scorecardresearch

Premium

उपराळकर पंचविशी : आदर्श नवनिर्मिती

शिवमंदिर गावालगतच ओढय़ाकिनारीच्या उंचवटय़ावर होतं. बाजूलाच बेल आणि कवठ वृक्षांची दाटी होती.

पाणलोट क्षेत्र विकास - संतुलित शेती - समृद्ध जीवन
पाणलोट क्षेत्र विकास – संतुलित शेती – समृद्ध जीवन

गेला पंधरवडाभर वास्तुपुरुष अतिशय खुशीत होता. वटपौर्णिमेला गावकऱ्यांना उद्युक्त करून केलेल्या वनीकरणामुळे लोक, विशेषत: स्त्रिया आनंदाने फुलल्या होत्या. शिवाय मृगापाठोपाठ आलेल्या आद्र्रा नक्षत्राने ऊन- पावसाचा खेळ करत शेतकऱ्यांच्या पेरणीची सोय केली, नवीन लावलेली अश्वत्थ रोपंही प्रफुल्लित झाली. यावर्षी आद्र्रा उंदरावर बसून आल्या; अगदी गजाननासारख्या, हळुवार.. डुलत डुलत! गावकऱ्यांबरोबर झालेल्या दोस्तीमुळे वास्तुपुरुषाने त्यांच्याशी अगदी मनमोकळ्या सविस्तर चर्चा केल्या, घरं, शेतं, गावं, परिसर, निसर्ग, सुविधा आणि गावाचं होऊ पहाणारं शहरीकरण या विषयांवर. आज शिवरात्रीला गावातल्या पुरातन शिवमंदिरात गावकऱ्यांबरोबर याच विषयावर ऊहापोह करण्यासाठी बैठक ठरवली होती.
वास्तुपुरुष सकाळपासूनच आपल्या विचारांच्या मांडणीत गुंग होता, शिवमंदिरात एकटाच बसून. मनात विचार आला उपराळकर देवचाराचा- त्याला दिलेल्या आश्वासनाचा. उपराळकरालाच इथे बोलावलं तर? त्यालाही प्रत्यक्षच सर्व अनुभवता येईल. समोरच्या कोनाडय़ातील गणेशमूर्तीच्या बाजूला उंदिरमामाकडे त्याचं लक्ष गेलं आणि तोच बाहेरून येणाऱ्या ‘चुचकाऱ्या’कडे त्याचं लक्ष गेलं. हा नक्कीच देवचाराचा निसर्गदूत- रान उंदिर. तोही वास्तुपुरुषाकडे प्रश्नार्थक नजरेने पहात होता. वास्तुपुरुषाने संधी साधली, ‘‘उंदिरमामा, कृपया देवचार महाराजांकडे माझा निरोप पोचवून त्यांना इथे आज रात्रीपर्यंत बोलावून घ्या. आज महत्त्वाची बैठक आहे गावकऱ्यांसह. मला आधार होईल यांचा आणि त्यांनाही माझी नवनिर्मितीची संकल्पना कळेल- गावकऱ्यांच्या प्रतिक्रियांसह.’’ रान- उंदिर निसर्गदूताने चकाकणारे डोळे मिचकावले आणि धूम ठोकली. रान उंदरांचं जाळं सर्वत्र पसरलेलं असतं आणि त्याद्वारे वास्तुपुरुषाचा निरोप उपराळकर देवराईत वेगाने पोचलाही. आपल्यालाही गावकऱ्यांच्या चर्चेत समाविष्ट करण्याची वास्तुपुरुषाची कल्पना देवचाराला खूपच आवडली आणि त्याने रात्री मराठवाडय़ात पोचायचं ठरवलंच.
शिवमंदिर गावालगतच ओढय़ाकिनारीच्या उंचवटय़ावर होतं. बाजूलाच बेल आणि कवठ वृक्षांची दाटी होती. पक्ष्यांचा किलबिलाट त्या दिशेने येत होता. एका कवठवृक्षावर सुगरण पक्ष्यांचा प्रियाराधनेचा खेळ आणि खोपे बांधणं सुरू झालं होतं. अधून मधून पावश्या पक्ष्यांचे कुकारे पावसाला आवतण देत होते. संध्याकाळ झाली आणि गावकरी जमायला लागले. अंधार पडता पडता वास्तुपुरुषाला बिल्ववृक्षाच्या पानापानांतून चमचमणाऱ्या काजव्यांनी हर्षभरीत केलं. हे तर उपराळकर देवचारचं खुणावणं. ‘‘नमस्कार देवा महाराजा! माफ कर, यावेळी तुलाच इथे यायची तसदी दिल्याबद्दल.’’ बिल्ववृक्षाच्या बाजूने एक हळुवार झुळूक आली शिवमंदिरात. ‘‘मला कौतुक आहे तुझं वास्तुपुरुषा. चल, सुरुवात कर तुझ्या मांडणीची. गावकरीही आतुर दिसताहेत आणि स्त्रियांचाही सहभाग चांगलाच दिसतो आहे. माझ्या मनातील प्रश्न या स्त्रियांच्याच मुखातून येतील. तयारीत रहा.’’
बिल्ववृक्षाला वंदन करून, शिवलिंग आणि नंदी तसंच गणपती बाप्पा व उंदिरामामांपुढे नतमस्तक होत वास्तुपुरुषाने सुरुवात केली, ‘‘नमस्कार मंडळी, चला सुरू करू या वास्तुपुराण- तुमच्या परिसरासाठी, संतुलित नवनिर्मितीसाठी, निसर्गाच्या लहरींना समोरं जाण्यासाठी. खरं तर तुम्हा मराठवाडय़ातील माणसांचं कौतुक करायला हवं. या अस, खडतर परिसरात आणि विषम हवामानातही तुम्ही समर्पक शेती, उद्योग करून समाधानात जीवन जगताहा. पण अचानक आलेल्या धरणीकंपाने तुम्हाला उद्ध्वस्त केलं. त्या पाठोपाठ आलेल्या सरकारी पुनर्वसनाने तुम्हाला हतबल केलं. जे काही मिळालं ते स्विकारून तुम्ही जीवनाचा नवा डाव मांडण्याच्या प्रयत्नात आजही आहात. आपण झालं गेलं विसरून जाऊ या आणि आपल्या आटपाट नगरीच्या नवनिर्मितीला आपल्याच विचारांनी सामोरं जाऊ या. गेल्या पंधरावडय़ाच्या तुम्हा सर्वाशी केलेल्या चर्चेतून तुम्हाला माझं सर्वसामावेशक आणि संतुलित विकासाचं धोरण पटलं आहे असं मी समजतो. तर मग कुठून सुरुवात करू या पहिल्या अध्यायाला?’’
एका वयोवृद्ध गावकऱ्याने सुरुवात केली,‘‘माझ्या गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभवानुसार इथला परिसराचा जो काही विध्वंस अनेक कारणांनी झाला आहे, त्याचेच दुष्परिणाम आपण आज भोगत आहोत. त्यातल्या अनेक कारणांना आपणही जबाबदार आहोत. परिसर विनाश म्हणजे सर्वनाश. तेव्हा आपण सुरुवात करू या आपल्या परिसराकडून आणि गावाच्या शिवाराकडून. आम्ही परंपरेनुसार चालणारी माणसं. द्या आम्हाला नवी दृष्टी.’’
वास्तुपुरुष खुश झाला. सुरुवात परिसरापासून म्हणजे, अगदी योग्य दिशा निवडली. परिसर ते घर. ‘‘मंडळी तुम्हा सर्वाना अनुभव आहेच, की आपला मराठवाडा म्हणजे पर्जन्यछायेतला आणि दुष्काळी प्रदेश. त्यामुळे आपला परिसरही रखरखीत, बराचसा गवताळ, काहीसा मरूभूमीसदृश्य. कालव्याने पाणी आणायला आपल्या जवळपास मोठी नदीही नाही. तेव्हा सर्वप्रथम आपल्याला भूसंवर्धन आणि जलसंवर्धनाचं काम हाती घ्यायला हवं. त्यासाठी आपल्या परिसरातील जमिनीच्या चढ- उतारांचा अभ्यास करायला हवा, भूगर्भाची माहिती घ्यायला हवी, मातीची तपासणी करायला हवी. हा शास्त्रोक्त अभ्यास आपण तज्ज्ञांच्या मदतीने करू आणि नवी तंत्रं शिकून आपण स्वत:च राबवू. हा काही फार कठीण विषय नाही. मात्र तो व्यापकतेने समजून घ्यायला हवा. आपल्याकडचा पाऊसही