गेल्या अवसेला दीपपूजा करून वास्तुपुरुष भोपाळ परिसरातील भटकंतीत गुंतला होता. हत्तीवरून आलेल्या आश्लेषा नक्षत्राच्या ‘गजगामिनी’ पावसाचा शिडकावा, श्रावणातला ऊनपावसाचा लंपडाव आणि इंद्रधनुष्यांची नभांगणातली रंगावली अनुभवत त्याने परिसरातल्या ‘त्रिकाळा’चा वेध घेतला. भीमबेटका गुंफांमधील ३० हजार वर्षांपूर्वीच्या शिल्पचित्रांनी त्याला या परिसरातील प्राचीन संस्कृतीची झलक दिली, तर सांचीच्या स्तूपाने ३ हजार वर्षांपूर्वीच्या बौद्ध वास्तुकलेचा, शिल्पकलेचा अनुभव दिला. जुन्या भोपाळमधील मशिदी आणि हवेल्या, मशिदींच्या मिनारांशी स्पर्धा करणारे आधुनिक सूक्ष्मलहरी मनोरे तर नवीन भोपाळमधील अत्याधुनिक मॉल्स आणि बहुमजली इमारती यांतून एक प्रचंड विरोधाभास त्याच्यासमोर उभा रहिला. निसर्गसुंदर तलाव, जुन्या शहरातील बकाल वस्ती आणि प्रदूषणकारक कारखाने, वाहने तर परिसरातील िवध्यांचलातील नसíगक हिरवाई असंही परस्परविरोधी चित्र दिसत होतं. ‘प्रगती आणि विकास’ या संकल्पनांची असंख्य प्रश्नचिन्हं वास्तुपुरुषाच्या डोळ्यांसमोर तरळायला लागली होती. अचानक त्या प्रश्नचिन्हांच्या गुंत्यातून एक धूसर, निराकार प्रतिमा उमलली. ‘‘काय वास्तुपुरुषा, कसल्या कोडय़ात इतका रममाण झाला आहेस? नारळी पौर्णिमा जवळच आली आहे. आपल्या भेटीचं आश्वासन विसरलास काय? या कर्कवृत्त प्रदेशातील पुरातन वास्तू आणि सांस्कृतिक वारसा अनुभवला असशीलच! मग काय विचार मांडणार आहेस इथल्या घरं आणि इमारतींसंबंधी? कशा करणार आहेस या शहरी इमारती सुखदायक, आनंदमय?’’ उपराळकर देवचाराने वास्तुपुरुषाची समाधी भंग केली; प्रश्नांचा भडिमार करून.
‘‘प्रेमपूर्वक दंडवत देवा महाराजा! माफ कर महाराजा यावेळी. इथल्या विरोधाभासाने मन विचलित आणि धूसर झालं होतं. पण आता तू आलास आणि मनपटल कसं निरभ्र होऊन गेलं. गेल्या पंधरवडय़ातील परिसरातील भटकंतीतून अनेक कल्पना डोक्यात आल्या आहेत. परिसरातील निसर्ग, पुरातन आणि ऐतिहासिक वास्तू यांतून स्फूर्ती घेऊन हे शहर आधुनिक कल्पनांनी आणि तंत्रज्ञानाने संतुलित विकसित व्हावं असं मनात आहे. या नियोजनाचा गाभा अर्थातच निसर्ग परिसर आणि पर्यावरण असणार आहे, इथल्या आधुनिक इमारतीसुद्धा परिसरस्नेही असणार आहेत. कर्कवृत्त प्रदेशातील हवामानाचा सर्वागिण विचार करून इथली घरं आणि इमारती व्हायला हवीत. आपण प्रथम त्यांचा विचार करू आणि नंतर शहर नियोजनाकडे वळू. आपण याआधी इतर परिसरातील वास्तुरचनांचा जो विचार केला तो मुख्यत: ग्रामीण परिसराचा होता. आता शहरी परिसराचा विचार करताना काही वेगळे पलू विचारात घ्यायला लागतील. कारण शहरातील इमारतींच्या गरजा आणि प्रश्न वेगळेच असतात. शिवाय भोपाळचा विरोधाभास हेच वैशिष्टय़ असा विचार करून जुन्या आणि नव्या शहरातील इमारतींची मांडणी त्या वैशिष्टय़ांना समर्पक अशी करू. जुन्या शहरातील प्रमुख आणि वैशिष्टय़पूर्ण इमारतींचं जतन आणि संवर्धन करू. तिथले रस्ते, कमानी, महाद्वारं, शिल्प यांना सांभाळून तिथलं पुनíनयोजन शहराच्या वाढीशी सयुक्तिक असं करू. इथल्या नवीन इमारतींच्या उंचीवर, दर्शनी रूपावर, रंगकामावर नियंत्रण असेल आणि त्या इमारती परिसरातील जुन्या वास्तूंशी समरूप होतील असा आग्रह धरला जाईल. नवीन शहरातील विकास नियंत्रण वेगळ्या प्रकारचं असेल. तिथे समकालीन, आधुनिक कल्पनांना वाव असेल, पण पर्यावरण संतुलनाच्या भानाचा आग्रह