घर सजवताना विचार केला जातो तो जागेचा. छोटी जागा मोठी दिसायला हवी असेल तर आरशांचा नक्कीच उपयोग करतात. आरसे घराला ‘हट के लूक’ देतात. आरशाची साफसफाई, स्वच्छता करणं खूप सोपं असतं. कोऱ्या वर्तमानपत्राने पुसला की झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरसा हा इंटिरीअरमधला आवश्यक भाग बनला आहे. फर्निचरचा व शोभेचा अविभाज्य भाग म्हणून आरशाची मागणी वाढत आहे. घराला किंवा ऑफिसला स्टायलिश लूक देण्याकरता आरसे वापरतात.
आरशात आपली रूपरचना दिसते, पण आपली मनोरचना दिसत नाही. मन हाच आपला आरसा होतो. म्हणून आपल्यात म्हण आहे ‘त्याने तुला आरसा दाखवला.’
एका नावाजलेल्या चित्रपटगृहाच्या मालकाने जिन्याच्या भिंतीवरचे आरसे काढून टाकले, का? तर प्रेक्षक आरशात बघत बघत जिना उतरतात व जिन्यात गर्दी होते.
घर सजवताना विचार केला जातो तो जागेचा. छोटी जागा मोठी दिसायला हवी असेल तर आरशांचा नक्कीच उपयोग करतात. आरसे घराला हट के लूक देतात. आरशाची साफसफाई स्वच्छता करणं खूप सोपं असतं. कोऱ्या वर्तमान पेपराने पुसला की झालं.
ऑफिसचा कॉर्पोरेट लूक राखण्यासाठी अनेक प्रकारचे आरसे पाहायला मिळतात. आरशांचे विविध प्रकार पाहिले तर थक्क व्हायला होते. नक्षीदार, बिलोरी, षट्कोनी, गोल, आरसे, छोटय़ा आरशांचे बॉल वगैरे बँकेत, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कोपऱ्या कोपऱ्यात उभे-आयती आरसे भिंतीला लावतात. त्यामुळे निरनिराळ्या कोनातून आलेल्या माणसांच्या हालचाली न्याहाळता येतात. याच कल्पनेचा उपयोग आम्ही आमच्या घरात किचन आणि हॉलमधल्या कोपऱ्यात आरसा लावून केल्यामुळे माझी बायको स्वयंपाक घरातील ओटय़ाशी उभी राहून हॉलमध्ये, दरवाजावर लक्ष ठेवू शकते.
मध्यंतरी आम्ही आमच्या कुलदेवतेचे दर्शन घेण्याकरिता गावाला गेलो होतो. आमच्याच घराण्यातल्या एका नातेवाईकाच्या घरी एक रात्र उतरलो होतो. सकाळी उठून बघतो तर आरसा कुठेच दिसला नाही. माझ्या दाढीची तर पंचाईत झालीच पण बायकांचे पुष्कळ अडले. मग आम्ही एक युक्ती केली. कुलदेवतेची जुनी तसबीर होती ती पुसली आणि त्यात कडेकडेने बघून वेळ मारून नेली. तेव्हा कळले आरशाचे छुपे महत्त्व!
दुकानदार गिऱ्हाईकाला आकर्षित करण्यासाठी आरशाचा चांगला उपयोग करतात. सोन्याचांदीच्या दुकानात तर आरशाशिवाय व्यवसाय होणार नाही. आमच्या रानडे रोडवर एक छोटे अरुंद मिठाईचे दुकान आहे. त्याच्या मालकाने तर समोरच्या भिंतीवर ‘वॉल टू वॉल’ आरसा लावल्यामुळे दुकान मोठे तर दिसते, पण बाचकायलापण होते.
सलूनमध्ये तर समोरासमोरच्या दोन्ही भिंतीवर पूर्ण आरसे असतात. त्यामुळे मी दर महिन्याला सलूनमध्ये गेलो की स्वत:ला न्याहाळत असतो.
जिकडे तिकडे टॉवर झाल्यामुळे लिफ्टमध्ये, लिफ्टच्या बाहेर थांबावे लागते. त्या क्षणिक मिनटातही ड्रेस कसा दिसतो व आपण स्वत: कसे दिसतो (चेहरा, केस, दात वगैरे) हे बघण्याकरिता मोठे आरसे लिफ्टमध्ये, बाहेरच्या भिंतीवर लावण्याची स्टाईल झाली आहे.
पूर्वी मुले आरशाच्या तुकडय़ांनी एकमेकांच्या घरात, डोळ्यावर कवडसे पाडून खेळत असत, पुढे तीच मुले आरशाच्या तुकडय़ांचा उपयोग करून पुठ्ठय़ाचा पेरिस्कोप बनवू लागली. तर या आधुनिक काळात मुले मॉलमधे अंतर्गोल, बहिर्गोल आरशापुढे नाचत आपण कसे मोटू व पटलू दिसतो ते बघत खेळतात.
आरसे आपल्या घराचे सौंदर्य तर वाढवतात हे नक्की, पण आपली प्रतिमा स्वच्छ आहे का? हे आरसाच दाखवतो. आरसा खरं दाखवतो, खोटं दाखवत नाही, म्हणून तो आपला घरातला एकांतातला मित्र आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Effective use of mirrors in vastu shastra
First published on: 13-12-2014 at 01:03 IST