सीमा पुराणिक

‘वास्तुसंवाद’ या लेखमालेत सुरुवातीला आपण हे लक्षात घेतले की, अंतर्गत रचनाकार अंतर्गत रचना करताना ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊन, तसेच सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून जागेचा आराखडा तयार करत असतो. त्यानंतर अंतर्गत रचना करताना लक्षात घेण्याच्या तीन मुख्य मुद्दय़ांपकी पहिल्या मुद्दय़ांचा प्रामुख्याने विचार केला, तो म्हणजे अंतर्गत जागेचा सुयोग्य वापर. (Space Utilisation) या विषयाच्या अनुषंगाने जागेच्या मिती अर्थातच लांबी, रुंदी आणि उंची यानुसार आणि वस्तूंच्या परिमाणानुसार साधण्याची प्रमाणबद्धता, चलनवलन, दृश्य समतोल इत्यादी अनेक रचनामूल्यांचा विचार केला. दृश्य समतोल नसेल तर त्या जागेत वावर करतानाचा सहजपणा कसा निघून जातो हेदेखील लक्षात घेतले. अंतर्गत जागेचा आराखडा करणे या पहिल्या टप्प्यात (Planning and Designing) रचनाकार जरी द्विमितीय चित्र काढत असला (Plan or Layout) तरी त्रिमितीय चित्र (Three – Dimensional View) त्याच्या मन:पटलावर तयार असते. (Visualisation). अवकाश (Space), रेषा, आकार, घनाकार इत्यादी भौमितिक तसेच भौतिक रचनात्मक घटकांचा वापर रचनात्मक मूल्यांची जाण ठेवून केला तर रचनाकाराच्या कल्पनेच्या कुंचल्यातून घराचे त्रिमितीय चित्र आकाराला येते खरे; तरीही वास्तू आणि तेथील वस्तूंना तेथील व्यक्तींशी खऱ्या जाणिवेतून जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रकाशयोजना आणि रंगसंगती.

Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या
how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?

वस्तुत: प्रकाशाचे आणि रंगाचे स्वत:चे असे नाते आहे. भौतिकदृष्टय़ा सूर्यप्रकाशाच्या किरणांचे विकेंद्रीकरण होऊन सप्त रंगांचे इंद्रधनुष्य आपणास बघावयास मिळते. खरोखरच निसर्गराजा हा जादूगार आहे. शास्त्रीयदृष्टय़ा कितीही कारणमीमांसा केली तरी हे नयनमनोहर दृश्य बघण्याचा आनंद शब्दातीत असतो हेच खरे. असा हा सूर्यप्रकाश सजीवांना सचेतन ठेवणारा आणि आरोग्य प्रदान करणारा असतो. आपल्या घराच्या दारे-खिडक्यांची जागा ही ठरलेली असते. आणि घराला दिशांचे बंधनही असते. ऋतुकालानुसार कमी-जास्त प्रमाणात येणारा सूर्यप्रकाश हा घरातील वातावरण स्वच्छ, निरोगी आणि प्रफुल्लित ठेवण्यास पुरेसा असणे अत्यंत आवश्यक असते. जेथे नसíगक सूर्यप्रकाश अत्यंत कमी असेल अशा खोलीत पांढऱ्या रंगाचा किंवा फिक्कट रंगांचा अधिकाधिक वापर करावा. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाश तेथील वस्तूवर पडून परावर्तीत होऊनही आपल्या उपयोगी पडू शकतो. मात्र त्याचा विचार होणे आणि त्यानुसार रचनात्मक बदल करण्याचा प्रयत्न करणे हे गरजेचे असते. ‘‘अगं मने, खिडकीकडे पाठ करून काय वाचत बसली आहेस? तुझाच अंधार पडतोय पुस्तकावर.’’ हे बरेचदा कानावर पडणारे वाक्य. मथितार्थ असा की, स्टडी टेबलवर शक्यतो डाव्या बाजूने सूर्यप्रकाश येईल अशा पद्धतीने स्टडीरूमची रचना असावी.

