एका रविवारी रिकामपणाचा उद्योग म्हणून जुनी ट्रंक काढून, त्यातली जुनी कागदपत्रे चाळत बसलो होतो. वडिलांच्या घरखर्चाच्या डायऱ्या, जुनी बिले, काही महत्त्वाच्या नोंदी असणाऱ्या वह्य़ा वगैरे बरेच काहीबाही त्यात होते. त्यात माझ्या सर्वात मोठय़ा बहिणीच्या लग्नाचा जमा-खर्च लिहिलेली एक वही होती. त्यात त्या विवाहासंबधी इतर तपशीलदेखील नोंदविण्यात आला होता. सदर विवाह मुंबई येथे १९५६ मध्ये संपन्न झाला होता. ती वही चाळताना त्या विवाहाची निमंत्रण पत्रिकादेखील त्यात मला मिळाली. अगदी साधी, गुलाबी रंगाच्या कागदावर छापलेल्या त्या काळी तयार स्वरूपात मिळणाऱ्या निमंत्रण पत्रिकेवर ती छापण्यात आली होती. त्यावर रंगीत श्रीराम पंचायतनचे चित्र होते. त्या काळच्या पद्धतीनुसार त्यात निमंत्रणाचा मजकूर होता. आपल्या पंगतीचा लाभ आम्हाला व्हावा अशा शहाजोग पद्धतीने जेवणाचे निमंत्रण देऊन निमंत्रिताला उभ्या उभ्या कसेबसे जेवण उरकायला लावणारी बुफे पद्धत त्यानंतर बऱ्याच वर्षांनी सुरू झाली. त्या मजकुरातील एका ओळीने माझे लक्ष वेधून घेतले. ‘पान-सुपारीची वेळ’ थोडक्यात ज्याला आता रिसेप्शन म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या काळी लग्न समारंभात अत्तर, गुलाब पाणी, फूल, साखरेची पुडी आणि पान-सुपारी म्हणजे दोन विडय़ाची पाने आणि त्यावर बारीक कातरलेली थोडी सुपारी अशी आवर्जून निमंत्रित पुरुष मंडळीना देण्याची पद्धत होती. म्हणून त्या काळी संध्याकाळी होणाऱ्या निमंत्रितांच्या स्वागत समारंभाला पान-सुपारीची वेळ असे म्हणण्याचा प्रघात होता. त्याकाळी स्वागत करताना पान-सुपारी देण्याची पद्धत शिष्ट संमत होती. नंतर मात्र त्याला चाट देण्यात आला. आता तर असे चार लोकांत पान चघळत बसणे आणि त्याच्या पिचकाऱ्या सभोवार उडवत बसणे हे असभ्यपणाचे लक्षण मानले जाते. हे झाले लग्न, मुंजीसारख्या समारंभातील पान-सुपारी देण्याच्या पद्धतीबद्दल. परंतु त्याकाळी बहुतेक कुटुंबात आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करताना त्याच्यापुढे पान-सुपारीचा डबा किंवा तबक ठेवण्याची पद्धत होती. घरी आलेल्या एखाद्या पाहुण्याची उभ्या उभ्याच बोळवण केली तर तो पाहुणा समजून चालत असे की घरच्या मंडळींना पाहुण्यांना चहा-पाणी सोडाच, पण साधी पान-सुपारी विचारण्याची देखील पद्धत यांच्या घराला नाही. असे सांगायचे कारण म्हणजे त्याकाळी पान-सुपारी खाणे आणि ती पाहुण्यांना अगत्याने सादर करणे हा पाहुण्यांच्या चांगल्या प्रकारे केलेल्या सरबराईचा भाग समजला जात होता. विडय़ाचे पान खाणे आरोग्यदायी असले तरी त्याची पद्धत मात्र चुकीच्या प्रकारे अमलात आणल्याने, पान, सुपारी, तंबाखू, कात आणि चुना याच्या चुकीच्या पद्धतीच्या सेवनामुळे ते आरोग्याला घातक सिद्ध होत गेले. आता तर तंबाखू खाणे म्हणजे कर्करोगाला निमंत्रण असे शास्त्रीयदृष्टय़ा सिद्ध होऊ लागल्याने त्याच्या सेवनाला कायद्यानेच र्निबध आणले आहेत.

