इथे मुंबईत आम्ही सारेच थोडय़ा मोठय़ा घरासाठी धडपडत असतो. मात्र, आयुष्यभर कष्ट करूनही कधी हे स्वप्न साकार होत नाही.  तुलनेने स्वस्तात हे स्वप्न साकार करता यावं, यासाठी ही काही खास गुपितं.
‘हात फिरे तिथे लक्ष्मी वसे’ असं आपण जुन्या लोकांकडून ऐकतो. आमच्या घरी मात्र माझी आई मला या वाक्यावरून यथेच्छ चिडवते. मी मुंबईत छोटय़ा घरातच वाढलो. हे घर इतकं छोटं होतं की त्यात आमच्या सगळ्यांचा संसार कसा काय बसला याचं आता आश्चर्य वाटतं. मात्र या घरानेच मला वेगळा विचार करायची, प्रयोग करायची सवय लावली. पुढे जेव्हा माझ्यावर अधिकाधिक पर्यावरणप्रेमाचे संस्कार झाले, तेव्हा या घरात मी हैदोस घालायला लागलो आणि मला मिळणारे टोमणेदेखील वाढले!
चला घर आवरायला घेऊ
आमच्या घरात माझी घर आवरण्याची पद्धत फारच भयंकर आहे, यावर एकमत आहे. मी सर्वप्रथम चारचौघांसारखाच केर काढतो, धूळ वगरे झटकतो. मात्र त्यानंतर येणारा प्रकार आमच्या घरात अजिबात मान्य नाही. मी घरात वस्तूंचं ऑडिट करतो. एखादी गोष्ट एक वर्षांच्या वर लागली नसेल तर ती वस्तू ताबडतोबीने घराबाहेर जाते. म्हणजे असं पाहा, कधी काळी लागतील म्हणून आपल्या सगळ्यांच्याच घरात कितीतरी गोष्टी ठेवलेल्या असतात. काही हौशीने, काही सवयीने, तर काही- माफ करा – पण अविचाराने. घरात जास्त माणसं आली तर हवी म्हणून डझनावारी ताटं-वाटय़ा-पेले असतात. एक छोटा, एक मोठा आणि आता विभक्त कुटुंबांत मुलांसाठी वेगळा असा छोटा असे दोन-तीन प्रेशर कुकर असतात. लग्नात मिळालेली चहाची, दुधाची भांडी म्हणू नका, साडय़ा, कपडे म्हणू नका, मुलांच्या शाळेच्या आठवणी म्हणून जपून ठेवलेली वहय़ा-पुस्तकं असं किती आणि काय काय ठेवलेलं असतं. मी घर आवरायला काढलं म्हणजे या सगळ्या वस्तूंना हद्दपारी हे ठरलेलं असतं.
गंमत म्हणून सांगतो. आम्ही आमच्या घरात आईचं आणि माझ्या पद्धतीचं असं दोन्ही प्रकारचं स्वयंपाकघर वापरतो. आम्हा दोघांसाठी दोनच प्रेशर कुकर आहेत – दोन्ही पारंपरिक गॅस आणि मॉडर्न इंडक्शन कुकरवर चालतात. पूर्वी आम्ही वर्षांचं सामान भरत असू, आता मात्र सारं महिन्यापुरतं आणतो. मसाले वगरे वर्षांचे भरतो, मात्र तांदूळ-डाळ वगरे नाही, त्यामुळे स्वयंपाकघर अधिक सुटसुटीत व्हायला मदत झाली आणि वापरण्यायोग्य जागा वाढली. फ्रीजमध्येदेखील आठवडय़ाची भाजी आणून धुवून, निवडून ठेवतो. रोज ताजंच आणि लागेल तेवढंच अन्न शिजवतो, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवण्याच्या गोष्टींवर आपोआपच नियंत्रण आलं आहे. घरातल्या इतर भागांतही माझे प्रयोग चालतात. या माझ्या प्रयोगांत मी नव्या तंत्रज्ञानाची मदतही घेतो. जुने अनेक फोटोअल्बम मी स्कॅन केले. डिजिटल स्वरूपात जुने तीनेक हजार फोटो आमच्याकडे आहेत. पाहिजे तेव्हा पाहता येतात, वाटलंच तर एखाद्याची प्रतदेखील काढता येते, मात्र जागा अडत नाही. तसंच आमच्या घरात पहिल्या डेस्कटॉपनंतर मी लॅपटॉपच घेतले. जागा वाचते, वीज देखील वाचते आणि पाहिजे तिथे काम करण्याची मुभा. जुना चौरंग माझं अभ्यासाचं टेबल झाला आहे. लॅपटॉप त्याच्या जुन्या टेबलसकट एका संस्थेला देऊन टाकला. तर सांगायची गोष्ट म्हणजे माझ्या आवरासावरीत मी जुन्या न लागणाऱ्या गोष्टी वेगळ्या काढतो. त्या भेटीदाखल देतो, कुणा गरजू माणसांना देतो किंवा काही चक्क रद्दीत टाकतो. प्रत्येक वेळी मी रद्दी दिली की घसघशीत रक्कम मिळते आणि त्यानंतर आई-बाबांचे भरघोस टोमणे.
