आज दहा वर्षांनी पुण्यात कामानिमित्त येणं झालं. पुण्यात शिरतानाच जाणवलं, किती बदललंय पुणं दहा वर्षांत. खरं तर दहा वर्षांपूर्वी जेव्हा पुण्यातलं घर विकलं, तेव्हा त्याच्याही आधी सतरा-अठरा वर्षे पुण्याशी संबंध होता. त्यामुळे तो काळ हा या दहा वर्षांच्या काळापेक्षाही जास्त होता. पण कदाचित एखादं माणूस जसं आपण रोजच पाहतो, तेव्हा त्याचं बारीक होणं किंवा लठ्ठ होणं किंवा एकूणच त्याच्यातले बदल आपल्याला रोजच्या पाहण्यामुळे जाणवत नाहीत. पण वर्ष-सहा महिन्यांनी बघितल्यावर असे बदल चटकन जाणवतात. तसंच काहीसं माझं झालं होतं. कारण पुणं काही एका रात्रीत बदललेलं नव्हतं. पुण्यात जाणं-येणं असताना म्हणजे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते नव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत म्हणजे आमचं विकेंड होम विकेपर्यंत पुण्याचं बदलणं चालूच होतं. वाडे गेले..सोसायटय़ा आल्या.. गल्लीबोळ गेले.. रुंद रस्ते आले.. गावापासून लांब म्हणजे सदाशिव पेठ, नारायण पेठ, बुधवार पेठ अशा पेठांपासून लांब पुणं पसरत पसरत गेलं आणि कोथरूडसारख्या उपनगरांमध्ये अनेक मुंबईकरांनी ऐंशीच्या दशकात जणू दुसरी मुंबईच वसवली होती. पण आता धायरी, पाषाणपासून ते विमान नगर, हडपसपर्यंत चोहोबाजूंनी पुणं पसरत गेलेलं जाणवत होतं. पूर्वीच्या हाऊसिंग सोसायटय़ांची जागा आता उंचच उंच टॉवर्सनी घेतलेली दिसत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातली कामं आटोपल्यावर आमचं विकलेलं विकेंड होम ज्या भागात होतं, त्या कोथरूडच्या परिसरात आमच्या सोसायटीला भेट द्यावी म्हणून गेलो आणि पाहतो तर काय, मला तो भाग ओळखूच येईना. पूर्वी आमची सोसायटी जिथे होती तिथे वाट जवळजवळ संपायची. पीएमटीचा शेवटचा स्टॉप होता तिथे. सकाळी मॉìनग वॉकसाठी लोकं लांबलांबहून मुद्दाम तिथे चालत यायचीत. आमच्या घराच्या बाल्कनीसमोरच एक टेकडी होती. सुट्टीत मुलं या टेकडीवर चढायला यायचीत. टेकडीवर वेगवेगळ्या प्रकारची बरीच झाडं लावलेली होतीत. आम्हीही एक बकुळीचं झाड लावलं होतं. ही झाडं बघायला अनेक वृक्षप्रेमी यायचेत. मीही पुण्याच्या घरी गेल्यावर न चुकता टेकडीवर जाऊन तिथल्या माळ्याकडून एक बादली पाणी घेऊन झाडाला घालायचो. तेवढीच गार्डिनगची हौस भागायची. नाहीतरी मुंबईत कुठली आली स्वत:ची झाडंपेरं? टेकडीच्या पायथ्याशी लाफ्टर क्लब चालायचेत. तर कोणी एरोबिक्स करायचेत. अर्थात, हे घर घेताना ही टेकडी हेच एक मुख्य आकर्षण होतं. मला आठवतं, आमच्या इमारतीचं बांधकाम सुरू असताना मी इंजिनीअिरगला शिकत होतो. कॉलेजमध्ये जे काही शिकायचं, ते मुद्दाम तिथे साईटवर जाऊन पाहायचं. किमान तेवढय़ासाठी तरी आठवडा-पंधरवडय़ात माझं पुण्याला जाणं व्हायचं. इमारतीच्या बीमकॉलमचा सांगाडा तयार झाल्यावर िभती नसलेल्या स्लॅबवर उभं राहून इथे लििव्हगरूम येणार, इथून पुढे स्वयंपाकघर असेल, शेजारी बेडरूम बांधली जाईल आणि ही बेडरूमची बाल्कनी असेल, असा सगळा अंदाजपंचे दाहोदस्रे कल्पनेचा खेळ खेळायला मजा यायची. तेव्हा पुणे स्टेशनवरून आमच्या घराकडे जाणाऱ्या पीएमटी बसच्या दिवसभरात मोजून सात ते आठ फेऱ्या असायच्यात. बस चुकली की, दोनअडीच किलोमीटरची दोन पायांवरची दांडीयात्रा.. वाटेत मध्येच निर्मनुष्य रस्ता झाडांमधून जायचा. कधीकधी वाटायचं की कुठे लांब जंगलात जागा घेतलीये. पण त्या चालण्यातही एक वेगळी मजा वाटायची. कारण रस्त्याने चालत असताना मधूनच लागणारी बंगलेवजा घरं, शेजारशेजारच्या दोन घरांमधून जाणारे छोटे-छोटे रस्ते आणि त्या रस्त्यांवरून कधीतरी गेल्यानंतर बाहेरच्या मुख्य रस्त्याच्या एखाद्या ओळखीच्या भागात पोहोचल्यानंतर कोलंबसला झाला असेल असा नवीन भाग शोधून काढल्याचा आनंद.. इमारतीचं बांधकाम सुरू असताना बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेल्यावर इमारतीतले लोक भेटले की, तुम्ही कोणत्या िवगमध्ये? याची चौकशी करायची. आमच्या मजल्यावर कोण असणार? शेजारी राहायला कोण येणार? त्यांना भेटायची उत्सुकता असायची. इमारत बांधून बांधून पूर्ण झाली. घरांचा ताबा द्यायचा सोहळाच बिल्डरने आयोजित केला होता. त्यावेळी पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. नव्या ओळखी झाल्या. त्यात आधीपासून ओळख असलेले काही मुंबईकरही होते. आता राहायला आलो की मस्त मजा करू. जवळपास पिकनिक वगरे काढू असे बेत आखलेत.
घराचा ताबा घेतल्यावर खास मुंबईहून सुतार नेऊन फíनचर करून घेतलं. बिल्डरला सांगून िभतीत कडाप्पा दगडाची वॉर्डरोब आणि किचन कॅबिनेटसाठी कपाटं करून घेतली होती. कडाप्प्याच्या कपाटांना सुताराकडून लाकडी दरवाजे करून घेतले. त्यावर वॉर्डरोबना पूर्ण उंचीचे आरसे बसवले. त्याकाळी नवी संकल्पना असलेला आणि कमी जागा व्यापणारा सोफा कम बेड सुताराकडून घरीच लाकूड आणून करून घेतला. कारण त्याकाळी अशी तयार फíनचरची दुकानं जागोजागी नव्हती. त्यासाठी मुख्य शहरापासून इतक्या आत आणि लांबवर असलेल्या आमच्या घरी लाकूड, दगड, आरसे वगरे सामान घेऊन जाऊन बऱ्याच फेऱ्या मारून खूप कष्टाने फíनचर करून घेतलं. मग वास्तुशांत केली. त्या दिवशी मुंबईहून नेलेल्या वातीच्या स्टोव्हवर नव्या घरातलं पहिलं जेवण ओटय़ावर शिजवतानाचा आनंद वेगळाच होता. माझ्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही चांगले पंधरा दिवस जाऊन राहिलो होतो. सकाळी आंघोळी वगरे आटोपून साडेनऊची बस पकडायची आणि मंडईत जायचं भराभर भाजी, इतर खाणं आणि सामान विकत घ्यायचं आणि पुन्हा परतीच्या फेरीची बस पकडायला धावायचं की, साडेअकरापर्यंत घरी परत. मग जेवणाला सुरुवात. रॉकेलसाठी बाहेर मुख्य वस्तीच्या ठिकाणी जायला मग बस नसली की, अर्धा तास चालत जायला आणि अर्धा तास यायला अशी एक तासाची निश्चिती.. मग राहायला गेल्यावर छोटा पिकनिकसाठीचा गॅस सििलडर घेतला. शेगडी घेतली. सुट्टी संपली. आम्ही मुंबईला यायला निघालो. मग शनिवार-रविवार येतो असं पुणेकर शेजाऱ्यांना सांगून निघालो. माझं कॉलेज सुरू झालं, आईबाबाही त्यांच्या कामाच्या व्यापात व्यग्र झाले. मग माझा रविवारचा क्लास सुरू झाला आणि शनिवार-रविवारी जाण्याचे मनसुबे विरून गेले. एखाद्या रविवारी क्लास नसला, तर शनिवारी दुपारनंतर कॅलेज उरकून निघायचं, पोहोचायला संध्याकाळ मग थकून भागून गेल्यावर घर बंद असल्यामुळे जमलेली जळमटं आणि धूळ साफ करेपर्यंतच संध्याकाळचे साडेसात आठ वाजायचे. मग कुठलं आलं घरातलं जेवण? बरं बाहेर जेवायला जावं, तर रात्रीच्या बसेस नाहीत. म्हणजे मुख्य शहरात जेवायला जाण्यासाठी हे लांबचं अंतर कापून जायचं म्हणजे रिक्षाला दामदुप्पट भाडी आलीत. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी चहानाश्ता झाला की, भांडय़ांची आवराआवर करायची. जी काही दोनचार भांडी, कपबशा वगरे कपाटातून काढली असतील, ती सगळी घासूनपुसून सुकवून आत ठेवायचीत. पुन्हा कधी येऊ शकणार, हे माहीत नाही. त्यामुळे कपाटांना, घराला कडय़ाकुलुपं लावून घर बंद करून सकाळी साडेअकरा-बारापर्यंत निघायचं. स्टेशनवर जायचं, जेवायचं आणि मुंबईची बस पकडून संध्याकाळी परत मुंबईच्या घरी येऊन सुरू होणाऱ्या आठवडय़ाची तयारी करायची. या अशा धावपळीच्या शनिवार-रविवार भेटीनंतर हळूहळू हे लक्षात यायला लागलं की, हे विकेंड होम नसून फक्त दिवाळी, मे महिन्याची सुट्टी, ख्रिसमसची सुट्टी अशा मोठय़ा सुट्टय़ांमध्ये जाण्यासाठीचं सेकंड होम आहे. तरीही अधूनमधून तिथे जाण्याचा मोह आवरत नव्हता. एकदा अशाच एका कोजागरी पौर्णिमेला गेलो आणि शेजाऱ्यांबरोबर कोजागरी साजरी केली. आम्ही मसाला दूध करून नेलं. त्यांनी मेदूवडे केले. सोबत तिसऱ्या शेजाऱ्यांनी गुलाबजाम करून आणले. रात्री दोन-अडीचपर्यंत गप्पा-गाण्याच्या भेंडय़ा रंगल्या. मजा आली. मग एकदा पुण्यातला गणेशोत्सव बघावा म्हणून खास गणपतीच्या दिवसात गेलो. आमच्या सोसायटीत एकूण सात िवग्जच्या सात इमारती होत्या. सगळ्या इमारतीतल्या लहानमोठय़ांनी मिळून बसवलेले कार्यक्रम बघितले. इमारत आणि टेकडी यांच्यामधल्या जागेत स्टेज घातलं होतं. नाटकं, गाणी-ऑर्केस्ट्रा, नाच असे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालले होते.
तोपर्यंत साधारण जागा घेऊन दहा वर्षांचा काळ लोटला असेल. आमच्या सोसायटीतल्या जोशीकाकूंनी पोळीभाजी आणि जेवणाचे डबे द्यायला सुरू केले होते. आम्हाला तर तो मोठाच आधार वाटला. चला, म्हणजे आता रात्रीच्या जेवणासाठी तंगडतोड करत लांबपर्यंत जायला नको. पीएमटीच्या बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाली होती. तसंच आणखी एक नवीन रूटही आमच्या भागात येण्यासाठी पीएमटीने सुरू केला होता. माझंही शिक्षण संपून नोकरी सुरू झाली होती. आजूबाजूलाही आता बऱ्याच नव्या इमारती बांधल्या जाऊ लागल्या होत्या. या इमारतींच्या तळाशी नवी दुकानं आलीत. त्यामुळे आता किराणा सामान, भाज्या इतर जिन्नस, रोजच्या वापराच्या वस्तू, हे सगळं हळूहळू या इमारतींमधल्या दुकानांमधून मिळायला लागलं. यातल्याच एका दुकानामध्ये भाडय़ाने जागा घेऊन जोशीकाकूंनीही हॉटेल सुरू केलं. दोन दुकानं सोडून अजूनही एक हॉटेल आलं. तिथे फक्त चहा आणि फराळाचे जिन्नसच मिळायचेत. पण म्हणतात ना विपन्नावस्थेतून गेलेला माणूस थोडक्या सुखातही समाधानी असतो. तसंच आमचं काहीसं झालं होतं.
पण हे सुखही फार काळ टिकू शकलं नाही. माझ्या नोकरीत मला मोठी सुट्टी मिळेना. त्यामुळे शनिवार-रविवार जाणं तर सोडाच. पण दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत जायचं म्हटलं, तरी मग इतर कोणतीही नवी ठिकाणं बघायला जाताच यायचं नाही. कारण जरा जोडून आलेली मोठी सुट्टी मिळाली की, एरव्ही पुण्याच्या घरी जाता येत नाही, म्हणून मग पुण्यालाच जायचं. त्यामुळे इतर कुठेच फिरायला जाता येईना. बरं घर उभं करताना, त्यातली एकएक वस्तू आणताना एवढी मेहनत घेतली होती आणि एकूणच त्या घराबद्दलची आपुलकी आणि जिव्हाळा इतका होता की, ते घर म्हणजे जणू आमच्याच कुटुंबाचा एक सदस्य असल्यासारखंच वाटायचं. त्यामुळे अशा जरा मोठय़ा सुट्टय़ा मिळालेल्या असताना एकाकी पडून आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्या घराकडे पाठ फिरवून इतर ठिकाणी जायचं, हेही मनाला पटत नव्हतं. तशातच आईची गुडघेदुखी वाढली आणि आमच्या इमारतीला लिफ्ट नव्हती. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावरचं घर गाठताना तिचे फारच हाल व्हायला लागले. म्हणजे घरी जायचं, तर एकदा गेल्यावर जे तीन जिने चढून जायचे, ते थेट निघायच्या दिवशीच उतरायचं. त्यामुळे जाणं आणखीनच कमी व्हायला लागलं. मगमग तर वर्षांतून एकदा किंवा दोनदाच जाणं व्हायचं. कारण आई-वडिलांना तिथे जाऊन राहणं शक्य नव्हतं आणि मला माझ्या कामाच्या व्यापात इच्छा असूनही जाता येत नव्हतं.
शेवटी आई-वडिलांनी ही जागा विकायचा निर्णय घेतला. मला तो पटत नव्हता. माझं या घराबरोबर शिकत असल्यापासूनच नातं जुळलं होतं. पण माझं जाणं होत नव्हतं, हेही खरंच होतं. शेवटी मी मनावर दगड ठेवून विकायला तयार झालो. आम्ही चार ते पाच र्वष घर विकण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण काही ना काही कारण होऊन ते घर विकलं जात नव्हतं. कदाचित त्या वास्तूलाही आम्हाला सोडवत नव्हतं. अखेरीला दहा वर्षांपूर्वी ते विकलं गेलं. वडिलांनी त्यांच्या निवृत्तीपूर्वीच भविष्यनिर्वाहनिधीतून रक्कम काढून घेऊन घेतलेलं ते घर होतं. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्या हाती फारसं काही आलं नव्हतं. घर विकलं गेल्यावर त्यांच्या हाती पसा आला, असं म्हणेपर्यंत आईला कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झालं आणि तिच्या आजारपणात त्या वास्तुपुरुषाने आíथक मदत केली. तेव्हा आम्हाला उमगलं गेलं की, इतके र्वष विकलं न जाणारं घर विकलं कसं गेलं.
आज दहा वर्षांनी पुण्यात आल्यावर त्या सगळ्याची आठवण झाली आणि मन भरून आलं. आमच्या घराच्या आजूबाजूला खूपच सुधारणा आणि सोयी झाल्या आहेत. बसचा शेवटचा स्टॉप आता तिथे नाही. कारण अनेक बसेस तिथून पुढे दूपर्यंत वाढलेल्या पुण्यात जातात. शाळा-कॉलेजं जवळ आलीयेत. त्या भागात जाणंयेणं अगदी सुकर झालंय. घरासमोरच्या टेकडीवरचं आमचं बकुळीचं झाड आम्ही पुणं सोडून गेल्यानंतर पोरकं होऊनही आता खूप मोठं वाढलंय. दहा वर्षांपूर्वी अडीच लाखाला विकलेल्या आमच्या घराची किंमत आता पस्तीस ते चाळीस लाखांच्या घरात गेली आहे. इमारत आता तीस वर्षे जुनी असल्यामुळे पुनर्वकिासाचा विचार तिथले रहिवासी करता आहेत. नव्या टॉवरला आता लिफ्टही असेल. चौकशी केल्यावर कळलं की, आम्ही ज्यांना घर विकलं ते तिथे कधीच राहायला आले नाहीत आणि तेही आता विकायच्या विचारात आहेत. कदाचित अजूनही ते घर मी घेईन या आशेवर माझ्या प्रतीक्षेत आहे. माझं जाणं होईल की नाही? की, आईवडिलांप्रमाणेच माझंही वय झाल्यावर मला ते घर उगाचंच डेड इन्व्हेस्टमेंट नको म्हणून विकावं लागेल? असे विचार माझ्या मनात येऊनही इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी त्याप्रमाणे घराबद्दलच्या आस्थेमुळे माझ्या भावनांनी माझ्या व्यावहारिक विचारांवर विजय मिळवला आणि म्हणूनच पुन्हा एकदा त्या घराकडे वळायचा विचार करून त्यादृष्टीने जुळवाजुळव करण्यासाठी मी मुंबईच्या दिशेने माझा प्रवास सुरू केला…
मनोज अणावकर

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weekend home
First published on: 30-05-2015 at 01:04 IST