scorecardresearch

वाहतूक प्रकल्पांमुळे ठाण्यात गृहप्रकल्पांना उभारी

मुंबईच्या तुलनेत ठाण्यात स्वस्त घरे मिळत असल्यामुळे अनेक नागरिक ठाण्याला पसंती देऊन ठाण्यात स्थिरावत आहेत.

metro projects in Thane
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

नीलेश पानमंद

ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ही ओळख आजही कायम आहे. परंतु नवनव्या प्रकल्पांमुळे तसेच विविध बाबींमुळे शहराची एक वेगळी नवी ओळखही निर्माण होऊ लागली आहे. ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात स्वस्त घरे मिळत असल्यामुळे अनेक नागरिक ठाण्याला पसंती देऊन ठाण्यात स्थिरावत आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या  मुंबई शहराला लागूनच ठाणे शहर आहे.

मुंबई शहरापाठोपाठ ठाणे शहरातही मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. करोनाकाळातील टाळेबंदीमुळे थांबलेली घर खरेदी-विक्री आणि त्यानंतर महागलेले बांधकाम साहित्य यांमुळे बांधकाम क्षेत्राला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु गेल्या वर्षभरात या परिस्थितीत मोठा बदल होऊन बांधकाम क्षेत्राची बिघडलेली अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांचे ‘बदलते ठाणे’ या अभियानांतर्गत शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, रस्ते आणि शौचालयांच्या स्वच्छतेची कामे सुरू आहेत. या शिवाय शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच भविष्यात ठाणे आणि मुंबईसह आसपासच्या शहरातील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी वाहतूकविषयक तसेच मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पांमुळे गृहप्रकल्पांना उभारी मिळत आहे. क्रेडाई- एमसीएचआयच्या ठाणे शाखेच्या वतीने ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यात घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल असे आयोजकांना वाटते.

ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ही ओळख आजही कायम आहे. परंतु नवनव्या प्रकल्पांमुळे तसेच विविध बाबींमुळे शहराची एक वेगळी नवी ओळखही निर्माण होऊ लागली आहे. ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात स्वस्त घरे मिळत असल्यामुळे अनेक नागरिक ठाण्याला पसंती देऊन ठाण्यात स्थिरावत आहेत. शहरातील नौपाडा, घोडबंदर, पोखरण, माजीवडा, खोपट, पाचपाखाडी आणि कळवा या भागात गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्यास नागरिक पसंती देत असल्याचे एका अहवालातून वर्षभरापूर्वीच समोर आले आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध मोठय़ा प्रकल्पांची उभारणी केली जात आहे. त्यातील काही प्रकल्प स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविले जात आहेत. त्यात डीजी ठाणे, स्मार्ट जलमापके, सीसीटीव्ही आणि वायफाय यंत्रणा, कॅमेऱ्यांसाठी नियंत्रण कक्ष, पदपथ, सार्वजनिक वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा योजनेची पुनर्बाधणी, सौर ऊर्जा, मलनि:सारण प्रकल्प, गावदेवी भुयारी वाहनतळ, खाडीकिनारा सुशोभीकरण, नवीन स्थानक, मासुंदा तलावाभोवती काचेचा पदपथ, तलावांचे सुशोभीकरण, ठाणे पूर्व सॅटिस अशा प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे ‘बदलते ठाणे’ या अभियानांतर्गत शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, रस्ते आणि शौचालयांची स्वच्छता ही कामे सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेला कोटय़वधी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून देऊ केला आहे.