गराज सेल
अनेक पाश्चात्त्य देशांत गराज सेल लागतात.. घरातली मंडळी आपल्याच घराच्या ओसरीत घरातल्या जुन्या सामानाचा सेल लावतात. मुलांच्या लहानपणीची खेळणी, बाहुल्या, पुस्तकं, कपडे, इथपासून ते जुना सोफा, कपाटं सारं इथे विकायला ठेवलं जातं. वाटसरू, शेजारी किंवा असेच कुणी पसे मोजून स्वस्तात या वापरलेल्या वस्तू पदरात पाडून घेतात आणि आपली गरज भागवतात. आज आपल्या आजूबाजूला अनेक अशा सोयी-सुविधा उपलब्ध आहेत, जिथे आपण आपल्या घरच्या वापरलेल्या वस्तू विकू शकतो. अनेक संकेतस्थळं आपल्याला या सुविधा उपलब्ध करून देतात आणि आपण थेट कुणा ग्राहकापर्यंत पोहोचतो, ज्याला आपला जुना मोबाइल, पुस्तकं, कॅसेट्स, सीडीज् असं काहीबाही विकत घेण्यात रस असतो. फेसबुक-ट्विटरसारख्या सोशल नेटवìकग साइट्सच्या माध्यमांतून असो किंवा संकेतस्थळांच्या माध्यमांतून असो, आपल्याला असे व्हच्र्युअल सेल लावून आपल्या घरातल्या बिनगरजेच्या अनेक वस्तूंना विकता येतं. माझ्या घरातल्या वस्तूंचा असा गराज सेल मी लवकरच लावणार आहे. त्याची तयारी करताना काय
काय गमतीच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी सापडताहेत याची कल्पना करताना मला हसू येतं आहे. माझ्याकडे नव्या कोऱ्या इस्त्रीपासून छत्री, पुस्तकं, अशा अनंत प्रकारच्या गोष्टी मी या सेलसाठी
ठेवतो आहे.
निगाह रख्खो!
माझ्या या लक्ष्मी प्राप्त करण्याच्या अनोख्या मार्गाचा एक परिणाम माझ्यावरच व्हायला लागला आहे. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी..’ असं करताना अधिक जुनं तयारच होणार नाही, यावर माझा कटाक्ष जायला लागला. घरात माझेच अनेक मोबाईल, ेस्र्3 प्लेयर्स, ई-पुस्तक रीडर, टॅबलेट्स, पादत्राणं, पुस्तकं, गाण्याच्या-चित्रपटांच्या तबकडय़ा, वृत्तपत्रांतली अनेक
कात्रणं, मासिकं अशा एक ना अनेक गोष्टी दिसायला लागल्या. जुना झाला मोबाइल, आणला नवा. पण जुन्या मोबाइलचं करायचं काय? तो रद्दीत देण्यासाठी जीव होत नाही, कारण तो निकामी झालेलाच नसतो, त्याचं आयुष्य अजून बाकी आहे. कितीतरी दिवसांत हौसेने घेतलेल्या खास मोजडय़ा वापरल्याच जात नाहीत, त्या तशाच पडून आहेत. या सगळ्या टाळता येण्याजोग्या, अनावश्यक खरेदीचं करायचं काय? आई-बाबांच्या जुन्या गोष्टींकडे रोखलेले एक बोट आणि माझ्या या पसाऱ्याकडे आ वासून बघणारी तीन बोटं मला सतावायला लागली आहेत. या जाणिवेने आता मी खरेदी करताना अधिक जागरूक राहतो. बाजारात आलेल्या या मोबाइलची, लॅपटॉपची किंवा आणि काही गोष्टींची खरंच आत्ता निकड आहे का, हा प्रश्न मी प्रत्येक खरेदीच्या वेळेस विचारायला सुरुवात केलेली आहे. खरेदी करताना हात मागे जातो. पसे वाचताहेत. शिवाय आहे त्या वस्तूंचा पुरेपूर उपयोग होईल याची खात्री आहे. घरात येणाऱ्या अनेक निरुपयोगी वस्तूंना आळा बसतो आहे हे खरंय. या न येणाऱ्या वस्तूंनी काही जागा व्यापली नाही, साहजिकच माझं लहान घर मोठ्ठं झालं हे खरं.
‘गरज ते निकड’
सध्या माझा प्रवास ‘गरज ते निकड’ असा सुरू आहे. गरजा कधीच संपत नाहीत, कारण आपल्याला खऱ्या गरजा ओळखायलाही शिकावं लागतं. आपण लंच टाइम झाला म्हणून जेवतो, झोपायची वेळ झाली म्हणून झोपतो, कामाचं प्रेशर वाढलं म्हणून जागून काम करतो आणि मित्राने नवा मोबाइल मिरवला म्हणून आपणही घेतो. नकळत आपल्या घरात आपण गरज समजून किती टाळता येण्याजोग्या गोष्टी घेतो ते आपल्याला खरंच कळेनासं होतं आणि एक दिवस कृत्रिमरीतीने आपल्याला मोठय़ा घराची गरज वाटायला लागते. हे एक दुष्टचक्र आहे, हे मला कळायला लागलं आणि डोक्याचा भुगा झाला.
आपण आपल्याही नकळत घराच्या गरजेचा, निकडीच्या गरजेचा विचार न करता किती काय काय कोंबत असतो?
हे थांबवलं तर आपण या दुष्टचक्रातून बाहेर पडणार नाही का?
 मी व्यूह भेदायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि जसजसा मी या विळख्यातून स्वत:ला कष्टाने बाहेर काढतो आहे तसतसं माझं घर मोठं होत आहे. हा मजेदार अनुभव तुम्हीदेखील घेऊन पाहा.