आपण भारतीय मुळातच फार उत्सवप्रिय. धार्मिक, पारंपरिक, आधुनिक असे सगळेच सण-उत्सव आपण मोठय़ा आनंदाने साजरे करतो. परंतु या सर्व सणांचा शिरोमणी ज्याला म्हणता येईल असा दिवाळी हा सण तर खासच. दिवाळी म्हणजे सजावट, दिवाळी म्हणजे फराळ, दिवाळी म्हणजे रांगोळ्या, दिवाळी म्हणजे आकाश कंदील आणि दिवाळी म्हणजे आनंदाला समानार्थी शब्द.. नवरात्र संपले की लगेचच धांदल सुरू होते ती दिवाळीची. हातात फक्त १५ दिवस आणि घराला रंग द्यायचा असतो, पडदे बदलायचे असतात, नवे कोरे कुशन्स कव्हर्स घालून सोफे सजवायचे असतात. आणि अशातच घरातली छकुली हट्ट घेऊन बसते- या वर्षी आकाश कंदील घरीच बनवायचा. मग चुकत माकत तर कधी भन्नाट कल्पना लढवून एकदाचा आकाश कंदील तयार होतो. तर कधी कधी बाजारात तयार मिळणाऱ्या नवनव्या रंगांच्या आणि आकाराच्या आकाश कंदिलांची मनाला अशी भूल पडते, की त्यातलाच एक सहज आपल्या घरी येतो. या वर्षी तर बाजारात आपण जे हल्ली वापरून टाकण्याजोगे असे पाण्याचे पेले वापरतो ना त्यापासून बनवलेले छान छोटे छोटे कंदील पाहिले, म्हणजे टाकाऊतून टिकाऊ..
एकूण महत्त्वाचे काय तर घर सजणे. पूर्वीची चाळ संस्कृती जाऊन बऱ्याच अंशी फ्लॅट संस्कृती आपल्या अंगी भिनली असली तरी सण साजरे करतानाची पारंपरिकता आजही आपण जपलेली आहे. यामुळेच दिवाळीची सुरुवातच मुळी दारातल्या सुंदरशा रांगोळीने होते. घरातला स्त्रीवर्ग तर आपली कला दाखवायला उत्सुकच असतो, पण त्याचबरोबर काही घरातले मुलगेही सुंदर रांगोळ्या घालून ‘आम्हीही काही कमी नाही’ हे दाखवून देतात. पण जर नसेल येत आपल्याला रांगोळी घालता, तरीही घाबरून जायचे कारण नाही. बाजारात जे रांगोळ्यांचे छाप मिळतात त्याचाच वापर करून वरून छान रंग भरले की झाले! तसेही हल्ली इंटरनेटवर अगदी सोप्या आणि आकर्षक पद्धतीने रांगोळ्या काढण्याचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, त्याचाही उपयोग होऊ शकतो.
रांगोळी काढून होते ना होते तोच आई आवाज देते ‘अरे कोणीतरी दाराला तोरण बांधून घ्या रे’, दाराला तोरण सजल्याशिवाय सण सुरू झालाय हेच पटत नाही. दाराला लावलेल्या तोरणावरूनच घरातील आनंद ओळखण्याची प्रथा आहे नं. अनेक सणांना दाराला ताज्या फुलांचे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावण्याची प्रथा असली तरी दिवाळीत मात्र लखलखत्या दिव्यांच्या तोरणाला पर्याय नाही. मग चमचम करणाऱ्या छोटुकल्या रंगीत दिव्याची माळ असो, नाहीतर टप्पोऱ्या लाल पिवळ्या दिव्यांची, दाराच्या चौकटीवरून वरपासून खालपर्यंत सोडायची माळ; पण दाराची शोभा तोपर्यंत वाढत नाही जोवर आजीने विणलेले लोकरीचे तोरण त्यावर चढत नाही. क्रोशाच्या सुईने घातलेली नाजूक वीण आणि त्यामागे लुकलुकणारी तेजस्वी दीपमाळ. कित्ती लोभस नं! आत्ता झालं, आपलं दार दिवाळीच्या स्वागताला तयार! आता दार इतकं नटून थटून तयार आहे तर खिडकी बरी मागे राहील. अनेकवेळा दिवाणखान्याची भली मोठी खिडकीच दारापेक्षा जास्त भाव खाऊन जाते. फ्लॅट सिस्टीममध्ये राहताना तर अनेकदा आकाश कंदिलाचा मानदेखील खिडकीलाच मिळतो. खिडकीला बाहेरील बाजूने मस्त दिव्यांच्या माळा सोडून मधोमध छानसा आकाश कंदील लावायचा. पण एवढय़ावरच थांबायचं नाही, मोठय़ा आकाश कंदिलासोबतच छान सोनेरी, चंदेरी झिरमिळ्या आणि बाजारात मिळणाऱ्या लहान कंदिलांची माळ लावली की खिडकीला खरी शोभा आलीच म्हणून समजा.
