मोक्षदा एकादशी आणि गीता जयंतीच्या मुहूर्तावर वास्तुपुरुष पहाटेपासूनच उळसुरू तलावाच्या किनारी अश्वत्थ वृक्षाखाली बसून भगवद् गीतेतील श्लोक गुणगुणत जललहरींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. असं समजलं जातं की याच मार्गशीर्षांतील शुक्ल एकादशीला कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाच्या प्रारंभी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगून चेतना दिली. वास्तुपुरुषाची नजर पश्चिमेकडील आकाशातील मृग नक्षत्राकडे गेली. काहीसा वर व्याध तेजाने तळपत होता, वास्तुपुरुषाला इशारा देत होता, आता तुलाही पर्यावरण गीता शहरवासीयांपर्यंत पोचवायला हवी! वास्तुपुरुष त्याच विचारात गर्क असतानाच सूर्योदय झाला. सोनेरी किरणांनी अश्वत्थाच्या तरुशिखरावरील कोवळ्या कुसुंबी पालवीला पुलकित केलं. आसमंतातील शीतलतेने शहारलेला वास्तुपुरुष जागृत झाला. उपराळकर देवचाराच्या जललहरींतून उमलणाऱ्या हाकेने, ‘‘शुभ प्रभात वास्तुपुरुषा! आज आपल्या भेटीसाठी ठिकाण तर सुंदर निवडलं आहेस, हा सुरेख जलाशय आयण त्यात पाय पसरून किनाऱ्यावर उभा असलेला हा उध्र्वमूलम् अध:शाखम् अश्वत्थ वृक्ष. पण हे सुंदर चित्र मला तर फसवं वाटतं आहे. या मायावी जललहरींखालील पाण्यातील प्रदूषण मला इथेही जाणवतं आहे आणि इथल्या किनाऱ्यावरील वनस्पतींना तर त्याने हतबल करून टाकलं आहे. त्यातच त्यापलीकडच्या कोपऱ्यातील कचऱ्याचा प्रचंड ढीग! कसा काय तू इतका शांतपणे बसला आहेस इथे? चल सुरू कर पर्यावरण गीते पुढचा अध्याय!’’
उपराळकर देवचाराच्या आगमनाने वास्तुपुरुष आनंदला. ‘अनेक दंडवत, देवा महाराजा! मी मुद्दामच ही विरोधाभासी जागा निवडली, विचारांना चालना मिळण्यासाठी. या बेंगळुरू शहराच्या अस्ताव्यस्त विकास प्रक्रियेत वाचलेला हा एक जलाशय. पूर्वीच्या नगर निर्मात्यांनी या ओसाड पठारावरील नद्या-नाल्यांना बंधारे घालून, जलाशयांचं जाळं निर्माण करून पाणीपुरवठय़ाची सोय केली होती. आताच्या विकासकांनी मात्र याच पाणवठय़ांवर अतिक्रमण करून, भर टाकून त्यावर वसाहती निर्माण केल्या. लोकसंख्या मर्यादेबाहेर गेल्यावर पाणीटंचाई भासायला लागली. मग दूरवर कावेरी आणि तिच्या उपनद्यांवर मोठी धरणं झाली, तिथून जलवहिन्या टाकून शहरात पाणीपुरवठा सुरू झाला, अगदी वाटेतील खेडेगावांतील पाणीटंचाईला वाकुल्या दाखवत! शहरातून जाणाऱ्या नद्या-नाल्यांचं रूपांतर झालं गटारांमध्ये, कारण आजुबाजूच्या वसाहतींतील सांडपाणी त्यातच सोडलं गेलं. बेंगळुरू शहरातून वाहाणारी वृषभावती ही पवित्र नदी इतकी ओंगळवाणी झाली की लोक तिच्यापासून दूर जायला लागले, रोगराई टाळायला. आता तिला भेट द्यायला येतात ते फक्त पर्यावरण अभ्यासक, इथल्या प्रदूषणाचं विश्लेषण करायला! पण यातूनच आता हळूहळू लोकजागृती व्हायला लागली आहे. हे असंच चित्र आता सर्व शहरांतून दिसायला लागलं आहे. नद्या आणि जलाशय हे तिर्थक्षेत्रं असल्याची जाणीव लोकांना आणि सरकारलाही व्हायला लागली आहे आणि त्यातूनच शुद्धीकरणाचे प्रयत्न सुरू होताहेत. लोकशिक्षणातून संवर्धनाचेही प्रयत्न सुरू होताहेत, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाचीही जोड मिळत आहे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर सुरू झाला आहे. सेंद्रिय शुद्धीकरण पद्धतींचा वापर करून जैवविविधतेच्या संवर्धानाकडेही लक्ष दिलं जात आहे. पाण्यातील जैवविविधतेला प्राणवायू पुरवण्यासाठी, हवेतील आर्द्रता संतुलित ठेवण्यासाठी आणि परिसर आकर्षक करण्यासाठी कारंज्यांचा वापर नवीन्यपूर्ण पद्धतीने केला जात आहे. वेगवेगळ्या वनस्पतींच्या खास लक्षणांचा वापर नसíगक शुद्धीकरण प्रक्रियेसाठी केला जात आहे. त्यातूनच पर्यावरणीय बेटं, तरंगणारी शेती-बेटं, पर्यावरणीय किनारे असे नवीन्यपूर्ण आणि आकर्षक पर्याय स्वीकारले जात आहे. एक प्रकारच्या पर्यावरणीय प्रयोगशाळाच या नद्या-नाले आणि जलाशयांच्या किनाऱ्याने जर लोकसहभागातून उभ्या रहिल्या तर ही एक प्रकारची जल-क्रांती शहरांमधून होईल. पाणीटंचाईने ग्रासलेल्या शहरवासीयांनी काहीशी कुरकूर करत का होईना, पण आता पावसाच्या पाण्याच्या संवर्धनाचे मार्ग स्वीकारले आहेत. नदी-तलाव किनारी होणाऱ्या धार्मिक कर्मकांडांना, विसर्जनासारख्या विधींना दिले जाणारे पर्याय हळूहळू लोक स्वीकारत आहेत. जगभरातल्या सर्वच शहरांतला एक खास विरोधाभास आहे. इथला शुद्ध पाणी, वीज, ताजा भाजीपाला, दूध इत्यादी जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा हा बाहेरील परिसरातून होतो. उलट इथला कचरा, सांडपाणी, प्रदूषण इत्यादी वाईट गोष्टी मात्र बाहेरील परिसरात टाकल्या जातात. पर्यावरण गीतेच्या शिकवणीतून निर्माण होणाऱ्या लोकआंदोलनातून आणि जल-संस्कृतीतूनच शहरी कुरुक्षेत्रांतील या युद्धांना यशस्वीपणे सामोरं जाता येईल, समर्पक पर्याय उभे करता येतील.’’
‘‘शाब्बास वास्तुपुरुषा, या अध्यायाची सुरुवात तर छान झाली. मी आदर्श जलाशयाचं स्वप्न आतापासूनच पाहायला लागलो आहे. पण त्या कोपऱ्यावरच्या कचऱ्याच्या ढीगाचं काय? असेच प्रचंड ढीग सर्वच शहरांतून सातत्याने दिसत राहातात. हा तर इथल्या शहरवासीयांनीच निर्माण केलेला आणि टाकलेला कचरा आहे. शिवाय जेव्हा नगरपालिका हा शहरातील कचरा बाहेरील परिसरात टाकतात तेव्हा तिथल्या खेडेगावांतील जनतेवर अन्याय होतो, त्यांना ती दरुगधी, त्यातून निर्माण होणारी रोगराई सहन करावी लागते. मग शहरं विरोधी गावं अशी आंदोलनं सुरू होतात. तुझ्याकडे काय पर्याय आहे या प्रचंड शहरी समस्येवर?’’ उपराळकर देवचाराने प्रश्न टाकला वास्तुपुरुषाला.
वास्तुपुरुष उगवत्या सूर्यदेवासमोर नतमस्तक झाला, त्याने जललहरींच्या हिंदोळ्यात मनाला झोका दिला आणि सुरुवात केली, ‘‘देवचारा, अगदी सर्वाना जाचणारा आणि स्वत:कडेच पर्याय असतानाही न सुटणारा हा प्रश्न विचारलास. कार्यक्षम व्यवस्थापन आणि लोकशिक्षण या दोन मार्गानीच ही समस्या सोडवता येईल आणि अनेक ठिकाणी असे उपक्रम सुरूही झाले आहेत. अगदी इथूनच जवळ दोन रहिवासी वसाहती आहेत. लोक जागरूक आहेत, निसर्गप्रेमी आहेत, सामजिक जाणिवेने भारलेले आहेत. त्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून जवळच्याच मोकळ्या, ओसाड जागेत एक हिरवंगार उद्यान उभं केलं आहे. त्याचा उपभोग गेली काही र्वष स्थनिक रहिवासी, मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग घेत आहेत. सर्वत्र कसा आनंदीआनंद होता. पण हळूहळू चित्र बदलायला लागलं. पहाटे फिरायला येणारे आणि आजूबाजूच्या रस्त्यांवरून जाणारे रहिवासी अंधाराचा फायदा घेऊन घरातला कचरा कडेला, कोपऱ्यात टाकायला लागले. उद्यानाच्या कोपऱ्यात कचऱ्याचे डोंगर आणि परिसरात दरुगधीचं साम्राज्य सुरू झालं. नगरपालिकेचंही दुर्लक्ष! जागरूक रहिवासी पहारा करायला लागले, कोपऱ्यांवर देवदिकांच्या तसबिरी लावल्या, कडक कारवाईचे इशारे झळकवले. पण समस्या सुटत नव्हती, कारण समस्येचा उगमही लोकांमध्येच होता. त्यांना आपापली घरं स्वच्छ ठेवायची होती आणि नगरपालिकेचं स्वच्छतेचं काम अगदीच अनियमित होतं. सर्व शहरभर हेच चित्र दिसत होतं. शेवटी जागरूक कार्यकर्त्यांनी एका पर्यावरण संस्थेचं सहकार्य