संहिता जोशी

विदा-तंत्रज्ञान बऱ्याचदा कसं काय चुकतं? ‘स्त्री’ म्हटलं की ‘गौरवर्णीय स्त्री’ असंच गृहीत धरलं जाणं, ही केवळ तांत्रिक त्रुटी असते का? की, सांस्कृतिक वर्चस्वाचे रुजलेले पैलू आता तंत्रज्ञानातूनही वर येत आहेत? मुळातले भेदाभेद, अन्याय्य कल आता तंत्रज्ञानामुळे आणखी गडद होत जात आहेत, यावर काही उपाय नसेलच का?

या लेखमालेत वारंवार दिसणारं वाक्य असेल – विदाविज्ञानाच्या (डेटा सायन्स) मशीन लर्निग या शाखेचं काम आहे, वारंवार दिसणारे पॅटर्न ओळखून त्यातून भाकितं करणं.

गेल्या लेखात म्हटलं होतं, फोटोंचं वर्गीकरण करणाऱ्या गूगलच्या अल्गोरिदमनं कृष्णवर्णीय तरुणीचं वर्गीकरण गोरीला असं केलं. त्याचं कारण होतं, फोटो बघून शिकणाऱ्या अल्गोरिदमला कृष्णवर्णीय स्त्रियांचे, कदाचित पुरुषांचेही पुरेसे फोटो दाखवून – हा फोटो कृष्णवर्णीय स्त्रीचा – असं शिकवलेलंच नव्हतं. लहान मुलांना जसं शिकवावं लागतं – हा कान, ते नाक – तसंच फोटोंची विदा (डेटा) वापरणाऱ्या न्यूरल नेटवर्कसारख्या अल्गोरिदमलाही हे शिकवावं लागतं. लहान मुलांना दोन-चारदा कान दाखवून पुरेल; विदाविज्ञानात हजारो प्रकारे कान दाखवावा लागेल. शिवाय माणसाचा कान निराळा आणि हत्तीचा कान निराळा, हे शिकवण्यासाठीही हजारो फोटोंची विदा दाखवावी लागेल.

जगात कृष्णवर्णीय लोक कमी नाहीत; मोबाइल कॅमेरा वापरून फोटो काढणारे आणि ते फोटो गूगलवर चढवणारे कृष्णवर्णीय लोक कमी नाहीत. तत्त्वत: गूगलकडे हजारो काळ्या, गोऱ्या, सावळ्या अशा वेगवेगळ्या वर्णाच्या, चेहऱ्यांची ठेवण असणाऱ्या लोकांचे फोटो असायला हवेत. तरीही गूगलका चुकलं?

सॉफ्टवेअर, कृत्रिम प्रज्ञा, अशा विषयांमध्ये सध्या अमेरिकी कंपन्या आघाडीवर आहेत. गूगल, फेसबुक (इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकचाच भाग आहेत), ट्विटर, अ‍ॅमेझॉन ही मोठी उदाहरणं. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या आणि त्या चालवणाऱ्या लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात गौरवर्णी, तरुण वा मध्यमवयीन पुरुष आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे कोण, हे तंत्रज्ञानाला विचारलं जातं, त्यांच्या लेखी तिशीचा गोरा पुरुष म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती असते. भारतातून गूगललं तर बहुतेक भारतीय-गोरा पुरुष दिसेल. कारण भारतातही शिक्षण-तंत्रज्ञानात अशा दिसणाऱ्या समाजगटांचं वर्चस्व आहे. आपल्याकडेही देवाचं चित्र गूगलल्यावर किती लोकांना कालीमाता किंवा वेतोबा अपेक्षित असतात आणि दिसतात; किती वेळा रविवम्र्यानं काढलेल्या गोऱ्यागोमटय़ा, सोज्वळ देवता अपेक्षित असतात, दिसतात!

अशा समाजगटांना आपण अन्याय करत आहोत, याची जाणीवही नसते. तरीही अन्याय होत राहतो. उदाहरणार्थ सोबतचं चित्र पाहा. ते जालावर फार पसरल्यामुळे – व्हायरल झाल्यामुळे – मला माझ्या विचारकूपातून (एको चेंबर) मिळालं. मानवी शरीरातले स्नायू दाखवायला गूगलला सांगितलं, की समोर येतात पुरुषाच्या शरीरातले स्नायू. ती अर्धीच लोकसंख्या झाली. उरलेल्या अर्ध्या लोकसंख्येच्या शरीरातले स्नायू फार निराळे दिसतात; पण ते दाखवले जात नाहीत.

समाजातल्या अन्याय्य कलांची आणखी बरीच उदाहरणं देता येतील. ‘जोडपं’ म्हणजे एकेक स्त्री-पुरुष; मराठी म्हणजे फक्त प्रमाणभाषा आणि मराठीच्या असंख्य बोलीभाषा ‘अशुद्ध’; अशी अनेक. हे कल पिसाच्या झुलत्या मनोऱ्यासारखे असतात. मुळात मनोरा बांधला तो कललेला असण्यासाठी नाही; तो प्रसिद्ध झाला कलल्यामुळे. आता तो सरळ करायचा तर मुद्दाम कष्ट घ्यावे लागतील. पिसाचा मनोरा कलता असल्यामुळे कोणालाही त्रास होत नाही; पण समाजातले कल असे नसतात. ज्यांच्यावर त्यांमुळे अन्याय होतो, त्या गटांना त्याची किंमत मोजावी लागते आणि दुसऱ्या गटाला बहुतेकदा याची जाणीवही नसते.

हे कल कमी करायचे असतील तर मुळात तंत्रज्ञान बनवणाऱ्या लोकांना या अन्याय्य कलांची जाणीव असावी लागते. बोलताना बरेचदा मीही सामान्य मनुष्य म्हणजे पुरुष, अशी वाक्यरचना करते; लिहिताना विचार करायला वेळ मिळतो, त्यामुळे त्यात सामान्य मनुष्य म्हणजे स्त्री, असं लिहिते. अन्याय ठरवूनच केला जातो असं नाही, तर तो होतो. अनेकदा अन्याय होणाऱ्या गटांनाही याची जाणीव नसते.

मुळातले भेदाभेद, अन्याय्य कल आता तंत्रज्ञानामुळे आणखी गडद होत जात आहेत. कृष्णवर्णीय स्त्रीचं वर्गीकरण ‘गोरीला’ असं करणं यात सरळच वंशवाद दिसतो. पण ‘स्त्री’ची प्रतिमा शोधायला गेल्यावर फक्त गोऱ्या स्त्रियांचीच चित्रं प्रकर्षांनं दिसत असतील तर त्यातही वंशवाद आहे. ही पसा आणि सत्तेच्या सांस्कृतिक वर्चस्वाची छुपी ताकद असते. गोरी स्त्री असण्यात काही चूक नाही, पण स्त्री म्हणजे गौरवर्णीय असा समज पसरवणं हे सांस्कृतिक वर्चस्व. किंवा भारतमाता म्हणजे सालंकृत, सुवासिनी, हिंदू स्त्री; हे सांस्कृतिक वर्चस्व.

हे आणि असे अनेक कल अन्याय्य आहेत आणि ते बदलले पाहिजेत, हे समजण्यासाठी मुळात सामाजिकशास्त्रांचा अभ्यास करावा लागतो. तंत्रज्ञान बनवणारे सॉफ्टवेअर अभियंते, तंत्रज्ञानामुळे मिळणाऱ्या विदेचा, आकडय़ांचा अर्थ लावणाऱ्या माझ्यासारखे विदावैज्ञानिक – यांच्यात याची जाणीव निर्माण होणं महत्त्वाचं आहे. यासाठी विविधता महत्त्वाची ठरते. तंत्रज्ञानक्षेत्रात काम करणारे लोक जर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असतील तर त्यांच्या जाणिवाच निरनिराळ्या असतील आणि त्यांची दखल घेतली जाईल.

सगळे कल अन्याय्य असतीलच असं नाही;  इंग्लिशमधला रंग यासाठी शब्द आहे  colour, पण त्याचं स्पेलिंग चुकीचं असल्याचं संगणक सांगेल कारण संगणकात अमेरिकी पाठभेद  color योग्य असल्याचं आपसूक समजलं जातं. मराठीत कोणता शब्द बरोबर, पोळी का चपाती? की दोन्ही शब्द ग्राह्य़ आहेत? ‘पोळी’ हा शब्दच प्रमाणभाषेतला आहे आणि म्हणून तोच योग्य आहे, असं म्हणत फोनच्या ऑटोकरेक्टनं ‘चपाती’ खोडून तिथे ‘पोळी’ लिहिलं, तर त्यातला अन्याय दिसतो का?

आता थोडी गंमत आणि त्यातल्या विदा-तंत्रज्ञानाबद्दल. आपल्या पंतप्रधानांनी ढग-रडार-विमानं वगैरे विधान केल्यावर लोकांनी गुगलवर मोठय़ा प्रमाणात शोधाशोध केली, can clouds help escape radar – ढगांमुळे रडारला दिसत नाही का? एवढय़ा लोकांनी ही शोधाशोध केली की त्या इंग्लिश प्रश्नातले पहिले दोन शब्द टंकले तरी गूगल पुढचं वाक्य पूर्ण करायला लागलं होतं. खूप मोठय़ा प्रमाणावर लोकांनी अशी शोधाशोध केली असेल, असं नाही. पण दोन शब्द टंकल्यावर पुढे गूगल जे पर्याय दाखवतं, ते लोकशाही पद्धतीनं ठरतात.

म्हणजे, निवडणुकीत जिंकून येणाऱ्या उमेदवारांना ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतात असं नाही; तर इतर, प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा जास्त मतं मिळवणारी उमेदवार जिंकते. आपल्या लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात. गूगलच्या या निवडणुका दिवसातून अनेकदा होत असतील. म्हणजे असं, की समजा गेल्या पाच तासांत त्या विशिष्ट गोष्टीचा शोध सगळ्यात जास्त वेळा घेतला गेला. आता ते विधान शिळं झालं, आता पुन्हा हवामानशास्त्राशी संबंधित ढग-रडार शोध जास्त प्रमाणावर घेतले जात असतील; तर आता can clouds एवढं टंकलं तर कदाचित स्थानिक हवामानाशी संबंधित पर्याय जास्त दिसतील. ही तुलना पुढे वाढवायची तर can clouds हा मतदारसंघ. मतदार म्हणजे आपण सगळे गूगलणारे लोक.

ज्या लोकांनी असं काही गूगललंच नाही, त्यांनी ‘नोटा’ला मत दिलं, असं समजता येईल. ज्यांनी मत दिलं नाही, त्यांच्या कृतीचा किंवा न करण्याचा काही परिणाम घडला नाही.

देवता म्हटल्यावर कालीमाता किंवा वेतोबा दिसायला हवे असतील तर ते सतत डोळ्यांसमोर आले पाहिजेत; प्रत्यक्षात आणि जालावरही.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com