सुलतानी! आताच बघ, मग गेला, आद्र्रा अध्र्यावर आल्या, तरी त्याच्या हुलकावण्या चालू आहेतच. मग एकदम धडाक्याने कधीतरी येईल आणि सगळं पाणी वेगाने वाहून जाईल. बरोबर वरचा सुपीक मातीचा थर घेऊन. ही जमिनीची धूप आणि वाहून जाणारं पाणी आपण थांबवलं पाहिजे. पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, अधिक पाण्याची साठवण झाली पाहिजे. रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी जसे गतिरोधक असतात, तसे जलरोधक आपल्याला जमिनीच्या समपातळीवर करायला लागतील; चर आणि बांध या स्वरूपात. या बांधावर देशी वनस्पतींची लागवड करून धूपही थांबेल आणि जमिनीत पाणीही साठवलं जाईल. हळूहळू हा परिसर हरित होईल, सुपीक होईल, इथली जैवविविधता वाढेल. याला पूरक म्हणून सर्व ओढय़ांमध्येही दगड- मातीचे, वाळू- पोत्यांचे बांध घालून पाणी अडवूया आणि जलसंवर्धन करू या. या ओढय़ांलगत सदाहरित उपयुक्त झाडांची लागवड करू या. अनेक वनस्पती ओढय़ांच्या किनाऱ्याने नैसर्गिकरित्या उगवलेल्या आपण पाहतोच. ही इथलीच बेलाची आणि कवठाची झाडं पहा. या वृक्षांपासून आपल्या पुष्कळ शिकता येईल. चंदनाची झाडं, रोपं उगवलेली दिसतात. शिसमची, बाभळीची, करंजाची, कडुलिंबाची झाडंही सहज कोणत्याही निगराणीशिवाय वाढताना दिसतात. बांबूही गरज आणि वेगाने वाढताना दिसतो. आपण त्यांचा सांभाळ केला पाहिजे. ही झाडं हा आपल्यासाठी उत्पन्नाचा मार्ग ठरेल. खरं तर ही वृक्षसंपदा म्हणजे रोज सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. तिला मारून खाल्लं की आपलाही सर्वनाश.’’
एका तरुण, चुणचुणीत मुलीने वास्तुपुरुषाला रोखलं, ‘‘हे सर्व व्हायला कित्येक र्वष जातील. तोपर्यंत आमच्या रोजी- रोटीचं काय? मर मर मरून सुद्धा शेती जेमतेम सहारा देते. सर्व निसर्गाच्या लहरीवर अवलंबून.
थोडंफार चांगलं पीक आलं तर त्याला बाजारभावही नाही. मग गुरांना देणं परवडतं. हे कसलं जीवन? आम्हाला उत्पन्न देणाऱ्या शिवाराचा मार्ग दाखवा,
नाही तर शहराची दिशा द्या.’’ सर्वच तरुणांनी टाळ्या वाजवून तिच्या म्हणण्याला आपला पाठिंबा व्यक्त केला.
वास्तुपुरुषाने ओळखलं, की या तरुणीच्या नथीतून देवचाराने तीर मारला आहे! आता समर्पक उत्तर देण्यासाठी तो जोमाने सरसावला. ‘‘मंडळी, तुमची हतबलता मी समजू शकतो. पण तुम्हीच स्वत:कडे पहा. शेती फुकट जाते, मग कमी पाण्यावर होणाऱ्या पीकांचा आपण का विचार करत नाही? खरं तर आपल्या शिवारात विविध डाळींची पिकं सहज घेऊ शकतात, केवळ दवावर वाढणारी. हरभरा, तूर, मूग इत्यादी पिकं केवळ पूरक म्हणून न घेता त्यांची प्रमुख लागवड केली तर भरभराट दूर नाही. शिवाय, या द्विदल पिकांमुळे जमिनीला नैसर्गिक नत्र मिळून तिचा कसही वाढतो. अशा नवविचारांनाच मी नवनिर्मिती म्हणतो. शिवाय अनेक गोष्टी तुमच्याच परंपरांतून शिकता येतात. जरा आजूबाजूला फिरून डोळस वृत्तीने जग अनुभवायला पाहिजे. इथेच जवळपास ‘हवेवरचा गहू ’ होतो, ‘पाच महिन्यांची बाजरी’ होते. आपण हे अंगिकारायला हवं. केवळ पाण्यासाठी अवलंबून न राहता इथे निसर्गत:च होणाऱ्या तेलबियांच्या वनस्पती, चारा यांपासूनही उत्पन्न घ्यायला आपण शिकलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे- परंपरांचा गंज साफ करून नवविचारांची झळाळी आपल्या मेंदूला द्यायला पाहिजे. खडतर निसर्गही योग्य मार्ग स्विकारल्यास भरभरून देतो. आपण आपला शेतीचा दृष्टीकोनही सर्वसमावेशक, स्वयंपूर्ण केला पाहिजे. धान्यांच्या शेतीला पूरक वनशेती, चाराशेती, तेलबिया शेती, शेळी पालन, कुक्कुट पालन हे तर करायला हवंच, पण त्याही पुढे जाऊन आपल्या उत्पादनांना योग्य भाव मिळण्यासाठी बाजारपेठेचं तंत्रही सहकारी तत्त्वावर स्वीकारायला हवं, उत्पादन उद्योगाकडे वळायला हवं. नुसत्या तेलबिया लावून त्या विकण्याऐवजी तेल उत्पादन उद्योग आधुनिक पद्धतीने इथेच उभारायला हवेत. यातूनच रोजगार निर्मितीही इथेच होईल. जिथे तुमची जमीन आहे, गाव आहे, संस्कृती आहे तिथेच तुमची भरभराट होईल. दुसऱ्या शहरांच्या वाटेला जाऊन हलाखीत दिवस काढण्यापेक्षा या ग्रामीण परिसराचा तुम्ही आधुनिक, संतुलित, आदर्श विकास करू शकाल. हीच तर खरी नवनिर्मिती.’’
आता जोरदार टाळ्यांचा पाठिंबा एक मताने मिळाला वास्तुपुरुषाला. वास्तुपुरुषाची नजर वळली बिल्ववृक्षाकडे. उपराळकर देवचाराचे काजवे आकर्षक दिवाळी साजरी करत होते. ‘‘धन्यवाद देवा महाराजा! तुझा पाठिंबा असल्यावर योग्य मार्ग सापडणारच. आता पुढचा अध्याय आहे ग्राम रचनेचा आणि गृहनिर्माणाचा. भेटू या इथेच गुरुपौर्णिमेला.’’
गावकरी समाधानाने आणि विचारात गर्क होऊन पांगू लागले. दूरवरून होणारी कोल्हेकुई वास्तुपुरुषाच्या कानी पडली. लवकरच येणाऱ्या पुनर्वसु नक्षत्राचं वहान वास्तुपुरुषाला उत्तेजन देत होतं.
उल्हास राणे – ulhasrane@gmail.com

Gosht Mumbaichi
गोष्ट मुंबईची भाग : १४६- आरे, मरोळमधले मध्ययुगातील समृद्ध मुंबईचे पुरावे!
nagpur tiger video, tadoba andhari tiger reserve marathi news, cold weather marathi news, tigers playing in tadoba marathi news
VIDEO : थंड वाऱ्याची झुळूक आणि ताडोबात वाघांची मस्ती
human bone found Naigaon
वसई : नायगावच्या रेती बंदरात आढळला मानवी हाडांचा सापळा, कवटी आणि हाडे वेगवेगवेगळे
leopard cubs rescue in sanjay gandhi national park
दुरावलेली बिबट्याची तीन पिल्ले संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यात

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Balanced and ideal development of rural area

First published on: 02-07-2016 at 03:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×