scorecardresearch

फ्लोरिंग मटेरियल्स

मार्बल फ्लोरिंग केल्यानंतर त्यावर मशीनच्या सहाय्याने पॉलिश केले जाते. ज्यामुळे मार्बलला एक सुंदर चमक येते.

flooring materials

अजित सावंत

आपल्या भारतीय बाजारपेठेत विविध प्रकारची फ्लोरिंग मटेरियल्स उपलब्ध आहेत. या मटेरियल्सचे आपण नैसर्गिक मटेरियल्स व कृत्रिम मटेरियल्स असे वर्गीकरण करून माहिती घेऊया. नैसर्गिक प्रकारच्या फ्लोरिंग मटेरियल्समध्ये प्रामुख्याने मार्बल, ग्रॅनाइट, जैसलमेर, कोय, शहाबाद असे बरेच दगड वापरले जातात. या सगळय़ाप्रकारांच्या दगडांच्या खाणी भारतात बऱ्याच ठिकाणी आहेत. या सगळय़ा प्रकारात ‘मार्बल’ म्हणजे संगमरवर हा दगड सगळय़ात जास्त लोकप्रिय आहे. मकराना, जयपूर, जैसलमेर, आंधी पिस्ता, बरोडा, नेपाळी असे बरेच प्रकारचे मार्बल्स बाजारात उपलब्ध आहेत. या प्रत्येक प्रकारची स्वत:ची अशी वेगवेगळी वैशिष्टय़े आहेत. जसं की, मकराना मार्बल हा सगळय़ांत जास्त पांढरा शुभ्र व डागरहित असतो, बरोडा मार्बल रंगाने पांढरा नसून हिरवा असतो. आंधी पिस्ता या मार्बलमध्ये साधारणपणे पांढऱ्या रंगाच्या मार्बलवर हिरव्या रंगाचे पिस्त्याच्या आकाराचे ठिपके असतात. नेपाळी मार्बलमध्ये वेगवेगळे रंग व ग्रेन पॅटर्न असतात. यात सगळय़ात महागडा प्रकार म्हणजे ‘मकराना’ मार्बल. हा अतिशय शुभ्र असल्याने खूप सुंदर असतो आणि अर्थातच याच कारणामुळे अत्यंत महाग असतो. ‘मकराना’ हे ज्या ठिकाणी या मार्बलच्या खाणी आहेत, त्या जागेचे नाव आहे. मार्बल जितका डागरहित व शुभ्र तितकी त्याची किंमत जास्त असते. मार्बल हा मोठय़ा स्लॅब्सच्या स्वरूपात मिळतो. हा आपल्याला हव्या असलेल्या आकारात कापून फ्लोरिंगसाठी वापरला जातो. मार्बल हा नेहमी पांढऱ्या म्हणजेच व्हाइट सिमेंटने चिकटवला जातो. जर चुकून कोणताही मार्बल नेहमीच्या ब्लॅक सिमेंटने चिकटवला तर त्या सिमेंटचे डाग मार्बलवर दिसू लागतात. हल्ली हल्लीपर्यंत मार्बल किंवा इतरही फ्लोरिंग करणारे कुशल कारागीर हे राजस्थानी असत. पण आता इतर प्रांतीय कारागीरही हे काम करतात. तरीही पहिली पसंती ही राजस्थानी कारागिरांनाच असते.

