घरातील वातावरणात लावण्यायोग्य काही प्रजातींची माहिती आपण घेतली आहे. आजच्या लेखातूनही आपण अशाच अजून काही प्रजातींची माहिती घेणार आहोत. ही झाडे अशी आहेत की जी आपल्या घरातील बागेची शोभा वाढवतील.

नेचे / फर्न्‍स (Ferns) : फर्नचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. यातील प्रजातींमध्ये हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा बघायला मिळतात. त्यांच्या पानांच्या आकारातदेखील वैविध्य आढळते. फर्न हे सावलीत वाढणाऱ्या प्रजातींपैकी आहे. कुंडीतील मातीत व्यवस्थित प्रमाणात सेंद्रिय खत व कोकोपिटचा वापर करून माती भुसभुशीत राहील अशा प्रकारचे मिश्रण तयार करून घ्यावे. फर्नची झाडे वाढून काही काळाने कुंडी संपूर्ण भरते. अशा वेळी ती झाडे कुंडीतून बाहेर काढून त्यातली झाडे वेगळी करून कुंडय़ांमध्ये पुनर्लागवड करावी. फुलदाणीत फुलांबरोबर फर्नची पाने लावली तर त्या फुलदाणीचे सौंदर्य अधिक वाढते. फर्नच्या प्रजातींमध्ये नेफ्रोलेपिस (Nephrolepis), डेवेलिया (Nephrolepis), पॉलिस्टिकम (Polystichum), टेरिस (Pteris) इत्यादी प्रकार लावता येऊ  शकतात. सर्वसामान्यपणे फर्नच्या झाडांना आद्र्रता आवश्यक असते. त्यामुळे यांच्या कुंडीत नेहमी ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच उन्हाळ्यात निरीक्षणावर आधारित पाण्याचे प्रमाण वाढवावे जेणेकरून त्यांच्या वाढीवर उन्हाळ्याचा विपरीत परिणाम होऊ  नये. उन्हाळ्यात या पानांवर थोडे पाणी शिंपडून यांचा टवटवीतपणा वाढवता येतो.

पाम (Palm) : पामच्या अनेक प्रजाती आहेत. काही खूप उंच आहेत की ज्या बागेत  लावण्यायोग्य असतात. घरातील कुंडय़ांमध्ये काही प्रकार लावता येतात. त्यापैकी अरेका पाम ((Areca Palm) अनेक ठिकाणी लावला जातो. हा मध्यम उंचीचा पाम आहे. त्यामुळे याची लागवड मोठय़ा कुंडीतच करावी. जमिनीत लावला तर हा उंच पण वाढू शकतो. मध्यम उंचीचा असल्यामुळे घरातील एखाद्या भागात याच्या कुंडय़ा एका ओळीत ठेवून याची हिरवी भिंत तयार करता येते. काही महिन्यांनी कुंडी जर पूर्ण भरली तर याची पुनर्लागवड करावी. हे करताना कधी कधी एका झाडाची २ ते ३ झाडेही झालेली असतात. ती झाडे वेगळी करून वेगळ्या कुंडय़ांमध्ये लावावीत.

पाम प्रकारातील दुसरे प्रकार म्हणजे लिक्युला पाम (Licuala Palm), लिवीस्टोना (Livistona), रेफीस पाम (Rhapis Palm), इत्यादी.

एडेनियम (Adenium) : एडेनियम हे अनेकांना आवडणारे असे सक्युलंट (Succulent) प्रकारातील झाड आहे. खरं म्हणजे हे वाळवंटातील झाड आहे. त्यामुळे त्याच्या पानांची व खोडाची रचना वेगळी असते. याला इंग्रजीमध्ये डेझर्ट रोझ (Desert Rose) असे पण म्हणतात. याच्या कुंडीतील मातीत सेंद्रिय खताचे प्रमाण मध्यम असायला हवे. कुंडीतील पाण्याचा निचरा नीट होणे आवश्यक आहे. याला इतर झाडांच्या तुलनेने पाणी कमी द्यावे. याची गुलाबी व गुलाबी रंगाच्या छटा असलेली फुले आकर्षक दिसतात. याच्यात पांढऱ्या फुलांचा प्रकारही बघायला मिळतो. ही झाडे जिथे सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवावीत.

जिल्पा निजसुरे jilpa@krishivarada.in