‘बालपणीचा काळ सुखाचा’ ही म्हण आता खूप आठवते. रम्य ते बालपण आई-वडिलांचे छत्र आणि भावंडांच्या समवेत सुखाचे व समाधानाचे गेले. ते दिवस आता परत येणे अशक्य.
वडिलांचे घर कणकवलीत बाजारपेठेतच होते. पहिले आजोबांचे घर गावात स्वयंभूच्या मंदिराजवळ होते. ते जुने झाले व पडले म्हणून माझ्या वडिलांनी स्वत:च्या उमेदीच्या काळात बांधले. घरापुढे मोठे अंगण, तुळशी वृंदावन होते आणि आजूबाजूला जागा असल्यामुळे फुलझाडे लावली होती. त्यामुळे वडिलांना देवपूजेसाठी घरचीच फुले मिळत. प्रथम बैठकीची खोली होती, नंतर देवाची खोली, स्वयंपाकघर, कोठीची खोली आणि मधोमध मोठे माजघर होते. त्याला लागूनच सर्व सामान ठेवण्यासाठी खोली होती. जवळच घरातले दळण-कांडण करण्यासाठी खोली होती. तिथे जाते, भात भरडण्यासाठी घिरट, पोहे करण्यासाठी उखळ, मुसळ वाह्यन अशा वस्तू असत. त्याला लागूनच खोली होती त्यात विहिरीवरून पाणी आणून सर्व हंडे, घागरी, मोठय़ा तफेल्या बादल्या भरलेल्या असत. तिथेच रोज लागणाऱ्या वस्तू- कोयता, कुऱ्हाड, खोरे, बगिच्याला लागणारे सामान ठेवलेले असे. त्याच्याच पुढे अंघोळीला पाणी तापवायला मोठे तपेले असे, तिथेच मोरी होती. त्याच्यापुढे मांगर गुरांना बांधायला खुंटे होते. जवळच गुरांना लागणारा चारा आणि लाकूडफाटा ठेवण्याची खोली होती.
अशा या मोठय़ा घरात कितीही पाहुणे आले तरी काही कमी पडत नसे. सुट्टीच्या वेळेला गणपती, दिवाळी, होळी आणि मे महिन्याची सुट्टी घालवायला नातेवाईक नेहमी यायचे. आमच्या परसात भाज्या, फुले, फळे असायची. घरातच अळू, पपया, केळी, पालेभाज्या, त्याचप्रमाणे आंबे, पेरू, अननस, आवळे, फणस, इत्यादी झाडे होती. वडील जमीनदार, त्यामुळे घरातच भाताचा तटा उभा असे. वडील तूर, कुळीथ, वाल आदी कडधान्ये भरून ठेवीत. आठवडय़ाला मंगळवारी बाजार भरे, घरात नारळ, कांदे, बटाटे, चहा, साखर, गूळ सर्व भरलेले असे. वडील कचेरीत कामाला होते. त्यामुळे सर्व जमिनीचे व्यवहार त्यांना माहीत होते. पूर्वी सर्व कागदपत्रे मोडीत होती. त्यांचे मोडी फार छान होते. त्यांच्या बैठकीच्या खोलीत सकाळी आणि संध्याकाळी सल्ला-मसलतीसाठी सारखी वर्दळ असे. कित्येकांना सरकारी माहिती तसेच शेतकऱ्यांना अर्ज वगैरे लिहून देत. त्यांना मान फार होता. तसेच कोर्ट-कचेरीच्या कामाला खेडेगावातील माणसे येत. त्या वेळी वाहनाची सोय नसे. लोक लांबून लांबून चालत येत. सकाळी वडील लवकर उठून देवाची पूजा करून नंतर ते ७ ते ९ पर्यंत लोकांशी चर्चा करीत. नंतर कामावर जात.
त्या वेळी गावात हॉटेल थोडीशीच असत. तिथे फक्त चहा, भजी, खाजे मिळे. बहुतेक लोक भाकरी, भाजी घेऊन येत. जर का कोर्टाची तारीख वाढली तर ते लोक आमच्या बाहेरच्या व्हरांडय़ात झोपत. त्यांना वडील चटई, चादरी, उशी झोपायला देत. कधी कधी आमच्याकडे ३/४ माणसे जेवायला असत.
आई सर्वाच्या चहाची, जेवणाची सोय करी. वडिलांप्रमाणे माझी आईपण कर्तव्यात कमी पडत नसे. आमचे घर नेहमी भरलेले असे. भावंडांचे मित्र अभ्यासाला येत. खोलीत बसून माझ्याबरोबर अभ्यास करीत. त्या वेळी स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. स्वातंत्र्यावर कोणी बोलले अगर भाषण केले तर पोलीस त्यांना घेऊन जात. अशा वेळी स्वातंत्र्यसैनिक पोलिसांचा डोळा चुकवून रात्री १२-१ ला आमच्याकडे येत आणि माझ्या आईला सांगत की, आम्हाला भूक लागली. त्या वेळी माझी आई रात्री पिठले-भात किंवा भाजी-भाकरी करून जेवायला वाढे व त्यानंतर ते रात्री दुसऱ्या गावाला भाषणाला जात. त्या स्वातंत्र्यसैनिकांत माझे दोन भाऊही असत. देशासाठी या मुलांची धडपड चाले.
गणपतीलापण आमच्याकडे मोठा उत्सव असे. त्या वेळी पाच दिवसांत आरती, पूजन, भजनांचा कार्यक्रम मोठा चाले. रोज सकाळी वडिलांनी पूजा केल्यावर प्रसाद होई. अशा या संस्कृती जपणाऱ्यांची मुलेही सकाळी अंघोळ करून देवाचे श्लोक वाचन व शाळेत जाताना आईवडिलांना नमस्कार करूनच शाळेत जात. अभ्यास रोजचा रोज करीत. पहिला नंबर सोडत नसत.
आई-वडिलांची शिस्त, दुसऱ्याला मदत करणे, सर्वाशी प्रेमाने वागणे, आईकडे कोणी लोणचे मागायला, कोणी ताक मागायला किंवा औषध मागायला नेहमी येत. आईपण सर्वाना मदत करी. अशा सर्वाना मदत करणाऱ्या आईवडिलांच्या पोटी आमचा जन्म झाला, त्यामुळे आम्हीही धन्य झालो.
– रजनी वैद्य