दिवाळीत बऱ्याचदा घराची ओळख प्रवेशद्वाराशीच होते ती दाराला लावलेल्या तोरणाने आणि उंबरठय़ाशी असलेल्या रांगोळीने. ‘स्वागतशील आहोत आम्ही’ हे दर्शवणारी! पूर्वी रोज नेमाने गोपद्म स्वस्तिक अशी शुभचिन्हं, उंबरठय़ाला समांतर पाना-फुलांची नक्षी, त्यावर हळद-कुंकवाचा शिडकावा करून शोभिवंत केलेलं असे.
‘दिवाळी आली.. आली दिवाळी’ असा घोष दसऱ्यापासूनच सुरू होई. खरं तर वर्षभर दिवाळीलाच केंद्रस्थानी ठेवलेलं असे. रंग लावायचा असो वा एखादी छोटी-मोठी खरेदी असो, ‘दिवाळीलाच घेऊ’ असंच म्हणत.
घरात सजावटीला सुरुवात दसऱ्यापासून झालेली असे. सजावट म्हणजे काय घराची स्वच्छताच. आहेत त्याच वस्तूंची नीटनेटकी मांडणी करायची. पाऊस नुकताच संपलेला असे. त्याची जाळी-जळमटं काढणं, भिंती स्वच्छ करणं. पडदे धुवायचे वा असला नवासा तर दुसरा सेट लावायचा. बहुधा हा हाती विणलेला पडदा असायचा. तोरणही विणलेल्या गुलाबांच्या फुलांचं असे. लाद्या धुण्याचं काम आणि पितळेचे डबे, तांब्याची पाण्याची भांडी चिंच-मीठ लावून लखलखीत केली जात. रिठय़ाच्या पाण्याने जुन्या दागिन्यांना झळाळी आणली जाई. घरं प्रसन्नतेनं हसू लागत. थोडीफार खरेदी होई. ही खरेदी कपडय़ांची असे. जे २ कपडय़ांचे जोड वर्षभरासाठी लागत तेच दिवाळीचं निमित्त साधून आणले जात. घरात मुली असतील तर पुढची तरतूद म्हणून थोडं सोनं वा दागिना घेतला जाई. वायफळ खर्चाला मनाई होती. मात्र, दिवाळी अंक आणि फराळ यांवरील खर्चाला कात्री नसे. दिवाळीची ओढ या दिवाळी अंकासाठीही लागत असे. नरकचतुर्दशीच्या पहिल्या आंघोळीनंतर फराळ करून झाला की नवेनवे कपडे घालून पळत सुटायचं ते लायब्ररीत. सगळ्यातआधी जावून मनासारखा अंक आणण्यातील चढाओढ हाही एक आनंदच. कधी जवळच्यांना दिवाळीअंक भेटीदाखल द्यायचा तर कधी मामा भाच्याला भेट म्हणून ‘किशोर’ ची वार्षिक वर्गणी भरून वर्षभराचा आनंद द्यायचा. पण फराळाचे पदार्थ मात्र विविध आणि मोठय़ा प्रमाणात केले जात. कारण वर्षभरात इतर वेळी हे पदार्थ सहसा होत नसत. घीवर करायला काकींना बोलावलं जायचं. ती उत्तम घीवर करायची. गोल, जाळीदार कुरकुरीत, वर पिस्त्यांची पखरण. येताना ती घीवरासाठी उंच आणि अरुंद भांडं घेऊन येई. चंद पापडीही बेसनाची असे, पापडय़ा या रवा-मैद्याच्या, अनारसे, शेव-चकली, खाजं, खाजांच्या करंज्या, वेगवेगळे लाडू, गोडाबरोबरच तिखट शंकरपाळेही असत. अशा पदार्थाना थाळे भरून त्यावर विणलेले रुमाल टाकून आम्हा मुलींच्या हाती शेजारी-पाजारी, नातलगांना ते दिले जात.
आज चार ठळक पदार्थ बनवून बाकीचे मेवा-मिठाई बाहेरून आणली जाते. घरगुती पदार्थ बनवणारेही ठिकठिकाणी आहेत. हल्ली घरात २ सुना, नणंद-भावजय अशा दोघी मिळून पदार्थ बनवतात आणि निम्मे-निम्मे वाटून घेतात. त्यामुळे श्रमांचंही वाटप होतं आणि २ पदार्थ जास्त बनवले जातात. घरातला जिव्हाळाही दुप्पट होतो.