खिडक्या-दरवाजे इतके छान सजल्यावर घर आतूनही प्रसन्न वाटलंच पाहिजे, नाही का! यासाठी घराला रंग देताना, नवे पडदे निवडताना काळजी घ्यायची. घराला रंग देताना शक्यतो प्रकाश परावर्तित होईल असे अर्थात तजेलदार रंग निवडावेत, तेच पडद्यांच्या बाबतीतही. घरातील प्रकाश व्यवस्थाही पांढऱ्या आणि पिवळ्या अशा मिक्स रंगांची असावी, म्हणजे घरात प्रसन्न वाटेल. पडद्यांच्या बाबत म्हटले तर दरवर्षी काही नवे पडदे घेणं शक्य नसतं. मग काय, जुन्यालाच थोडा नवा साज चढवायचा. सजावटीच्या आणि कलाकुसरीचे सामान मिळणाऱ्या दुकानात छान सोनेरी चंदेरी रंगांची जाळीसदृश कपडे अगदी रु. १५/- ते रु. ५०/- प्रति मीटर भावाने मिळतात. त्यातीलच काही मीटर कापड आणून मस्तपैकी पडद्याच्या रोडला सैलसर गुंडाळून थोडं पडद्यावरून खाली सोडला की आली नव्याची झळाळी.
दिवाळी हा सणच मुळी तेजाचा, त्यामुळे सढळ हस्ते सोनेरी-चंदेरी रंगांची उधळण केली तर प्रसन्नतेत भरच पडेल. कमी खर्चात घराला सणासाठीचा नवा साज चढवताना बाजारात थोडं डोळे उघडे ठेवून फिरायचं, मग छान छान वस्तू लगेच समोर हजर होतात. जसं की- कुशन कव्हर्स, सोफे किंवा सोफ्याची अपहोलस्टरी.. दरवर्षी काही बदलण्याची गोष्ट नव्हे. मग बाजारात मिळणारे सिल्क तसेच ब्रोकेडचे कुशन कव्हर्स वापरून त्या कुशन्स सोफ्यावर ठेवल्या की हुश्श्य! झाली दिवाळीची गृहसजावट. शेवटी कलात्मक टेबल क्लॉथ, ठेवणीतले फ्लॉवर पॉट, त्यात केलेली ताज्या फुलांची रचना आणि नव्या नवरीच्या रुखवतात खास आणलेले छान छान वॉलपीस घरभर लावले की ‘चेरी ऑन टॉप’.
आता हे सगळं आपल्या घरासाठी आपण आपल्या हाताने केलं की वेगळंच समाधान, पण त्यात थोडं वेगळेपण आणायचं तर इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रोफेशनल हातही आहेत मदतीला. फक्त थोडे पैसे जास्त खर्च होतील इतकेच. पण हौसेला मोल नाही. शिवाय त्यातून दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा.. तरबेज हातांमध्ये घर दिले की आपण घेऊ तसे पॅकेज डिझाइन करून आपल्याला आपल्या बजेटप्रमाणे गृहसजावट करून घेता येते. अगदी दारातील रांगोळीदेखील ही मंडळी काढून जातात. आपण फक्त साऱ्यांचा आनंद घ्यायचा.
महत्त्वाचे काय, तर सण साजरा करण्यासाठी लागणारा उत्साह आणि तो तर आपण सर्वाच्यात अगदी भरभरून आहेच. मग वाट कशाची पाहायची. चला मंडळी, सोनेरी चंदेरी रंगांची उधळण करत आनंदाने एकमेकांना शुभेच्छा देत साजरी करूयात या वेळची दिवाळी.
– गौरी प्रधान
ginteriors01@gmail.com
(इंटिरियर डिझायनर)