घेतलं आणि उद्यानातच कचरा व्यवस्थापनावर एक शिबीर घेतलं. कार्यकर्त्यांनी खूप प्रचार करून अनेकांना शिबिरात सहभागी केलं, प्रात्यक्षिकांतही भाग घेतला. मग सुरू झाला उपक्रम गांधी जयंतीच्या मुहुर्तावर, स्वच्छता अभियानाचा. घरोघरी कचरा वेगळा केला जाऊ लागला, ओला- स्वयंपाकघरातला आणि सुका – कागद, आवरणं, प्लस्टिक वगरे. ओल्या कचऱ्यातून घराबाहेरच मोठय़ा कुंडीत किंवा िपपात खत निर्मिती सुरू झाली. काही उत्साही रहिवाशांनी गांडूळ खतनिर्मितीलाही सुरुवात केली. हे सर्व खत घराघरांतील बागांमधून, गच्चीवरील शेतीसाठी वापरलं जाऊ लागलं. त्याशिवाय उरलेल्या खताच्या वापराने उद्यानातील हिरवाई तरारली. ज्यांच्याकडे जागा नव्हती अशा अनेक रहिवाशांनी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांनी उद्यानातल्या वेगवेगळ्या भागात वाफे करून भाजीपाला शेती सुरू केली. आता नागरिक पहाटे फिरून, व्यायाम करून झाल्यावर आपापल्या शेतीच्या अनुभवांची देवाणघेवाण करायला लागले. सर्वजण प्रदूषणरहित, ताज्या भाजीपाल्याचा, फळांचा आनंद घेऊ लागले. समतोल आहार आणि आरोग्यावर चर्चा करायला लागले. परिसरातल्या काही उत्साही आणि उद्योगप्रेमी तरुणांनी जवळच्याच मोकळ्या जागेत सुका कचरा प्रक्रिया केंद्र सुरू केलं. वसाहतीतला सर्व सुका कचरा, कागद, प्लस्टिकसह गोळा करून त्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादनांचा उद्योग सुरू झाला. वसाहतीतीलच काही बेकार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला. कचऱ्याची समस्या तर सुटलीच, पण त्यातूनच एक सामाजिक कार्य सुरू झालं. वसाहतीतला कचऱ्यातून तिथल्या तिथेच पुननिर्मिती व्हायला लागली. नगरपालिकेवरील कचरा व्यवस्थापनाचा ताण कमी झाला. एक सामाजिक आणि पर्यावरणीय लोकआंदोलन उभं रहिलं. आता इथले कार्यकत्रे शहरातील इतर वसाहतीत जाऊन पर्यावरण शिबिरं घेतात, प्रात्यक्षिकं देतात, आपल्या उद्यानात शिक्षण सहली आयोजित करतात. स्वावलंबनातून पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जाणीव जागृती असा हा दुहेरी लाभ देणारा उपक्रम बेंगळुरू शहराला आदर्शवत झाला आहे. मला वाटतं सर्वच शहरांसाठी हा आदर्श आहे. शिवाय असाच मार्ग इतर समस्या सोडवण्यासाठीही हाताळता येईल. स्वयंसेवी संस्थांच्या अशा पुढाकाराने सरकारी व्यवस्थापनालाही त्यांचं काम योग्य रीतीने करणं भाग पडेल.’’
‘‘वास्तुपुरुषा, फारच सुंदर आणि यथार्थ उदाहरण दिलंस तू. हा स्वावलंबनाचा आणि लोकसहभागाचा मार्ग महानगरांत राबवता येईल का? खरं म्हणजे महानगरांमध्ये फार मोठी जबाबदारी व्यवस्थापनावर असते. पाहू या का आपण महानगरांमधले व्यवस्थापनाचे प्रश्न पुढच्या भेटीत?’’
वास्तुपुरुषाच्या नजरेत एक वेगळीच चमक दिसत होती. सूर्य बराच वर आला होता, तलावातील बेटावरील झाडांवर बगळे स्थिरस्थावर झाले होते, काही स्थलांतरित बदकं जललहरींवर हेलकावत होती. वास्तुपुरुष उत्साहात उद्गारला, ‘‘ होय देवा महाराजा, महानगरांच्या समस्या गंभीर आहेतच आणि सरकारी व्यवस्थापनं दुर्लक्ष करून त्यात भर टाकताहेत. पण काही व्यवस्थापनं नवीन्यपूर्ण मार्गाने आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुधारणेचा संदेश देत आहेत. पुढच्या भेटीत, पौषाच्या स्वागतात घेऊ या आढावा, एका महानगरातून.’’ अश्वत्थ वृक्षावरून पाण्यात झेप घेऊन एक धिवर पक्षी किंचाळत पळाला. वर नभांगणात समुद्री घारींची देखणी जोडी आनंदात विहरत होती आणि उपराळकर देवचाराला सागरी किनाऱ्यावरील महानगराची दिशा दाखवत होती.
उल्हास राणे lhasrane@gmail.com