर्माण होऊन ताक लवकर व्हावे म्हणून हळूहळू रवीचा वेग वाढवला जाई. मात्र ताक होत आल्यावर पुन्हा रवीचा वेग मंद केला जाई. कारण ताक होत आल्यावरही रवी जोराने घुसळत राहिल्यास लोणी पातळ होते. तसेच घुसळताना वरचेवर रवी थांबणार नाही ना याचीही खबरदारी घ्यावी लागते; कारण वरचेवर रवी थांबवल्यास ताकाची उष्णता कमी होऊन लोणी वर यायला उशीर लागतो. तसेच रवीला लोणी चिकटू नये म्हणून ती आधणाच्या पाण्याने धुऊन घेतली जाई. एवढेच नव्हे तर हाताने लोणी काढताना ते चिकटू नये म्हणून हातही गरम पाण्याने धुऊन मगच लोणी काढले जाई.

ताक घुसळून लोणी आलं की लोण्याचा नवेद्य बाळकृष्णाला दाखवून नंतरच त्याचा आस्वाद घेत. तसेच ताक करताना अवतीभोवती उडालेले दह्याचे शिंतोडे पायाखाली येऊ नयेत म्हणून तो भाग शेणाने सारवला जाई. तसेच घुसळखांबाला सूर्यरूप मानून त्याची पूजा केली जाई. घरात गोधनाची वृद्धी व्हावी यासाठी रवीसह दही घुसळण्याचे भांडे ब्राह्मणाला दान द्यावे असाही संकेत होता. एका प्राचीन आख्यायिकेप्रमाणे द्रोणाचार्याची पत्नी कृपी हिला दुर्वास ऋषींनी सांगितलेल्या दधिमंथदान व्रतामुळे अश्वत्थामा हा पुत्र झाला. त्यामुळे आजही काही ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी दधिमंथदान हे व्रत केले जाते. या व्रतात दह्याच्या भांडय़ांवर यशोदा-कृष्णाची प्रतिमा ठेवून त्यांची आणि लाल वस्त्रात गुंडाळलेल्या रवीच्या दांडय़ावर देवी व सूर्य यांची कल्पना करून पूजा केली जाते. तसेच लाह्या, उसाचे करवे, पोहे व लाडू यांचा नवेद्य दाखवून दही घुसळण्याची रवी व घुसळणासह डेरा यांचे दान केले जाते. काही समाजांत लग्नात मंडपांच्या खांबाला लाकडाचे मुसळ, ताक घुसळण्याची रवी व पुरणपोळी बांधण्याची प्रथा आहे.

सुरुवातीला रवीचे स्वरूप हे पूर्णपणे लाकडी होते. कालांतराने विविध धातूंच्या रव्या उपलब्ध होत गेल्या. आज बाजारात पितळ, अ‍ॅल्युमिनियम, स्टेनलेस स्टीलच्या स्प्रिंग असलेल्या, प्लास्टिकच्या रव्या दिसून येतात. आज रवीचा वापर फक्त दही घुसळण्यासाठी एवढाच मर्यादित राहिलेला नसून वरणाची डाळ मोडण्यासाठीही रवी वापरली जाते. अंड फेसण्यासाठी तर खास बारीक तारेच्या छोटय़ा रव्या उपलब्ध झाल्या आहेत. तसेच हाताने दही घुसळण्यासाठी बरीच अंगमेहनत करावी लागत असल्याने आज विद्युतशक्तीने घुसळकाम करणारे यंत्रही वापरले जात आहे. काही वर्षांपूर्वी पंजाबमध्ये वॉशिंग मशीनमध्ये बनवलेली लस्सी खूप प्रसिद्ध झाली होती. मध्यंतरी एका वर्तमानपत्रात ग्रामीण भागात छोटय़ा टेबल फॅनचा सांगाडा वापरून त्याला छोटी पाती बसवून लस्सी मेकर्स बनवल्याची बातमी वाचनात आली होती. याकडे आधुनिक रवीचे रूप म्हणून पाहता येईल.