19 March 2019

News Flash

औषधांचे नियोजन

घरात जितके सदस्य जास्त, जितके आजारांचे वैविध्य जास्त, तितकी औषधे, वैद्यकीय उपकरणे घरात येणार.

प्रतिनिधिक छायाचित्र

|| प्राची पाठक

घरात जितके सदस्य जास्त, जितके आजारांचे वैविध्य जास्त, तितकी औषधे, वैद्यकीय उपकरणे घरात येणार. त्यात अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि काय काय, सगळेच जमणार!  घराघरात औषधांचे संमेलन भरते मग. औषधे कधी अर्धी वापरली जातात, कधी पडून राहतात तशीच. वेळेवर एकही औषध सापडत नाही, अशीही परिस्थिती उद्भवू शकते. मुदत संपलेली औषधेदेखील कुठे कुठे पडलेली असतात. डॉक्टर कधी डोस बदलून देतात, त्याचे वेगळेच प्रकार होतात. हॉस्पिटल अथवा मेडिकलमध्ये शक्य तितकी रिप्लेसमेंट करूनदेखील काही औषधे उरतातच. परत बदलायला जाणे शक्य होत नाही. एका दुकानातले औषध दुसरा दुकानदार घेत नाही.. अशी वेगवेगळी कारणे या पडून राहणाऱ्या औषधांमागे असतात. काहींना कोणकोणत्या सरकारी, निमसरकारी स्कीममध्ये औषधे फुकट किंवा कमी दरात मिळतात. मिळतेच आहे, तर लोक जमा करत जातात. आधी आपली गरज भागवत आणि नंतर साठवत जातात. आपल्याला फुकटच जे मिळाले आहे, ते ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ ठेवून इतर कोणाला उगाच, त्यांची गरज आहे की नाही हे न बघताच वाटायलाही जातात! बरे, तुम्ही एकदा वाटाल, दोनदा वाटाल; पण त्या लोकांना त्याची गरज नसेल तर कितीदा वाटाल? कुणाकुणाला वाटाल? त्याचे दुष्परिणाम झाले, तर कोण जबाबदार? काहींना खरोखर उपयोगी पडतदेखील असतील अशी औषधे, पण तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय, गरज आहे की नाही, हे न ठरवता वाटली जाणारी औषधे घातकच. तरीही मुदत संपायच्या आत असलेली, चांगली ठेवलेली आणि परत करायची शक्यता/इच्छा नसलेली अनेक प्रकारची औषधे कुठे जमा करून ज्यांना ते औषध डॉक्टरने लिहून दिलेले आहे, त्यांना पोहोचवायची, मिळायची काही सुविधा असावी, असे वाटते.

काही ठिकाणी अशा सुविधा सुरू होतात. कुठे बॉक्स ठेवले जातात. कुठे आवाहन केले जाते. त्या सुविधा लवकरच बंददेखील पडतात. याचे एक कारण त्याला असलेले मूल्य. आपल्याकडे कशाकशातून लोक पैसे काढतील, सांगू शकत नाही. जिथे अनेक हॉस्पिटल्समध्ये स्टाफच गोळ्या, सलाइन, ग्लोव्ह्ज, बेडरिडन माणसाला पुसायचा कॉटनसुद्धा लांबवितो आणि परत विक्रीला नेतो अशा तक्रारी असतात, तिथे कुठेही अशी मुदतीतली औषधे नेऊन दिली, तर त्यांची विक्री करून पैसे मिळविणारे एक वेगळेच चक्र तयार होईल, अशी भीती आपल्या मनात असते. दुसरे कारण म्हणजे, नीट न ठेवलेले काहीही या सुविधेमध्ये ‘आणून टाकणे’. घरातला सगळा कचरा आणून टाकावा, तसे एक दिवस अचानक जाग येऊन लोक जसे असतील तसे सर्व पडीक औषधे इथे आणून टाकतात. ते तपासणे, तारखा चेक करणे, यादी करणे, सील्स तुटली नाहीत ना गोळ्यांची, बाटल्यांची, हे दर वेळी बघितले जातेच असे नाही. मग हा कचरा आवरणे, हेच एक काम त्या सुविधा देणाऱ्यांना करत बसावे लागते. त्यात, मार्केटिंगवाले असेच आणि तसेच अशा विविध कथाही लोक हिरिरीने शेअर करत असतात. ‘कशाला नको ती कटकट,’ असे करून शेवटी आपण बरे पर्याय उपलब्ध नसल्याने सोपा उपाय म्हणून ते फेकूनच द्यायचा पर्याय निवडतो. त्यात काही जण गोळ्या वगैरे असतील तर झाडांना कुटून टाकतात. सिरप्स त्यांच्या मुळाशी ओततात. त्याने झाडांना चांगली फुले येतात, पाने टवटवीत होतात वगैरे निरीक्षणे लोक सांगतात. हे फारच मोघम निरीक्षण असते आणि या कृतीचेही काही दुष्परिणाम रोपांवर होत असतील का, याची माहिती आपल्याला नसते. ते अतिशय छोटय़ाश्या प्रमाणात होत असल्याने आणि विखुरलेले असल्याने तसे मोजमाप करायचीदेखील संधी विशेष नसते.

