करोनाकाळात घराचे नूतनीकरण करताना..

करोनाकाळ हा सगळय़ांसाठीच अतिशय खडतर ठरला आहे. किंबहुना अजूनही आपण यातून पूर्णपणे मुक्त झालेलो नाही.


अजित सावंत


करोनाकाळ हा सगळय़ांसाठीच अतिशय खडतर ठरला आहे. किंबहुना अजूनही आपण यातून पूर्णपणे मुक्त झालेलो नाही. या करोनाकाळात बहुतांश उद्योग डबघाईला आले. कित्येक व्यवसाय तर बंद पडले. या करोनाकाळाचा दुष्परिणाम इंटिरियर डिझाइनच्या व्यवसायाला देखील झाला. बहुतेक सगळे कामगार येथील बेरोजगारीला कंटाळून आणि जिवाच्या भीतीने आपआपल्या गावी स्थलांतरित झाले. दुकाने बंद असल्याने इंटिरियरसाठी लागणारे मटेरियल मिळणेही बंद झाले होते. सुरक्षिततेच्या कारणाने कोणत्याही बाहेरील व्यक्तीस प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे कोठेही इंटिरियरची कामे चालू नव्हती. पण सुदैवाने कालांतराने परिस्थिती थोडी आटोक्यात आल्याने कामगार परतायला सुरुवात झाली. दुकानेही उघडली आणि व्यवसाय-धंद्याचे चित्र थोडय़ा प्रमाणात आणि हळूहळू का होईना पुन्हा पहिल्यासारखे होण्यास सुरुवात झाली. सध्या नूतनीकरणाची अर्थात रिनोव्हेशनची कामे पुन्हा जुन्या जोमाने सुरू झाल्याने ती करताना सावधीगिरी बाळगणे गरजेचे आहे. करोनाच्या दृष्टीने सुरक्षित उपाययोजना करून मगच कामाला सुरुवात करावी.
शक्यतो राहत्या घरी काम करून घेणे टाळावे. पर्यायी जागेची सोय नसेल तरच घरी राहून काम करून घ्यावे. आपला इंटिरियर डिझायनर कॉन्ट्रॅक्टरकडून सुरक्षित उपाययोजना करून घेऊ शकतो. यात सर्वप्रथम म्हणजे दर्जेदार कॉन्ट्रॅक्टर निवडणे. जेणेकरून तो स्वत: करोनाबाबत जागरूक असेल. काम सुरू करण्याअगोदर सगळी डिझाईन्स निश्चित करून घ्यावे, तसेच मटेरियल निश्चित करून घ्यावे. जमेल तितके मटेरियल साइटवर आणून ठेवावे. जेणेकरून काम थांबून राहणार नाही. काम सुरू करण्याआधी जे कामगार आपल्या साइटवर काम करणार आहेत त्यांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत का याची खात्री करावी.
प्रत्येक इमारतीची इंटिरियर नूतनीकरणासंदर्भात नियमावली असते. त्यात काही मुद्दे मांडलेले असतात जसे की, काम करण्याच्या वेळा कोणत्या आहेत? रविवारी/ सुट्टीच्या दिवशी काम चालू ठेवू शकतो का? बाहेरून मटेरियल दिवसाच्या कोणत्या वेळी येऊ शकते? डेब्रिज टाकण्याची जागा कोणती? सामान चढवण्यासाठी लिफ्टचा वापर करू शकतो का? सिक्युरिटी डिपॉझिट ठेवण्याची गरज आहे का? इ. या नियमावलीबरहुकूम काम करावे.
कामगार साइटवर राहून जर काम करणार असतील तर उत्तम. कारण त्यांचा बाहेरील माणसांशी संपर्क कमी येईल. कामगार साइटवर राहून काम करणार असतील किंवा येऊन-जाऊन काम करणार असतील तर त्यांचे सकाळ-संध्याकाळ तापमान चेक करणे गरजेचे आहे. तसेच ऑक्सिमीटरने त्यांची ऑक्सिजन पातळी तपासणेही गरजेचे आहे. सर्दी-तापाची किंचित जरी लक्षणे आढळली तर त्वरित त्या कामगाराला रजा द्यावी. साइटवर आल्या आल्या आणि दिवसातून जमेल तितक्या वेळा हँड सॅनिटायझर वापरायची सूचना करावी. बाजारात पंप असलेला सॅनिटायझर फवारण्याचा स्प्रे मिळतो. त्या स्प्रेचा वापर बाहेरून येणाऱ्या मटेरियलला सॅनिटाइझ करण्यासाठी करावा. कामगारांनी ग्लोव्हज घालणे उत्तम. पण सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे सगळय़ांना मुखपट्टी (मास्क) वापरणे बंधनकारक करावे. शक्यतो वापरून टाकण्याजोग्या मुखपट्ट्या वापराव्यात कारण कापडी मुखपट्टी कामगारांकडून धुतल्या जात नाहीत. काम करताना यातील काही गोष्टी पाळणं कठीण आहे आणि त्यात भर म्हणून कामगारही हे सगळं पाळण्यात टाळाटाळ करतात. पण त्यांनी हे पाळणं खूप आवश्यक आहे. राहत्या घरी हे थोडं अधिक अवघड आहे त्यामुळे पर्यायी राहण्याची सोय झाल्यास उत्तम ठरते.
हा सॅनिटायझेशनचा खर्च कॉन्ट्रॅक्टरने करणे अपेक्षित आहे. काही वेळेस मटेरियल मिळण्यात अपेक्षेपेक्षा थोडासा अधिक वेळ लागतो, त्यामुळे काम संपण्यास थोडा उशीर होऊ शकतो. हे गृहीत धरून आपण आपले शेडय़ूल प्लॅन करावे. आपण शिफ्ट होणार नसाल तर नाइलाज आहे, पण शिफ्ट होणार असाल तर कमीत कमी साइट व्हिजिट कराव्यात. व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून व्हर्च्युअल भेट द्यावी.
कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार सुरक्षेचे नियम तंतोतंत पाळत आहेत याची खात्री करण्याची जबाबदारी इंटिरियर डिझाईनरची आहे. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे काम संपल्यावर संपूर्ण घराचे र्निजतुकीकरण करून मगच गृहप्रवेश करावा. हे निर्जंतुकीकरण एखाद्या प्रोफेशनल आणि खात्रीच्या एजन्सीकडून करून घ्यावे. अशी खबरदारी घेऊन आपण इंटिरियर नूतनीकरण करून घेतल्यास आपण आणि आपले घर सुरक्षित राहीलच, पण त्याचबरोबर नूतनीकरणही अप्रतिम होईल.
(इंटिरियर डिझाइनर)
ajitsawantdesigns@gmail.com

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Corona period house renovation work ysh

Next Story
स्थावर मालमत्ता क्षेत्राची सकारात्मक वाटचाल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी