यशवंत सुरोशे surosheyashavant@gmail.com

कर्तापुरुष वनबीएचकेच्या हप्त्यात गुंतला. वाढत्या खर्चामुळे मुलांच्या, बायकोच्या हट्टामुळे घराकडे फिरकत येईना. तो तिथेच गुंतून जातो. मुलांनाही गावाकडचे ‘ओल्ड हाऊस’ नको वाटते. दरवेळेला येऊन साफसफाई करायला बायकोला, पुरुषाला वेळ नसतो. साफसफाईच्या त्रासामुळे घराकडे पाठ फिरवली जाते. घर आणि माणसे यातलं अंतर वाढतच जाते. दुर्लक्षातून निष्काळजीपणा वाढत  जातो. भाऊ-भाऊ पक्के वैरी होतात. तुला नको-मला नको.. अशी तऱ्हा होते नि स्वप्नातून निर्माण झालेले घरं पोरकं होतं. हे पडीक घर माणसांची वाट पाहत असते. घराच्या दरवाज्याची करकर ऐकण्यास घर आतुरलेले असते.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?

हल्ली कोणत्याही गावात फेरफटका मारला की चार-दोन घरं अशी सापडतात की कितीतरी दिवसांपासून माणसांचा घरांना स्पर्श झालेला नाही. घराबाहेरच्या अंगणात साचलेला पालापाचोळा, जमा झालेला कचरा, छप्परावरून खाली आलेली चार-दोन कौले आणि त्या कौलांचे लाल-लाल बारीक तुकडे, वाढलेले उंच गवत, वाळलेली रोपटी, बाहेरच्या वाशांना लागलेली वाळवी.. हे सारं पाहिलं की मन गलबलून येते.

रस्त्यातून जातांना रस्त्याच्या कडेला माणसांविना असं पोरकं घर पाहताना मनात विचार येतात. हे घर बांधताना केवढी स्वप्नं पाहिली असतील. कितीतरी दिवस घराचा आराखडा निश्चित करण्यासाठी चर्चा घडली असेल. कमी-टोकाचा वादही झाला असेल. कोणी लाडिकपणाने स्वत:साठी वेगळी खोली काढण्याची गळ घातली असेल. प्रत्येकाने घर बांधण्यापूर्वी घराचे पूर्ण चित्र डोळ्यात पाहिलेले असते. मग पैशांचा प्रश्न उभा राहतो. कोणी अपार कष्ट करून चार पैसे साठवतो. घरची लक्ष्मी वेळ पडली तर दागिने पुढे करते. नातेवाईक हातभार लावतात. कोणी शब्दाने धीर देतो. कोणी कष्टाची मदत करतो. पण हे घर झालं पाहिजे अशी सर्वाची इच्छा असते. ही सामूहिक प्रेमाची भावना घराच्या निर्मितीमागे असते.

प्रत्यक्ष घर बांधताना अनेक अडचणी येतात. कधी विटाच अपुऱ्या पडतात. कधी लाकूड बिनकामाचे निघते. कधी-कधी एखादा अपघात होतो. माळ्यावर चढवायचे लाकूड पायावर पडते. माणसं थांबतात, कामही थांबते. पुन्हा धीर करून कामाला सुरुवात होते. सुरुवातीचे दिवस उमेदीचे असतात. काम भरभर उरकल्याचा भास होतो. महिना-दीड महिना झाला की गडी माणसे थकतात. शरीर थकते. बायाबापडय़ा घरातलं आवरून घराच्या कामातही  मदत करतात. ना लग्नसोहळा की नाही पूजा. आला दिवस कामात जुंपून घ्यायचं. कधी एकदाचं घर होतंय हेच प्रत्येकाच्या मनात येत असतं. गवंडी, सुतार संध्याकाळ झाली की निघून जातात. मात्र उरलेला पसारा आवरताना जीव मेटाकुटीला येतो. घराच्या पसाऱ्यात वस्तू सापडेनाशा होतात. मग एकमेकांवर खापर फोडले जाते. चिडचिड होते. घरातली जाणकार स्त्री नेमकीच वस्तू शोधते. पुन्हा काम सुरू होते. अंघोळ कसली नि पूजा कुठली? ज्याला जमेल तसे तो साजरे करतो. कारण प्रत्येकाला वाटत असते, एकदाचं घर पूर्ण होऊ दे . घर पूर्ण झालं की दिनक्रम व्यवस्थित होईल. सर्वाच्या आशा या घरात गुंतलेल्या असतात. घर झाल्यावरच कोणाचे तरी लग्न ठरणार असते. घर बांधून झाल्यावरच कोणाला धंद्यासाठी भांडवल मिळणार असते. कधी कधी कोणी आयुष्यातील सुरक्षित आसरा मिळावा एवढीच अपेक्षा बाळगलेली असते.

