आपल्याला हे माहीत आहे की, रंगांचा जन्मच मुळी प्रकाशातून होतो. काचेच्या लोलकाप्रमाणे असणाऱ्या पावसाच्या थेंबातून सूर्याचा पांढरा प्रकाश जेव्हा जातो; तेव्हा पाऊस आणि उन्हं एकाच वेळी आलीत की सप्तरंगी इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं. याबरोबरच आपल्याला हेही माहीत आहे की, कमी प्रकाशात रंग कोणता आहे, हे ओळखणं कधी कधी कठीण जातं. एखादी वस्तू पाहिल्यानंतर तिची प्रतिमा, तिचे रंग याबाबतची माहिती मेंदूकडे पाठवण्याकरिता आपल्या डोळ्यात दोन प्रकारच्या पेशी असतात. कोन सेल्स अर्थात शंकू पेशी आणि रॉड सेल्स अर्थात दंडगोल पेशी. दंडगोल पेशींमुळे आपल्याला कमी प्रकाशातही दिसू शकतं, पण या पेशींमार्फत आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा किंवा रंग दिसू शकत नाहीत. शंकू पेशींमुळे आपल्याला सुस्पष्ट प्रतिमा किंवा रंगांचं ज्ञान होतं. पण त्या पेशी केवळ जास्त प्रकाशातच त्यांचं प्रतिमाज्ञान करवून द्यायचं काम करू शकतात. शंकू पेशी या तीन प्रकारच्या असतात- तांबडय़ा, हिरव्या आणि निळ्या रंगांचं ज्ञान करवून देणाऱ्या या पेशींमुळेच आपल्याला रंगज्ञान होत असतं. अशा प्रकारे रंग आणि प्रकाश यांचं घनिष्ठ नातं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण एखाद्याच्या घरी एखाद्या खोलीत बघितलेली रंगछटा आपल्या मनावर मोहिनी घालते आणि मग आपण ठरवतो की, आपण जेव्हा आपल्या घरी रंग काढू, तेव्हा आपणही आपल्या घरातल्या त्या खोलीतल्या भिंती त्याच रंगछटेनं सजवायच्या. पण सावधान! कारण दुसऱ्याच्या घरात उठून दिसलेली ती रंगछटा आपल्याही घरात तितकीच उठावदार दिसेल, असं मात्र सांगता येत नाही. प्रत्यक्षात रंगछटा या आजूबाजूला पसरलेल्या नसíगक किंवा कृत्रिम प्रकाशामुळे उठावदार किंवा निरस वाटत असतात. काही रंगछटा या सावलीत किंवा कमी प्रकाशात बघायला बऱ्या वाटतात, तर काही रंगछटा या तीव्र प्रकाशात अधिक खुलून दिसतात. त्यामुळे आपण ज्याच्या घरी ती रंगछटा बघितली, तिथे आपण पाहिलं, त्या वेळी प्रकाश किती होता? ती दिवसाची वेळ होती की रात्रीची? दिवसाची वेळ असेल, तर एकंदर खोलीतल्या दरवाजे-खिडक्यांची स्थानं आणि संख्या किती होती? त्यानुसार खोली उजळणारा तो प्रकाश खोलीच्या कुठल्या भागातून येत होता? एखाद्या कोपऱ्यातून, की मध्यभागी असलेल्या एखाद्या खिडकी किंवा दरवाजातून? अशा अनेक प्रश्नांबाबत विचार करावा लागेल. जर आपण बघितलं तेव्हा रात्र असेल, तर खोलीत टय़ूबलाइट, किंवा तशाच प्रकारचा सफेद प्रकाश देणारी प्रकाशव्यवस्था होती, की बल्बच्या पिवळसर प्रकाशाप्रमाणे प्रकाश देणारे दिवे होते? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला ती विशिष्ट रंगछटा का आवडली याचं उत्तर मिळू शकतं आणि मग त्या घरी आवडलेली ती रंगछटा खरोखरच आपल्याही घरी तितकीच प्रभावी वाटेल का, हे आपण त्या प्रश्नांसदर्भातली त्या घरची परिस्थिती आणि आपल्या घरची परिस्थिती याची तुलना करून ठरवू शकतो. हे सगळं केवळ भिंतींच्या रंगांनाच लागू नाही, तर फíनचरच्या लाकडाच्या पॉलिशचा रंग, सोफा आणि खुच्र्याची कव्हर्स, पडदे, बेडशीट्स अशा सर्वच गोष्टींच्या रंगसंगतीला लागू आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Living room colour relationship between color and light
First published on: 25-02-2017 at 01:31 IST