करोनाच्या पार्श्वभूमीवर आलेला हा दसरा आपल्या मनावरचे मळभ दूर करण्यासाठी, जीवनात सकारात्मकता ऊर्जा भरण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. करोनामुळे घरातच दसरा साजरा करणे उपयुक्त ठरेल. त्यामुळे यंदा घर सजावटीवर भर देता येईल.

सणाच्या निमित्ताने आपले घर सजविण्यासाठी गृहिणी अनेक गोष्टींची कल्पना करीत असतात. सणासुदीत आपले घर अधिक सुंदर दिसावे यासाठी त्या प्रयत्नशील असते.

आजकाल अनेक जण सणाच्या निमित्ताने एक विशिष्ट संकल्पना ठरवून घेतात आणि त्यानुसार आपले घर सजवतात. अगदी साध्या-सोप्या पद्धतीने घराची सजावट करू शकता.

दसऱ्याच्या निमित्ताने सजावटीसाठी सजवलेले कलश, बाजारात मिळणाऱ्या झटपट रांगोळ्या, अशा अनेक वस्तूंचा वापर आपण करू शकतो.

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सजावटीद्वारे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकता. स्वस्तिक, शुभ लाभ, ओम आणि लक्ष्मीची पावले अशा शुभ चिन्हांनी आपण आपले प्रवेशद्वार सजवू शकतो. तसेच वैशिष्टय़पूृर्ण रांगोळ्या काढून प्रवेशद्वाराची सजावट अधिक आकर्षक आणि मंगलमय करू शकतो. यात फुलांच्या रांगोळीनेही आपण उत्तम रांगोळी काढू शकतो. बाजारात तयार मिळणाऱ्या रांगोळ्या गृहिणींचा वेळ वाचवतात. त्या दिसतातही सुंदर. या रांगोळ्यांचा कल्पक वापर करता येईल.

घरातील सजावटीसाठी मणी, दगड, मोती, लहान आरसे, रेशीम आणि फुले, इत्यादी वस्तूंचा कलात्मक वापर करता येईल. घरात फुलांनी सजावट करायची असेल तर निळ्या आणि जांभळ्या रंगाच्या थीमसाठी ऑर्किडची फुले वापरता येतील. तसेच लाल आणि पांढऱ्या रंगाच्या थीमला प्राधान्य दिल्यास गुलाबांचाही सजावटीत उत्तम वापर केला जाऊ शकतो.

दसऱ्याच्या निमित्ताने घरात वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे आणि मटेरियलचे विविध प्रकारचे डायस आणि मेणबत्त्या वापरल्या जाऊ शकतात. साध्या, हाताने रंगवलेले डायस यांचा उपयोग करता येईल.