आपल्या स्तरावर करायच्या छोटय़ा उपाययोजना म्हणजे, आपल्याला जो डोस डॉक्टरांनी दिलेला आहे, तो समजून उमजून आणि पूर्ण घेणे. औषधे विकत घेतानाच बिल घेतलेले असेल, दुकानदाराशी बोलून चौकशी केलेली असेल, तर कालांतराने या औषधाची गरज संपली आणि ते मुदतीत असलेले उरले असेल, तर परत करता येते. रिफंड मिळू शकतो. घरातले सदस्य आणि त्यांना लागणारी संभाव्य औषधे, वैद्यकीय उपकरणे यांना नीट लेबल्स लावून वेगळे रचून ठेवता येते. जेणेकरून, काय किती वापरले गेले आहे, किती उरले आहे, ते वेळीच कळू शकते. औषधे, वैद्यकीय उपकरणे घरभरात कुठेही जागा सापडेल तिकडे कोंबण्यापेक्षा त्यांना एक दोन कप्पे खास ठेवावेत. जी औषधे फ्रिजमध्ये ठेवणे गरजेचे असते, तिथेही औषधांसाठी एक वेगळा कप्पा ठेवावा. वापरून झालेल्या गोळ्यांच्या, चूर्णाच्या डब्या, मलमे, स्ट्रिप्स तशाच साचू देऊ  नये. कशात काय, किती आहे आणि ते कोणाचे आहे, यानुसार वेगळे करून एका जागी ठेवावे. इतके करूनही काही उरले असेल आणि दुकानात परत करून रक्कम मिळविणे शक्य नसेल तर आपल्या डॉक्टरांनाच चांगली ठेवलेली आणि मुदतीत असलेली औषधे परत करायची सोय आहे का, ते तपासता येते. लहान मुलांची सिरप्स, गोळ्या, मलमे, नॅपकिन्स, पॅड्स वेगळे ठेवावेत. आधीचे पूर्ण संपल्याशिवाय, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नवीन घेऊ  नये. इतरांच्या लहान मुलांनाही तेच ‘लागू पडेल’ करत उगाच द्यायची सवय टाळावी. आपला डोस बदलून घ्यायचा असेल तर आधीचा डोस का बदलायचा आहे, ते विचारून घ्यावे. त्यातही त्या गोळ्यांचे काय करावे, याचे उत्तर मिळू शकते. त्यांचा डोस पूर्ण करून नवीन घेता येऊ  शकतो का, ते विचारावे. प्रवासात आणि एकूणच घरासाठीसुद्धा काही निवडक औषधे फर्स्ट एडसारखी वेगळी ठेवावीत. अनेकदा त्यांच्यावरच काम भागते. सगळे साहित्य एकत्र मिळते. काय आहे, काय नाही, ते नीट कळते. मगच नवीन विकत आणले जाते.

आजकाल शुगर आणि बीपी मोजायची यंत्रे घरगुती वापरासाठी घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. एक अंदाज यावा तब्येतीचा आणि आणीबाणीच्या काळात मदत होईल म्हणून ही यंत्रे आपण विकत घेतो. विविध मसाजर्स, बेल्ट्स, शेकायच्या पिशव्या, घरातल्या ज्येष्ठ सदस्यांना लागणाऱ्या गोष्टी यांची एक यादीच करून ठेवावी. काय कुठे आहे आणि किती आहे, ते लिहून ठेवावे.

गरज पडेल तशी आणि तितकीच खरेदी, डोळस खरेदी आणि नीटशी औषधे ठेवायची, साचवायची सुविधा हाच घरात येऊन पडणाऱ्या आणि साचणाऱ्या औषधांवर रामबाण उपाय आहे!

prachi333@hotmail.com

First Published on May 19, 2018 12:07 am

Web Title: what is drugs planning