आधी पाया सजतो, मग भिंती उभ्या राहतात, दारे दिसू लागतात. खिडक्यांच्या चौकटी येतात. मग वरचा माळा मांडला जातो. येणारा-जाणारा घराच्या चारही कोपऱ्यात निरखून बघतो. चार-दोन चौकशीचे प्रश्न विचारतो.. जाताना म्हणतो, ‘आता आलयं आवाक्यात, होईल झटक्यात घर..’ त्याच्या या शब्दांनी कामाला वेग येतो. शरीर थकलेलं असतं, पण मनात मात्र प्रचंड ऊर्मी दाटलेली असते.

आद्याची पूजा होते. वासे ठोकले जातात. रिपार मांडले जाते नि एखाद्या दिवशी बैलगाडीतून लालभडक मंगलोरी कौले मोकळ्या मैदानात उतरवली जातात. दुसऱ्या दिवशी गावातील, भावकीतील सर्वजण मदतीला येतात. छप्परावर कौले टाकली जातात. घर अंधारून जाते. पण अंधारापेक्षा मायेची सावली सर्वाना कवेत घेते. सर्वजण घरात येऊन ‘घरपणा’चा अनुभव घेतात. स्त्रिया मान वर करून लाल कौलांकडे कौतुकाने पाहत असतात. पण मनात, ‘झालं एकदाचं घरं’ म्हणत एक विश्वास टाकतात.

तरी भुई घालणे, पायरी बांधणे, दारं-खिडक्यांना झडपा लावणे. कडीकोयंडे बसवणे. मुठीपानाच्या फळ्या ठोकणे, घराभोवती स्वच्छता करणे या सगळ्या कामात दिवस भरभर पुढे सरकत असतात. स्त्रिया नवीन चूल मांडून पूजा करतात. नव्या घराला आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. एखाद्या देवाची तसबीर लावून हळद-कुंकू वाहिले जाते नि घरच्या घरी गृहप्रवेश केला जातो. भावकीतल्या, गावातल्या थोरा-मोठय़ांना बोलावून पंगत घातली जाते. सगळ्यांच्या मुखात ‘चांगल झालं’,  ‘मस्त झालं’.. अशीच भावना असते. घरातल्या मुला-माणसांच्या आनंदाला पारावर राहिलेला नसतो.

मग कोणीतरी प्लॅस्टर, कोणी रंगाचं तर कोणी कडीपाटाचा विषय काढतो. घरातल्यांना माहीत असतं, पैशाचं गणित चुकलेलं असतं. रुपयाच्या ठिकाणी दीड रुपया खर्च झालेला असतो. तरी घर झालं, डोळ्यात पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं या समाधानात भुईवर पाठ टेकल्या-टेकल्या निद्रेच्या आधीन होतात. कितीतरी दिवसांची झोप या डोळ्यात साठलेली असते. घराच्या उभेत सर्वजण स्वर्गसुखाच्या आनंदात तल्लीन होतात.

घराचे काम चालू असताना  इतर जगाचे व्यवहार अव्याहतपणे चालूच असतात. मग कोणी नातेवाईक रागवायचे नाटक करतात की आमच्या लग्नकार्यात आले नाहीत, अशी तक्रार करीत. मग सर्वजण दिलगिरी व्यक्त करीत म्हणायचे, ‘नाही जमलं यंदा, घराचं काम काढलं होतं. घराचं कसं असतं, हे तुम्हाला माहीतच आहे.’ बस्स एवढय़ा दोन वाक्यांनी विषय संपायचा. मग पाहुण्यांना नवं घर दाखवलं जाई. नव्या सोयी अभिमानाने सांगितल्या जात. पाहुण्याच्या तोंडून कौतुक झाल्यावर घर बांधताना केलेल्या कष्टाचे चीज होई.

