श्रावण महिना म्हणजे उत्सवांची रेलचेल. त्यातच श्रावण संपण्याआधीच भाद्रपदाचे वेध लागतात, अर्थात गौरी-गणपतीच्या आगमनाचे.. पावसाची रिमझिम सुरूच असते, त्यातच थोडा वेळ सूर्यदेव आपले अस्तित्व दाखवून जातो. हा माहौल आणि गणपतीच्या निरनिराळ्या रूपांत नटलेल्या मूर्त्यांनी  सजलेली दुकाने या दोहोंचं मिळून मनात एक वेगळंच नातं तयार होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच घराघरांतही गणपतीच्या भोवती करायच्या सजावटीची धांदल सुरू होते. हल्ली बाजारातही तयार मखरे मोठय़ा प्रमाणात मिळू लागली आहेत; पण आपल्या हाताने सजावट करण्याचे सुख ते वेगळेच.

थर्माकोल : गणपतीच्या सजावटीसाठी थर्माकोलपासून ते अगदी खऱ्या फुलांपर्यंत अनेक पर्याय आपण वापरू शकतो. थर्माकोल तर वजनाला हलके तसेच कापायला, कोणताही आकार द्यायलाही सोपे, त्यामुळे त्याला अंमळ जास्तच पसंती मिळते. ज्यांना कोरीव कामाची आवड असते त्यांच्यासाठी तर थर्माकोल वरदानच. पांढऱ्या शुभ्र थर्माकोलमध्ये केलेले कोरीव काम संगमरवरालादेखील लाजवेल असे दिसते. आपल्याला जर रंगीत सजावट आवडत असेल तर कॉम्प्रेसर आणि स्प्रे गनचा वापर करून थर्माकोलचे मखर आपण रंगवूही शकतो. परंतु आधीच प्रदूषणाची समस्या फार मोठी असल्याने थर्माकोलचा वापर थोडा संयमानेच करावा.

पेपर क्विलिंग : थर्माकोलला पर्याय म्हणून पेपर क्विलिंगची सजावटदेखील आपण करू शकतो. निरनिराळ्या रुंदीच्या आणि निरनिराळया रंगांच्या पेपर क्विलिंगच्या तयार पट्टय़ा बाजारात मिळतात. याचे निरनिराळे आकर्षक आकार करून आपण सुंदर देखावेदेखील साकारू शकतो. अर्थात, यासाठी थोडय़ा मेहनतीची आणि सरावाची तयारी मात्र हवी.

फुले : आणखी एक सोपा, पण अतिशय देखणा पर्याय म्हणजे खऱ्या किंवा खोटय़ा फुलांची सजावट. खऱ्या फुलांच्या सजावटीसाठी जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड यांसारख्या टिकाऊ फुलांचा वापर करावा. योग्य निगा राखल्यास अगदी पाच-पाच दिवसही ही सजावट ताजी टवटवीत दिसते.

अगदीच खरी फुले वापरणे शक्य नसल्यास या काळात बाजारात खोटी फुलेही मोठय़ा प्रमाणात दिसतात. शिवाय गणपती झाल्यावर ती व्यवस्थित काढून ठेवली असता पुन्हा दुसऱ्या वर्षी किंवा अन्य काही प्रसंगीदेखील सजावटीसाठी पुन्हा वापरता येतात. या फुलांसाठी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला जरूर चक्कर मारा, अगदी खऱ्या फुलांनाही  लाजवतील अशी सुंदर फुले सहज मिळतील.

प्रकाशयोजना : याखेरीज गणपतीच्या सजावटीमध्ये प्रकाशयोजनाही महत्त्वाची. सजावटीमध्ये इलेक्ट्रिकच्या माळा सोडण्याबरोबरच गणपतीचे मुखमंडल उजळून निघेल अशा प्रकारे प्रकाशयोजना करावी म्हणजे मूर्ती प्रसन्न दिसेल. याचप्रमाणे रंगसंगतीही उठावदार असावी. फुलांची सजावट असल्यास लाल, पिवळ्या फुलांसोबतच हिरव्या पानांचाही वापर करावा म्हणजे मूर्ती अधिकच शोभिवंत दिसेल. लाल, पिवळ्या, नारिंगी व हिरव्या रंगांचा वापर आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न करेल. चला तर मग, लागताय नं गणरायाच्या स्वागताच्या तयारीला!

गणपती बाप्पा मोरया!

(इंटिरियर डिझायनर)

ginteriors01@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati festival 2017 homemade ganpati decoration
First published on: 19-08-2017 at 04:51 IST