ठाणे शहरात मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या माध्यमातून ठाणे, भिवंडी, कल्याण, मुंबई, मीरा- भाईंदर अशी शहरे एकमेकांना जोडण्यात येत आहेत. त्यामुळे रस्ते वाहतुकीदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येतून ठाणेकरांची सुटका होण्याबरोबरच त्यांचा प्रवास वेगवान आणि सुखकर होणार आहे. त्याचबरोबर ठाणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच भविष्यात ठाणे आणि मुंबईसह आसपासच्या शहरातील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी विविध वाहतुकविषयक प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यात खाडीकिनारी मार्ग, श्रीनगर ते गायमुख मार्ग, घोडबंदर ते बोरिवली भुयारी मार्ग, कळवा खाडी पूल, मुंबई नाशिक महामार्ग रुंदीकरण अशा कामांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून त्याचे दाखले विकासक ग्राहकांना देत आहेत. त्यामुळे नागरिक ठाण्यास पसंती देत आहेत. एकूणच या प्रकल्पांमुळे गृहप्रकल्पांना उभारी मिळत असल्याचे दिसून येते.

ठाण्यात गृहप्रकल्पांबरोबरच मॉल, व्यापारी संकुले आणि आयटी पार्क अशा व्यावसायिक मालमत्ताही गेल्या काही वर्षांत उभ्या राहिल्या आहेत. त्यासही व्यापारी आणि उद्योजकांनी पसंती दिली आहे. व्यावसायिक मालमत्तांमुळे शहरामध्ये रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण झाल्या आहेत. शहरात कोरम, विवियाना, बिग बाझार, स्टार बाजार तसेच इतर बडे मॉल उभे राहिले आहेत. या मॉलमधील दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून येत आहे. याशिवाय मॉलमध्ये लहान मुलांच्या मनोरंजनाची साधने तसेच विशेष खेळ क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. त्यासही नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. ठाणे शहरातील स्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ, जांभळी नाका, गोखले रोड, राम मारुती रोड या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात आस्थापना आहेत. हे सर्व परिसर शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणून ओळखले जातात. याठिकाणी सण आणि उत्सवाच्या काळात ग्राहक खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. या भागातील आस्थापनांचे महत्त्व लक्षात घेऊन विकासक जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना त्याठिकाणी आस्थापनांची उभारणी करण्यात येत आहे. एकेकाळी वागळे इस्टेट हा संपूर्ण परिसर औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जात होता. या भागामध्ये गेल्या काही वर्षांत २४ हून अधिक आयटी पार्क उभे राहिले आहेत. यामध्ये मल्टिनॅशनल कंपन्या, वित्तीय संस्था, सॉफ्टवेअर कंपन्या, बँका, विमा कंपन्यांची कॉलसेंटर्स आहेत. आणखी आयटी पार्क उभे राहण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईच्या पावलावर पाऊल ठेवून ठाणे शहराची व्यावसायिक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळेही ठाण्यातील घरांना लोक पसंती देताना दिसत आहेत.

गुंतवणूकदारांचीही ठाण्यातील घरांना पसंती

करोना टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. त्यातील काही क्षेत्रं अद्यापही आर्थिक संकटातून पूर्णपणे बाहेर आलेली नाहीत. अशा काळात विविध क्षेत्रात पैसे गुंतवणूक केल्यास त्यातून गुंतवणूक केलेल्या रकमेसोबतच चांगला परतावा मिळेल का याविषयी गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. असे असले तरी बांधकाम क्षेत्राची बिघडलेली अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली आहे. शहरात प्रकल्पांची कामे सुरू होताच त्यातील घरांची खरेदी होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार बांधकाम क्षेत्रात पैसे गुंतवत आहेत. त्यातही वाहतूकविषयक आणि इतर विविध प्रकल्पांमुळे शहराचा चेहरामोहरा भविष्यात बदलणार आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रातील गुंतवणुकीतून भविष्यात चांगला परतावा मिळेल, असा गुंतवणूकदारांचा अंदाज आहे. त्यामुळे ते ठाण्यातील घरांना पसंती देत असल्याचे बांधकाम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ठाणे हे मध्यमवर्ती ठिकाण असल्याने नवी मुंबई आणि मुंबई आणि मुंबईतील उपनरांमध्ये जाण्यास वाहतूक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ठाण्यात घर घेण्यास लोक पसंती दर्शवत आहेत.

मराठीतील सर्व वास्तुरंग ( Vasturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 03:38 IST
ताज्या बातम्या