संहिता जोशी

कोणी तरी कुणाला तरी सतत बघतं आहे, असं सतत ‘नजरेत’ असल्यामुळेच आपल्यात व्यक्ती म्हणून- समाज म्हणून बदल होताहेत का?

आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धती होती; अजूनही अनेक कुटुंबांमध्ये आहे. घरची गोष्ट बाहेर जाऊ नये, मित्र-मत्रिणींपेक्षा नातेवाईक जवळचे अशा प्रकारची समाजव्यवस्था आणि मूल्यव्यवस्था होती, अजूनही काही प्रमाणात आहे. आपला स्वार्थ जपून, उन्नती होण्यासाठी, किमान नुकसान टाळण्यासाठी आपली गुपितं फक्त रक्ताच्या नातेवाईकांना माहीत असावीत आणि बाहेरच्या कुणालाही कळू नयेत, असा त्यामागचा विचार.

‘एकविसाव्या शतकात मत्र हेच आपलं कुटुंब असेल,’ असे विचार अनेकांना एकविसाव्या शतकात प्रवेश करताना पटले नसतील; पाश्चात्त्य खुळं वाटली असतील. परवडणारे स्मार्टफोन, डेटाप्लॅन्स आणि फुकटात(!) उपलब्ध असणारी समाजमाध्यमं यांच्या जमान्यात त्या विचारसरणीचा कधी पाडाव झाला आपल्याला समजलंच नाही. समाजमाध्यमांवर आपले आई-वडील, मुलं आपले ‘फ्रेंड्स’ असतात. या बदलत्या भाषेसोबत आपली नाती बदलतीलच असं नाही, किंवा जुनं ते सगळं सोनं असतंच, असंही नाही. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात; आपण त्यांची मुद्दाम दखल घेतो की लोंढय़ात वाहून जातो, असा प्रश्न आहे.

मागे एका लेखात म्हटलं तसं, दोन दशकांपूर्वी आपण किती लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होतो आणि आता किती लोकांना देतो? खासगीपणाच्या भारतीय कल्पना पाश्चात्त्यांपेक्षा बऱ्याच निराळ्या आहेत. घिसंपिटं उदाहरण द्यायचं तर आपल्या समाजात पुरुषानं स्त्रीला ‘तू सुंदर दिसतेस,’ असं म्हणण्याची पद्धत नाही. आता मुली-स्त्रियांना आपले फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करणं कठीण नाही आणि अनेक पुरुषांनी त्यावर ‘लाइक’ देण्यातही नावीन्य नाही.

आपली माहिती अनेक ठिकाणी आपल्या नकळत नोंदली जाते. मोठय़ा शहरांमध्ये सुरक्षिततेच्या कारणांसाठी सीसीटीव्ही जागोजागी लावलेले असतात. गुन्हा घडल्यास, गुन्हेगारांचा तपास लावण्यासाठी, पुढे पुरावा म्हणून या व्हिडीओंचा उपयोग होतो. त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यासाठी त्यांचा फायदा होतो, असं समजलं जातं. भुरटे गुन्हे सीसीटीव्हीमुळे कमी होतात, मात्र पाळत न ठेवता केलेल्या आणि हिंसक गुन्ह्य़ांचं प्रमाण सीसीटीव्हींमुळे कमी झाल्याचं दिसत नाही, असे निष्कर्ष ब्रिटिश आकडेवारीतून निघाले आहेत. ब्रिटनमध्ये सीसीटीव्हीचं प्रमाण सर्वाधिक आहे, ही बाब लक्षणीय.

याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सर्वसामान्यांचीही नोंद होत असते. सिनेमा बघून बाहेर पडताना, ऑफिसात शिरताना, बागेत फिरताना, अनेक ठिकाणी. बँकेसारख्या ठिकाणी, जिथे गुन्हे पाळत ठेवून केले जातात तिथे सीसीटीव्हीचा उपयोग होतो. हेच कॅमेरे मशीन लìनगसारख्या अत्याधुनिक यंत्रणा वापरून आपला चेहरा ओळखू शकतात. आपला व्यवहार संपूर्ण स्वच्छ असला तरीही सतत आपल्यावर पाळत ठेवता येते. जर आपण गुन्हेगार नसू तर काय फरक पडतो? सध्या काही मराठी विचारवंत, साहित्यिकांच्या जिवाला धोका आहे असं म्हणून २४ तास सुरक्षा पुरवली जात आहे; त्यांचं म्हणणं आहे की, या सततच्या सोबतीमुळे स्वतंत्र विचार करणं कठीण झालं आहे. हा आपल्या स्वातंत्र्यावर घाला आहे. सीसीटीव्हींमुळे आपल्या स्वातंत्र्य आणि खासगीपणाचा संकोच झाला आहे.

गेल्याच आठवडय़ात पाश्चात्त्य माध्यमांमध्ये आकडेवारी प्रसिद्ध झाली; ‘वाईट वर्तना’मुळे चीन सरकारनं २०१८ या वर्षांत सव्वादोन कोटींपेक्षा जास्त लोकांच्या प्रवास करण्यावर बंधनं घातली. चीन सरकारनं ‘सामाजिक गुणव्यवस्था’ तयार केली; चांगल्या वर्तनाबद्दल अधिक गुण, सोयीसवलती आणि वाईट वागल्यास अधिक बंधनं अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. रस्त्यावर कोणी थुंकलं तर त्यांना हटकणं किंवा सिग्नल तोडला तर दंड करण्यासाठी चौकाचौकांत पोलीस असण्याची आपल्याला सवय आहे. सीसीटीव्ही, चेहरा आपसूक ओळखला जाणं आणि या सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या असणं हे नवं तंत्रज्ञान आहे, ज्यात प्रत्येक व्यक्तीकडे बहुतांश वेळ नजरा रोखलेल्या असतात.