स्वयंपाकघरात पुरेसा सूर्यप्रकाश असेल तर गृहिणीचा उत्साह नक्कीच वाढेल. खाद्यपदार्थ बनविताना / शिजताना त्याचा बदललेला रंग समजणे गरजेचे असते. म्हणजे मग ‘शिरा कसा अगदी खमंग भाजला आहेस हो,’ अशी सासूबाईंची कौतुकवाणी नक्की कानी पडेल. स्वयंपाकघरातील ओटा हे नेहमीचे आणि जिव्हाळ्याचे उदाहरण. या ओटय़ाची उंची योग्य असणे हे गृहिणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. स्त्रीला स्वयंपाक करताना ओटय़ाची उंची, गॅस शेगडीची उंची आणि पातेल्याची उंची या सर्वावर मात करून त्या पातेल्यातील पदार्थ न्याहाळायचा असतो आणि मगच पाककृतीतील पुढचा पल्ला गाठायचा असतो. त्यातही कितीही गडबड घाई असली तरी सुरक्षितता महत्त्वाची असते आणि हो, खवय्यांसाठी पदार्थाची चवही महत्त्वाची असते.

एखाद्या खोलीचा आकार आयताकृती नसून, जर ती खोली पाच ते सहा कोनांनी युक्त असेल तर नक्कीच युक्तिपूर्वक रचना करून माणसाच्या मनात सहजपणे पडणाऱ्या आभासी प्रतिमांचा विचार करावा लागतो. रंगभूषाकार (make – up artist) जसे चेहऱ्यावरचे डाग लपविण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करत असतो. निरनिराळी सौंदर्य उत्पादने खुबीने वापरून चेहरा नितळ असल्याचा भास निर्माण करतो. त्याचप्रमाणे, लांबी-रुंदीची प्रमाणबद्धता नसलेल्या खोलीला फर्निचरची रचना करताना, युक्तीने त्या जागेत प्रमाणबद्धता आणणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे विशिष्ट रंगसंगतीचा आणि प्रकाशझोतांचा वापर करून त्या खोलीची प्रमाणबद्धता योग्य असल्याचा भासही निर्माण करता येतो.

वास्तविक पाहता, कमीत कमी फर्निचर असलेली, प्रमाणबद्ध, मोकळी आणि सुटसुटीत बठकीची खोली प्रवेश केल्या केल्या आपल्या नकळत आपल्या मनात एक प्रकारचा तोल आणि प्रसन्नता निर्माण करते. परंतु या खोलीतील भौमितिक आकारांची प्रमाणबद्धता मानवी मनाला आनंद देण्यास पुरेशी ठरते का? केवळ घनाकार नाही तर त्यांचा रंग, पोत (Texture)आणि त्या वस्तूंवर पडणारा नसíगक आणि कृत्रिम प्रकाश या सर्वच बाबी महत्त्वाच्या असतात. प्रकाशाचा आणि रंगांचा खेळ मोठा आकर्षक आणि जादुई असतो. पिवळ्या रंगाच्या प्रतलावर टाकलेला निळा प्रकाशझोत हिरव्या रंगाचा आभास निर्माण करतो.

प्रकाश हा ऊर्जेचा स्रोत आहे. सर्व रचनाघटकांवर त्याचा प्रभाव असतो. त्यांचे सौंदर्य खुलवतो. इतकेच नाही तर बरेचदा सावल्यांच्या माध्यमातूनही तो सुंदरता निर्माण करतो.

एखाद्या खाद्यपदार्थात जसे सर्व घटक महत्त्वाचे असतात, तसे तो पदार्थ तयार करण्याची कृतीही तितकीच महत्त्वाची असते. जसे की, उत्तम प्रतीचा बासमती तांदूळ असला तरी बाकीचे घटक योग्य प्रमाणात घेऊन पाककृती केली तरच तो पुलाव चविष्ट होतो. तसेच, महागडे मटेरियल अथवा फर्निचर असले म्हणजेच अंतर्गत सजावट उत्तम होते असे नाही. तर याचसाठी जाणकारांची गरज असते, अंतर्गत रचनाकार हा सर्व रचना मूल्यांचा सुयोग्य वापर करून एखादे सुंदर घरकुल तयार करतो तेव्हा त्या घरात प्रसन्न आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण होते आणि मग हळूच असे एखादे तरल गाणे गुणगुणावेसे वाटते,

‘‘माझिया दारात चिमण्या आल्या,                                                                                                                                                                  अबोल काहीसे बोलून गेल्या..

कळले सारे नि कळले नाही

अबोध मनाची हासली जुई..’’

seemapuranik75@gmail.com

(सिव्हिल इंजिनीअर,  इंटिरिअर डिझायनर)