मार्बल फ्लोरिंग केल्यानंतर त्यावर मशीनच्या सहाय्याने पॉलिश केले जाते. ज्यामुळे मार्बलला एक सुंदर चमक येते. कालांतराने ही चमक कमी होते. त्यामुळे तीन / चार वर्षांनी हे पॉलिश पुन्हा करावे लागते. मार्बल हा तितकासा मजबूत दगड नाही. त्यामुळे यावर तडे जाऊ शकतात तसेच चरेही पडू शकतात. मार्बल हा पोरस स्टोन आहे. म्हणजेच तो एक सच्छिद्र दगड. त्यामुळे हा त्यावर पडलेला द्रवपदार्थ शोषून घेऊ शकतो. यावर हळद, नेलपेंट अशा गोष्टींचे डाग लवकर पडू शकतात व ते कायमस्वरूपी राहण्याची शक्यता असते. त्यामुळे मार्बल हा थोडा काळजीपूर्वक वापरावा लागतो, तसेच तो मेंटेनही करावा लागतो. मार्बल हा भारतासह जगभरात अतिशय प्राचीन काळापासून वापरला गेला आहे व तो अतिशय अप्रतिम असा लूक देतो. इंडियन मार्बलप्रमाणे बरोबर इटालियन व ऑस्ट्रेलियन मार्बलही बाजारात उपलब्ध आहेत. यातील इटालियन मार्बल हा त्याच्या सुंदरतेमुळे जगभरात प्रचंड प्रसिद्ध आहे. हा अतिशय महागडा असल्याने उच्चभ्रू घरांमध्ये व तारांकित हॉटेल्समध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. आता आपण दुसऱ्या प्रकारची माहिती घेऊया.

‘ग्रॅनाइट’ हा दगडही भारतात बऱ्याच प्रदेशातील खाणीत मिळतो. हा खूप कठीण व मजबूत दगड आहे. ग्रॅनाइट हा स्लॅबच्या तसेच दोन फूट  ७ एक फूट या आकाराच्या टाइलच्या स्वरूपातही मिळतो. ग्रॅनाइटसह सगळय़ाच नैसर्गिक फ्लोरिंग स्लॅब्सचा थिटनेस म्हणजेच जाडी ही साधारणपणे पाऊण इंच इतकी असते. ग्रॅनाइट टाइलची जाडी ही अर्धा इंच असते. यात बरेच रंग व डिझाइन्स उपलब्ध आहेत. यात काळा, गुलाबी, राखाडी, चॉकलेटी, विटकरी असे बरेच रंग मिळतात. यातील प्रत्येक रंगाच्या विविध छटा उपलब्ध आहेत. हे सगळे मानवनिर्मित नसून नैसर्गिक प्रकार असल्याने याच्या रंगांमध्ये व डिझाइन्समध्ये थोडाफार फरक ( श्ं१्रं३्रल्ल) आढळून येतो. यात ब्लॅक, जेट ब्लॅक, टेलिफोन ब्लॅक, आग्रा, सिबाका, कॅट आय असे बरेच प्रकार आहेत. ग्रॅनाइट हा प्रिपॉलिश्ड म्हणजेच कारखान्यातूनच पॉलिश होऊन येत असल्याने त्याला लावल्यानंतर पुन्हा पॉलिश करायची गरज नसते व हे पॉलिश सहसा लवकर खराब होत नाही. बऱ्याच वर्षांनी याची चमक कमी झाल्यास याला पुन्हा पॉलिश करून पहिल्यासारखे चमकदार बनवता येते. काही जण याचं पॉलिश मशीनच्या सहाय्याने खरवडून काढून, त्याला थोडय़ाशा खडबडीत स्वरूपातही वापरतात. मॉडर्न शोरुम्स आर्ट स्टुडिओ  किंवा मॉडर्न डेकॉर असलेल्या ऑफिसांमध्ये हा प्रकार पहावयास मिळू शकतो. ग्रॅनाइटदेखील खूप छान लूक देतो.

तिसरा प्रकार आहे ‘जैसलमेर स्टोन’ राजस्थानमधील जैसलमेर येथे या दगडाच्या खाणी आहेत. पिवळय़ा रंगाच्या ‘यल्लो ऑकर’ या रंगछटेचा हा दगड असतो. हा दगड पॉलिश केल्यानंतर खूपच सुंदर दिसतो. हा प्रामुख्याने इंडियन एथनिक थिमच्या इंटिरियरमध्ये वापरला जातो. हादेखील मार्बल, ग्रॅनाइटप्रमाणे स्लॅबच्या स्वरूपात मिळतो.

