मंजू याज्ञिक
मुंबईतील अनेक जुन्या सोसायट्यांचे पुनर्विकास होत असताना, नव्या उंच इमारतींच्या आराखड्यात हिरवळीसाठी जागा राखून ठेवली जात आहे. यामध्ये शांत अंगण, देखणी लॉन्स, पाण्याचे झरे आणि नैसर्गिक घटकांचा समावेश करून ही जागा केवळ सौंदर्यपूर्णच नाही तर सुखदायी बनवली जात आहे.
मुंबईच्या नावाशीच आर्थिक आणि स्वप्नाची महानगरी हे बिरुद जोडलं गेलं आहे. मुंबईत पूर्वी फक्त मोक्याच्या जागा आणि आलिशान सोयी-सुविधांवर भर दिला जात होता, तिथे आता घर घेणाऱ्यांचा कल अधिक नैसर्गिक, हिरवळीने व्यापलेल्या मोकळ्या जागांकडे वळत आहे. हा केवळ एक ट्रेंड नसून लोकांचा निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा कल वाढला आहे याचे दयोतक आहे.
परंपरेने मुंबईतील रिअल इस्टेटचे तीन मुख्य आधारस्तंभ होते – मोक्याचे ठिकाण, कनेक्टिव्हिटी आणि किंमत. मात्र, आज ‘लक्झरी’ या संकल्पनेचे स्वरूपच बदलले आहे. आजचा घर खरेदी करणारा ग्राहक केवळ आधुनिक इंटेरियर्स आणि उच्च प्रतीचे क्लब हाऊस एवढ्यावर समाधान मानत नाही. आता लक्झरीमध्ये ‘आरोग्यदायी जीवनशैली, शांतता आणि वैयक्तिक विश्रांतीची जाणीव’ ही मूलभूत अपेक्षा वाढली आहे. याला ओळखून बांधकाम व्यावसायिक त्यांच्या प्रकल्पांमध्ये निसर्गाचा समावेश हुशारीने करत आहेत.
आजच्या काळात ‘कम्युनिटी पार्क्स’ आणि ‘ग्रीन कॉरिडोर्स’ म्हणजे केवळ अतिरिक्त सुविधा राहिलेल्या नाहीत- त्या गरजेच्या घटक बनल्या आहेत. नव्या इमारतींमध्ये झाडांच्या रांगांमध्ये असलेले जॉगिंग ट्रॅक्स, ध्यानासाठी डेक्स आणि गार्डनसह खुल्या बाल्कनी यांचा समावेश केला जातो. अद्ययावत जीवनशैली आणि निसर्गाची सुरेख सांगड शहरातील धकाधकीच्या जीवनातही आराम व निसर्गानुभवाचा ध्यास दिसतो.
पुनर्विकास प्रकल्पांमध्ये हिरवळीचा समावेश
मुंबईतील अनेक जुन्या सोसायट्यांचे पुनर्विकास होत असताना, नव्या उंच इमारतींच्या आराखड्यात हिरवळीसाठी जागा राखून ठेवली जात आहे. यामध्ये शांत अंगण, देखणी लॉन्स, पाण्याचे झरे आणि नैसर्गिक घटकांचा समावेश करून ही जागा केवळ सौंदर्यपूर्णच नाही तर सुखदायी बनवली जात आहे.
हिरवळ आणि पर्यावरण यांचे महत्त्व
हवामानातील वाढते प्रदूषण हे हिरवळीची गरज अधिक अधोरेखित करत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेनुसार, प्रदूषित हवेमुळे दरवर्षी सुमारे ७० लोकांचा अकाली मृत्यू होताे. मुंबईचा सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) १५० च्या आसपास असून, हे आरोग्यासाठी हानिकारक आहे – विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि हृदय/फुप्फुसाच्या आजारांनी ग्रस्त लोकांसाठी. त्यामुळे आता बरेच बिल्डर्स उंच इमारतींमध्येही रूफ गार्डन, वर्टिकल गार्डन आणि लहान उद्यानांचा समावेश करून हवामान अनुकूल आणि आरोग्यदायी वातावरण तयार करत आहेत.
