एक खोली असो नाही तर मोठा फ्लॅट असो; वॉश बेसिन ही घराची अविभाज्य वस्तू झाली आहे. कुटुंबात लहान असो नाही तर ज्येष्ठ व्यक्ती असो. सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करायच्या अगोदर वॉश बेसिनसमोर वाकावंच लागतं.

कदाचित उठल्याबरोबर प्रसन्न वस्तूचे दर्शन घडावे म्हणून मला वाटतं, हल्ली निरनिराळ्या आकाराच्या (गोल, चौकोनी, षटकोनी) रंगाच्या (म्हणजे आजूबाजूच्या टाइल्सला मॅचिंग) वेगवेगळ्या दगडांच्या (सिरॅमिक, ग्रॅनाईट, मार्बल) सुबक वॉश बेसिन घरोघरी दिसतात. काही वॉश बेसिन चांगल्या सुबक आडव्या कपाट किंवा ओटय़ावर विराजमान झालेली बघायला मिळतात. काही वॉश बेसिन इतकी सुंदर असतात की त्यात चूळ टाकायची पण जीवावर येते. वॉश बेसिन हल्ली गरजेपेक्षा भपका जास्त झाला आहे. वॉश बेसिनने संडास, बाथरूमजवळच्या जागेबरोबरच हॉलमधील डायनिंग टेबलच्या बाजूला जागा पटकावली आहे, जेणेकरून पाहुणे मंडळींना हात धुवायला (विसळायला) सोपे जावे.

वॉश बेसिनच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू खासकरून नजरेत भरणाऱ्या नळामुळे वॉश बेसिनची शोभा खुलून दिसते. नळाच्या तऱ्हा तर एव्हढय़ा असतात की वॉश बेसिनमध्ये नळ कसा सोडायचा हेच कधी कधी पटकन कळत नाही. एके ठिकाणी नळाखाली नुसता मी हात धरल्यावर पाणी सुरू झाले. टूथपेस्ट, ब्रश दाढीचे सामान वगैरे ठेवण्याचे बिलोरी आरशाचे कपाट, लिक्विड सोपची बाटली, छान टर्श टॉवेल ठेवायची स्टीलची रिंग, लटकता सुवासिक सोप अशा नाना वस्तूंनी वॉश बेसिन घेरलेले असते. घरातील लहान मुलांनाही स्वतंत्रपणे ब्रश करायला मिळावं म्हणून बेसिनखाली एक छोटे छान स्टूलही बनवण्याची पद्धत आहे.

गावाला पूर्वी दगडी द्रोण्यांशेजारी उंच दगड ठेवलेला असे. त्यावर उभे राहून हात तोंड धुण्याची पद्धत होती. हात तोंड धुताना ‘पाय’ घोळ कपडय़ावर पाण्याचे शिंतोडे उडू नये म्हणून भिंतीला लावलेल्या वॉश बेसिनचा शोध लागला असावा.

वॉश बेसिनवरील आरशासमोर दाढी करताना सिंकचा नळ काहीजण उघडा ठेवतात ही गोष्ट सोडली तर वॉश बेसिनवर हात तोंड धुताना पाण्याची बरीच बचत होते, हे मात्र खरे . म्हणूनच लग्नाच्या हॉलवर किंवा मैदानात उभारलेल्या शामियानात तात्पुरते हात धुवायला स्टीलचे बेसिन उभारतात.

सिंक किंवा बेसिन ही एकाच पॉटची दोन जुळी नावे आहेत. कारण बाथरूमजवळच्या भिंतीवर लावलेल्या पॉटला वॉश बेसिन म्हणतात आणि ओटय़ावर (स्वयंपाकघरात) असते ते सिंक असा ढोबळ फरक असावा. सुबक वॉश बेसिन सिंकला दुय्यम समजत असावे, कारण त्यात खरकटी भांडी घासली जातात. असा एक काल्पनिक भेदभाव मांडावासा वाटतो.

वॉश बेसिन तुंबल्यास एक मोठा फडका घेऊन त्याचा मोठा बोळा हातात करून वॉश बेसिन किंवा सिंकच्या भोकावर वरून जोरात भरभर दाबत राहिल्यास बसलेले बूच पटकन क्लिअर होते. म्हणून बेसिन खासकरून ओटय़ावर सिंकमध्ये काढा-घालायची बारीक वाटीसारखी स्टीलची जाळी बसवणे हा त्यावर उत्तम उपाय आहे.

शितावरून भाताची परीक्षा या म्हणीप्रमाणे एखाद्या घरातले वॉश बेसिन किती स्वच्छ (चकाचक) आहे, त्यावरून घरातील स्वच्छतेचा अंदाज बांधता येतो. वॉश बेसिन स्वच्छ करण्याच्या १०० लिंबाच्या ताकदीचा साबण, पावडर, लिक्विड सोपच्या जाहिराती सतत पेपरात टीव्हीवर आदळत असतात त्या म्हणूनच!

vasturang@expressindia.com