पुरुषोत्तम कृ. आठलेकर

गिरगावतील खोताची वाडी आणि येथील सुंदर छोटी घरे थोडासा आधुनिकीकरणाचा चढवलेला साजेसा साज, अरुंद रस्ते, पण स्वच्छ, रेखीव अशा छोट्या गल्ल्या त्यामुळे या वाडीत गेल्यावर बाहेर पडण्यासाठी नवख्या व्यक्तीची नेहमीच संभ्रमावस्था होते. म्हणून गंमतीने या वाडीला ‘भुल भुलैया’ असेसुध्दा म्हणतात. शहरातील गावाठणे त्यापैकी हेसुद्धा पूर्वी गावठाण म्हणून ओळखले जात असे. जुनी कौलारू घरे, सुंदर फुटपाथ, छोट्या गल्ल्या, घरांची आकर्षक रंगरंगोटी, उत्कृष्ठ बांधांकामाशैली.. यांमुळे १८/१९ व्या शतकांची आठवण करून देणारी ही पोर्तुगीज, ब्रिटिश कालीन घरे, गल्ल्या, फुटपाथ हे आजही अस्तित्वात असल्यामुळे या वाडीला हेरिटेज दर्जा प्राप्त झाला आहे. आजही येथील रहिवासी हा दर्जाअबाधित राहावा म्हणून सदैव सतर्क आणि जागरूक असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वाडीचे सुशोभिकरण ब्रिटिश कालीन पद्धतीनुसार व त्याला साजेसा लूक राहावा म्हणून कायम आग्रह धरून त्याप्रमाणेच वाडीचे व्यवस्थापन करत असतात. सर्व छोट्या घरांना केली जाणारी रंगरंगोटी, घराबाहेर लावल्या गेलेल्या सुंदर, रंगीबेरंगी आकर्षक फुलांच्या कुंडय़ा, वाडीत शिरल्यावर उजव्या हाताला असणारे छोटेखानी चर्च, ख्रिस्ती बांधवांची असलेली वस्ती यामुळे नकळतच या वाडीत शिरल्यावर गोव्याचा भास होतो. इतकेच नाही तर या वाडीची एक वेगळी खासियत म्हणजे गोमांतक पद्धतीची चविष्ट आनंदाश्रम व वेफर्सची फॅक्टरी- यामुळे या वाडीला एक वेगळाच लौकिक प्राप्त झाला आहे. नाताळ व नववर्ष निमित्त येथे केली जाणारी सजावट- विविध आकर्षक रंगीबेरंगी फुले, घरांवर केलेली आकर्षक, मनमोहक  विद्युत रोषणाई, खिडकीत, बाल्कनीत व पुढील मोकळ्या जागेत सर्वत्र लावलेल्या आकर्षक चांदण्या.. हे पाहताना व अनुभवताना खोताच्या वाडीला ‘मिनी गोवा’ असे  म्हटले तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही.