|| अलकनंदा पाध्ये

परवा व्हॉट्सअ‍ॅपवर स्टीलच्या भांडय़ांचा उपयोग करून बनवलेले एका घराचे प्रवेशद्वार बघितले आणि ज्याने कुणी ती कल्पना साकारली त्याच्या कल्पकतेचे खरोखर कौतुक वाटले. कल्पकतेला वाव देताना त्या प्रवेशद्वारामुळे घरमालकांची नावीन्याची हौसही भागली असावी. अशा दारामुळे सुरक्षेचा प्रश्न कितपत सुटेल माहीत नाही, पण सुरक्षेसाठी असलेल्या अशा प्रवेशद्वारांचे अनेक प्रकार मात्र नजरेसमोर आले. ऐतिहासिक वास्तूंच्या म्हणजे मोठे मोठे किल्ले गडांच्या दारांचा विचार करताना सर्वप्रथम आठवण आली शिवरायांच्या काळातल्या गडांच्या कडेकोट बंदोबस्ताची. रायगडाचे एकूणएक दरवाजे बंद झाल्यावर एका माऊलीने आपल्या लेकरासाठी रात्रीच्या वेळी तो गड उतरण्याचे केलेले धाडस आणि त्यामुळे अजरामर झालेली हिरकणी. ऐतिहासिक वास्तूंच्या दरवाज्यांतून हत्तीवरून राजे मंडळींची ये-जा चालत असल्याने असे दरवाजे महाकाय असणे आवश्यकच! परंतु त्याचबरोबर शत्रूने युद्धाच्या वेळी दारावर धडका देऊन ते फोडून आत घुसू नये यासाठी अत्यंत भक्कमपणा हासुद्धा मोठाच निकष होता. पूर्वी युद्धाच्या वेळी शत्रुपक्ष किल्ल्यात शिरण्यासाठी उन्मत्त हत्तीला प्रतिस्पध्र्याच्या दारावर धडका मारायला सोडत, म्हणूनच अशा हत्तींना अटकाव करण्यासाठी दारांना बाहेरच्या बाजूला बरेचदा मोठाले अणुकुचीदार धातूचे खिळे बसवलेले आढळतात. अशा अवाढव्य दरवाजातच असलेला छोटा दरवाजा म्हणजे दिंडी दरवाजा ज्यातून जेमतेम एखाद्दुसरा माणूस अथवा घोडेस्वार येऊ-जाऊ शकेल, पण फक्त ऐतिहासिक नाही तर नाशिक-पुण्यासारख्या शहरात पूर्वी सर्वसामान्य नागरिकांच्या वाडय़ांतील मुख्य दारांना असलेले दिंडीदरवाजेसुद्धा आपल्यापकी बऱ्याचजणांनी पाहिलेले असतील. ज्यांना दिवाळीत कुठल्या ऑईलपेंटने नव्हे, तर रक्तचंदनाचा लेप लावून रंगवले जायचे असे आजीने सांगितल्याचे आठवतेय.

बरेचदा प्रवेशद्वारांकडे बघून आपल्या मनात आतल्या माणसांबद्दल त्या वास्तूबद्दल काही आडाखे बांधले जातात. काही खूप लांबलचक ऐटबाज दारांकडे बघून आपला जीव उगाचच दडपतो. त्यावर जर कुत्र्यांपासून सावधानची पाटी पाहिली तर बघायलाच नको. पण काही फाटकांकडे पाहून तेथील पारिजातकाचे झाड किंवा मधुमालतीच्या लटकत्या फुलांचे घोस पाहून त्या घराबद्दल आणि तिथल्या न पाहिलेल्या माणसांबद्दलही उगीचच आपलेपणा वाटतो. मध्यंतरी आमच्या स्नेह्यंच्या नवीन घरी गेलो तेव्हा त्या संपूर्ण वसाहतीतील बंगल्यांची प्रवेशद्वाराला अ‍ॅन्टीक लूक यावा म्हणून लाकडाच्या ओंडक्यासारख्या फळ्यांनी बनवलेले पाहिले. सोन्या-चांदीच्या पत्र्याने मढलेल्या मंदिराच्या दारावरचे कोरीवकाम नेत्रसुखद. तर तुरुंगाचे दरवाजे धडकी भरवणारे.

चंद्रमौळी प्रकारात मोडणाऱ्या साध्यासुध्या घरांना प्रवेशदार नाही तर साधेसुधे फाटक.. कवाड असते. ज्याचा उपयोग माणसांना नाही तर फक्त गुरांना आवारात मज्जाव करण्यासाठी. आदिवासींनी आपल्या खोपटच्या दारावर चितारलेली चित्रकला आज वारली पेंटिंग म्हणून जगप्रसिद्ध झालीय.

पण प्रवेशदारे फक्त इमारती किंवा बागांनाच असतात असे नाही बरं का! आपल्या भारताचे प्रवेशद्वार म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया तर आपल्या मुंबईची ओळख आहे. ब्रिटिश राजवटीत १९११ साली इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारतभेटीला येऊन गेल्यावर त्याच्या भारतभेटीच्या स्मरणार्थ मुंबईत अपोलो बंदरावर अरबी समुद्राच्या सन्मुख असलेल्या या दरवाजाला मोठेच ऐतिहासिक मूल्य आहे. मात्र दिल्लीतील इंडिया गेटचे आणि तेथील अमर जवान ज्योतीचे पहिल्या महायुद्धात तसेच १९७१च्या भारत-पाक युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या सनिकांप्रतिचे स्मारक म्हणून परिचित आहे.

