नाथांचा एक अभंग आहे. त्यातले दोन चरण असे आहेत.. ‘कोण समयो येईल कैसा। याचा न कळे कि भर्वसा। जैसे पक्षी दाही दिशा। उडोन जाती।।’ एखाद्या झाडावर अनेक पक्षी अलगद विसावले असावेत.. वाऱ्याच्या संगतीनं फांदीवर मजेत डोलत असावेत आणि बंदुकीच्या गोळीच्या आवाजानं जसे क्षणार्धात दशदिशांना उडून जावेत तसा अंतकाळ आहे! या देहवृक्षावर मजेत विसावणारे पंचप्राणांचे आणि पंच ज्ञानेंद्रियांच्या चेतनेचे पक्षी मृत्यू येताच या देहवृक्षाला सोडून भर्रकन उडून जातात.. पण एक फरक आहे! मृत्यूची चाहूल लागताच पक्ष्यांचा जीव झाडात अडकत नाही, माणसाला मात्र देहाचं, देहाच्या आधाराचं प्रेम सुटता सुटत नाही.. तरीही ज्याचा जन्म झाला आहे त्याच्यासाठी मृत्यू हेच अटळ असं अंतिम सत्य आहे.

बहिणाबाई चौधरी म्हणतात त्याप्रमाणे, जगणं आणि मरणं यात एका श्वासाचं अंतर आहे! होत्याचं न-व्हतं व्हावं.. पुढचे बेत आखले असावेत, आनंदोत्सवाच्या क्षणांची चित्रं रंगवली असावीत आणि अनपेक्षितपणे क्षणार्धात श्वासांचा हिशेबच संपावा! मृत्यू असाच येतो बेभरवशाचा. अनेकदा तो स्पष्ट कल्पना देतो की, तो अगदी जवळ येऊन ठेपलाय, तरी तो नेमका कधी येईल, याचा काही भरवसा नसतोच. कधी तो अनाहूतपणे येतो.. कधी अलगद कुशीत घेतो.. कधी दुसऱ्यालाही हेवा वाटावा असा धीरोदात्तपणे येतो, तर कधी जीवघेणी प्रतीक्षा करायला लावतो..

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
नाव उलटून सहा मृत्युमुखी; झेलम नदीतील दुर्घटना, बहुसंख्य शाळकरी मुलांचा समावेश
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
father and son drown in dhom dam in wai
सातारा: धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू

माझ्या मित्राचा रोग बळावत चालला होता.. त्याला मात्र वरकरणी ते जाणवत नव्हतं, पण शरीर रोगानं पोखरत चाललं होतं.. आपण बरे होऊन घरी परतू, अशी त्याची उमेद होती.. त्याला भेटणाऱ्यांनी आणि डॉक्टरांनीही ती टिकवली होतीच. ‘त्या’ दिवशीही डॉक्टरांच्या थोपटत्या स्पर्शानं तशी ग्वाही जणू पुन्हा दिली होती.. बाहेर आल्यावर डॉक्टर आम्हाला म्हणाले, ‘‘आमची शर्थ सुरूआहेच, पण कोणत्याही क्षणी सारं संपेल! जवळच्या नातेवाईकांना बोलावून घ्या..’’