असेल. गेल्या दीप अमावास्येला आपण विचार केला होताच की शहराच्या नियोजनातला सर्वप्रमुख घटक म्हणजे तिथला निसर्ग आणि पर्यावरण- जमीन, पाणी आणि हवा. इथल्या इमारतींची आखणी करतानाही प्रथम भूरचना, भूगर्भ, हवामान, सौरमार्ग, वाऱ्याची दिशा, पाणवठे, भूगर्भ जलसाठे इत्यादींचं सर्वेक्षण आणि सखोल अभ्यास व्हायला हवा. कर्क वृत्तालगतच्या या प्रदेशात सूर्य हा नेहमी दक्षिण बाजूनेच पूर्व-पश्चिम प्रवास करत असतो. इथलं हवामान हे समशितोष्ण आणि मिश्र असतं. काहीसं गुंतागुंतीचं असतं. तेव्हा इथल्या वास्तुरचनेला सर्वागीण आणि सारासार विचाराचा आधार द्यायला लागेल. या कर्कवृत्तीय समशितोष्ण हवामानातही ऋतूंनुसार आणि जागेच्या वैशिष्टय़ांनुसार विरोधाभास असतो. सर्वसाधारणपणे उबदार-आद्र्र आणि उष्ण-शुष्क असे ऋतू असतात. पण त्यामध्येच दिवसा उष्ण, तीव्र सूर्यप्रकाश आणि रात्री कडक थंडी असाही हिवाळ्याचा ऋतू असतो. या विरोधाभासाला सामोरं जाण्यासाठी त्या त्या ऋतूंच्या कालावधीचा विचार करावा लागेल. त्यावरून सरासरी हवामान आणि सुखकारक तसंच त्रासदायक हवामानाचा निर्देशांक वास्तुनियोजनासाठी काढावा लागेल. याशिवाय घरांच्या जागेतील वापरानुसार त्या त्या खोलीच्या किंवा मजल्याच्या गरजांचा विचार करावा लागेल. याचं अगदी सोपं उदाहरण म्हणजे झोपायची खोली. ही जागा बहुधा रात्रीच वापरली जाते. त्यामुळे तिची रचना रात्रीच्या तीव्र शीत हवामानाला सामोरं जाणारी असावी लागेल. या उलट दिवाणखाना, स्वयंपाकघर या जागा बहुधा दिवसा वापरल्या जातात. त्यामुळे त्यांची रचना दिवसाच्या हवामानानुसार करावी लागेल. हे सर्व नियोजन करताना सौरऊर्जेचा आणि उष्णता इमारतीत शोषून घेण्याचा समर्पक विचार करावा लागेल. इमारतींतील िभती व छप्परं यांच्या साहित्याचा योग्य विचार आणि वापर करावा लागेल. सर्वसाधारणपणे हिवाळा आणि पावसाळा या ऋतूंसाठी लागणारी तरतूद नियोजनात केली तर इमारती बहुतांशी सुखदायक राहतील.’’
उपराळकर देवचाराला आता राहवेना. ‘‘वास्तुपुरुषा, मला वाटलं होतं की या समशितोष्ण हवामानात कोणतीही इमारत सुखकारक होईल. पण हा हवामानाचा विरोधाभास फारच किचकट दिसतो. जरा सोपं करून सांग, कशी करावी घरांची आणि इमारतींची रचना.’’
वास्तुपुरुष हसला, ‘‘देवा महाराजा, मी तिथेच येत होतो. सर्वसाधारणपणे घरं किंवा इमारती या दाट, आटोपशीर असाव्यात. फार पसरट असू नयेत. अंतर्गत चौक हा अतिशय उपयुक्त ठरतो आणि सूर्यगवाक्षाचा आधार घेऊन त्या चौकातली ऊन-सावलीची मांडणी चौकाला घराचाच, अधिक वावराचा भाग बनवते. चौकातलं पानगळीचं झाड उन्हाळ्यात सावली, शीतलाई तर हिवाळ्यात ऊन आणि ऊब पुरवतं. घरं किंवा इमारतींची मांडणी जवळ जवळ असावी, त्यामुळे एकमेकांच्या सावलीचा फायदा घेता येतो, रस्तेही छायांकित राहातात. शिवाय वाऱ्याच्या दिशेचाही विचार करून मोकळ्या जागा वायुविजनासाठी ठेवाव्या. उत्तर दिशेने रोख सूर्यप्रकाश कधीच येणार नाही, तेव्हा त्या दिशेच्या खोल्यांचा सयुक्तिक वापर दिवसाच्या वापरासाठी करावा. बाहेरील िभती आणि छप्पर हे भक्कम बांधकाम सहित्याचं असावं, सहसा दगडी किंवा काँक्रीटचं कमी उंचीची घरं, इमारती या दिवसा जमिनीत मुरलेल्या उष्णतेचा फायदा रात्री घेऊ शकतात. उंच इमारतींच्या वरच्या मजल्यांना थंड हवेला सामोरं जावं लागतं. इमारतींच्या बाहेरील भिंतींचा गिलावा आणि रंग हेही उष्णतेच्या आणि शीतलतेच्या गरजांनुसार करावे लागतील. फिकट रंग आणि लकाकी गिलावा हे उष्णता बाहेर परतवतात, तर गडद रंग आणि काहीसा खरबरीत गिलावा हे उष्णता शोषून घेतात. कर्कवृत्तीय प्रदेशात आणखीही एक कल्पना लढवली जाते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला छप्परांना रंगसफेदी करून सौरऊर्जा परावíतत केली जाते, तर हिवाळ्याच्या आधी याच छप्परांना काळा रंग देऊन सौरऊर्जा घरात शोषून घेतली जाते. दारं-खिडक्या समोरासमोर ठेवून घरात हवा खेळती ठेवता येईल. परंतु दरवाजे मात्र भक्कम लाकडाचे असावेत म्हणजे हिवाळ्यात ते बंद करून घर उबदार ठेवता येईल. खोल्यांना वर आणि खाली छोटे झरोके ठेवल्यास उन्हाळ्यात अंतर्गत तापमान सुखकारक राहू शकेल. या प्रदेशात हिवाळ्यात भिंती आणि छप्परं दवाने ओलसर होतात. याचा इमारतींना तसा धोका नसतो, पण ह्यच पृष्ठभागाला ओलावा शोषून घेणारा गिलावा किंवा रंग वापरला तर त्याचा प्रतिबंधक थर दविबदूंच्या दवनिर्मितीला विरोध करू शकतो. शिवाय हवामान शुष्क होताच हा पृष्ठभाग त्वरित सुकून जातो. शहरांत हे सर्व उपाय करणं बहुधा कठीण जातं. कारण एक तर कामासाठी मजूर मिळणं कठीण किंवा महाग असतं. शिवाय शहरांमधील जागेच्या दुर्मीळतेमुळे आणि चढय़ा किमतींमुळे घरांऐवजी बहुमजली सदनिकाच वापरल्या जातात. अनेक रहिवासी असल्याने अशी वैयक्तिक उपाययोजना करण्याऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. वायुविजनासाठी पंख्यांचा वापर हा सर्वात सोपा मार्ग. शिवाय परवडत असल्यास वातानुकूलित यंत्रेही वापरली जातात, घरं उबदार ठेवण्यासाठी विद्युत-यंत्रं वापरली जातात. अर्थातच यासाठी अखंडित विद्युतपुरवठा असावा लागतो. बांधकाम साहित्यही सहज मिळणारं आणि सर्वसाधारण तंत्रज्ञानाचं बांधकाम केलं जातं. त्याला मग बाहेरून सज्जे, उभ्या-आडव्या झडपा, खिडक्यांना पडदे इत्यादींचा वापर करून तीव्र हवामानातही घरं सुखकारक केली जातात. हे सर्व खर्चीक असतं आणि त्याची पर्यावरणीय किंमतही जास्त असते. देवा महाराजा, ही कर्कवृत्तीय प्रदेशातील घरांची योजना ठिकाणा-ठिकाणांच्या वैशिष्टय़ांनुसार समर्पक आयोजनाने बदलावी लागते. शिवाय दक्षिणेकडील मकरवृत्तीय प्रदेशातही हवामान असंच असल्याने हीच उपाययोजना अवलंबवावी लागेल. फक्त तिथला सूर्यमार्ग हा अगदी विरोधी म्हणजेच सतत उत्तरेकडून जाणार असल्याने तिथली दक्षिण बाजू ही नेहमीच सावलीत असते. त्यामुळे त्यानुसार खोल्यांची अदलाबदल करावी लागेल. हा सर्व त्या ‘अदित्य’ देवाचा पराक्रम आहे महाराजा!’
उपराळकर देवचाराचं समाधान झाल्यासारखं भासत होतं आणि तो उद्गारला, ‘‘छान मांडणी केलीस यथार्थ घरबांधणीची. आता पुढे जाऊ या. माझ्या महितीनुसार तुझं हे भोपाळ शहर आता ‘स्मार्ट’ होण्याच्या मार्गावर आहे, सरकारी योजनेनुसार. मला तुझे विचार हवे आहेत या नगरविकास उपक्रमावर तर मग भेटू आता पिठोरी अमावास्येला, मातृदिनाच्या मुहूर्तावर.’’
‘‘होय महाराजा, मलाही या ‘स्मार्ट’ योजनेचा सर्वागिण आणि लोकाभिमुख विचार करायचा आहे. या श्रावणातील आनंदी वातावरणात आणि लवकरच बेडकावरून येणाऱ्या मघा नक्षत्राच्या ओलाव्यात चिंब होत करेन मांडणी माझ्या ‘आदर्श’ शहराची.’’ वास्तुपुरुष स्वप्नमय झाला, उपराळकरही अमूर्तात विरून गेला. दूरवरून मोरांचा केकारव, अश्वत्थ वृक्षाची सळसळ आणि निर्झरांची झुळझूळ कौतुकाची शाबासकी देत होते.
ulhasrane@gmail.com