ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर तळेगावमधील ज्या घरात वास्तव्यास होते त्या घराविषयी..

पुण्यातील तळेगाव दाभाडे.. एक ऐतिहासिक पाश्र्वभूमी लाभलेलं गाव. या गावात सरसेनापती खंडेराव दाभाडे, उमाबाई दाभाडे यांच्यासारखे लढवय्ये शूरवीर, अण्णासाहेब विजापूरकर यांच्यासारखे शिक्षणतज्ज्ञ, तर वसुधा माने, गो. नी. दांडेकर यांच्यासारखे साहित्यिक आपल्या कार्याने अजरामर होऊन गेले. तळेगावातील गाव भागात असलेल्या शाळा चौकातील विठ्ठल मंदिराशेजारी माडीवर ते राहत. हे विठ्ठल मंदिर सुमारे ३५० वर्षे पुरातन असून या मंदिरात संत तुकाराम महाराजांचे कीर्तन होत असे. तसेच विनायक नारायण जोशी ऊर्फ (दादा महाराज) साखरे महाराज यांचे याच वास्तूत सुमारे ५० वर्षे वास्तव्य होते. गंगाधरपंत मवाळ, संताजी महाराज जगनाडे  यांच्या पदस्पर्शाने मंदिर पावन झाले आहे. सन १९४८ मध्ये गांधी हत्येनंतर पुण्यात ब्राह्मण समाजातील लोकांच्या घराची जाळपोळ झाली. त्यात गोनीदा राहत असलेल्या सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शेजारचा वाडा जाळला गेला. त्यामुळे प्रकृतीला मानवणाऱ्या तळेगाव दाभाडे या गावात वास्तव्याचा निश्चय केला. तसेच मावळ पसिरातील ऐतिहासिक लेणी, संत तुकारामांच्या वास्तव्याने पावन झालेला भंडारा डोंगर, राजमाचीचा किल्ला अशा धार्मिक – सांस्कृतिक वातावरणांशी एकरूप होता यावं यासाठी त्यांनी तळेगाव दाभाडे या गावाची निवड करून १९४८ मध्ये ते या गावात रहाण्यास आले. पहिल्या मजल्यावर साधारण दोन खोल्या आणि लहान बाल्कनी असलेलं त्यांचं घर म्हणजे साहित्यिक चळवळीचं एक केंद्रच बनलं होतं. घरात गेल्यावर घरातील जिन्याच्या समोर त्यांची खुर्ची असायची. त्यांच्या आवडीचे एखादे किल्ल्याचे चित्र किंवा निसर्ग चित्र भिंतीवर लावलेले असायचे. जिना आणि गॅलरीच्या मध्ये भिंतीत एक खोल मजबूत कपाट असून, उजवीकडे भिंतीत पुस्तकाचे शेल्फ असून, तेथे त्यांचे लिखाणाचे साहित्य असे. साधारण १० x १५ ची खोली, ३ x १२ ची बाल्कनी आणि १० x १० चे स्वयंपाकघर अशी घराची रचना आहे. बुधगांवच्या पटवर्धनांच्या घरातील ऐतिहासिक तलवार तेथील भिंतीवरील खुंटीवर आजही टांगलेली दिसते. भिंतीवर खुंटी आहे. त्यांच्या घरातून एका बाजूने विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारात असलेले पितळी कासव सहज दृष्टीस पडे. तसेच घराच्या गॅलरीतून सुपत्तीचा डोंगर दिसतो. स्वयंपाकघरात गेल्यावर स्वयंपाकाचा ओटा, उजव्या बाजूला भिंतीत शेल्फ, डाव्या बाजूला छोटी मोरी, कोनाडे आजही दृष्टीस पडतात. तेथील जमीन मातीनं सारवलेली आहे. बाहेरची खोली कोबा केलेली असून पूर्वी तिथे ‘मॅटिंग’ केलेलं होतं. या घरात गोनीदांसह त्यांच्या मातोश्री अंबिकाबाई, पत्नी नीराताई आणि कन्या वीणा यांचे वास्तव्य होते. घराच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत त्यांच्या मातोश्री मुलांना प्रार्थना, श्लोक, गोष्टी सांगून संस्कार वर्ग घेत असत. गोनीदांनी या वास्तूत दर्जेदार साहित्यनिर्मिती केली. सागराशी झुंज (नाटक), मृण्मयी, दास डोंगरी राहतो, तुका आकाशाएवढा, मोगरा फुलला, माचीवरला बुधा, शितू, पडघवली, आईची देणगी अशा अनेक कादंबऱ्यांचे लिखाण याच वास्तूत झाल्याची साक्ष घराशेजारील वृद्धमंडळी देतात. साधारण १९४८-१९८८ अशी ४० वर्षे त्यांचे या वास्तूत वास्तव्य होते. लता मंगेशकर, रमेश देव, यशवंतराव चव्हाण, केशवराव कोठावळे, श्रीनिवास कुलकर्णी, आशा भोसले आणि दुर्ग भ्रमण करताना भेटलेले इतिहासप्रेमी अशा अनेक व्यक्ती त्यांच्या घरी भेटीला येत असत. दुर्गभ्रमण करून येताना दांडेकर तेथील ऐतिहासिक दगडधोंडे, वस्तू घरी आणत आणि शेजाऱ्यांना बोलवून त्या दाखवत असत. तळेगाव येथील शामराव दाभाडे हे त्यांच्यासोबत सदैव असायचे. एक मोठा साहित्यिक आपल्या गावात राहतो याचा अभिमान तळेगावकरांना होता. सर्वाशी प्रेमाची वागणूक, विठ्ठल मंदिरात धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन ऐकण्यास सहभाग, घरात सतत वाचन, लेखन करणे आणि रात्री जेवण झाल्यावर फिरणे असा गोनिदांचा दिनक्रम होता. त्यांनी तळेगाव येथील रेव्हेन्यू कॉलनीत स्वत:चा बंगला बांधला होता, पण त्या बंगल्यात न राहता तो भाडय़ाने दिला होता.

Departure of Sri Sant Tukaram Maharaj palanquin on 28th June
पिंपरी : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जूनला प्रस्थान; ‘असा’ आहे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
MP Dhananjay Mahadik, Leads Campaign for Mahayuti, Sanjay Mandlik, Kolhapur lok sabha seat, Rajarampuri peth, Shahupuri peth, people united to campaign,
संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पदफेरीत राजारामपूरी, शाहूपूरी व्यापारी पेठ एकवटली
latur lok sabha marathi news, shivraj patil chakurkar latur latest news in marathi
शिवराज पाटील यांच्या ‘देवघरा’ बाहेरील गर्दी वाढली
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

अशा या दर्जेदार साहित्यनिर्मिती करणाऱ्या प्रतिभावंत साहित्यिकाच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूचे दर्शन एकदा तरी घ्यावे.

ameyagupte66@yahoo.com