चौथा प्रकार आहे, ‘कोटा स्टोन’ हा राजस्थानमधील कोटा या ठिकाणी असलेल्या खाणीत सापडतो. हा फिकट हिरव्या रंगाचा असतो. हा दगडही अत्यंत मजबूत असल्याने आधीच्या काळात किचनसाठी खूप वापरला जायचा. आता हा इंडियन व्हिलेज थीम इंटिरियरमध्ये वापरला जातो. हादेखील खूप छान दिसतो.

या प्रकारांप्रमाणेच शहाबाद, स्लेट, सँडस्टोन, लाइमस्टोन असे इतरही प्रकार उपलब्ध आहेत, पण त्यांचा वापर विशेष होत नाही. वेगवेगळय़ा प्रकारची मटेरियल्स वापरून आपण कॉम्बिनेशनही करू शकता. जसे की मार्बल व कोटा, मार्बल व ग्रॅनाइट, मार्बल व जैसलमेर व ग्रॅनाइट. इटालियन मार्बलच्या डार्क व लाइट शेडच्या दगडांचे कॉम्बिनेशनही खूप प्रमाणात वापरले जाते. हे सगळे प्रकार खाणीत सापडत असल्याने, यात वेगवेगळे लॉट असतात व नैसर्गिक असल्याने यात प्रत्येक लॉटच्या रंगात व डिझाइनमध्ये थोडा फार फरक असतो. म्हणूनच हे लॉट काळजीपूर्वक निवडावे. गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

अजून एक नैसर्गिक प्रकारचे फ्लोरिंग मटेरियल उपलब्ध आहे, जे दगड या प्रकारात मोडत नाही. ते आहे वुडन फ्लोरिंग, जे नैसर्गिक लाकडापासून बनवले जाते. वुडन फ्लोरिंगला बहुतांश जणं कृत्रिम प्रकारचे फ्लोरिंग मानत असले तरीही ते नैसर्गिक प्रकारातच मोडते. हे फ्लोरिंग पातळ लाकडी फळय़ांच्या स्वरूपात मिळते. या फळय़ा इंटर लॉकिंगपद्धतीने म्हणजेच एकात दुसरी फळी अडकवून लावल्या जातात. परदेशात वातावरण कोरडे असल्याने हे वुडन फ्लोरिंग तेथे खूप वापरले जाते. भारतात दमट वातावरण असल्याने हा प्रकार तितकासा साजेसा नाही. हे प्रिपॉलिश्ड असल्याने याला पुन्हा पॉलिश करायची गरज नाही. हा महागडा प्रकार आहे, पण अत्यंत रिच लूक देतो.

आपले भारतीय राजे महाराजे आधीच्या त्यांच्या काळात हौशीने हे वुडन फ्लोरिंग तसेच इटालियन मार्बल युरोपमधून बोटीतून मागवत व आपल्या राजवाडय़ांच्या इंटिरियरसाठी वापरत. आजही बऱ्याच कृत्रिम टाइल्स मोठय़ा प्रमाणात वापरायला सुरुवात व्हायच्या आधी वरील प्रकारचे नैसर्गिक प्रकारचे फ्लोरिंगच केवळ वापरले जायचे. पण सिरॅमिक व विद्रिफाइड टाइल्स बाजारात आल्यापासून नैसर्गिक प्रकारचे फ्लोरिंग वापरण्यात जवळपास ९५ % घट झाली आहे. कृत्रिम टाइल्स या लावण्यासाठी व वापरण्यासाठी सोयीस्कर असल्या तरी मार्बल किंवा जैसलेमर वापरून पाहायला हरकत नाही. आरोग्यासाठी देखील ते हितकारक आहेत. तर हे झाले नैसर्गिक पर्याय. पुढील लेखात आपण कृत्रिम फ्लोरिंग मटेरियल्सची माहिती घेऊया.  ajitsawantdesigns@gmail.com

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 13:35 IST
ताज्या बातम्या