गणरायाचं स्वागत करत, पूर्वा नक्षत्राचा धुंवाधार पाऊस अंगावर घेत वास्तुपुरुषाने कर्क वृत्ताच्या उत्तरेला उच्च अक्षांशाकडे प्रयाण केलं आणि पुढे हृषिकेश, हरद्वार करत भगिरथाच्या मार्गाने उत्तराखंडातल्या उच्च भूपातळी, डोंगराळ प्रदेशात भटकंती सुरू केली. गेला पंधरवडाभर त्याने या ‘देवभूमी’तील गढवाल आणि कुमाव विभागातील तेराई, बाभर, प्रयाग आणि हिमालयातील दऱ्या-खोऱ्यांतून घोंघावत वाहणाऱ्या नद्यांकिनारींच्या गावांचं आणि  शहरांचं अगदी जवळुन निरीक्षण केलं, तिथल्या गावकऱ्यांशी आणि  पर्यटकांशीही गप्पा मारल्या, तिथला डोंगराळ निसर्ग अनुभवला. आताही रुदप्रयागच्या एका टेकडीवरून त्याची नजर अलकनंदा आणि  मंदाकिनीच्या संगमावरील खळखळणाऱ्या पाण्यावर खिळलेली होती तर त्याच्या मनपटलावर काही वर्षांपूर्वीच्या जंगलांनी नटलेल्या डोंगर उतारांचं आणि दऱ्यांचं कल्पनाचित्र तरळत होतं. जिम कॉब्रेट या प्रसिद्ध निसर्गप्रेमी शिकाऱ्याने पालथा घातलेला हा परिसर वाघ आणि बिबटय़ांची आठवण करून देत होता. आताचा तुरळक दिसणारा निसर्ग, उजाड डोंगर उतारांवरील शेती, मधूनच चट्ट्यासारखी दिसणारी भूस्खलनं आणि अगदी नदीकिनाऱ्याला चिकटून दाटीवाटीने उभ्या रहात असलेल्या वसाहती मन अस्वस्थ करत होत्या. बाजूच्याच टेकडीवरून एक भला मोठा खडक मातीतून निखळला आणि गडगडत अलकनंदेच्या पात्रात जोरदार उसळी घेत विसावला.

वास्तुपुरुषाचं मन शहारलं, अंगावर काटा उभा रहिला आणि  जून २०१३ च्या आठवणी दाटून आल्या. सुमारे आठवडाभर चाललेल्या त्या निसर्ग तांडवाने गढवालच्या या परिसराला उद्ध्वस्त करून टाकलं. सुमारे दहा हजारांहून अधिक माणसं मृत्यूमुखी पडली, तर सुमारे दीड लाखांहून अधिक गावकरी आणि पर्यटकही खडतर परिस्थितीत अनेक दिवस अडकून पडले, जखमी झाले, तहान-भूकेपोटी आजारी पडले. गावंच्या गावं वाहून गेली, शहरातल्या मोठमोठय़ा इमारती क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या. शेकडो वाहून गेलेल्यांचा ठाव-ठिकाणाही लागला नाही. या निसर्ग तांडवाच्या भयानक तडाख्यातून स्वत: ‘केदारेश्वर’ ही सुटला नाही. केदारनाथ परिसर काही क्षणांत होत्याचा नव्हता झाला. त्या आठवणी आणि  नुकतंच गावकऱ्यांकडून ऐकलेलं स्वानुभवाचं वर्णन वास्तुपुरुषाला अस्वस्थ करत होतं. हा काही नुसता निसर्गकोप नव्हता. ही तर निसर्गाने मानवाला दिलेली इशारामय शिक्षा होती. या देवभूमीला निसर्गाचं तांडव काही नवीन नव्हतं. हा तर त्या ‘रूद्रा’चाच परिसर, त्या नटराजाचंच निसर्ग-व्यासपीठ, त्याचंच क्रीडांगण! नवीन आहे मानवाचा हस्तक्षेप, निसर्गाचा अक्षम्य विध्वंस, पवित्र नद्यांची केलेली दुर्दशा. हिमालयाच्या या पर्यावरणीय अति-संवेदनाशील परिसरात गेल्या काही वर्षांत मानवाने जंगलतोड केली, नद्यांवरील मोठमोठय़ा प्रकल्पांमुळे जमिनीची आणि डोंगर-दऱ्यांची अपरिमीत हानी केली. डोंगरात बोगदे खणून तिथून निघालेली दगड-माती नद्यांच्याच पात्रात टाकून दिली. पवित्र म्हणून वर्णन केलेल्या, पूजनीय नद्यांच्या किनाऱ्यावर इमारती आणि वसाहतींची दाटी झाली. सांडपाण्याने पवित्र र्तिथ प्रदुषित केली. पर्यटनाचा अतिरेक झाला, या डोंगराळ, दुर्गम भागात वहातूक वाढली आणि त्यातूनच प्रचंड प्रमाणात प्रदूषण सुरू झालं. अशास्त्रीय पद्धतीने बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांमुळे जमिनी खचायला लागल्या. मुळातच समुद्रातून निर्माण झालेला काहीसा ठिसूळ हिमालय ढासळायला लागला. निसर्गाच्या या ढासळण्यात मग मानव गाडला गेला तर नवल काय?

