रिअल इस्टेटबद्दल सध्या खूपच भाकितं केली जात आहेत. कोणी सांगतायत मंदीचं सावट आहे, तर कोणी म्हणतंय की मागील वर्षीपेक्षा किंवा तेवढीच घरांची विक्री होत आहे. पूर्वीचे लोक म्हणायचे, सणासुदीला वास्तू घ्यावी, वास्तूची पूजा करावी.. किंवा सोनं घ्यावं. कोणतेही चांगले काम पवित्र दिवशी व सणाच्या दिवशी करावे. मात्र याचाच नेमका फायदा आपलं ब्रॅंडिंग करण्यासाठीही होऊ  शकतो,असा विचार कोणी केला नसेल. रेरा, जीएसटीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आली. मोदी सरकारला २०२२ पर्यंत सर्वाना परवडणारी घरे मिळवून द्यायची आहेत. सध्या मुंबईत प्राइम लोकेशनला परवडणारी घरे बांधण्यासाठी विकासक पुढे सरसावत आहेत. रेरानंतर किती विकासकांनी प्रकल्प नोंदणी केली, जीएसटीच्या नियमांनुसार रिअल इस्टेटमध्ये काय बदल केले याची इत्थंभूत माहिती आपल्याला बातम्यांद्वारे कळतच असते. मात्र, तरीही या सर्व कायद्यांचा परिणाम  कुठेच घरांच्या किमतींवर मात्र दिसून येत नाही. किमती कमी जरी दिसत असल्या तरी घराचा आकार मात्र तेवढा राहिला नाही, हेही तितकंच खरं आहे. त्यात आता घरे बांधण्यासाठी जमिनी उपलब्ध नसल्याने विकासकांनी मिठागरांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सणासुदीला वास्तू घेणे हे खरं तर शुभ मानलं जातं.

सणांच्या दरम्यान अनेक विकासक एकावर एक ऑफर्स आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येतात. कोणी डाऊन पेमेंटमध्ये सूट देतात, तर कोणी आकर्षक भेटवस्तू. रेरा, जीएसटीनंतर काही प्रमाणात रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचं वातावरण होतं. मात्र सणांच्या दरम्यान विकासकांना मोठी आशा आहे. गुढीपाडवा तसेच नुकत्याच झालेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर घरांची विक्री बऱ्यापैकी झाली असल्याचे काही विकासकांचे म्हणणे आहे. घरांच्या नोंदणीत झालेली वाढ ही या क्षेत्रासाठी नक्कीच पूरक आहेत. कारण घर घेण्यासाठीचं आपलं बजेट ग्राहकांनीही वाढवलं आहे. सप्टेंबरमध्ये नोंदणीची संख्या ही १,५६,४०५ इतकी आहे. हाच आकडा मागील वर्षी १,४७,९९८ एवढा होता.

यावर्षीच्या दिवाळीत विकासक चांगल्या विक्रीची अपेक्षा करत आहेत. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमधील एकूण चित्र पाहता घरांच्या विक्रीत देशभरात ३५ टक्के इतकी घसरण झाली आहे. या पाश्र्वभूमीवर घरांची किंमत, कमी व्याजदराचे कर्ज व रेडी टू मूव्ह असणारे घर यामुळे येत्या दिवाळीत घरांची विक्री वाढेल असा अंदाज विकासकांनी वर्तवला आहे. नवीन नियम, आकर्षक ऑफर्स हे सर्व वरवर दिलासादायक वाटत असले तरी प्रत्यक्षात सामान्यांना परवडणारी घरे घेण्यात अडचणी या आहेतच. डिजिटल माध्यमातून पाहायचे झाले तर डिजिटायझेशनमार्फत सर्व व्यवहार करताना त्यावर लागणारे चार्जेसही जास्त आहेत, असा विचार हा प्रत्येक सामान्य माणूस करतो. जीएसटीनंतर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे तज्ज्ञांच्या सल्लय़ानुसार योग्य मानले जात आहे. त्यात सणाच्या दिवशी खरेदी करत असाल तर ऑफर्सच्या माध्यमातून काही सवलती ग्राहकांना मिळू शकतात. घरखरेदीचे प्रमाण जरी गेल्या काही महिन्यांत कमी असले तरी मागणी मात्र जास्त आहे. खरेदीचे प्रमाण कमी झाल्याने साहजिकच घरांच्या किमतींवरही परिणाम झाला. गृहकर्जावरील व्याजदरात कपात केल्याने ग्राहकही घरे घण्यास पुढे येत आहेत. गृहनिर्माण मंत्रायलयाने जाहीर केलेली पीपीपी पॉलिसी, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणारा लाभ यामुळे दिवाळीत विक्री जास्त होण्याचे संकेत आहेत.

रेरा लागू झाल्यानंतर अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्याची लगबग विकासकांमध्ये आहे. शिवाय ग्राहकांना पूर्ण झालेले प्रकल्प व सुरू असलेले प्रकल्प यामध्ये घरांची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहेच. एकूणच रिअल इस्टेट क्षेत्राची प्रगती पाहता विकासकही मोठमोठे मार्केटिंग फंडे घरविक्रीसाठी वापरत आहेत. मॉडय़ुलर किचन, एअरकंडिशनर्स, इंटरनॅशनल हॉलिडेज् अशा अनेक युक्त्या विकासकांकडून लढवल्या जात आहेत. प्रकल्पांशी जोडलेले प्लॅन, ताबा मिळेपर्यंत कर्जाचे हप्ते नाही, फ्लॅट सेल्स व कॅश डिस्काऊंट अशा ऑफर्सही दिल्या जात आहेत.