पूर्वी ज्यावेळी पान-सुपारी खाणे आणि ती आदराने इतरांना सादर करणे हा चांगल्या आदरातिथ्याचा भाग समजला जात होता, त्या काळी बहुतेक घरांतून पानाचा डबा किंवा तबक पाहुण्याच्या स्वागताला नेहमी तयार असे. हा डबा आणि तबक, त्या त्या जागेच्या वकुबानुसार आणि घराच्या आर्थिक आणि सामाजिक स्तरा प्रमाणे बदलत जाई. खानदानी घरात पितळेचा किंवा किमती धातूपासून बनविलेला दोन-तीन कप्पे असणारा मोठा, देखणा ज्यावर कोरीव नक्षीकाम केलेले आहे, असा घुमटाकार पान-सुपारीचा डबा दिवाणखान्यात मांडलेला असे. किंवा नक्षीकाम केलेले किमती धातूचे बरेच खोलगट  कप्पे असणारे तबक पानाचा विडा बनविण्यासाठी लागणाऱ्या उंची पदार्थानी, उदा. कलदार विडय़ाची हिरवीगार ताजी पाने, सुवासिक तंबाखू, दोन तीन प्रकारच्या अखंड आणि कातरून ठेवलेली सुपारी, वेलची, लवंग, बडीशेप, तयार कात, अगदी मऊ  पांढराशुभ्र चुना भरून ठेवलेला असे आणि बाजूला नक्षीदार उत्तम कलाकुसर असणारा दिमाखदार आकाराचा सुपारी कातरायला आडकित्ता. शिवाय पितळी पिकदाणी असा सगळा सरंजाम मांडून ठेवलेला असे. जिथे समाजातील धनिक, वतनदार, मोठे व्यापारी अशांचे जाणे-येणे नित्य होत असे, अशा ठिकाणी- त्यात व्यापारी पेढय़ा आणि मनोरंजनाच्या कोठय़ादेखील आल्याच अशा ठिकाणी असा भारदस्त रंगीत-संगीत पान-सुपारीचा पाहुणचार होत असे.

सामन्य कुटुंबातून मात्र हे असे ऐश्वर्य मिरवणारे पान-सुपारीचे डबे किवा तबके नसली तरी साधा का होईना एक-दोन कप्प्यांचा पान-सुपारीचा पितळेचा किंवा स्टीलचा डबा किंवा लहानसे ताटवजा तबक हमखास पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी सज्ज असे. यात साधी विडय़ाची पाने, सुटा मिळणारा साधा तंबाखू, सुपारी, कात आणि लहान डबीत चुना असे सगळे साहित्य, लहानशा साध्या धातूच्या आडकित्त्यासमवेत ठेवलेले. वाडय़ाचे अडकित्ते त्या काळी त्यांच्या अप्रतिम बनावटीमुळे फार लोकप्रिय होते. त्याच्या पात्यांनी अगदी सुपारी कितीही बारीक कापता येत असे. घरात एखादा समारंभ असला किंवा काही कारणांनी बैठक असली की कुटुंबप्रमुख या सर्व गोष्टींची तजवीज जातीने लक्ष घालून करून ठेवी. लहानसा घरगुती गाण्याचा कार्यक्रम, भजन किंवा कोजागरीचे जागरण अशा प्रसंगी पान-सुपारीचे साहित्य जय्यत ठेवले जायचे. गरीब घरातून एखादा साधा पत्र्याचा डबा बहुधा पूर्वी गॅसबत्तीची मेंटल्स पत्र्याच्या चपटय़ा डब्यातून मिळत. त्याचा उपयोग बऱ्याच गरीब कुटुंबांतून पान-सुपारीचा डबा म्हणून होताना दिसत असे. काही पान-सुपारी  खाणारी मंडळी आपल्यासोबत आपला पान-सुपारीचा डबा बाळगत. त्यासाठी मिटलेल्या पुस्तकासारखे दिसणारे स्टेनलेस स्टीलचे पान-सुपारीचे छोटेखानी सुबक डबे बाजारात उपलब्ध झाले.

