प्राची पाठक

कोणाच्याही घरी जा, त्यांनी काहीतरी शोभेच्या वस्तू कुठे ना कुठे ठेवलेले असतात. अनेकदा घरांघरांतले कोपरे यासाठी व्यापून टाकलेले असतात. काही काचेचे बंदिस्त कप्पे असतात, ज्यात लोक शोभेच्या वस्तू मांडत जातात, नाहीतर कुठे खुल्या जागा असतात. कट्टे, प्लॅटफॉम्र्स, डिस्प्ले असतात. तिथेही लोक सजावटीच्या वस्तू आकर्षकरीत्या मांडून ठेवतात. घरामध्ये अशी रचना करायला सुरुवातीला फार हौस असते लोकांना. आधुनिक इंटेरिअरमुळे अशा जागा राखीव ठेवायची खास सोय असते. त्या जागा गरजेप्रमाणे बनवून घ्यायची सोयसुद्धा असते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावता येतात. कुठे स्पीकर्सदेखील अडकवायची सोय असते. वेगळे वॉलपेपर्स, निराळी रंगसंगती असं सगळं तिथे करता येतं. काही जण फर्निचरमध्येच असे डिस्प्ले वेगळे ठेवतात. त्यांना नानाविध आकार प्रकार जोडतात. साफसफाईच्या दृष्टीने ते किचकट आणि नाजूक बनू शकतात. घरातल्या भिंती किंवा बंदिस्त कप्पे, खुले डिस्प्ले जितक्या सहज साफ केले जातात, तितक्या सहज या जागा आवरता येत नाहीत.

सुरुवातीला हौशीने ठेवलेल्या वस्तू, फोटो फ्रेम्स कालांतराने धूळ खातच पडलेल्या दिसतात. जसे दिवस जातात, तशा काही नवीन वस्तू भेट मिळतात. त्याही अनेकदा ‘शोभेच्या वस्तू’ या गटातल्याच असतात. कुठे वरचेवर काही पत्रकं मिळतात. ती लगेचच टाकून देण्यासारखी नसतात. वाचून टाकायचेच तर आहे म्हणत म्हणत ही कागदपत्रं अशा डिस्प्लेच्याच पुढेमागे खुपसून ठेवली जातात. एखादी महत्त्वाची वस्तू वरचेवर तुटली, तर तिचे पार्ट्स असे समोरच दिसतील, असे ठेवले जातात. त्यांना अनेक दिवस कोणीही वाली उरलेला नसतो. घराच्या /गाडीच्या चाव्या, हाताचे घडय़ाळ आणि तत्सम वस्तूदेखील अशाच वरचेवर काढून ठेवायची सवय लागते. त्यात कोणी पाहुणे आले तर तेही अशाच खुल्या जागा त्यांचे लहानमोठे सामान, फोन, चार्जर वगैरे ठेवायला वापरतात. लोक चहाचे कप, नाश्त्याच्या डिशेससुद्धा खाऊन झाल्यावर ठेवायला अशा जागा वापरून घेतात. त्या वस्तू उचल-पटक करताना त्यांच्या आजूबाजूच्या, मागे सरलेल्या शोच्या वस्तू खाली पडू शकतात. खराब होऊ शकतात. तिथे काही सांडून जाऊ शकते. मग डाग पडतात आणि वरचेवर दिसूनही नेटकेपणाने स्वच्छता न होणाऱ्या जागांमध्ये अशाही डिस्प्ले युनिट्सचा समावेश होऊन जातो!

जितक्या हौसेने शोभेच्या वस्तू, फोटो फ्रेम्स वगैरे विकत घेतल्या जातात आणि कोपऱ्या कोपऱ्यात सजवून ठेवल्या जातात, तितक्या हौसेने त्यांची देखरेख होत नाही. त्या फक्त विकत घेतानाच त्यांचं सौंदर्य एन्जॉय केलेलं असतं. कधी कधी एकाने घेतल्या म्हणून दुसऱ्यांवरदेखील ऑफिसात, शेजारीपाजारी अशा वस्तू घ्यायचा दबाव येतो. कुठे प्रतिष्ठेचा मुद्दा होऊन गेलेला असतो. कितीही भारी असल्या तरी नीट देखरेख नसलेल्या, धुळकट झालेल्या शोभेच्या वस्तूंचे घरातले  कोपरे त्या त्या वास्तूत ‘निरुपयोगी वस्तू भांडार’ म्हणूनच समोर यायला लागतात. त्यातलं सौंदर्य, त्यातली कला त्या वस्तू टेचात आणि चकाचक मिरवण्यात असते. बारकाईने त्यांच्या रचनेवर विचार करण्यात असते. तेव्हाच ते डिस्प्ले आकर्षक वाटतात. नाहीतर या बिनकामाच्या वस्तूंनी भरलेल्या छोटय़ा-छोटय़ा जागा तयार होऊन जातात, ज्या वरचेवर स्वच्छ होत नाहीत. बरं, त्या निरुपयोगी असल्याने त्यांचा वापर असा काहीच नसतो. त्या खराबदेखील होत नाहीत चटकन. तर अशा वस्तू ठरवून काढून टाकल्या जात नाहीत. त्या साठत राहतात आणि पडून राहतात. पाण्याचे फाउंटन वगरेंसारख्या शोभेच्या वस्तू त्यांच्या डिझाइन्समुळे साफसफाईसाठी किचकटदेखील झालेल्या असतात. पुन्हा, शोभेच्या अनेक वस्तू या अतिशय हलक्या दर्जाच्या प्लॅस्टिक अथवा तत्सम सामानापासून बनतात. जरा एखाद्या भागावर किंचित जोर पडला तर त्या चटकन तुटतात, खराब होऊन जातात. त्यांचा लहानसा टवका उडतो. तेवढय़ासाठी त्या टाकवत नाहीत. ते तुटलेले भाग सुरुवातीला चिकटवू चिकटवू करत जपून ठेवले जातात. नंतर ते सगळं हरवून जातं. मग, एक पार्ट सापडत नाही, तर त्याचे काही फंक्शन्स कमी होऊन जातात. तरीही आपण ते जपून ठेवतो. त्यांचे प्रदर्शन एकूणच धुळकट, ओंगळवाणं आणि जुनाट होऊन जातं.

घरात उगाचच आणून ठेवलेल्या, गिफ्ट मिळालेल्या शोभेच्या निरुपयोगी वस्तूंची एक हजेरीच घेऊन टाकणे गरजेचे असते. घरातल्या एकाला एक आवडतं, दुसऱ्याला ते बोगस वाटतं. पण फेकून देता तर येत नाही, अशाही काही वस्तू असतात. त्यांच्या उपयुक्ततेचा आणि सौंदर्याचादेखील एकदाचा निर्णय घेऊन टाकावा आणि अशा वस्तू कमी करत जावे. त्यात अनावश्यक फोटो फ्रेम्सदेखील खूपच असतात. त्यातले फोटोही अगदी जुनाट झालेले असतात. कसल्या कसल्या लेसेस त्यांना लटकत असतात. त्यांच्यावरदेखील धूळ बसलेली असते. शोभेचे कॉर्नर्स बनवताना घरात आपण बारीकसारीक साफसफाईवर, डिस्टगवर किती वेळ, पसा खर्च करू शकणार असतो, त्याचा थोडासा विचार करूनच अशा वस्तू विकत घ्याव्यात आणि शोभेसाठी ठेवाव्यात. प्रचंड भारीतल्या वस्तूदेखील धूळ खात पडल्यावर, देखरेखीअभावी जुनाट, मळक्या आणि नकोशा वाटू लागतात. आपल्याला असल्या निरुपयोगी शोभेच्या वस्तू नेमक्या का हव्या आहेत, याचाही विचार करता येतो. त्या जागी इतर काही ताज्या फुलांचे, अधूनमधून बदलता येणारे फ्लॉवरपॉट्स ठेवता येतील का किंवा चक्क झाडांच्या कुंडय़ाच मांडता येतील का, असाही विचार करून बघता येतो. अनावश्यक फोटो आणि त्यांच्या फ्रेम्स येताजाता आपल्या डोळ्यांसमोर का आणि किती काळ हव्या आहेत, याचाही विचार नक्कीच करता येईल! या सर्व कोपऱ्या कोपऱ्यांत टांगलेल्या, मांडलेल्या, लटकावून ठेवलेल्या, सजवलेल्या, परंतु बिनकामी वस्तूंना एक मोक्षद्वार आपणच दाखवून टाकू शकतो!

चल, हो जा शुरू..

prachi333@hotmail.com