गुंतवणुकीच्या नियमांनुसार, जेव्हा ग्राहकहिताय मार्केट असेल तेव्हाच ग्राहकाने मोठी खरेदी करावी. घरखरेदीचे प्रमाण कमी असणे याला घरांच्या किमती, मागणी किंवा आर्थिक परिस्थिती जबाबादार नसून, वेळेवर प्रकल्प पूर्ण न होणे किंवा दर्जा, कायद्यांचा अभाव ही कारणे आहेत. मात्र आता रेरा या सर्व परिस्थितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सद्य:स्थितीत रेरामुळे अनेक विकासकांनी प्रकल्प नोंदणी पूर्ण केली आहे. तसेच अनेक ग्राहकांनी सजगता दाखवत विकासकांना रेराचा दणका दिला आहे.

सर्वाना घरे या सरकारच्या योजनेसोबत सणाचे दिवसही अधिक महत्त्वाचे आहेत. यावेळी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर घरांची चांगल्या प्रकारे विक्री होणे शक्य असल्याचे नाहर ग्रुपच्या उपाध्यक्षा मंजू याज्ञिक यांनी व्यक्त केली आहे.

त्याचप्रकारे ग्राहकांमध्ये सध्या वेट अ‍ॅंड वॉचची भूमिका दिसत आहे. रेरानंतर रेडी टू मूव्ह अपार्टमेंट्स, कमर्शिअल कनेक्टिव्हिटी, तसेच योग्य पायाभूत सुविधा याबाबत खात्री करूनच ग्राहक पावले उचलत आहेत. नोटाबंदी, रेरा व जीएसटीनंतर रिअल इस्टेट क्षेत्राला पूर्ववत होण्यास काही वेळ लागेल. मात्र दसऱ्याच्या मुहूर्ताप्रमाणे दिवाळीतही विक्री चांगलीच होईल असा विश्वास परवडणारी घरे बांधणाऱ्या पोद्दार हाऊसिंगचे रोहित पोदार यांना वाटत आहे. मागील वर्षांपेक्षा यावर्षी किमान ३० टक्के विक्रीत वाढ होण्याची शक्यता हावरे ग्रुपचे अनिकेत हावरे यांनी व्यक्त केली आहे. तांत्रिक अडचणी विकासकांसमोर असल्याने त्यावर मात करत ऑफर्सच्या माध्यमातून हे लक्ष्य गाठणे सोपे होईल असेही हावरे यांनी नमूद केले. रेरानंतर पारदर्शकता आल्याने ग्राहकांनीही रिअल इस्टेटकडे पाठ न फिरवता सतर्कतेने घरखरेदी करणे अपेक्षित असल्याचे रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटच्या बिझनेस हेड शुभिका बिल्खा यांनी सांगितले आहे. रेरानंतर या दिवाळीत ग्राहक नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देईल. मागील ३ ते ४ वर्षांपासून मागणीमुळे रखडलेल्या प्रकल्पांमधील तयार घरे यावर्षीपर्यंत विकली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवाळीला नक्कीच घरांच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे निर्मल लाइफस्टाइलचे धर्मेश जैन यांनी वर्तवली आहे.

येत्या वर्षांत रिअल इस्टेट बिझनेसमध्ये उभारी येण्याची चिन्हे आहेत. तसेच ग्राहकांना २० ते ३० टक्के सवलतीही असतील. कायदे व वित्तीय संस्था या ग्राहकहिताय काम करत असल्याने याचा फायदा नक्कीच होऊ  शकतो, असे साई इस्टेट कन्सल्टंटचे अमित वाधवानी यांनी सांगितले.

सणासुदीचा काळ हा खरेदीसाठी उत्तम असला तरी तो काहीही किंवा कितीही खरेदी करण्यासाठी नाही. ज्याप्रकारे विकासकांकडून ऑफर्स दिल्या जातात, तेव्हा त्यामागे त्यांच्या छुप्या अटीही लागू असतात हे ग्राहकांनी विसरता कामा नये. ज्याप्रमाणे सध्या ऑनलाइन खरेदी करताना किंवा सुपर मार्केटमध्ये खरेदी करताना डिस्काऊंट, ऑफर्स पाहतो, त्याप्रमाणे घरखरेदी करतानादेखील अशा ऑफर्स ग्राहकांना भुरळ पाडू शकतात. कायद्याच्या कचाटय़ातून सुटताना विकासकांची दमछाक होते, मात्र अशा वेळी ग्राहकांनीच सतर्क राहणे अपेक्षित आहे. वर्तमानपत्रातल्या जाहिराती पाहून आधी खात्री करूनच तसेच प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती घेऊनच पुढे पाऊल टाकावे.

विकासकांच्या या ऑफर्स स्विकारू नये किंवा त्या खोटय़ा असतात असं नाही, मात्र आपल्याला जसं घर हवं आहे, घरातल्या सर्व व्यक्तींच्या गरजा पूर्ण करणारे ठिकाण या ग्राहकाच्या घर घेण्यामागच्या गरजा पूर्ण होत असतील तर या ऑफर्स स्वीकारण्यात काहीच हरकत नाही. ग्राहकाने घर घेताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन व्यवहाराबाबतचे निर्णय घेतला पाहिजे. गुंतवणूक किंवा राहण्यासाठीच्या सर्व गरजा समजून घेतल्यास निर्णय अधिक सोयीस्करपणे घेता येऊ  शकतो.