केवळ आमसभेने संमत केले म्हणून एखाद्या सभासदाला कोणतीही आगाऊ नोटीस न देता परस्पर महिन्याच्या बिलामध्ये फक्त ‘पेनल्टी’ या हेडखाली दंड करणे कितपत योग्य आहे? अशोक सुर्वे, मुंबई.

केवळ आमसभेने मंजूर केले म्हणून एखाद्या सभासदाला कोणतीही आगाऊ नोटीस न देता परस्पर महिन्याच्या बिलामध्ये फक्त ‘पेनल्टी’ या हेडखाली दंड करणे योग्य नाही. उपविधीच्या कलम १६५ ‘अ’अंतगंत याबाबत अधिक खुलासा केलेला आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित न राहिल्यास किंवा उपविधीमध्ये तरतूद नसलेल्या मुद्दय़ांवर दंड करणे हेसुद्धा योग्य आहे का? –अशोक सुर्वेमुंबई.

नाही. दंड करताना सदस्याने उपविधीच्या कोणत्या क्रमांकाचा भंग केला आहे हे संस्थेच्या सचिवाने त्या सदस्याला कळविले पाहिजे. तसेच त्या संबंधीची कारणेदाखवा स्वरूपाची नोटीसदेखील सदस्याला दिली पाहिजे. एवढेच नव्हे, तर त्या सदस्याला त्याची बाजू मांडण्याची योग्य ती संधी दिली पाहिजे. या सर्व गोष्टी आपल्या बाबतीत केलेल्या दिसत नाहीत म्हणून आपल्याला दंड करणे योग्य नाही असे आम्हाला वाटते.

 

माझ्या मुलाने सोसायटीच्या आवरातील आंब्याच्या झाडाच्या, हातालगत असणाऱ्या दोन कैऱ्या तोडल्या, त्याबद्दल आम्हाला रु. १०००/- (एक हजार) दंड करण्यात आला, हे सहकार खात्याच्या नियमात बसणारे आहे का? नसल्यास दंडाची रक्कम परत मिळवण्यासाठी मी सोसायटीला अर्ज करू शकतो का? किंवा देणारच नसतील तर पुढे काय करावे?  अशोक सुर्वे, मुंबई.

गृहनिर्माण संस्थेतील सदस्य किती छोटय़ा गोष्टीचा बाऊ करतात व त्यामध्ये अन्य विषयांचे मिश्रण करतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रश्न आहे. आमच्या मते, आपल्याला ज्या कारणांसाठी दंड केला आहे ते कारण योग्य नाही त्यामुळे आपण याविरुद्ध उपनिबंधकांकडे तक्रार करू शकता व दंडाच्या रकमेचा परतावादेखील मागू शकता.

दंडात्मक कारवाईबद्दल करण्यात आलेल्या ठरावाच्या प्रतीची लेखी मागणी केली असता तीसुद्धा मला अद्याप देण्यात आलेली नाही, त्यासाठी काय करावे?  अशोक सुर्वे, मुंबई.

खरे तर संस्थेच्या सदस्याला कुठल्याही ठराव्याची प्रत मिळणे हा त्याचा अधिकार आहे. त्यासाठीचे विहित केलेले शुल्क सदस्याला द्यावे लागते. आपण अशा प्रकारे शुल्क भरण्याची तयारी दर्शवूनसुद्धा आपल्याला जर संस्था संबंधित ठरावाची प्रत देत नसेल तर संस्थेविरुद्ध उपनिबंधकांकडे तक्रार करावी व उपनिबंधकांकडून त्याबद्दलचा आदेश मिळवावा.

आमच्या शेअर सर्टिफिकेटवर प्रथम माझ्या पत्नीचे व नतंर माझे असे संयुक्त नाव असताना, सहयोगी सभासद म्हणून रु. १००/- भरण्यात आले ते मला परत मिळू शकतील का? अशोक सुर्वे, मुंबई. 

नाही, आपण सहयोगी सभासदत्व मिळण्यासाठी भरलेली फी परत मिळणार नाही.

मी एक पुनर्विक्रीद्वारे एक सदनिका खरेदी करण्याच्या विचारात आहे. सदर इमारतीमधील रहिवाशांची गृहनिर्माण संस्था अद्याप स्थापन झालेली नाही, अशा परिस्थितीत मी सदनिका विकत घेतल्यावर मला विकासकाला काही शुल्क अदा करावे लागेल का याबद्दलचे मार्गदर्शन करावे? औदुंबर लेंडाळ

आपण दिलेली माहिती ही संदिग्ध आहे. आपण विकासकाला कोणतेही शुल्क अदा करावे लागेल हे सांगितलेले नाही तरीसुद्धा सदनिकेचे मासिक मेंटेनन्स शुल्काची रक्कम जर विकासकाने आपणाकडे केल्यास ती रक्कम आपणांस दरमहा विकासकाला द्यावी लागेल असे वाटते.

माझ्या मित्राच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. केलेल्या मृत्युपत्रानुसार गावाकडील स्वत: बांधलेले घर त्यांनी ज्येष्ठ पुत्राच्या नावे करावे असे नमूद केले तसेच त्या घराखालील जमीनसुद्धा फक्त त्याच्या नावे व्हावी व त्या जमिनीवर ७/१२ मध्ये फक्त त्याचे एकटय़ाचे नाव टाकावे, अशी इच्छा प्रकट केली आहे. असे असतानासुद्धा तलाठी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी घराखालील जमीन कोणत्या कायद्यानुसार ज्येष्ठ पुत्रासह इतर भावंडांच्या नावे करू शकतात का? व तसे केल्यास अशी जमीन फक्त ज्येष्ठ पुत्राच्या नावे होण्यास कोणत्या कायद्याचा आधार घ्यावा लागेल याबाबत खुलासा करावा? अनिल पाटील

सर्वप्रथम आपण मृत्युपत्रानुसार जी जमीन हस्तांतरित करायची आहे त्या जमिनीबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. सदर जमीन जर वडिलोपार्जित असेल तर ती जमीन तुमच्या मित्राच्या वडिलांना अशी मृत्युपत्राद्वारे कोणालाही देता येणार नाही. कारण मृत्युपत्र फक्त स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत करता येते. जर सदर जमीन वडिलोपार्जित असेल तर तलाठी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी सदर जमिनीला सर्व सहहिस्सेदारांची नावे लावू शकतात.

मी आपला नेहमीच वाचक असून मला एका दुकानाचा करारनामा करायचा आहे, तर असा करारनामा करण्याची पद्धत काय आहे?  सुधीर रानगुडे

आपणाला कोणत्या प्रकारचा करारनामा करायचा आहे हे आपण स्पष्ट केले नाही. आपणाला दुकान खरेदी करायचे असेल तर तो करारनामा करायची पद्धत वेगळी आहे. आपल्याला जर लिव्ह लायसन्सवर करारनामा करायचा असेल तर त्याची पद्धत वेगळी आहे. आपणाला कोणत्या प्रकारचा करारनामा करायचे आहे हे कळवले असते तर उत्तर देणे सोपे झाले असते. दोन्ही पद्धतीची माहिती या ठिाकणी जागेअभावी देणे शक्य नाही.

– अ‍ॅड. श्रीनिवास घैसास

ghaisas2009@gmail.com