घरोघरी जिथे मूर्ती आणल्या जातात त्यात देखील कालमानाप्रमाणे बदल होणे गरजेचे आहे. मातीच्या किंवा प्लास्टर ऑफ परिसच्या मूर्तीऐवजी आता धातूच्या लहान मूर्ती बसविणे योग्य ठरणार आहे. जेव्हा गणेश विसर्जन केले जाते तेव्हा मातीच्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनामुळे त्या क्षेत्रात जे विदारक दृश्य दिसते, भंगलेल्या मूर्तीचे इतस्तत: विखुरलेले अवयव पायदळी येतात, त्यात वापरलेल्या विषारी रंगद्रव्यांमुळे जलसृष्टीमधील जीव धोक्यात आली आहे, पर्यावरणाचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला त्या गोष्टीला आता शतकापेक्षा अधिक काळ लोटला आहे. घरोघरी गणपती बसविण्यामागे समाजातील ऐक्य साधण्याबरोबरच घरात हे संस्कार होत राहावेत, हाही मोठा उद्देश लोकमान्य टिळकांचा होता. केवळ गणपतीची मूर्ती आणून तिच्यासमोर पूजेचे सोपस्कार करावयाचे हे त्यांना अजिबात अपेक्षित नव्हते, तर घराचे घरपण व समाजाचे सामाजिक स्वरूप एकत्रितपणे अबाधित राहावे हा त्यामागचा आणखी एक व्यापक हेतू होता. परकीयांच्या राजसत्तेविरुद्धच्या लढय़ात या एकात्मिक भावनेचा फार मोठा वाटा असू शकतो, हे लोकमान्यांच्या ध्यानात आले होते. गणपतीचे समाजातील सर्वमान्य स्थान हेरून त्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देता येणे सहजशक्य आहे व त्यातून राष्ट्रीय एकता साधता येईल, ह्या विचारामागे त्यांची मोठी दूरदृष्टी होती यात शंकाच नाही.
घर बांधून झाले व सजवून झाले तरी घरात विविध सणवार आणि उत्सव साजरे झाल्याशिवाय त्यातील भावनिक ओलावा जाणवत नाही. मुळातच समाजप्रिय व भावनाप्रधान असलेल्या भारतीय घरांमध्ये व समाजात म्हणूनच गणपती उत्सव रुजला आणि वर्धिष्णू राहिला आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर हळूहळू या सार्वजनिक उत्सवात त्याच्या मूळ हेतूला हरताळ फासणाऱ्या अनेक रूढी कधी शिरल्या व त्याला विकृत स्वरूप कधी प्राप्त झाले हे लक्षात येण्यापूर्वी खूप उशीर झाला होता. त्यामुळे समाजातील अनेक मान्यवरांनी त्या उत्सवामधील आपला सहभागच काढून घेण्यास सुरुवात केली. घरोघरी होणाऱ्या या सणातदेखील अनेक बदल होत गेले, पण त्या बदलांमध्ये सामाजिक वातावरण आणि आपले पर्यावरण यांचे प्रदूषण प्रचंड वाढले! अर्थात सर्वच उत्सव खराब झाला किंवा त्यातील उत्सवच हरविला आहे असे मात्र झालेले नाही, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणावी लागेल. समाज नेहेमीच या असल्या कमकुवत वाटणाऱ्या, पण रेशमाच्या बंधांपेक्षा घट्ट असलेल्या वीणेवर शिवलेला असल्यामुळे काळाच्या ओघात हे असले दोष मागे पडत जातात व त्यातूनच नवनिर्मिती होत राहाते. त्यासाठी समाजातील अनेक घटकांना सजग राहावे लागते, हेही तेव्हढेच महत्त्वाचे असते. या उत्सवाच्या बाबतील समाजातील प्रत्येक घराने सजग असण्याची आजची काळाची गरज आहे.
घराची वास्तुशांत करताना किंवा घरात कोणतेही शुभ कार्य करताना गणपतीची पूजा केली जाते. त्यामुळे गणपतीला आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण स्थान आहे. या हस्तिवदन देवाबद्दल परदेशातदेखील प्रचंड कुतुहूल आहे. प्रदेशात गेल्यावर एखादा तरी प्रश्न या हत्तीदेवासंबंधी विचारला जातोच. शिवाय विविध देशामंध्ये स्थलांतरित झालेल्या भारतीयांनी तिथे हा उत्सव सुरू केला असून, तो अतिशय शिस्तबद्धपणे साजरा करून चांगला आदर्श देखील घालून दिलेला आहे. परदेशातील सामाजिक शिस्त वाखाणण्यासारखीच असते व त्या शिस्तीच्या चौकटीत राहून साजरा केलेला उत्सव त्या त्या देशातदेखील लोकप्रिय होत आहे हे पाहून तरी आपल्या उत्सवात शिस्तबद्धता येणे निकडीचे झाले आहे. जर अशी शिस्तबद्धता आपण आपल्या गणपती उत्सवात आणू शकलो तर तो फार मोठा कौतुकाचा विषय ठरेल व अधिक पर्यटक तर त्यातून आकर्षित तर होतीलच, पण त्यातून लोकमान्यांना अपेक्षित असलेल्या भारतीयत्वाचे दर्शन सर्व जगाला होत राहील यात शंका नाही.
भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षातील चतुर्थीला या उत्सवाचा आरंभ होतो व त्याच पक्षातील अनंत चतुर्दशीला त्याची सांगता केली जाते. काही ठिकाणी दीड दिवसांनंतर तर काही ठिकाणी ३, ५ वा ७ दिवसांनंतर गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी २१ दिवसांनंतरदेखील विसर्जन करण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी गणपतीबरोबर गौरींची वा महालक्ष्मींचीदेखील पूजा केली जाते. ह्या देवतांचे आगमन गणपतीच्या आगमनानंतर तीन दिवसांनी होते व मग पाचव्या दिवशी गौरी आणि गणपतीचे विसर्जन केले जाते. हे असे का? या प्रश्नाला फारसे सयुक्तिक उत्तर मिळालेले नाही. आमच्याकडे पूर्वापार चालत आलेला हा नियम आहे हे उत्तर देऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो. या उत्सवासाठी देवाची मृण्मय मूर्ती करण्याची पद्धत रूढ झालेली आहे.
शाडूच्या मूर्तीला आकर्षक रंग देता येत नाहीत आणि या मातीने बनविलेल्या मूर्ती सहजपणे भंगू शकतात या (गैर) समजापायी या मातीला पर्याय शोधले जाऊ लागले आणि मातीची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसने कधी घेतली हे लक्षातदेखील आले नाही. आता तर या मूर्तींची आयात चीन देशामधून होऊ लागली आहे! या मूर्तीचा आकार केव्हढा असावा याला कोणतीही मोजपट्टी लावल्याचा संदर्भ कुठेही आढळत नाही. केवळ आमची मूर्ती सर्वात जास्त उंच किंवा सर्वात मोठी हे सांगण्याच्या हव्यासापोटी सार्वजनिक गणेश मूर्तींचा आकार व उंची वाढत गेली. त्यात इतकी स्पर्धा सुरू झाली की मग ती रोखण्यासाठी सरकारला कायदा करावा लागला! प्रत्येक बाबतीत लालबागच्या राजाची किंवा दगडूशेठ हलवायाच्या गणपतीशी तुलना करावयाची खरे तर गरज नसते, पण तशी ती केली जाते! सार्वजनिक उत्सवातील मूर्तींची उंची फारशी मोठी न ठेवता त्या उत्सवाची उंची कशी वाढविता येईल हे अधिक महत्त्वाचे आहे!
घरोघरी जिथे मूर्ती आणल्या जातात त्यात देखील कालमानाप्रमाणे बदल होणे गरजेचे आहे. मातीच्या किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी आता धातूच्या लहान मूर्ती बसविणे योग्य ठरणार आहे. जेव्हा गणेश विसर्जन केले जाते तेव्हा मातीच्या किंवा प्लास्टर ऑफ परिसच्या मूर्तींच्या विसर्जनामुळे त्या क्षेत्रात जे विदारक दृश्य दिसते, भंगलेल्या मूर्तीचे इतस्तत: विखुरलेले अवयव पायदळी येतात, त्यात वापरलेल्या विषारी रंगद्रव्यांमुळे जलसृष्टीमधील जीव धोक्यात येतात, त्याची अनेक छायाचित्रे दर वर्षी वर्तमान पत्रांमधून प्रसिद्ध होत असली तरी समाजमनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही हे खेदाने म्हणावे लागते. एखादी मूर्ती भंगली तर त्यावरून केव्हढे रणकंदन होते या अनुभवाला आपला समाज पारखा नाही. मग आपणच करीत असलेल्या ह्या मूर्तीभंगाचे पाप कसे फेडायचे? वास्तविक मूर्ती कशाची आहे किंवा केव्हढी आहे ते अजिबात महत्त्वाचे नसते. मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्या मूर्तीला देवत्व जर प्राप्त होत असेल तर मग धातूची मूर्ती पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक योग्य नाही का?
गणेश विसर्जन हे पाण्यातच केले जाते कारण देवाचा परतीचा मार्ग पाण्यावाटे आहे असा संकेत आहे. जर असे असेल तर धातूच्या मूर्तीचे घरातच पाण्याच्या बादलीत विसर्जन केले तर विविध गावांमध्ये होत असलेले नैसर्गिक पाण्याच्या साठय़ांचे प्रदूषण आपल्याला थांबविता येईल. विसर्जनामुळे पाण्याच्या साठय़ांचे, तलावांचे किंवा नद्यांचे प्रदूषण कसे रोखावे ही स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर निर्माण झालेली बिकट समस्या सोडविण्याचा हा एकमेव मार्ग आहे, हे गणपती स्थापना करणाऱ्या प्रत्येकाने व प्रत्येक मंडळाने लक्षात घेतले तर ही अतिशय बिकट वाटणारी समस्या अगदी सहजपणे सोडविता येईल. या वर्षी ‘लोकसत्ता’च्या प्रत्येक वाचकाने हा आदर्श निर्माण करावा व इतरांनाही तसे करण्यास उद्युक्त करावे अशी मनापासून विनंती आहे. या सूचनेत एक नवी समस्या निर्माण होणार आहे ती म्हणजे मृण्मय किंवा इतर प्रकारच्या मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांचे काय होईल? प्रश्न अगदी वाजवी आहे. मात्र समाजाला आणि पर्यायाने प्रशासकीय पातळीवर त्यांच्यासाठी पर्यायी व्यवसायाची सोय करावी लागेल. हे लिहिणे सोपे असले तरी प्रत्यक्षात ते आणणे अजिबात सोपे नाही याची जाणीव आहे. पण जल प्रदूषण झाल्यामुळे ज्या समस्या निमा्रण होत आहेत त्यांच्यापुढे ही समस्या लहान आहे व सोडविता येण्याजोगी आहे, असे नक्कीच वाटते. राजकीय इच्छाशक्ती असेल तर त्यातून मार्ग लवकर निघेल. ल्ल ल्ल
सह संचालक, जैवविज्ञान वर्ग, भाभा अणुशक्ती केंद्र
डॉ. शरद काळे – sharadkale@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eco friendly ganesha
First published on: 12-09-2015 at 01:02 IST