‘बिग बॉस’ हा प्रकार रिअ‍ॅलिटी टीव्ही शो म्हणून आपल्याला माहीत आहे. एक प्रकारे सगळे चिनी ‘बिग बॉस’च्या घरातच राहत आहेत. सामाजिक गुण कमी असलेल्या लोकांना कर्ज मिळवणं, प्रवास करणं, या सगळ्या गोष्टी कठीण होणार. त्यात एकदा अडकल्यावर पुन्हा सुधारण्याची संधी किती, लोकांवर सतत लक्ष ठेवणं किती योग्य आणि मुख्य म्हणजे या गुणव्यवस्थेत कोणाला जास्त गुण, कोणाला कमी गुण यात काहीही पारदर्शकता नाही. मायबाप सरकार म्हणेल ते प्रमाण!

चीनमध्ये भारतासारखी लोकशाही नाही. माध्यमांना स्वातंत्र्य नाही; बाकीचं जग वापरतं ते फेसबुक, गुगल चीनमध्ये उपलब्ध नाही. ही पारदर्शकता भारतात आहे. कारगिलमध्ये सन्य तोफा डागत असताना, २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्याच्या वेळेस एनएसजी आपल्या जिवावर उदार होऊन दहशतवाद्यांचा मुकाबला करत असताना, पत्रकार याचं थेट प्रक्षेपण देशभर करत होते. जी माहिती दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना सहज मिळत नव्हती, ती टीव्हीमुळे सहज मिळाली.

पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याचं उत्तर म्हणून बालाकोटला भारतीय वायुदलानं बॉम्ब टाकले. वैमानिकांच्या त्या तुकडीपैकी एक, विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानी नागरिकांना सापडले. त्यांना मारहाण होत असताना काही पाकिस्तानी नागरिकांनी त्यांचा व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर जाहीर केला. माजी विंग कमांडर जे एल भार्गव यांच्या मते, हा व्हिडीओ जाहीर झाल्यामुळे अभिनंदन जिवंत आहेत आणि कोणत्या परिस्थितीत पाकिस्तानी सन्यानं त्यांना ताब्यात घेतलं, या गोष्टी जगजाहीर झाल्या. इस्लामाबादला यांतली एकही गोष्ट नाकारणं अशक्य झालं. बालाकोटला किती वाजता बॉम्बफेक झाली, हा व्हिडीओ किती वाजता जाहीर झाला, कोणत्या उपकरणांवरून हा व्हिडीओ रेकॉर्ड झाला, अशा अनेक गोष्टी या व्हिडीओसोबत उपलब्ध आहेत. त्यातून हा व्हिडीओ खरा की खोटा हे तपासणं सहज शक्य झालं.

फेसबुक, गुगल, ट्विटर ही माध्यमं जगभर उपलब्ध आहेत. पाकिस्तानी नागरिकांनी हा व्हिडीओ नेमका कोणत्या हेतूनं प्रकाशित केला, हे सांगणं कठीण आहे. मात्र याचा फायदा भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांना झाला. व्हिडीओ तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांची सहज उपलब्धता यातून देशभक्ती म्हणजे काय, याची व्याख्या बदलली का? ‘वुमन इन गोल्ड’ नावाच्या सिनेमात, एक ऑस्ट्रियन पत्रकाराचं पात्र आहे. आपल्या देशाच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात, जनमताविरोधात जाऊन तो दोन अमेरिकी नागरिकांना मदत करतो. तो म्हणतो, ‘‘माझ्या देशानं कोणावरही अन्याय करू नये, असं मला वाटतं. देशभक्तीचा अर्थ मी असा लावतो.’’

आपल्याकडे अनेकदा बंद पुकारले जातात तेव्हा जाळपोळ होते; पाकीटमार हातात सापडला तर त्याला जथे मिळून मारहाण करतात; कधी गोमांस बाळगल्याच्या संशयावरून किंवा दुधासाठी गाई खरेदी केल्या तरी संशयावरून मारहाण होते. अमेरिकेतली सध्याची उदाहरणं म्हणजे कृष्णवर्णीय गाडीचालक, तरुणांना पोलीस पकडून मारहाण करतात, गोळ्या घालतात तेव्हा पोलिसांच्याच अंगावर लावलेल्या कॅमेऱ्यातून या प्रकारांची व्हिडीओ नोंद होते; पोलिसांना त्याचा जाब द्यावा लागतो. कळत-नकळत सामाजिक बदल घडण्यासाठी बंदूक आणि लाठीपेक्षा सहज उपलब्ध असणारा आणि अिहसक उपाय आहे, कॅमेरा आणि समाजमाध्यमं.

सीसीटीव्हीचे कॅमेरे आपल्यावर रोखलेले असतात तसेच आता जिथं माणूस असेल तिथं जगाची नजर आपल्याकडे रोखलेली असू शकते. जगभर पसरलेल्या या माध्यमांतून, तंत्रज्ञानामुळे देशभक्ती म्हणजे काय याची व्याख्या बदलू शकते; सभ्यपणा आणि कायद्याचं राज्य पसरायलाही मदत होऊ शकते. प्रश्न असा आहे, आपण या बदलांचा स्वीकार डोळसपणे करत आहोत की लोंढय़ात वाहून जात आहोत? सभ्य-सुसंस्कृतपणा, देशभक्ती म्हणजे काय, या व्याख्या विचारपूर्वक ठरवत आहोत, की कोणी व्यक्तीनं किंवा जथ्यानं अधिकारवाणीनं सांगितलं म्हणून हो-ला-हो करत आहोत.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com