राहत्या घरांच्या दरवाजातही कालानुरूप बदल झालेला आढळतो. एकेकाळी दिंडी दरवाजाप्रमाणेच घरांचे दरवाजे दणकट लाकडी आणि दोन दारांचे (फळ्यांचे) असायचे, ज्याच्या मध्यावरच्या कडय़ा बरेचदा जाडजूड लाकडी आणि वरच्या बाजूला लोखंडी साखळीसारख्या असायच्या- ज्या आता फक्त जुन्या वाडय़ांत किंवा ऐतिहासिक चित्रपटात हमखास बघायला मिळतील. अगदी अलीकडेपर्यंत चाळीतील दरवाजेही दोन दाराचेच असायचे, पण ब्लॉकसंस्कृतीत मात्र दोन दारांची पद्धत पूर्णपणे नामशेष होऊन आता फक्त एकाच दिशेने आतल्या बाजूने उघडणारे दरवाजे बघायला मिळतात. घरातील खोल्यांमध्ये  पूर्ण उघडणाऱ्या दाराऐवजी गरजेनुसार स्वत:ला आक्रसून घेणाऱ्या सरकत्या दरवाजांनी-sliding door अपुऱ्या जागेचा प्रश्न सोडवला. शौचालय- बाथरूमच्या दाराचे स्वरूपही आजकाल बदललेले आढळते. एकेकाळी असे दरवाजे पाण्यामुळे फुगायचे जेणेकरून उघडबंद करताना त्रास होई त्यावर उपाय म्हणून बरेचदा त्याला खालच्या बाजूला त्याला पत्रा बसवला जाई. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाने तो त्रास कमी करून टाकलाय, कारण आजकाल अशा ठिकाणी सन्मायका किंवा तत्सम प्रकारचे दरवाजे लावले जातात- ज्याच्यावर पाण्याचा काही परिणाम होत नाही. खाजगीपणा जपू पाहणारी म्हणजे आतील व्यक्तीचा चेहरा न दिसता फक्त पायच दिसतील अशी झुलणारी अर्धी दारे पूर्वी हॉटेलच्या फॅमिली रूममध्ये हमखास दिसायची. त्यामुळे उडणाऱ्या गोंधळाचे चित्रण बऱ्याच चित्रपटातून आपण बघितलेले आठवेल. स्वत:चे महत्त्व कायम अधोरेखित करणारे एकमेव दार म्हणजे लिफ्टचे दार. त्यांनी असहकार पुकारल्यावर घडणाऱ्या अघटीत घटना त्याची साक्ष देतात.

सुरक्षेच्या कारणास्तव घराच्या मुख्य दाराबाहेर आणखी एक सेफ्टी दरवाजा नामक प्रकार आजकाल आवश्यक झालाय. चाळी-वाडी वस्तीतील सर्व बिऱ्हाडांची दारे दिवसभर उघडी असण्याचा जमाना आता इतिहासजमा होतोय; त्याउलट आजकालच्या सोसायटय़ांमध्ये आपल्या शेजारी कोण राहतात, कुठे काम करतात, या गोष्टी समजून घेण्याचे दिवस गेले. त्यामुळे एकेकाळी दारे सताड उघडी ठेवूनही चोराचिलटांची भीती नसणाऱ्यांना आता दारे साध्या कडीने अधिक लॅचने म्हणजे दुहेरी पद्धतीने बंद करूनसुध्दा चोरीची धास्ती असतेच, त्यावर इलाज म्हणून अशा सेफ्टी दारांची कल्पना अस्तित्वात आली.. पूर्णपणे लोखंडी ग्रिलचे किंवा खाली लाकूड आणि वरती लोखंडी जाळी अथवा स्टीलचे बार अशा स्वरूपातील दारामुळे बाहेरील व्यक्तीची खातरजमा करूनच त्याला प्रवेश दिला जातो. शिवाय त्यालाही साधी अधिक विशिष्ट लॅच (कडी) असतेच.

माझे एक निरीक्षण आहे की, टीव्ही मालिकांतील आलिशान घरांना मात्र सहसा असे सेफ्टी दार आढळत नाही. शिवाय घराबाहेर कधीही सुरक्षारक्षकही नसतात. त्यामुळे अचानक दार उघडल्यामुळे मालिकेत हमखास अनावस्था प्रसंग ओढवतात. कोण जाणे ती त्यांच्या कथेची मागणीही असू शकते कदाचित..

एकीकडे व्यक्तिगत स्वातंत्र्य जपण्याच्या नादात कदाचित माणसाच्या अंतर्मनात येणारी समुहापासून तुटल्याची असुरक्षिततेची भावना.. परस्पर विश्वासाचा अभाव आणि अर्थातच त्याला खतपाणी घालणारे आजूबाजूचे वातावरण यामुळे ‘भय इथले संपत नाही..’ अशी स्थिती.. म्हणूनच दोन दोन दारांशिवाय सुरक्षेच्या अधिकाधिक उपायांचा अवलंब होताना दिसतोय. सी.टी.व्ही. तसेच इमारतीमध्ये इंटरकॉमची सोय हे त्याचेच द्योतक. अनेक प्रकारच्या दारांबद्दल विचार करताना मुक्ताबाईंच्या ताटीच्या अभंगांची आठवण येणे अपरिहार्यच आहे. विमनस्क स्थितीतील ज्ञानेश्वरांनी स्वत:ला कुटीत बंद करून घेतले तेव्हा ‘चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा,’ ही मुक्ताबाईंची विनवणी. निराशेचा अंधार दूर सारून मनाचे दार उघडण्यासाठी त्यांनी केलेले आवाहन हे फक्त ज्ञानेश्वरांनाच नाही तर आपल्यापकी प्रत्येकासाठीच ते एकप्रकारचे समुपदेशन ठरेल- जे आजच्या काळातही उपयुक्त आहे.

alaknanda263@yahoo.com