घरात झाडे ठेवायची असे एकदा ठरले की सर्वात आधी विचार करायला हवा तो कुंडय़ांचा. कुंडय़ांमध्ये अनेक प्रकार मिळतात. काही वर्षांपूर्वी मातीच्या कुंडय़ा जास्त प्रमाणात वापरल्या जायच्या, पण आता प्लॅस्टिकच्या कुंडय़ा, सेरॅमिकच्या कुंडय़ा, सिमेंटच्या कुंडय़ा असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. प्लॅस्टिकच्या कुंडय़ा वजनाला हलक्या असल्यामुळे अनेकांना त्या वापरायला सोप्या वाटतात. यात परत वेगवेगळ्या आकाराच्या कुंडय़ा उपलब्ध असतात, जसे की गोल कुंडय़ा, चौकोनी कुंडय़ा, आयत आकाराच्या कुंडय़ा ज्याला ट्रफ (trough) म्हणतात, इत्यादी. सिमेंटच्या कुंडय़ांमध्ये पसरट आकाराच्या कुंडय़ाही मिळतात. अशा कुंडय़ांमध्ये छोटी पसरणारी झाडे लावता येतात. जागेच्या उपलब्धतेनुसार कुंडीचा आकार ठरवावा लागतो. खिडकीत चौकोनी किंवा आयत कुंडय़ा जास्त शोभून दिसतात. सेरॅमिक व सिमेंटच्या कुंडय़ा तुलनेने जड व हाताळायला थोडय़ा नाजूक असतात. पण आपल्या आवडीनुसार आपण यातले प्रकार निवडू शकता.
कुंडय़ांमध्ये हँगिंग बास्केट (Hanging basket) हाही एक प्रकार मिळतो. नावावरूनच लक्षात येईल की या लटकवायच्या कुंडय़ा असतात. अशा कुंडय़ांमध्ये लहान झाडे लावावीत. तसेच पसरणारी झाडेही यात लावता येतात. अशी झाडे या कुंडय़ांमध्ये वाढून त्याच्या फांद्या खाली लटकतात. यामुळे त्यांचे सौंदर्य वाढते. घरातील तेलाचे जुने कॅन किंवा प्लॅस्टिकच्या बरण्याही स्वच्छ धुऊन झाडे लावण्यासाठी वापरता येऊ शकतात आणि त्यांचा पुनर्वापर करता येतो. अशा कॅनचा किंवा बरणींचा वरचा निमुळता भाग कापून टाकावा आणि त्याच्या तळात ३-४ छिद्रे पाडावीत. त्यानंतर असे कॅन/ बरण्या झाडे लावण्यासाठी वापरायला घ्याव्यात.
कोणत्याही प्रकारची कुंडी असली तरी तिला महिन्यातून एक-दोन वेळा ओलसर फडक्याने पुसून स्वच्छ करून घ्यावी. यामुळे ती नवीन दिसते. जर मातीची कुंडी असेल तर ती खूप मळलेली दिसायला लागल्यावर तिला गेरूचा रंग लावावा. सिमेंटच्या कुंडय़ांनाही वर्षांतून एक-दोनदा रंग लावता येऊ शकतो.
सर्वसामान्यपणे प्लॅस्टिकच्या कुंडय़ांबरोबर त्याच्याखाली ठेवण्यासाठी प्लेट मिळतात. या प्लेटमध्ये कुंडी ठेवली की कुंडीमधून निचरा होऊन बाहेर पडलेले जास्तीचे पाणी या प्लेटमध्ये येते आणि जमीन खराब होत नाही. या प्लेटमधील पाणी अधूनमधून टाकून देऊन ती स्वच्छ करून ठेवावी. पण या प्लेट सतत पाण्याने भरतील एवढे पाणी कधीही झाडाला देऊ नये. झाडांना किती पाणी द्यावे हा या लेखाचा विषय नाहीये, पण इथे मला असे सांगणे गरजेचे वाटते की, अनेक वेळा कुंडीतील झाडे ही कमी पाण्यामुळे नव्हे तर जास्त पाण्यामुळे चांगली वाढत नाहीत. त्यामुळे पाणी अत्यंत काळजीपूर्वक द्यावे. कुंडीच्या खाली प्लेट आहे, त्यामुळे जास्तीचे पाणी तिथे जाईलच असा विचार करून भरपूर पाणी घालू नये. सिमेंटच्या किंवा मातीच्या कुंडय़ांनाही खाली प्लेट ठेवावी. या कुंडय़ांच्या प्लेट तशा मिळत नसल्या तरी साधारण त्या आकाराच्या वेगळ्या प्लेट ठेवता येतात.
कुंडय़ांची निवड झाल्यानंतर या कुंडय़ा खत व मातीच्या मिश्रणाने भरून घ्याव्या लागतात. कुंडी भरताना सर्वात आधी कुंडीच्या तळाशी असलेल्या छिद्रांवर फुटलेल्या कुंडय़ांचे तुकडे किंवा जाळीचे तुकडे ठेवावेत. यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. यानंतर माती व सेंद्रिय खत यांचे सम प्रमाणात किंवा २:१ या प्रमाणात मिश्रण तयार करून घ्यावे. या मिश्रणात कोकोपिट (Cocopeat) पण घालता येते. कोकोपिटमुळे मातीचा भुसभुशीतपणा वाढतो आणि पाणी धरून ठेवण्यात मदत होते. कोकोपिट घालायचे असल्यास माती, खत व कोकोपिट यांचे सम प्रमाणातील मिश्रण कुंडीत भरावे. कोकोपिटचे चौकोनी आकाराचे ठोकळे विकत मिळतात. कोकोपिट बनवताना ते दाब देऊन बनवलेले असतात. त्यामुळे ते आणल्यानंतर त्याच्यावर पाणी घालून भिजवून ठेवावे. भिजल्यावर ते मोकळे होते. असे मोकळे झालेले कोकोपिट सुकल्यानंतर वापरावे. माती उपलब्ध नसेल तर कोकोपिट आणि सेंद्रिय खत हे मिश्रण कुंडय़ांसाठी वापरता येते. पण हे मिश्रण भरताना दाबून नीट भरावे लागते. कारण कोकोपिट भुसभुशीत असल्यामुळे जर त्याच्यामध्ये पोकळी राहिली तर त्यात झाडे नीट वाढू शकत नाहीत. अशा प्रकारे तयार केलेले मिश्रण कुंडय़ांमध्ये भरावे. कुंडय़ा भरताना वर थोडी जागा ठेवावी. अगदी काठोकाठ भरू नये. नाही तर पाणी घालताना मातीचे कण पाण्याबरोबर वरून बाहेर वाहत जाऊ शकतात.
अशा अनेक प्रकारच्या कुंडय़ांपैकी आपल्या आवडीनुसार व जागेच्या उपलब्धतेनुसार कुंडय़ांची निवड करावी. नर्सरीमधून आणलेली पिशवीत असलेली रोपे कुंडीत कशी लावावीत याबद्दलची माहिती पुढील लेखातून घेऊ .
जिल्पा निजसुरे jilpa@krishivarada.in