हिरवळ असलेल्या घरांचे आर्थिक आणि जीवनशैली मूल्य
आज नवीन ट्रेंड म्हणजे – ज्या घरांमध्ये हिरवळीला महत्त्व दिले जाते, अशा घरांमध्ये गुंतवणूक करणे. मुंबईसारख्या शहरात, जिथे चौरस फुटांना खूप किंमत आहे, तिथे हिरवळ असलेली घरे केवळ सौंदर्यासाठी नाही, तर आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्राधान्याने घेतली जात आहेत.
हे घर तरुण व्यावसायिकांसाठीही शांततेचा अनुभव देणारे ठरते तसेच संपूर्ण कुटुंबांसाठी आरोग्यदायी वातावरण देते आणि वृद्धांसाठी आरोग्य-केंद्रित जीवनशैलीची संधी. त्यामुळे या घरांना मोठी मागणी असून, त्यांची विक्री किंमतही तुलनेत जास्त आहे. शिवाय, पर्यावरणाशी संबंधित गुंतवणूकदारांना ही घरे भविष्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरतात.
आरोग्य, तंदुरुस्ती आणि समुदाय
हिरवळीचे लाभ तसेच चालण्यासाठी ट्रॅक, योगा डेक्स, आणि सामुदायिक बागा आरोग्यदायी आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देतात.
मुंबईसारख्या शहरात, जिथे मानवी नाती विस्कळीत होतात, तिथे अशा हिरवळीच्या जागा समुदायाला एकत्र आणतात – मुलांसाठी खेळाची मैदाने, वयोवृद्धांसाठी मैत्रीपूर्ण संवादाचे ठिकाण आणि शेजाऱ्यांमध्ये आत्मीयता निर्माण करणारी जागा बनतात. माणसांमधील एकोपा यासाठी अशी घरे फायदेशीर ठरतात.
हिरवळ-केंद्रित जीवनशैली मुंबईच्या रिअल इस्टेट सेक्टरचे रूपच बदलून टाकणार आहे. खुल्या जागांचे आरोग्यावर आणि जीवनमानावर होणारे फायदे लक्षात घेता, विकासकांना अधिक नवनवीन योजना आखाव्या लागतील.
महानगरपालिका देखील आता हिरवळीच्या दृष्टीने अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देत आहेत. हे केवळ स्वतंत्र प्रकल्पापुरते मर्यादित नसून एकत्र जोडलेले ग्रीन कॉरिडोर्स, सार्वजनिक जागांचे रूपांतर आणि शहराची एक संतुलित व नैसर्गिक वाढ ही दृष्टी ठेवली जात आहे.
निसर्ग आणि आधुनिकतेचा समन्वय
मुंबईतील हिरवळ-केंद्रित घरबांधणी म्हणजे एक अशी दिशा आहे जिथे शहरातील जीवन आणि निसर्ग यांचा समतोल साधला जाऊ शकतो. खरेदीदारांसाठी ही एक शांतता अनुभवण्याची – शहराच्या गोंगाटापासून दूर जाण्याची संधी आहे.
आज जिथे चौरस फुटांमध्ये किमती मोजली जाते, तिथे हे हिरवळीचे स्वप्नसदृश प्रकल्प केवळ त्यांच्या दृश्यमानतेसाठी नव्हे, तर त्यांनी दिलेल्या ‘नवीन जीवनदृष्टी’साठी सर्वात अधिक आकर्षक ठरत आहेत – आधुनिकतेचा, आरोग्याचा आणि निसर्गाशी असलेल्या मैत्रीचा संगम आहे.
मंजू याज्ञिक
(लेखिका नरेडको-महाराष्ट्राच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.)