खिन्न मन:स्थितील वास्तुपुरुषाने नजर वर उचलून सभोवार फिरवली. पूर्वेकडील गिरीशिखरांना मावळत्या सूर्याने उजळून टाकलं होतं, तर आजुबाजूच्या दऱ्या-खोऱ्यांत कृष्ण आणि  शुभ्रवर्णीय मेघ हळूवार विसावत होते. वास्तुपुरुषाचं मन प्रफुल्लित झालं आणि हिममरुताच्या शीतल झुळुकांनी त्याला गोंजारलं. हा तर होता उपराळकर देवचाराचा सहानुभूतीचा आश्वासक स्पर्श! ‘वास्तुपुरुषा, स्वागत या देवभूमीत! इथे कोणी विमनस्क व्हायचं नसतं. हा निसर्ग परिसर तर मनाला उभारी देणारा, ही गिरीशिखरं आव्हान देणारी, आवाहन करणारी आणि  परिसरात येणाऱ्यांना विनम्र करणारी. आता तुझ्यापुढे तर मोठं आव्हान आहे, या परिसराला संतुलित विकासाच्या वाटेने न्यायचं. चला २०१३ चं निसर्ग तांडव आता मागे टाकूया. त्यातून मिळालेली शिकवण लोकांपर्यंत पोचवू. सांग आम्हाला या उच्च अक्षांशातील आणि उच्च भूपातळीवरील परिसरांची वैशिष्ट्यं आणि दाखव मार्ग सम्यक विकासाचा.

‘‘अनेक दंडवत, देवा महाराजा! कसं मन आनंदी आणि  उत्सहित करून टाकलंस तुझ्या आगमनाने! गेला पंधरवडाभर इथल्या भटकंतीत सातत्याने आशा-निराशेचा लपंडाव चालला आहे. पण काही झालं तरी इथला निसर्ग सतत स्फूर्ती देत असतो आणि इथल्या माणसांची जगण्याची जिद्द, खडतर परिस्थितीतही जीवनातला आनंद अनुभवण्याचा उत्साह मनाला सातत्याने उभारी देत असतो. गेल्या काही दिवसात अनेक नवीन कल्पनांनी आणि विचारांनी डोक्यात दाटीवाटी केली आहे. आता करतो त्या विचारांची उलगड तुझ्यासमोर, टप्प्या-टप्प्याने.’’ वास्तुपुरुषाने प्रस्तावना केली.

‘‘वास्तुपुरुषा, हा हिमालयातील किंवा कर्क-मकर वृत्तांच्या उत्तर-दक्षिणेकडील परिसर आम्हाला अनोळखी आहे. प्रथम आम्हाला या परिसराची ओळख करून दे, इथली वैयशष्ट्यं सांग आणि त्यांना संवेदनाक्षमतेने सामोरं जायचा मार्ग दाखव.’’ उपराळकर देवचाराने दिशा दिली.