बऱ्याचदा घराची ओळख प्रवेश दाराशीच होते ती दाराला लावलेल्या तोरणाने, उंबरठय़ाशी असलेल्या रांगोळीने. ‘स्वागतशील आहोत आम्ही’ हे दर्शवणारी! पूर्वी रोज नेमाने गोपद्म, स्वस्तिक अशी शुभचिन्हं, उंबरठय़ाला समांतर पाना-फुलांची नक्षी, त्यावर हळद-कुंकवाचा शिडकावा करून शोभिवंत केलेलं असे. बहुतेक कीड-मुंगीला, अशुभाला नकार आणि पावित्र्याला होकार देण्याचा हा एक मवाळ आणि सौंदर्यपूर्ण मार्ग असावा.
तेव्हा आम्ही डोंबिवलीला होतो. घर बैठं. आमच्या दारातच विहीर. कारण आम्ही मागच्या बाजूला राहात होतो. घर गमतीदार होतं. चार बाजूला चार भाडेकरू. प्रत्येकाला ऐसपैस अंगण. समोरच्या बाजूच्या देशपांडय़ांच्या दारात नळ, तर पलीकडच्या प्रधानांच्या घरासमोर बकुळीचा पार. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही फायदा होताच. पारावर बायकांचा निवडणं-टिपणं, शिवणं-विणण्याचा अड्डा बसे. दुसरी गंमत म्हणजे ४ खोल्यांच्या त्या घराला ३/३ प्रवेशदारं होती आणि त्या सर्वाना मिळून लांबच लांब ३/४ पायऱ्या. अंगणाच्या कडेने सर्वानीच फुलझाडं-फळझाडं लावलेली  अगदी भाडेकरू असूनही. गुलबक्षी, सदाफुली, झेंडू, गणेश-वेल, कृष्ण कमळ, वेली, गावठी गुलाब यांच्या बरोबरीनेच अनंत, कवठी चाफा, हिरवा चाफाही होता. फणस, आंबे, जांभूळ, नारळ म्हणजे आमचे तहान लाडू, भूक लाडू होते. तिथेच विहिरीच्या कोपऱ्यात तोपर्यंत माहिती नसलेला अनोखा हजारी मोगरा होता.
निजायची खोली तेवढी आतल्या बाजूला होती. तीन खोल्यांच्या लांबीएवढं चांगलंच रुंद असं अंगण होतं. दिवाळीची चाहूल लागायची ती आसमंतातल्या धप् धप् आवाजाने. आधी अंगण नीट करायचं आणि मग ते चोपण्याने चोपायचं, सबंध आळीत कोणातरी एकाकडे चोपणं (धोपाटणं) असायचं. दिवाळी आली की त्याच्यावर नंबर लागायचे. कोणालाही कसलाही संकोच नव्हता की कसं काय मागायचं बुवा चोपणं दुसऱ्याकडे? तेपण बापडे कधी काही बोलले नाहीत. ते चोपणं परभारेच फिरत राहायचं आणि मूळ घरी पोचतं व्हायचं. पावसाने उखणलेली सगळय़ांची अंगणं काचेसारखी गुळगुळीत. अगदी साजरी दिसायची. त्यावेळी सगळे जण ठिपक्यांची रांगोळी काढत असताना आमची आई मात्र, ‘शकुंतलेचं पत्रलेखन,’ ‘सीता आणि सोनेरी हरीण,’ ‘भाऊबीजेची ओवाळणी’ अशी दृष्यं काढत असे. तेव्हा ग्रिटिंग कार्डस्चा वावर फारसा नव्हता. पण दिवाळी अंकांतली वा पत्र्याच्या मिठाईच्या डब्यावरची चित्रं बघून ती काढी.