हे आज ना उद्या ऐकायची तयारी सर्वानी केली होतीच. आत खाटेवर शांतपणे पहुडलेल्या त्याला मात्र त्याची पुसटशीही जाणीव नव्हती. घडय़ाळाचे काटे संथपणे सरत होते.. घरी लवकर जाण्याचं चित्र रंगविण्यात तो मश्गूल असतानाच दारातून त्याचा मामेभाऊ  आला.. ‘‘अरे! हा आत्ता कसा आला? आज कामावर जायचं नाही?’’ मित्राच्या नजरेतले हे प्रश्न वाचत मामेभाऊ  म्हणाला, ‘‘अरे, ऑफिसच्या कामासाठीच या भागात आलो होतो, म्हटलं जाता जाता तुलाही भेटावं!’’ त्याच्या बोलण्यातलं अवघडलेपण लपत नव्हतं.. त्यानं उगाच आपला हात का हातात घेतला? तो दाबताना त्याच्या डोळ्यांत पाणी चमकून गेलं का? हे प्रश्न पडतात ना पडतात तोच मावसबहीणही आली.. थोडी धापा टाकत.. आपल्याला पाहताना हिच्या डोळ्यांनी ‘हुश्श’ म्हटलं का? आणि हो, कालच तर आली होती.. ‘‘घरातल्या कामांपायी पाय निघता निघू शकत नाही,’’ असं म्हणत कालच किती अडचणींचा पाढा वाचला होता हिनं. मग आजच परत का आली? तीही ओशाळंसं हसली.. नजर टाळत इतरांशी उगाचच काही तरी बोलू लागली. इतर जणही काही तरी बोलू लागले.. पण ना त्या प्रश्नांना अर्थ होता ना उत्तरांना.. तोच मेव्हणा आला.. अरे! हा रोज रात्री मला सोबत म्हणून झोपायला येतो.. मग आता का आला? रजेवरच आहे सध्या, पण दिवसा मुलं शाळेतून येतात. त्यांना सांभाळणारी बाई रजेवर आहे म्हणून हा दुपारी घरीच थांबतो.. तरी का आला? यानं खोल स्वरात विचारलं, ‘‘हिरो येईल ना शाळेतून?’’ मेव्हणा बोलून गेला, ‘‘आजच्यापुरतं शेजारी सांगितलंय..’’ ‘आजच्यापुरतं?आज काय आहे असं?’ याचं मन प्रश्नांनी पोखरायला सुरुवात केली. हळूहळू जवळचे-लांबचे जमू लागले.. बायांचा हात उगाच बायकोच्या पाठीवर थबकतोय, असं त्याला वाटू लागलं.. त्याला जाणवू लागलं, हे सारे ‘उगाच’, ‘अचानक’, ‘योगायोगानं’ जमलेले नाहीत.. हे वाट पाहायला जमले आहेत.. त्याच्या मनाची घालमेल झाली.. मग तोही इतरांप्रमाणेच वाट पाहू लागला.. त्या अखेरच्या क्षणाची! मृत्यू कोणत्या क्षणी येईल, याचा काही भरवसा नसतो हे खरं, पण ‘त्या’ क्षणाची वाट पाहायला लागणं इतकं भीषण असतं, या अनुभवानं त्याच्या अंत:करणाची चिरफाड सुरू केली असेल का? खोलीतल्या प्रत्येकाचं मन आपल्यावरील प्रेमानं भारावलं आहे, पण ‘त्या’ क्षणासाठीही ताटकळत आहे, ही जाणीव त्याला पेलली का? कळायला मार्ग नाही.. तो या प्रश्नांच्या उत्तरांसोबतच गेला!

‘ये मृत्यो ये’ असं मृत्यूचं अजरामर स्वागतगीत रचणारे वीर दुर्मीळच असायचे.. बहुतेकांना मृत्यूचा विचारही नकोसा वाटतो. जगात माणूस इतके मृत्यू अवतीभवती पाहातो, पण आपणही कधी तरी अखेरचा श्वास घेणार आहोत, हे त्याच्या मनातही येत नाही. काही जण आजाराला कंटाळून वा परिस्थितीला उबून, ‘आता मृत्यू आला तर सुटेन तरी,’ असं म्हणतात किंवा अगदी सर्व सुख लाभल्याच्या आनंदातही वार्धक्याच्या टप्प्यात काही जण म्हणतात की, ‘आता कोणतीही इच्छा राहिलेली नाही. देवानं आता कधीही न्यावं.. सुखाचा मृत्यू द्यावा.’ पण म्हणून प्रत्यक्ष मृत्यू आला तर हे सारे त्याचं स्वागत करतीलच असं नाही! श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आहे ना? त्यांच्या एका शिष्याच्या वृद्ध मातोश्रींनी महाराजांना सांगितलं की, ‘‘महाराज! आता मी अगदी आनंदात आहे. आता एकच इच्छा आहे की, तुमच्या पायाशी शांतपणे मृत्यू यावा..’’ महाराज लगेच काय म्हणाले?‘‘माय, आजचा दिवस फार चांगला आहे. शिवाय मी इथंच आहे, मग आताच साधायचं का?’’ त्यावर गडबडून ती माय म्हणाली की, ‘‘म्हणजे अगदी आताच नको!’’

तर मृत्यू असा नेहमीच नकोसा वाटतो.. पण वरकरणी सर्वसामान्य भासणारे काही तयारीचे साधक आणि साधिका मला जवळून पाहाता आल्या ज्यांनी मृत्यूचं नुसतं स्वागतच केलं असं नाही तर जणू त्यानं कधी यायचं ती वेळही ठरवून दिली! आत्महत्येबद्दल म्हणत नाही मी हे! आत्महत्या करायलाही मोठं धाडस लागत असलं तरी ते गौरवास्पद नाही. जगण्याची भीती वाटणं हा कमकुवतपणाच आहे आणि असा कमकुवतपणा जर असंवेदनशील यंत्रणा निर्माण करीत असेल तर तेही निंदनीयच आहे; पण मुख्य म्हणजे नुसतं स्वत:च्या देहाचं जगणं संपवणं ही आत्महत्या नाही, तर दिशाहीन जगणं, आत्मभान गमावणं ही खरी आत्महत्या आहे; पण या व्यापक विषयाला आत्ता स्पर्श न करता पुन्हा मृत्यूकडे वळू..