‘‘होय महाराजा, इथलं हवामान समजून घेऊया प्रथम. त्यासाठी सर्वप्रथम इथला सूर्यमार्ग पाहू. एक लक्षात घ्यायला हवं की आपण आता सूर्याच्या दक्षिणोत्तर चलन वलनाच्या सीमेकडील प्रदेशात आलो आहोत. कर्क वृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात सूर्य हा नेहमीच दक्षिणेकडून दिवसाचं मार्गक्रमण करणार तर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील प्रदेशात याच्या अगदी उलट म्हणजे सूर्य सातत्याने उत्तरेकडूनच मार्गक्रमण करणार. त्यामुळे या परिसरात सूर्यऊर्जेचं उत्सर्जन बऱ्याच कमी प्रमाणात होतं. इथला दिवस-रात्रीचा कालावधीही विषम असतो. इथले वारे सहसा संथ गतीने वहात असतात. आकाश बहुधा निरभ्र असतं. उन्हातल्या आणि  छायेतल्या तापमानात फार फरक नसतो. जसं जसं आपण ध्रुवप्रदेशांच्या जवळ जाऊ तसतसं हवामान अतिशीत व्हायला लागतं, विषम व्हायला लागतं. सर्वसाधारणपणे हा परिसर मानव जीवनासाठी समाधानकारक असतो. भारतात या परिसरातल्या हवामानावर परिणाम करणारे दोन प्रमुख घटक म्हणजे वायव्येकडील मरूप्रदेश आणि उत्तरेकडील हिमालय. या दोन्ही परिसरातून येणारे शीतल वारे इथलं हवामान समशितोष्ण राखतात. फक्त हिवाळ्यात ते अतिशीतल होण्याची शक्यता असते. हिमालयाच्या परिसरात उत्तरेकडे वाढणाऱ्या भूपातळीच्या उंचीमुळेही इथल्या हवामानावर खूपच परिणाम होतो. शिवाय डोंगररांगाच्या भूरचनेमुळे वाऱ्यांच्या दिशा, डोंगर उतारांवरील परिसरात होणारं सूर्यऊर्जेचं उत्सर्जन हे घटक काहीसे बिकट होतात. संपूर्ण वर्षांच्या हवामानाचा जर आढावा घेतला तर हिवाळ्यातील काही दिवस सोडून या परिसरातलं हवामान समाधानकारक असतं. सूर्याचं तेज प्रखर वाटलं तरी ते मुख्यत दयक्षणोत्तर आणि पश्चिम दिशेला असतं. डोंगराळ आणि अति उच्च पभरसर वगळता इथला पाऊसही समाधानकारक असतो आणि सर्वसाधारणपणे चार महिन्यांचा असतो. विजांचा कडकडाट, गारांचा वर्षांव हाही अनुभव उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी मिळतो. अशा हवामानाला समर्पक असा इथला निसर्गही उत्क्रांतीत झाला आहे. इथलं जैववैविध्य विषुववृत्तीय पभरसरापेक्षा काहीसं वेगळं भासतं. अधिक उत्तर-दक्षिणेकडील किंवा अधिक उंचीवरील प्रदेश हे सूचीपर्णी जंगलांनी व्यापलेले दिसतात. प्राणीजीवनही या परिसराशी आणि  हवामानाशी मिळवून घेणारं असतं. या परिसरातील मानवाचं पारंपरिकजीवनही समर्पक असतं. त्याची शेती, रहाणीमान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरं ही वैयशष्ट्यपूर्ण असतात.’’

उपराळकर देवचाराने समाधानाने वास्तुपुरुषाला थोपवलं, ‘‘वास्तुपुरुषा, कल्पना आली इथल्या हवामानाची आणि परिसर घटकांची. आता भेटुया पुढल्या पौर्णिमेच्या सुमाराला, गणरायांना गावी पोहचवून आणि दुग्रेच्या स्वागताच्या तयारीत. तिथल्या घरांचा, इमारतींचा आणि शहरांचा आढावा घेऊ ऋतूबदलाच्या पाश्र्वभूमीवर.’’

‘‘होय महाराजा, २०१३ सारख्या दुर्घटनांना सामोरं जायचं आणि पर्यावरण विनाश टाळण्याचं मोठं आव्हान समोर आहे इथल्या हिमालयातील परिसरासाठी. नक्कीच मांडतो माझे विचार संतुलनाचे.’’ वास्तुपुरुषाची नजर पुन्हा मंदाकिनीच्या काजळलेल्या पात्राकडे वळली आणि अमूर्तात मग्न झाली. उपराळकरही कृष्णमेघात झिरपून गेला.

उल्हास राणे ulhasrane@gmail.com