माझं काम रंग भरायचं! आजी गिरगावात चाळीत रहात असे तिथे वेगळचं होतं. लांबलचक सामायिक गॅलरी पण अगदी अरंद आणि खूप सारी ये-जा. रांगोळीचे कोपरे कपडय़ांच्या फळकाप्याने उडायचे. कधी मुलांची मस्ती किंवा मुद्दाम केलेली खोडी आड यायची. म्हणून मग कार्डबोर्डचा चौरस तुकडा करून तोच गेरूने सारवून त्याच्यावर ठिपक्यांची रांगोळी काढली जाई. मुंबईतला शब्दप्रयोग ‘चला कणा काढू या’ असा असायचा. कॉर्नरची खोली असलेले दिवाडकर मात्र मोठी आईसारखी रांगोळी काढत. गॅलरीला त्यांनी दार लावून घेतलं होतं त्यामुळे ती खरोखरच रांगोळीची खोली झालेली असायची. तेव्हाची अपूर्वाईची गोष्ट म्हणजे रंग भरताना ते मलमलच्या फडक्यातून वस्त्रगाळ करून भरत. बाकी सर्वजण रांगोळी मिक्स केलेले रंग चिमटीने टाकत. त्यामुळे अर्थातच दिवाडकरांची रांगोळी झगझगीत रंगांची, कलात्मक असे. आजीकडे मावश्या कुशल असल्यामुळे मला रंग भरायचं काम असे. फारतर एखादी पणती काढायची वा ‘शुभ दीपावली’ लिहायचं! रांगोळी काढायचं राहूनच गेलं. लग्न झालं तेव्हा या रांगोळीचंच मोठ टेंशन होतं. मला रांगोळी येत नव्हतीच, पण इतर बायका ताटाभोवती, चौरंगाभोवती, तुळशी वृंदावनाजवळ ज्या गतीनं सराईतपणे रांगोळी काढत त्यामुळे तर आता कोण, काय, कसा उद्धार करेल असं वाटायचं. त्यात सासर म्हणजे भला-थोरला वाडा! माडीचं घर. वरचा सगळा मजला आमचा. पुढे अंगणाएवढी मोठ्ठी गॅलरी. हॉलमध्ये जायला ३/३ दारं एवढा मोठा हॉल. हॉलच्या लांबीची भरपूर रुंद अशी मागच्या बाजूला ऐसपैस गच्ची! रांगोळी काढायला जागा नाही असं म्हणायची सोयच नाही. गच्चीत लोळायला २ बाजा बसायला ३-४ मोढे. गच्चीच्या कठडय़ाला लागून फुलझाडांच्या कुंडय़ा. सगळी सुगंधी फुलं. सायली, मोगरा, जुई, कृष्णकमळ भरपूर उन्हानं छान फुलत. त्यांच्या उमलत्या कळय़ा काढून तांब्यात घालून ठेवायच्या आणि वर झाकण द्यायचं. रात्री उशाशी ठेवून झाकण उघडायचं की फुलांच्या १ल्या बहराच्या सुगंधानं खोली दरवळून जायची. आजच्या सुगंधी मेणबत्या, रूम फ्रेशनर्सला फिकं पाडणारा जिवंत सुगंध!
तर ते असो! त्या मोठय़ा गच्चीच्या एका कोपऱ्यात सासूबाई ठिपक्यांची पारंपरिक रांगोळी काढायच्या. मी घरातल्या सगळय़ा कामाचा भार घ्यायचे, आणि रंग भरायला रांगोळीची मागची आवराआवर करायला जायचे. नाही म्हणायला उंबरठय़ाजवळ फुलं-पानं-वेल काढून वेळ मारून न्यायची. नवऱ्याला विश्वासात घेतल्यामुळे तो पुढच्या गॅलरीत आधी खडूनं निसर्गदृश्य काढून मग त्यात रंग भरायचा. बॉर्डर काढायचा. छानच दिसायची त्याची रांगोळी. एखाद्या चित्रासारखी (पेंटिंग सारखी) त्याचं ड्रॉईंग चांगलंच होतं. त्यामुळे माझी झाकली मूठ तशीच राहिली. उलट मी त्या दोघांच्या रोगोळीचं खूप कौतुक करायची अगदी मनापासून. स्वत:ला येत नसल्यामुळे त्यात आश्चर्याचाही भाग असे. त्यामुळे सासूबाई खूश असत. त्या म्हणत, ‘आतापर्यंत घरातलं सगळं काम आवरून रांगोळी काढायची म्हणजे एक ‘काम’ वाटायचं आणि ते उरकलं जायचं. आता मनाप्रमाणे सावकाश काढता येतात. शिवाय मागचं आवरणं नको नको वाटायचं तेही तू उरकतेस.’
त्यानंतर आम्ही ब्लॉकमध्ये रहायला गेलो. एका मजल्यावर ३ बिऱ्हाडं. इथे तर माझी झाकली मूठ दीड लाखाची झाली.
कारण तोपर्यंत मुलं मोठी झाली होती आणि त्यांचं ड्राईंग बापापेक्षा सवाई. पुन: दोघांच्या दोन पद्धती. छोटा मिकी माऊस, वेताळ, ही मॅन अशी चित्रं काढायचा. त्याला गेरूने सारवलेला एक मोठा-पाट दिला होता. दुसऱ्याचा पंथ पारंपरिक ठिपकेवाला. घरात २/२ रांगोळय़ा. दिवाळी अगदी रंगीबेरंगी होऊन जायची. त्या रांगोळीला शोभतील अशा नक्षीदार रंगीत पणत्या कलात्मक पद्धतीने मांडायच्या हा सिलसिला चालू राहिला.