शहरी भागात मध्यमवर्गीय आणि खानदानी कुटुंबात असे पान-सुपारीचे डबे किंवा तबके पाहुण्यांच्या स्वागताला असली तरी ग्रामीण भागात शेतकरी, शेत मजूर किंवा शहरी भागातील कष्टकरी कामगार वर्गात पान-सुपारी यांसाठी चंचीचा उपयोग होई. चंची म्हणजे कापडाची शिवलेली पानं, सुपारी आणि त्याला लागणारे इतर साहित्य राहील यासाठी वेगवेगळे आडवे कप्पे असलेली फूटभर लांबीची आणि सहा-आठ इंच रुंदीची पिशवी. त्याची एक बाजू त्रिकोणी आणि त्या त्रिकोणी बाजूच्या शेवटाला ती पूर्ण पिशवी त्यातील छोटेखानी आडकित्त्यासकट आपल्यामध्ये घट्ट बांधून ठेवू शकेल अशी लांबलचक नाडी. ही चंचीदेखील वापरणाऱ्याच्या आवडीनुसार आणि वकुबानुसार तयार केली जायची. काही चंच्या रंगीबेरंगी कापड वापरून आणि त्याला कडेला रंगीत झालार किंवा कलाकुसर आणि नाडीच्या शेवटाला रंगीत गोंडा अशी सजवलेली असे. कामगार वस्तीत मंडळी शिळोप्याच्या गप्पा हाणायला किंवा गावच्या चावडीवर कामाला बसली की अशी चंची त्या मंडळीत हातोहात फिरायची. जरा चंची काढा, म्हणताच चंची बाळगणारा अभिमानाने आणि आपुलकीने चंचीची गुंडाळी मागणाऱ्याच्या हातात आवर्जून ठेवायचा. गावच्या बाजारात, एसटीच्या प्रवासात, गाडी तळावर, कष्टकरी कामगारांच्या घोळक्यात अशी पान-सुपारीची चंची सगळ्यांच्या सुखदु:खात, गावगप्पांत आणि राजकारणावरील गप्पांत आपल्या परीने संवाद जिवंत ठेवण्याला मदत करत फिरत राहायची.

राहणीमानाच्या आणि आरोग्याच्या आधुनिक विचारसरणीनुसार आता पान-सुपारी खाणे, ती खात चार लोकांत उठणे-बसणे शिष्टसंमत प्रकार गणला जात नाही. पाहुण्याची ऊठबस करण्यासाठी किंवा त्यांच्या सरबराईसाठी आता पान-सुपारीची व्यवस्था करणे आधुनिक जगात मान्य होणारे नाही. उलट ही पान-सुपारी खाण्याची सवय लोकांनी सोडून द्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. कारण या सवयीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ  शकतात हे आता कळून चुकले आहे. आता शहरी कुटुंबांतून असे पान-सुपारीचे डबे, तबके जवळ जवळ दिसतच नाहीत, ग्रामीण भागात अजूनही कष्टकरी समाजात त्या सर्व वस्तू  काही प्रमाणात तग धरून आहेत. जसजशी लोकजागृती होत जाईल तसतशी तेथेही या वस्तू मागे पडत जातील. काही काळाने तो सर्व सरंजाम एखाद्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात पाहता येईल, असे म्हणायला हरकत नाही.

gadrekaka@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on pan supari dabba
First published on: 05-11-2016 at 02:52 IST