‘आश्लेषा महाजन’ यांचा ‘बाहेरून दिसणारी घरं’ (१ मार्च) हा लेख वाचला आणि माझ्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या. मी सातवी-आठवीत असेन. शाळेत जाण्या-येण्याच्या वाटेवर रस्त्याला लागूनच एका ओळीत सुंदर टुमदार छोटे बंगले होते. प्रत्येकाची स्वत:ची अशी खासियत होती. दप्तराचं ओझं सांभाळत ते बंगले बघत जाणं हा माझा विरंगुळा. आतासारखा चार चाकी गाडय़ांचा सुळसुळाट नव्हता. त्यामुळे एखाददुसऱ्या बंगलीत गाडीसाठी गॅरेज दिसायचं. बाकी सारे आवार तऱ्हेतऱ्हेच्या फुल-फळझाडांनी बहरलेला दिसे. एका बंगल्याच्या आवारात एक मोठा कुत्रा होता. फाटकावर पाटी लटकत असे- कुत्र्यापासून सावध. एका बंगल्यातून नेहमी तबल्याचे बोल आणि शास्त्रीय संगीताचे सूर ऐकू येत. बंगल्याचं नावही छान होतं- ‘बागेश्री.’ एका बंगल्यातून बगळीवर झोके घेत कुणीसं बसल्याचं जाणवत असे. एकाच्या कंपाउंडच्या आत भिंतीला लागूनच बकुळीचं झाड होतं. बकुळ बहरली की बाहेर रस्त्यावर फुलांचा सडा पडलेला असे. ती फुलं हातरुमालात भरूनच आम्ही पुढे जात असू. आज बकुळीची फुलं बघितली की तो बंगलाच आठवतो. पावसाळय़ात पाण्याने निथळणारे बंगले अजूनच खुलून दिसत. झाडोरा गच्च झालेला असे. पाण्याचे छोटे ओहोळ बंगल्यातील वळणावळणाच्या पायवाटेवर वाहताना खूपच सुंदर दिसत असे. या घरांमध्ये राहणाऱ्या माणसांविषयी उत्सुकता वाटत असे. ही घरे बघूनच माझ्या स्वप्नातलं घर आकार घेत होतं.  यथावकाश मी डॉक्टर झाले. स्वत:ची प्रॅक्टिस सुरू केली. मुंबईत स्वत:चा बंगला घेणे किती कठीण आहे हेही कळून आले. एक छोटा, सुंदर फ्लॅट घेण्यावर मी समाधान मानून घेतलं. आज ते बंगलेही एकएक करत जमीनदोस्त होत आहेत. त्या जागी चकाचक अपार्टमेंटस् उभी राहत आहेत. ते बघताना काहीतरी हरवल्याची हुरहुर मात्र वाटत राहते.

‘वास्तुरंग’ (२९ मार्च) मध्ये प्रसिद्ध झालेला ‘घराघरांवर गुढय़ा-तोरणे..’ हा लेख आश्लेषा महाजन यांचा आहे.