मागील काही लेखांतून आपण घरात झाडे ठेवण्याची जागा, झाडांची कुंडीत लागवड, पाणी व्यवस्थापन, त्यांची निगा, इत्यादी बाबींविषयी जाणून घेतले. आजपासूनच्या पुढील काही लेखांतून आपण घरात ठेवण्यायोग्य प्रजातींची माहिती घेणार आहोत.
बिगोनिया (Begonia) : या प्रजातीच्या झाडामध्ये भरपूर प्रकार मिळतात. मुख्य करून मोठी पाने व लहान फुले आणि छोटी पाने व मोठी फुले या दोन प्रकारांत मोडणारे विविध प्रकार उपलब्ध असतात. अनेकांना आवडणारी ही बिगोनियाची झाडे परिसराचे सौंदर्यही वाढवतात. मोठय़ा पानांच्या प्रकारात पानांचे रंग, पानांवरील रेषा, इत्यादींमध्ये खूप वैविध्य बघायला मिळते. याची फुले लहान असून पानांच्या मधून या फुलांचा तुरा वाढतो. छोटी पाने असलेल्या प्रकारात फुले थोडी मोठी असतात. त्यांचे पण एक वेगळेच सौंदर्य असते. या प्रकारची झाडे त्यांच्या पानांचे रंग व रंगछटा त्यांची फुले व त्यांची भरभर होणारी वाढ या सर्व कारणांमुळे अनेकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. ही झाडे कुंडीत तसेच हॅंगिंग बास्केट या दोन्ही प्रकारांत लावता येतात. सर्वसामान्यपणे या झाडांना कडक सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळणार नाही अशा जागी ठेवावे. पण त्याचबरोबर त्यांना व्यवस्थित उजेड मिळणे गरजेचे असते.
ड्रेसिना (Dracaena) व कॉर्डीलाइन (Cordyline) : या दोन्ही प्रकारांतील झाडांमध्ये खूप साम्य आढळून येते. दोन्ही प्रकारांची झाडे सहजगत्या वाढतात. यांची उंची ४ ते ५ फुटांपर्यंतही वाढू शकते. यात अनेक रंग जसे की हिरवा, पिवळा, गुलाबी व या सर्वाच्या छटा असलेली पाने बघायला मिळतात. यांच्या उंचीमुळे जर विविध कुंडय़ा एकत्र ठेवून सजावट करायची असेल तर या कुंडय़ा मागे ठेवाव्यात. यांच्या पानांचे रंग व त्यांच्या रंगछटांमुळे भिंतीच्या समोर ही झाडे उठून दिसतात. या झाडांना व्यवस्थित उजेड मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. पण कडक सूर्यप्रकाशात शक्यतो ठेवू नये.
शेफलेरा (Schefflera) : मोठे झुडूप या प्रकारात मोडणारी ही झाडे पानांच्या शोभेसाठी लावली जातात. याची पाने हाताच्या बोटांसारखी रचना असल्यासारखी दिसतात. ही झाडे छाटून त्यांना नीट आकारही देता येतो. ४ ते ५ फुटांपर्यंत वाढू शकणारी ही झाडे मुख्यत्वे २ प्रकारांत उपलब्ध असतात. हिरव्या पानांचा प्रकार आणि हिरवा व पांढरट पिवळा अशी मिश्रित रंगछटा असलेल्या पानांचा प्रकार- याला इंग्रजीमध्ये व्हेरिगेटेड (variegated) असे म्हणतात. जर आपण नर्सरीतून आणलेले झाड लहान असेल तर आधी त्याला छोटय़ा कुंडीत लावावे. झाड मोठे झाल्यावर मोठय़ा कुंडीत त्याची पुनर्लागवड करावी.
जिल्पा निजसुरे jilpa@krishivarada.in