पुढे एकीला माझ्या मुलात इंटरेस्ट निर्माण झाला. एकदा ती म्हणाली, ‘तुम्हाला कशी सून हवी?’ मी म्हटलं, ‘ती पसंती त्याचीच पूर्णपणे पण तिला रांगोळी काढता आली तर चांगलंच’ ती पटकन म्हणाली, ‘अय्या! पण मला नाही काढता येत’ मला एकदम इतिहासातल्या नूर जहाँची आठवण आली. तिला जहाँगीरने रागाने विचारलं, ‘ऐसे कैसे उडा दिया तुमने मेरे कबूतकर को?’ तर तिने हातातलं जोडीतलं कबूतर हवेत उडवून म्हटलं, ‘ऐसे!’ त्या निरागसपणाची आठवण आली. पुढे तीच माझी सून झाली. आणि फुलांच्या रांगोळय़ा काढायला लागली. दुसरी सूनबाई पण माझ्याच पंथातली. पण ती हळूहळू शिकली. त्यासाठी वेगवेगळी बाजारात मिळणारी पेनं आणली. डिझाइनवाल्या चाळण्यांतून विविध आकृत्या काढून स्वस्त-मस्त सुटसुटीत अशा प्रकारातली जवळ जवळ रेडिमेड रांगोळी काढली. पण प्लॅस्टिकचं स्टिकर मात्र कधी लावलं नाही. या सगळय़ात मोठा सुखद अपवाद नातीचा. ड्राईंग भन्नाट चांगलं, बोटात कला, रंगांची उत्तम जाण. त्यामुळे ती रांगोळीच्या तऱ्हा तऱ्हा काढू लागली. सगळेच पंथ आपलेसे केले. घराबाहेर गॅलरीत, देवापुढे रांगोळय़ा काढ काढ काढून घराला शृंगारून टाकलं. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना माझे विद्यार्थी रांगोळी स्पर्धेत भावपूर्ण चेहरे, काहीजण पाण्यावरची, काही जणी पाण्याच्या आतली, धान्याची, फुला-पानांची, कोळशाची पावडर, लाकडाचा भुसा-वापरून त्यावरची अशा अगदी वेगवेगळय़ा रांगोळय़ा काढत. मला अचंबा वाटे, मी उसासेही टाके. मी
परीक्षक (?) असल्यामुळे मला सर्वानाच बक्षिसं द्यावीशी वाटत. पण आता आमच्या घरी हे नित्याचं झालंय.
रांगोळय़ासारखंचं कंदील बनवायचं काम! ते खूप आधीपासून सुरू व्हायचं. आम्ही दोघी बहीणीच. भाऊ खूपच लहान. त्यामुळे शेजारची मुलं येऊन कंदील बनवायला मदत करत, कामटय़ा तासायच्या, बांधायच्या, मापं घेऊन कागद कापणं, खळ बनवणं. घराला एखाद्या कारखान्याचं स्वरूप यायचं. सहसा पारंपरीक कोनांचा कंदील बनायचा. फार तर चांदणी. तिला थोडी रंग-रंगोटी, टिकल्या वगैरे. सोनेरी कागदाने कडांना चिकटवायचं. दुसरी थोडी अवघड गोष्ट म्हणजे फिरता कंदील. पण हासुद्धा बरीच मुलं करत. पण सगळय़ात धमाल येई वाडीतला मोठ्ठा सामायिक कंदील बनवताना किंवा सगळी चाळ ठरवत असे सगळय़ांनी सारखेच कंदील लावायचे. मग प्रत्येक मजल्याला वेगवेगळा रंग ठरवला जाई. कधी करंज्याचे बनवलेल्या छोटय़ा-छोटय़ा कंदिलांची रंगीबेरंगी माळ बनवली जाई. प्रत्येक घर या सगळय़ा तयारीच्या दिवसात ‘लघुउद्योग’ चालू असल्या सारखं वाटे. पण दिवाळीच्या दिवसात अख्खी इमारत शृंगारल्यासारखी दिसे. तरी त्यावेळी इलेक्ट्रिकच्या माळांचा अतिरेकी वापर नव्हता. पण फुलांचा दरवळ, दाराचं तोरण, आकाशकंदील रांगोळी ही आरास प्रत्येक घराला चैतन्य देई घर आतून इतकं स्वच्छ लखलखत असायचं की त्याची चमक पाहणाऱ्याला जाणवे. नवे कपडे, फराळ रेशमी वस्त्रांची सळसळ यामुळे घरातल्या माणसांचे चेहेरेही प्रसन्न असत आणि ही प्रसन्नता घराच्या दगड-मातीच्या भिंतीच्या कणाकणात आणि अवकाशातही भरून राही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व वास्तुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy diwali
First published on: 02-11-2013 at 01:06 IST