मग याच घराला प्लॅस्टर, गिलावा दिला जाई. पैशाची जमवाजमव झाल्यावर एखाद्या सणाच्या निमित्ताने रंग दिला जाई. खिडक्यांच्या झडपा बसवल्या जात. कधी काचा लावल्या जात. ओटीला लादी बसवली जाई. पुढे कधीतरी ओटीवर एखादा सोफा आणला जाई. चार खुच्र्या मांडल्या जात. सरपण ठेवायला पडवी काढली जाई. अंगण सारवले जाई. याच घरात लग्नकार्य होई. नातवंड जन्माला येत. पाचवी, बारसं साजरं होई. नातवंड तीन-चार वर्षांची झाली की त्यांच्या शिक्षणांच्या काळजीने आख्खे घर व्याकूळ होई. मग मुलांच्या शिक्षणासाठी शहराकडे वाटचाल होई. म्हातारी आजी-आजोबा हे घर सांभाळायची. शरीर थकेपर्यंत घर सांभाळीत राहिली. सण, प्रसंगी माणसे घरी येत. शहरातल्या माणसांना गावाकडे घरदार असल्याचा अभिमान दाखवत. हक्काने मित्रांना गावी, घरी घेऊन येत.

पण पिकलं पान किती दिवस टिकणार? घराचे राखणदार देवाघरी गेले. कर्तापुरुष वनबीएचकेच्या हप्त्यात गुंतला. वाढत्या खर्चामुळे मुलांच्या, बायकोच्या हट्टामुळे घराकडे फिरकत येईना. तो तिथेच गुंतून जातो. मुलांनाही गावाकडचे ‘ओल्ड हाऊस’ नको वाटते. दरवेळेला येऊन साफसफाई करायला बायकोला, पुरुषाला वेळ नसतो. साफसफाईच्या त्रासामुळे घराकडे पाठ फिरवली जाते. घर आणि माणसे यातलं अंतर वाढतच जाते. दुर्लक्षातून निष्काळजीपणा वाढत  जातो. भाऊ-भाऊ पक्के वैरी होतात. तुला नको-मला नको.. अशी तऱ्हा होते नि स्वप्नातून निर्माण झालेले घरं पोरकं होतं. हे पडीक घर माणसांची वाट पाहत असते. घराच्या दरवाजाची करकर ऐकण्यास घर आतुरलेले असते. कर्त्यां स्त्रीच्या हात फिरवण्याची वाट पाहत असते. अंगणातील तुळस बहरलेली असते, कारण  तिला पणतीच्या प्रकाशाची प्रतीक्षा असते. घरातील पाली, किडे, मुंग्या यांनाही माणसे कधी येतील याची प्रतीक्षा असते. पण कोणीच येत नाही. सुरुवातीला भावकीतले, नात्यातले घराकडे लक्ष देतात, पण आता तेच विचार करतात, ज्याचं आहे, त्यांना काळजी नाही, आपण कशाला चिंता करायची? या अशा माणसाविना घराशेजारून जाताना घराचे रुदन ऐकायला येते. अशा घरासमोरील वृंदावनातील तुळस पाहून वाटत राहते, घराची लक्ष्मी अजूनही जिवंत आहे. तिचं सारं लक्ष या वास्तूकडे आहे. रस्त्यांतून जाणारी माणसं म्हणतात, ‘घर तर मोकळचं दिसतंय, पण तुळस कशी बहरलेय.’ अशा मोजक्याच वृंदावनातील तुळशीमुळे घराचे घरपण साजरं होतं. तरी या घरांना जिवंत माणसांचीच प्रतीक्षा आहे. त्यांचा प्रश्न आहे- का केला अट्टहास, जर सोडून जायचे होते घर!  माझ्या असण्याला अर्थ नाही, घरात माणसे नसतील तर!’