मृत्यू ज्याच्या समीप असतो, त्याला त्याचा स्वीकार करता येत नसतोच, पण त्याच्या मृत्यूचा स्वीकार त्याच्या आप्तांनाही साधत नाही. मनुष्यपणाच्या दृष्टीनं ते स्वाभाविकही आहे.. कारण मन आहे म्हणूनच मनुष्य आहे ना? आणि हे मन देहाला आधार मानतं, त्यामुळे हा देहाचा आधारच हिरावून घेणारा मृत्यू मनाला स्वीकारता येत नाही. ज्यांचं केवळ असणंदेखील आपला भावनिक आधार असतो त्यांच्या जाण्यानं आपल्याला निराधार झाल्यासारखं वाटतं.. पण ज्यांचं मन देहभावापलीकडे गेलं आहे त्यांची गोष्टच वेगळी. श्रीगोंदवलेकर महाराजांचे अनन्यभक्त भाऊसाहेब केतकर यांच्या पत्नी अतिशय आजारी होत्या. श्रीमहाराजांनी भाऊसाहेबांना विचारलं की, ‘‘भाऊसाहेब, आता काय करावं?’’ अशा क्षणी कुणीही आपल्या सद्गुरूंकडे प्राण वाचविण्याची याचनाच करतो ना? पण भाऊसाहेब म्हणाले की, ‘‘महाराज, जे त्यांच्या हिताचं आहे ते करा! म्हणजे मला वाटतं म्हणून तिनं जगावं, ही इच्छा नाही. जर मृत्यू तिच्या हिताचा असेल तर मी त्या वास्तवाचाही स्वीकार करायला तयार आहे!’’ पण हे वास्तव स्वीकारणं जड जातंच. एका प्रथितयश डॉक्टरांचा एक अगदी जवळचा आप्त एका भीषण अपघातानंतर रुग्णालयात दाखल झाला. प्रकृती ढासळत जाऊन तो कोमातही गेला. प्रकृती चिंताजनक झाली आणि तो वाचला तरीही सामान्य माणसाप्रमाणे जगू शकणार नाही, असं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. उत्तम वैद्यकीय ज्ञान असूनही भावनेची गाठ अधिक बळकट झाली. त्या आप्ताला कसंही करून महाराजांनी वाचवावं, यासाठी प्रार्थना करायला ते डॉक्टर विनवू लागले. अशी प्रार्थना करू नये, मृत्यू जर त्याच्या हिताचा असला आणि जगणं हेच त्याच्यासाठी क्लेशकारक ठरणार असेल, तर अशी प्रार्थना तर क्रूरच ठरेल, असं त्यांना समजावलं. तरी हट्ट कायम होता; पण नंतरच्या एकाच दिवसात प्रकृती जसजशी ढासळू लागली आणि भावावेगावर वैद्यकीय ज्ञानानं ताबा मिळवला तसतशी विनंती वास्तवाशी समांतर झाली. ‘‘कसंही करून महाराजांनी वाचवावं,’’ इथपासून ‘‘त्यांना शांत मृत्यू यावा,’’ इथपर्यंत प्रार्थनेचं स्वरूप बदलत गेलं.

पण तरीही भाऊसाहेबांसारखी मनाची बैठक होणं सोपं आहे का? जे. कृष्णमूर्ती म्हणत त्याचा आशय असा की, ‘‘एखादा जवळचा माणूस गेला म्हणून तुम्ही धाय मोकलून रडता. ते रडणं त्याच्यासाठी नसतं, तर तुमच्यासाठीचंच असतं! तुमचा आधार गेल्याच्या जाणिवेचं ते आक्रंदन असतं!’’ अर्थात यात काही गैर आहे, अस्वाभाविक आहे असं नाही. बरेचदा ते अश्रू कृतज्ञतेचेही असतात. तरीही मृत्यूच्या वास्तवाला कसं पचवावं, हा प्रश्न जिवंत राहतोच! काही श्रेष्ठ साधकांच्या जीवनातून मी ते अनुभवलं.. भले मला ते साधेल का, हे माहीत नाही!

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com